पॅकेज असतं रे

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
17 Jun 2021 - 10:03 am

“समोशात साखर टाकली का रे?” पहिला घास घेताच निखिल ओरडला.
“नाही साहेब बटाटे गोड आहेत. नवीन बटाटे पूर्ण तयार व्हायच्या आधीच मार्केटात येते. ते गोड राहते.”
“पण समोशाची चव बिघडते ना.”

अपरिपक्व बटाट्यामुळे त्याचा मूड गेला तशीही त्याला Too much Too early ची खूप चीड होती. समोशाची प्लेट तशीच ठेऊन तो अक्कलकोटकडे निघाला. तो अधूनमधून देवस्थानाला भेट देत असतो. देवाच्या पाया पडणे तर होतेच पण त्याचा विश्वास होता अशा ठिकाणी नवीन आवाज सापडतो, असा आवाज ज्यावर शहरातल्या सुगम संगीत विद्यालयाचे संस्कार नाही. गाताना उगाच ताना नाही की गरज नसताना उंचावलेला सूर नाही. अशा आवाजांच्या शोधातच तो गेली तीन वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकत होता. देवस्थानातील भजन किर्तन, तमाशाचे फड अशाच ठिकाणी त्याला हवा असलेला असंस्कारीत आवाज सापडेल असा त्याला विश्वास होता. त्याचा विश्वास खोटा नव्हता काही दिवसापूर्वी अशाच एका किर्तनात त्याला काव्या पाध्ये नावाचा हिरा गवसला होता. पिढ्यान पिढ्या घरात असणाऱ्या किर्तनाच्या परंपरेमुळे तिचा गळा तयार होता. त्याने तिला त्याच्या ओळखीतल्या धारवाडमधील गुरुकडे काही गोष्टी शिकायला पाठवले होते. आत पुढे काय अशा विचारातच तो जात होता. त्याचा फोन वाजला, फोनवर रेवती होती. समोशाचा राग उपहासाच्या रुपाने रेवतीवर निघाला.

“हॅलो रेवती श्रृंगारपुरे क्वीन ऑफ सिंगिंग रियालिटी शो”
“किती तिरकस बोलशील, But I tell you I am proud of my show.”
“जज पासून स्पर्धकापर्यंत सर्वांना गायक असूनही अभिनय करायची संधी देणारा शो.”
“नवीन गायकांना टॅलेंट दाखवायचे व्यासपीठ.”
“टॅलेंट” असे म्हणत तो जोरात हसला. “कुणी माझे माहेरी छान म्हटले तर त्याला पुढल्या वेळी उची है बिल्डिंग म्हणायला सांगता. टॅलेंट.”
“It is a package. तुला माहीती आहे सारे. कालपर्यंत तू या साऱ्याचा भाग होता. तू काय पराक्रम केला. गेली तीन वर्षे गावोगाव हिंडतोय मिळाली तुला कुणी श्रेया घोषाल?”
“नाही पण मी कुणाला खोटी स्वप्ने दाखविली नाही.”
“शो म्हटला की शोबाजी आलीच. कुठुन आणार टॅलेंट. भारतात वर्षाला तीस ते चाळीस टॅलेंट सर्च शो होतात. एका शोमधे दहा गायक जरी घ्यायचे म्हटले तरी दरवर्षी तीनशे तयार गायक लागतील. ते स्वप्न वगैरेंचे म्हणशील तर गायकांनाही कळायला हवे आपण किती पाण्यात आहोत ते. काय रे मी दोन महिन्यानंतर तुला फोन केला ते काय तुझ्याशी वाद घालायला.”
“सॉरी.”
“यू मस्ट, मी टिव्ही कधीच सोडला, आता वेबमधे आहे.”
“अरे हो तू टिआरपीच्या चक्रातून सुटली आता.”
“टिआरपी गेले तर लाइक्स व्ह्यूज, कॉमेंटस आले. No business can be done without counting numbers.”
“बोल काय काम काढलं या फकीराकडे.”
“तू नाही पाठविले पण तुझ्या एका कार्यक्रमाचे विडियो बघितले. ते सौभाग्यदा लक्ष्मी गाणारी कोण?”
“काव्या पाध्ये, ती माझी गायक आहे, माझ्या गायकांना हात लावू नको तू.”
“माझे गायक म्हणे तू काय कॉन्ट्रॅक्ट केले त्यांच्याशी. मी आमच्या वाह मराठी वेब चॅनेलवर डिजीटल राणी कार्यक्रम करतेय. दहा गायक घ्यायचेत. त्यात तुझी मदत लागणार आहेत. नवीन गाणी, नवीन गायक आणि नवीन प्लॅटफॉर्म”
“अग तिचा डिजिटलशी काही संबंध नाही”
“ते कपिल बघून घेईल. तू तिचे डिटेल्स पाठव. तुला सांगते निखिल this is going to be big hit. मी बिलियन व्ह्यू टारगेट करत आहे. तू जॉइन हो ना, मजा येईल.”
“ए बाई मला माफ कर. मी काही ते लाइक करा, शेअर करा असे ओरडू शकत नाही.”
असे म्हणत तो जोरजोरात हसला. तो रेवतीच्या पद्धतीला हसला नाही असे कधी होत नव्हते. शो मात्र रेवतीचेच गाजले आणि रेवती एकेक पायरी चढत पुढे गेली. आज ती वाह मराठी या मोठ्या मिडिया ग्रुपच्या डिजिटल चॅनेलची मुख्य होती. रेवती आणि निखिल तसे बोलणार नाहीत पण फोन केला तर तासभर ठेवणार नाहीत. सूर्य मावळत होता, चंद्राची प्रभा पसरत होती. काहीतरी मावळून कशाचा तरी उदय होता आणि धुळीचा धुराडा उडत होता.

