'माया': एक झुंजं संसाराशी!-अंतिम भाग

सुहास चंद्रमणी बारमासे's picture
सुहास चंद्रमणी ... in जनातलं, मनातलं
3 Jun 2021 - 5:12 pm

.........मायाचा छोटा भाऊ 'प्रभाकर' आयुर्वेदामध्ये 'डॉक्टर' होता. त्याला आपल्या दाजींचे दारूचे व्यसन माहित होते. त्याच्याकडे दारू सोडवण्यासाठी काही जालीम औषध होते. 'प्रभाकर' माया ला भेटायला आला आणि औषधाबद्दल मायाला सांगितले. "पण हे औषध द्यायचं कसं दादू?" मायाने विचारले."औषधांच्या गोळ्याची भुकटी करायची आणि खाण्याच्या पदार्थामध्ये द्यायची! जेव्हा दाजी दारू पितील तेव्हा दारूसोबत या गोळ्यांची रासायनिक प्रक्रिया होते आणि उलट्या सुरू होतात. असे दोन-तीनदा झाले की दारू पिणारा माणूस दारू प्यायला घाबरतो. त्याला उलट्यांचीच आठवण होते."पण, मायाने काळजीपूर्वक विचारले, "काही साईड इफेक्ट तर नाही होणार ना!" "नाही ताई या औषधाचे माझ्या खूप रुग्णांवर मी परीक्षण केले आहे आणि यशस्वी पण झाले त्यामुळे काही काळजी करू नको! प्रभाकर म्हणाला.
.....चंद्रभान ला सकाळी न्याहारी मध्ये उकडलेले अंडे आणि कांदेपोहे खायची सवय होती. मायाने या गोळ्याची भुकटी त्याला न्याहारी तून द्यायला सुरुवात केली आणि गोळ्यांनी आपला परिणाम दाखवला. एके दिवशी 'चंद्रभान' दारू पिऊन घरी आला. त्याला उलट्या व्हायला लागल्या आणि 'चंद्रभान' खाटेवरच पडून राहला दिवसभर! असे दोन-तीन दिवस झाले त्यामुळे त्याने घाबरुन तात्पुरती दारू बंद केली.काही का असेना कित्येक वर्षानंतर मायाच्या चेहर्‍यावर एक समाधानाची तृप्ती दिसायला लागली होती. सासूला ही आश्चर्य वाटले, "की 'चंद्रभान' दारू न पिता कसा काय राहतो." कारण तिला आता दारू मिळणे बंद झाले होते.

.........'स्वानंद' दहा वर्षांचा आणि 'मल्हार' आठ वर्षांचा झाला होता. पैशांचा हिशोब त्यांना कळायचा! एकदा मायाला स्वानंदने बास्केटमध्ये पैसे ठेवताना बघितले. मंगळवारच्या आठवडी बाजाराला माया गेली असता स्वानंदने बास्केट उघडली आणि त्याच्या हाताला चिल्लर पैसे लागले. ते त्याने चोरले आणि मंदारला घेऊन तो गुजरी चौकात केला. 'गुजरी चौक' म्हणजे जिथे आठ दहा दुकाने होती आंबा, पेरू, चिंचेची आणि त्यांनी त्या पैशाचा खाऊ घेतला. 'माया' जेव्हा परत आली तेव्हा तिला बास्केटचे सामान अस्तव्यस्त दिसले. मायाला शंका आली तिने सामान चाचपून बघितले तर तिथे चिल्लर पैसे नव्हते. "अगं बया म्हणजे मुलांनी चोरी केली की काय!" माया स्वतःच पुटपुटली. 'स्वानंद' आणि 'मल्हार' घरी येताच दोघांनाही तिने खडसावून विचारले,"खरं सांगा! बास्केटला हात कोणी लावला?" दोघेही गपगार! कोणीही बोलेना! मायाने चुलीत जळणारे लाकूड हातात घेतले आणि त्यांना चटके द्यायला सुरुवात केली तर 'स्वानंद' लगेच बोलला,"आई मीच चोरले पैसे!" माया खूप रागात आली आणि स्वानंद ला थाडथाड हाताच्या बुक्कीने गालात मारले.मायाचा राग अनावर झाला की ती बाॅक्सर प्रमाणे मुक्केबाजी करायची. "याद राखा यापुढे जर चोरी केली तर चटके नाही लाल मिरच्यांची धुणी देईल."
या प्रसंगानंतर स्वानंदने कधीही पैशाला हात लावला नाही खरं तर पहिल्याच गुन्ह्याची शिक्षा अशी जबर असायला हवी की दुसऱ्यांदा गुन्हा करण्याचा विचार जरी मनात आला तर गुन्हेगाराच्या काळजाचा थरकाप उडाला हवा! आणि मायाचे मुलांच्या बाबतीतही हेच धोरण होते. तिने आधीपासून मुलांवर चांगले संस्कार घडवले.