***

“तो लाइट कमी कर. वेब आहे टिव्ही नाही. Show realism here.”
रेवती जोरात ओरडली. डिजीटल राणी कार्यक्रमाच्या शेवटल्या विडियोचे शूट सुरु होते. स्वतः रेवती कार्यक्रमाविषयी माहिती देणार होती म्हणून तिने तिच्या फार्म हॉऊस मधे शूट ठेवले होते. सारी तयारी आता झाली होती. महाराष्ट्रातून सात, हैदराबाद, बेळगाव आणि बडोदा मिळून असे दहा गायक शोधले होते. तीन संगीतकारांनी दहा गाण्यांना चाली लावल्या होत्या. गाण्यांचे, गाण्यांच्या मेकींगचे सारे शूटींग संपले होते. सर्व गायकांना डिजिटल अस्तित्व प्राप्त झाले होते. कपिलने प्रत्येकीला इंस्टावर मिलियन फॉलोअर मिळवून दिले होते. प्रत्येक गायकाचे फॅन अकाउंट, फॅन पेज सारे तयार झाले होते. काव्याने सहज सुरवात म्हणून तिचा दापोलीच्या समुद्रावरचा फोटो इंस्टावर टाकला तर तासाभरात त्याला दोन हजार लाइक्स आणि पाचशे कॉमेंट्स आल्या. या साऱ्या गोष्टी मॅनेज करण्यात कपिलचा हातखंडा होता. टिव्हीत असल्यापासून तो रेवतीच्या कार्यक्रमाचे डिजीटल मार्केटींगचे काम बघत होता. ट्विट स्ट्रेटेजी, हॅशटॅग, फोटो मिक्सिंग, मिम्स, यूट्यूबच्या थंबनेल या साऱ्याचा त्याने आराखडा बनविला होता. रेवतीचे प्रत्येक गोष्टीवर किती बारीक लक्ष असते याची त्याला पूर्ण कल्पना होती. रेवतीला कस खूष ठेवता येईल याचाच विचार तो करीत होता. रेवती त्याच्यापेक्षा दहा वर्षानी मोठी असली तरी त्याला आवडत होती. एखादा कार्यक्रम उत्तम पॅकेज करुन लोकांसमोर आणण्याचे रेवतीचे कसब, व्यवसायातल्या बारकाव्यांचे तिला असलेले ज्ञान, तिची काम करायची पद्धत हे सारं त्याला आवडत होते. स्वतःच्या मनातले तिच्यासमोर बोलायची हिंमत झाली नव्हती.