.......मायेची मोठी बहीण 'छाया' लग्न होऊन आता तिच्याच गावी राहायला आली होती. छायाला दोन मुली होत्या 'तन्वी' आणि 'जान्हवि' आणि नवरा आर्मी मध्ये नोकरीला होता. छाया चे 'बी.एड' सुरू होते. त्यामुळे तिला कॉलेजला रोज जावे लागे 'जान्हवि' मोठी होती पण 'तन्वी' अजून लहान होती ६-७ महिन्यांचीच! त्यामुळे तिला सांभाळायला छायाला अडचण यायची. तिने ही परिस्थिती मायाला सांगितली. माया म्हणाली "दीदी काही काळजी करू नकोस. मी सांभाळेल तुझ्या तन्वीला आणि तुझं कॉलेज काय वर्षभर तर राहणार. सकाळी सोडत जा माझ्याकडे!" खरंतर मायाची परिस्थिती बिकटच होती म्हणजे तिला तिन्ही मुलांचे डबे करून त्यांना शाळेत पाठवायचे आणि तन्वीला पण सांभाळायचे. पण 'माया' सर्व परिस्थितीवर मात करायला शिकली होती. तिने आनंदाने तन्वीला सांभाळले.

......प्रौढ साक्षरता अभियानाचे वर्ग आता बंद झाले होते. त्यामुळे मायाला पैशांची अडचण येत होती. यावर मार्ग कसा काढता येईल असा विचार 'माया' करायला लागली. कांताबाई कडून तिला महिला गृहोद्योगाची माहिती मिळाली. 'कांताबाई' या घरीच पापड, लोणचे, मसाला पॅकेट तयार करून कंपनीला द्यायच्या. मग मायाने सुद्धा हा उपक्रम सुरू केला आणि सहा महिन्यातच तिने आपल्या हाताखाली दहा महिलांना कामाला घेतले.पापड, लोणच्याचा उद्योग आता वाढीला लागला होता मग तिने बँकेकडून अधिकृत मान्यता घेऊन 'महिला बचत गट' सुरू केला आणि अध्यक्षपदाची धुरा आपल्या हातात घेतली. महिला बचत गटातून जी रक्कम शासनाकडून अनुदान म्हणून मिळे त्या पैशातूनच तीने गरजवंतांना निम्न व्याजावर पैसे द्यायला सुरुवात केली. त्यामुळे पुष्कळ भगिनींना यातून आपली नड भागवता आली.
आपली सून एवढं सगळं काही करते म्हणून सासूचा आणि चंद्रभानचा खूप जळफळाट व्हायचा पण ते दोघेही आता तिला काही बोलू शकत नव्हते कारण मायाजवळ आता पुष्कळ लोकांचा आधार होता. त्यामुळे सासू वाकड्यात शिरत नसे.