आजच्या शूटमधे रेवती सुरवातीला कार्यक्रमाविषयी सांगणार होती आणि नंतर इतर गायिका बोलणार होत्या प्रत्येकाला ते लाइक करा, शेअर करा वगेरे सांगायचे होते. रेवती, तिच्या कुत्र्याला मॅक्सला घेऊन आली होती. ब्लू जिन्स आणि गुलाबी रंगाचा टि शर्ट त्यावर #डिजीटल राणी असा पेहराव तिने केला होता. कपिलने रेवतीला विचारले.
“अरे क्या, नो ट्रेड मार्क रेवती साडी टुडे.”
“अपील टू न्यू जनरेशन कपिल.” असे म्हणत तिने त्याला टाळी दिली. ती बोलत असतानाच डायरेक्टरने सूचना दिल्या.
“मॅम तुम्ही बोलत असताना आपण मॅक्सला तुमच्याकडे पाठवू म्हणजे घरगुती फिलिंग येईल.” डायरेक्टरने इशारा देताच तिने बोलायला सुरवात केली.
“नमस्कार मी रेवती श्रृंगारपुरे, वाह मराठी तुमच्यासाठी घेऊन येतेय दहा नवीन गायिका आणि दहा नवीन गाणी, #डिजीटल राणी. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ओह सॉरी”
“काही हरकत नाही मॅम, तुम्ही बोलत रहा. आपण हे फनी मोमेंटस म्हणून घेऊ.”
“That is innovative, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दहा गायिका आम्ही निवडल्या आहेत. लक्षात ठेवा ही स्पर्धा नाही, इथे पुरस्कार नाही. या गायिकांना हवे आहे फक्त तुमचे प्रेम. तुम्हाला त्यांना मोठे करायचे आहे. तुम्हाला काय करायचे आहे.” तेवढ्यात मॅक्स धावत तिच्या जवळ आला.
“तुला सांगायचे?” मॅक्स उगाच लाडाने भो भो करीत हाता. बघा मॅक्स सुद्धा तेच सांगतो. “लाइक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा.”
लगेच टाळ्या वाजल्या, डायरेक्टरने रेवतीच्या बोलण्याची तारीफ केली. रेवतीने तिकडे दुर्लक्ष करीत कपिलला विचारले
“काय कपिल तुला इंस्टा पब्लिसिटीसाठी मटेरियल सापडले की नाही?”
“Enough”