......हळूहळू आता मायाची लोकप्रियता वाढत होती. हे सर्व शेजारी असणारे 'दिगंबर कामत' बघून होते. 'दिगंबर कामत' हे 'लोकहितवादी पार्टीचे' 'अध्यक्ष' होते. एक दिवस ते मायाला भेटायला आले आणि म्हणाले, "मायाबाई इतक्या सगळ्या हाल-अपेष्टा सहन करून तुम्ही आपला उद्योग-धंदा भरभराटीला आणला आणि गरजू लोकांचे कल्याण केले. या शहरातील लोक तुम्हाला आता ओळखू लागले आहेत म्हणून मी सांगतो तुम्ही आता जनसेवेचा व्याप वाढवायला हवा. "काय? मी समजले नाय!" माया म्हणाली.
'कामत' बोलले,"आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या लोकहितवादी पार्टी सामील व्हावे आणि येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहावे!"निवडणुकीत! तात्या काय बोलता! मी! मला कसं जमणार हे! नाही नाही! मी आपला छोटासा बचत गट चालवते आणि नगरसेवक तर लय मोठी जबाबदारी!
" पोरी तुझी इच्छा आहे नवं जनसेवेची आणि तुझा 'बा' पण सरपंच आहेच की! त्यामुळे राजकीय वातावरण तर तुला ओळखीचं आहे. बाळकडू तर तुला तुझ्या 'बा' कडूनच मिळाले मग आता त्याचा उपयोग व्हायला नगं! विचार कर आणि मला कळव!" असे म्हणत 'कामत' निघून गेले.
मायानी ही खबर रामरावांना सांगितली. 'रामराव' तर लय खुश झाले. "पोरी ही संधी सोडू नगं! तात्यासाहेबांना मी जवळून ओळखतो. ते जनतेचे खरे सेवक आहेत. आणि त्यांच्या आश्रयाखाली तू भरारी घेणार! काही जास्त विचार करू नको फार्म भरून टाक!"

.......'बा'च्या बोलण्यामुळे मायाच्या अंगात हत्तीचे बळ आले. तिने याबाबत चंद्रभान ला सांगितले तर तो खेकसला, "तू तुझं बघ! मला काय विचारायचं नाय!" आता 'माया' स्वतंत्र होती. तिने तात्याला आनंदाने होकार दिला आणि सर्व तयारी सुरू झाली. मायाच्या बचत गटात आता शंभर स्त्रिया होत्या आणि महिला गृह उद्योगात तर पाचशे! सर्वांनी मिळून मायाचा खूप प्रचार केला. भाषणे झाली. 'माया' आपल्या परखड शैलीत मतदारांचे लक्ष वेधून घेई! लवकरच जनमानसावर तिची छाप पडली आणि माया निवडणुकीत प्रचंडं मताने जिंकून आली.
पूर्ण गावात तिची मिरवणूक काढण्यात आली. पुष्पहाराने तिचा गळा भरून गेला होता.आज कित्येक वर्षांनी आनंदाश्रू मायाच्या चेहऱ्यावर तरळले होते. मायाला आता वाट सापडली होती आपल्या अस्तित्वाची! तिला आपल्या अस्तित्वाच्या गाभाऱ्यात होणाऱ्या सत्वाची विटंबना आठवली. आता या आपल्या सत्वाचे वास्तवात रूपांतर करण्याची सुवर्णसंधी तिच्या मनगटात चालून आली होती. अन्यायाला वाचा फोडण्याचे भीमबळ तिच्या बाहुपाशात संचारले होते. या दुष्कर्माच्या रणांगणात ती आपल्या सत्कर्माची 'समशेर' घेऊन चहू बांजूनी लढण्यास सज्ज होती. क्षितीजांना ती खुणावत होती.वादळवाऱ्यांना नमवत ही अबला आता सबला झाली होती.

"रणांगणात ती रणरागिनी,
जनमानसात सत्कर्माची घागर!
डोळ्यात तिच्या ज्योतिर्मय कांती;
अन् काळजात मायेचा सागर!!"

सांगता!!!!!

संस्कृतीकलासद्भावनालेख

प्रतिक्रिया

मायाचा राग अनावर झाला की ती बाॅक्सर प्रमाणे मुक्केबाजी करायची
हे माहित न्हवते...

वादळवाऱ्यांना नमवत ही अबला आता सबला झाली होती.
खुप छान _/\_

शिक्षण नसेल तर स्त्रियांचे हाल ... खात नाही... आणि त्यातुनही ज्या लढा देतात त्या सर्व प्रातःस्मरणीय होत.

सुहास चंद्रमणी बारमासे's picture

3 Jun 2021 - 9:59 pm | सुहास चंद्रमणी ...

आपल्या अमुल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
गाॅडजिला आपण कथेचे समिक्षण केल्याबद्दल आभारी आहे!