आता गायिकांच्या शूटला सुरवात झाली. पहिलाच नंबर काव्याचा होता परंतु गेला अर्धा तास ती फोनवर बोलत होती. तिचे असे वागणे रेवतीला अजिबात आवडले नव्हते. तिचा संताप तिच्या डोळ्यात दिसत होता. या आधीसुद्धा रिहर्सलमधे, शूटींगमधे तिच्यविषयी अशा तक्रारी आल्या होत्या. सेटवरील वातावरण बघताच काव्या घाबरली. तिने घाबरतच दिग्दर्शकाला सांगितले
“आमच्या निखिल सरांचा फोन होता.”
“आम्ही इथे उगाच बसलो आहोत.” तिच्या उत्तराने रेवती अधिकच चिडली. ती कपिलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली “बघितल कपिल. एक गाण आल नाही तर हे नखरे, उद्या हिट झाला तर काय रेवतीने यांच्या पाया पडायचे?” असे म्हणत ती निघाली. मागे वळत तिने कपिलला आवाज दिला.
“ए चल कपिल काही गोष्टी ठरवून टाकू.” दोघेही शांत चालत आत आले. आत येताच रेवतीने दोघांचे ग्लास भरले. दारुचा घूट आत जाताच तिचा राग शांत झाला. कपिलने विषय बदल म्हणून विचारले.
“रेवती गाणी ऐकली, चाली मस्त आहेत ना” रेवती हसली. “तुला काय कळत गाण्यातल. गंधार म्हटल तर जोशांचा का कुलकर्ण्यांचा असे विचारशील तू.” रेवतीने कपिलला टाळी दिली. मग कुठेतरी शून्यात बघत ती बोलली. “त्याच चाली आहेत. इथे निखिल हवा होता. त्याने बरोबर काम करुन घेतले असते. म्हणे वेळ नाही. त्या काव्याशी फोनवर गप्पा मारायला वेळ आहे मला साधे बेस्ट लक सुद्धा दिले नाही. काय चुकले माझे. I always try to do perfect show.”
“जाऊ दे ना यार” कपिलची व्हिस्की बोलून गेली पण रेवतीच्या रोखून धरलेल्या डोळ्यांनी तो लगेच भानावर आला.
“सॉरी……. रेवती.” त्याच्या या घाबरलेल्या उत्तरावर रेवती मनसोक्त हसली. तिने हलकेच त्याच्या गालावर टपली मारली आणि त्याच्या ग्लासात व्हिस्की ओतली. तो पुढे बोलत होता
“त्या काव्यात काही दम नाही मठ्ठ आहे, चेहऱ्यावर एक्सप्रेशन नाही.”
“आवाज चांगला आहे गातेही छान”
“नुसतं गाण्याचा काय उपयोग. पॅकेज लागत. फोटजेनिक चेहरा, एक्सप्रेशन ये सब मंगता है. Prajakta will top. काय एक्सप्रेशन देते.” त्याच्या या उत्तराला रेवती आणखीनच हसली.
“तुझ गणितच वेगळ, तुझा प्रमोशनचा प्लॅन तयार आहे.”
“हो.”
“त्यात थोडसं नटखट, सेक्सुयल अंडरटोन अस काही करता येईल तर बघ. वेबमधे हे लागते.” व्हिस्की वाईन आणि गप्पा न थांबता सुरु होत्या. कपिलच्या उत्तरावर रेवती खूप हसत होती, टाळ्यावर टाळ्या देत होती, त्याच्या गालावर टपली देत होती, तर कधी पाठीवर थाप देत होती. तिने टाळी दिली की तिचा हात असाच धरुन तिला सारे सांगून टाकावे असे कपिलला वाटत होते परंतु रेवती भलत्याच मूडमधे होती. तिला असे मनसोक्त हसताना बघून कपिल सुखावत होता.
“आता रात्रीचा कुठे जातो. उद्या सकाळी जा मुंबईला”

***

कपिल सुखात्मे याची आत्महत्या या बातमीने महाराष्ट्र हादरला असे म्हणणे अतिशयोक्तीचे होते कारण मिडियामधील काही मोजकी मंडळी सोडली तर त्याला ओळखणारे कोणी नव्हते. आपण ज्या सेलेब्रिटीला फॉलो करतो, त्यांचे ट्विट, इंस्टा फोटो आपल्या पर्यंत पोहचवणारी व्यक्ती कपिल सुखात्मे आहे हे जाणून घ्यायची कुणाला गरज नव्हती. मिडिया इंडिस्ट्रीत याची काही दिवस चर्चा झाली पण आता रेवती सोडली तर कुणालाच त्याचे पडले नव्हते. त्याने आत्महत्या करावी असे काही घडले नव्हते. आठ महिन्यांपूर्वी त्याने वाह मराठी सोडले होते. त्याने स्वतःची सोशल मिडिया मार्केटींगची कंपनी काढली होती. त्याची कंपनी मराठी आणि हिंदी टीव्ही इंडीस्ट्रीतल्या सेलेब्रिटींचे सोशल मिडिया अकांउंट मॅनेज करीत होती. रेवतीला या आत्महत्येसंदर्भात निखिलशी बोलायचे होते. निखिल मात्र उत्तर भारतात फिरत होता. गेले वर्षभर तो तिकडेच भटकत होता. रेवती त्याच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करीत होती पण तो टाळत होता. रेवतीने पिच्छा सोडला नाही ती रोज वेगवेगळ्या वेळेला त्याला फोन करीत होती. काल त्याने स्वतःहून फोन करुन रेवतीला सांगितले तो महाराष्ट्रात येत होता. तो काव्याला भेटायला दापोलीला चालला होता. त्याच्या येण्याने रेवतीला खूप आनंद झाला तिने त्याला दापोलीलाच भेटू असे कळविले.

वाह मराठी डीजीटल चॅनेलचा पहिला मोठा शो डिजीटल राणी प्रचंड यशस्वी झाला होता. आता त्याला दोन वर्षे झाली होती. रेवतीला हवा असलेला बिलियनचा आकडा केंव्हाच पार झाला होता. रेवती श्रृंगारपुरे या नावाचा दबदबा डिजीटल विश्वात सुद्धा निर्माण झाला होता. प्राजक्ता आता महाराष्टातल्या घराघरात पोहचली होती. काव्याला प्राजक्ता सारखे यश जरी मिळाले नसले तरी तिचे नाव झाले होते. तिलाही दिवाळी पहाट, गणेशोत्सव, शाळा कॉलेजचे वार्षिकोत्सव यात गायला बोलावले जात होते. या साऱ्यात गाणे शिकले थांबले होते. त्याचे तिला काही वाईट वाटत नव्हते. काव्या तिच्या कार्यक्रमात इतकी व्यस्त होती की नवीन काही शिकण्यासाठी तिच्याकडे सवड नव्हती. खरतर गाणं शिकायला ती पुण्याला शिफ्ट झाली होती पण आता फक्त कार्यक्रमासाठी गाणे यातूनच तिचा रियाज होत होता. या साऱ्यात वाह मराठीचा जोरात प्रचार होत होता.

वर्षभरानंतर काव्याला एका राष्ट्रीय टिव्हीच्या हिंदी कार्यक्रमासाठी बोलावणे आले. तिला तर आभाळ ठेंगणे झाले होते. दापोली आणि आसपास किर्तनात अधून मधून गाणारी काव्या आता भारतभर ओळखली जाणार होती. पहिल्या भागात तिने मन लावून ‘तोरा मन दर्पण कहलाये’ गायले. तिथल्या जजने सांगितले

“बहुत अच्छा गाया. पर अगर भक्ती भावको प्रेझेंट करने के लिये सलवार की वजह सारी पहनती तो इम्पॅक्ट जादा होता.”
निखलने तिला फोन करुन सांगितले खालचे सूर बरोबर लागत नाही आहे त्यावर लक्ष दे. नक्की काय करावे हेच तिला कळेनासे झाले होते. हे अस नेहमीचेच झाले होते तिचे नक्की काय चुकत आहे हेच तिला कळत नव्हते. त्यात कार्यक्रमाची क्रियेटिव्ह टिम काहीतरी स्टोरी दे म्हणून तिच्यावर दबाव आणत होती. तिच्याकडे कोणती गोष्ट नव्हती. अशात वाह मराठीने डिजीटल राणीचे दुसरे पर्व केले त्यातून दोन नवीन मुली समोर आल्या महाराष्ट्रात आता त्या मुलींची चर्चा होती. प्राजक्ता अजूनही वाह मराठीच्या कॉन्ट्रॅक्ट मधे होती पण काव्या नव्हती. रेवतीने मुद्दाम तिचा कॉन्ट्रॅक्ट संपवून तिला राष्ट्रिय चॅनेलवर पाठविले अशा अफवा तिच्या कानावर आल्या होत्या. चॅनेलच्या झगमगाटात काव्या आणि तिचे गाणे हरवले होते. दिवसागणिक तिचा आत्मविश्वास कमी होत होता. ती कधी मोकळेपणे मनापासून गाऊ शकली नाही. शेवटी तिचा अंतिम पंधरा स्पर्धकात नंबर लागला नाही. या धक्क्यामुळे काव्या खूप खचली होती. गेले दीडवर्ष ती महाराष्ट्रात स्टार म्हणून वावरत होती आणि अचानक आलेली ही शून्यत्वाची भावना तिला पचवणे जड जात होते. बुजरा एकलकोंडा स्वभाव त्यामुळे काम मिळणे बंद झाले होते. ती सतत स्वतःत कुठेतरी हरवलेली राहत होती. घरच्यांनी काही सांगितले तर त्यांच्यावर उगाच चिडत होती. ती आपल्या जीवाचे काही करील काय अशी भिती तिच्या आईवडीलांना वाटत होती. त्यांनी निखिलला सर्व परिस्थिती सांगितली. त्याने त्यांना हवापालट म्हणून दापोलीला राहा असा सल्ला दिला. तिलाच भेटायला निखिल दापोलीला चालला होता.

“कशी आहेस?”
“ठिक”
“काही नवीन ऐकव.” ती न बोलता शून्यात बघत होती. ती बोलत नाही हे बघून त्याने तिची हनुवटी वर केली. तिचे दोन्ही खांदे हातात घेत तो म्हणाला
“काय आहे ना काव्या तो झगमगाट, सोशल मिडीया, स्टारडम हे सारे पोकळ आहे, दिखाऊपणा आहे हे खर आहे पण त्याची गरज आहे. आपण वाढदिवसाला गिफ्ट देतो तर ते सुद्धा छान पॅक करुन देतो. गिफ्ट ठेवतो आणि पॅकेज फाडून फेकून देतो. हेही तसच असत. Ignore it.”
काव्या अजूनही गप्प होती तशीच पाण्यात धूसर होणारे स्वतःचे प्रतिबिंब एकटक बघत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू तिच्या गालावार ओघळत होते. त्याने ते रुमालाने पुसले. तरी ती शांत होती. बराच वेळ दोघे शांत होते.
“प्रतिबिंबापेक्षा तुझ्या गळ्यात जे आहे ते जप.”
आता तिला हुंदका अनावर झाला. ‘नाही’ असे म्हणत ती निखिलच्या खांद्यावर डोक ठेवून रडायला लागली. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते ती फक्त रडत होती. निखिलला तिच्याशी काय बोलावे सुचत नव्हते, या आधी ती अशी कधीच रडली नव्हती. त्याने हलकेच तिच्या केसांवरुन हात फिरविला. ती तशीच रडत होती. खूप दिवसानंतर ती इतकी मनमोकळी रडत होती. खूप रडत होती, फक्त रडत होती. रडून झाल्यावर तिने निखिलला विचारले
“तुम्ही मला तिकडे का पाठवले सर?”
“मला हिरा सापडला होता तो चमकवायचे काम फक्त रेवतीच करु शकत होती.”
“तिला तर मी अजिबात आवडत नव्हते. माझा राग करायची. मी उत्तम पॅकेज नाही हेच ऐकले मी. नाही सर ते विश्व माझं नाही.” ती बोलायला लागली याने निखिलला उत्साह आला.
“तुझ गाण तर तुझ आहे.”
“नाही सर.”
“मी बोलू रेवतीशी.”
“नको सर. तुमचा फोन आला तर युनीट समोर अद्वातद्वा बोलली होती.”
“तिचे बरोबर होते. आपल्या बोलण्यापेक्षा काम महत्वाचे होते.”
“काम.” ती कुत्सितपणे हसली.
“उत्तम शो करायचा म्हटला तर हे सारं आलच. She is the best.”
“तुम्ही का तिची बाजू घेता सर?”
“माझी बायको आहे. I mean होती. आता बारा वर्षे झाली वेगळे होऊन.”
“हे सार अस घडणार हे तुम्हाला माहीत होत तर”
“अगदीच नाही पण अंदाज होता”.
“तरी तुम्ही मला तिथे पाठविले”
“मी थांब म्हटले असते तर थांबली असती.”
“थांबवून तर बघायचे होते. तेवढा अधिकार तर तुम्हाला होता.”

काव्या त्याच्याकडे बघत होती. त्याने तिच्या डोळ्यात बघितले त्याला त्या डोळ्यांची भिती वाटली. त्या डोळ्यांमुळे त्याचे विचारचक्र थांबले, काव्याला काय उत्तर द्यावे हेच त्याला सुचत नव्हते. ती त्याच्याकडे बघत होती आणि तो तिच्याकडे बघत होता. तितक्यात त्याचा फोन वाजला रेवतीचा फोन होता. त्याने रेवतीला मी आलोच असे सांगितले.
“मला निघावे लागेल. रेवती वाट बघत आहे.” त्याने तिचे डोळे पुसले. तिचे खांदे हातात घेतले आणि तो म्हणाला
“कदाचित तुला गाण्याची गरज नसेल पण गाण्याला तुझी गरज आहे. तू गात रहा.”
रेवती वाट बघत होती रेवतीला जास्त वाट बघायला लावणे म्हणजे एका मागोमाग एक वाइनचा ग्लास तिने घशाखाली ओतणे होते याची त्याला पूर्ण कल्पना होती म्हणूनच त्याच्या गाडीने वेग वाढवला होता. किती उशीर असे ती ओरडण्याआधीच त्याने तिची माफी मागीतली.

“सॉरी.”
“घाबरु नको. I stopped drinking.” ती हसली.
“अरे वाह”
“मी वाह मराठी सोडले.”
“I heard.”
“I want to quit media. कपिलने आत्महत्या केली. रोज रेवती रेवती करणारा असा अचानक निघून गेला.”ती थांबली. एक आवंढा गिळला आणि शांतपणे बोलली. “वाह मराठी सोडायच्या आधी त्याने मला प्रपोझ केले होते. He wants to marry me. तो असा विचारच कसा करू शकत होता.”
“काहीतरी कारण असेन ना.”
“गेली सहा महिने तोच विचार करतेय मी. कामासाठी त्याच्यावर अवलंबून होती, तोही सांगेल ते करायचा, आम्ही रोज भेटत होतो, बऱ्याचदा सोबत ड्रिंक्स घेत होतो, उशीर झाला म्हणून कधी तो रात्री थांबला देखील असेल. या साऱ्याचा अर्थ या रेवतीचे त्याच्यावर प्रेम आहे असा काढला. नाही निखिल. रेवतीचे कपिलवर कधीच प्रेम नव्हते आणि नाही.”
“I know you still love me. You know I too.”
“का कपिलने असा विचार केला असेल?”
“प्रत्येक कार्यक्रमाचे वेगळे पॅकेज करणारे आपण नाती जपताना त्याचे पॅकेज करताना चुकलो. जस टिव्हिच आणि वेबच ऑडीयंस वेगळ तस पॅकेज सुद्धा वेगळ असत तसच नात्यांचेही असते नाही. प्रत्येकासाठी तुमच्या वागण्या बोलण्याचा अर्थ वेगळा असू शकतो. कपिल तुला समजू शकला नाही, मी तुला आणि काव्या मला.”
“BTW I didn’t move her out.”
“but you didn’t stop either.”
“I should have. Sorry”
“मी तरी कुठे चांगला वागतो. सतत तुझा उपहास केला, तुला चिडवले. तरी तू मला कधी विसरली नाही, काही नवीन करायचे म्हटले की लहान मुलीसारखी निखिल निखिल करते. तो खोडकर मुलगा असतो ना मुद्दाम मैत्रीणीला चॉकलेटच्या रॅपरमधे दगड देतो आणि मग चिडून ती त्याच्यामागे धावते. त्याला तिला असे पळविण्यात खूप मजा येत असते. तसाच आहे मी उनाड”
“कधी कधी चॉकलेटपेक्षा आपल्या माणसांमागे पळण्यात अधिक गोडी असते निखिल.”
तिचे वाक्य ऐकून तो चक्रावला, तिच्याकडे एकटक बघत होता, मग हळूच हसला आणि मग जोरजोरात हसायला लागला.
“मी विचार करीत होतो मी डीप इंटेलेक्च्युयल वगैरे आहे आणि तू उथळ शो करणारी.” तो स्वतःशीच हसला. जोर जोरात हसला. हसता हसता त्याने आपला हात टेबलवर ठेवला. रेवतीने सहज तिचा हात निखिलच्या हातावर ठेवला. खूप दिवसांनी तिने निखिलचा स्पर्श अनुभवला होता. गेली कित्येक वर्षे ती या स्पर्शासाठी आसुसलेली होती. लग्नानंतरच्या दिवसापेक्षाही आजचा निखिल तिला हवा हवासा वाटत होता. हा निखिल जपायचा असेल तर हा हात दूर असलेलाच बरा. तिने लगेच हात बाजूला केला. दोन्ही हातावर हनुवटी ठेवून ती निखिलाकडे कौतुकाने बघत होती. तिच्या अशा बघण्याने निखिल ओशाळला. त्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले.

“I think Kavya need me or maybe I need her more.” असे म्हणत ती उठली. पर्स उचलून गाडीकडे चालायला लागली. दूर कुठेतरी मल्ल्य़ाळम गाण्याचे सूर ऐकू येत होते ‘जीवमशमाय ताने नी एन्निल’ (तू माझ्यात सामावलेला आहेस). परत एकदा वाटा वेगळ्या झाल्या होत्या धुळीच्या धुराड्यात खोल आत दडलेला स्वतःच अस काहीतरी जपण्यासाठी.

~मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

कथा

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

17 Jun 2021 - 11:52 pm | विंजिनेर

छान लिहिलंय पण शेवटी आवरती घेतल्यासारखी वाटली कथा. काव्याचं पात्र अजून खुलवता आलं असतं. कपिलने दुसर्या टिव्ही सिरीज मध्ये रोल मिळाला म्हणून ह्या कथेमधून अचानक एग्झीट मारली वाट्टं

गॉडजिला's picture

18 Jun 2021 - 1:36 am | गॉडजिला

लिहलं छानच आहे पण पुरेसं खुलवलं नसल्याने ती मजा आली नाही... एव्रींथिग सोर्टेड वे लाइटली.

मित्रहो's picture

18 Jun 2021 - 5:51 pm | मित्रहो

धन्यवाद विंजिनेर आणि गॉडजिला. तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!
मी स्वतः आंतरजालावरील लेखाची किंवा कथेची लांबी जास्त असेल तर ते वाचत नाही. मी लिहितानाही ते माझ्या डोक्यात असते त्याचमुळे कदाचित कथा एव्रींथिग सोर्टेड किंवा आवरती घेतल्यासारखी होऊ शकते. तुमच्या प्रतिसादामुळे कथा लिहताना माझ्या डोक्यात काय होते याचा परत अॅनॅलिटिकली विचार करता आला.
रेवती आणि निखिल यांचे नाते आतून अजूनही खूप घट्ट, विश्वासाचे असले तरी त्याचे लेबल, पॅकेज उध्वस्त झालेले आहे, धुराडा झाला आहे असा काहीसा विचार करुन कथा लिहायला सुरवात केली होती. हे पॅकेज सांभाळणे त्यांना जमले नाही जे दिवसरात्र मिडियामधे पॅकेज पॅकेज करीत असतात. मग त्यात काव्याचे पात्र आले. आधी फक्त पहिल्या परिच्छेदात आणि शेवटी होते. मग अचानक कपिलचे पात्र सुचले. साधारणतः काव्याचा प्रवास कदाचित आत्महत्येकडे झाला असे केले असते तर ते नेहमीचे होते कपिलन तसे करणे हा धक्का होता म्हणून तसे लिहिले.
जर छापील माध्यमात ही कथा एक दिर्ध कथा म्हणून लिहायची संधी कधी मिळाली तर वरील सर्व त्रुटी दूर करुन लिहायला नक्कीच आवडेल.
खूप खूप धन्यवाद

गॉडजिला's picture

18 Jun 2021 - 6:05 pm | गॉडजिला

रेवती आणि निखिल यांचे नाते आतून अजूनही खूप घट्ट, विश्वासाचे असले तरी त्याचे लेबल, पॅकेज उध्वस्त झालेले आहे, धुराडा झाला आहे असा काहीसा विचार करुन कथा लिहायला सुरवात केली होती. हे पॅकेज सांभाळणे त्यांना जमले नाही जे दिवसरात्र मिडियामधे पॅकेज पॅकेज करीत असतात

छान संकल्पना होती... पण माझ्या नजरेत पॅकेज कंटेक्स्ट बरेच व्हास्ट ठरल्याने अपेक्षित डेप्थ तयार होण्यापुर्वीच आटपले गेले... दोन भागची कथाही जमली आसती. असो पुढिल लिखाणास शुभेच्छा

मदनबाण's picture

18 Jun 2021 - 6:36 pm | मदनबाण

सुरेख लेखन...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami