होबार्टचं भूत
लेखनप्रकार
होबार्टचे भूत सौ सरिता सुभाष बांदेकर
फ्लाईट होबार्टला लॅंड झालं,चेक ईन् बॅग नव्हतीच त्यामुळे लगेच बाहेर पडायला मिळेल असं वाटत होतं. एक्झिटच्या दिशेने बाहेर पडताना एक कुत्रा जवळ येऊन घुटमळायला लागला, त्याच्या मागोमाग एक ॲाफिसर हजर.
सर, मॅडम जरा बाजूला चला.त्या ॲाफिसरचे शब्द ऐकल्यावर आम्हाला काही कळेचना की याला आपल्या बॅगमध्ये कसला वास आलाय.
बॅगची चेन उघडून कुणी काही टाकले तर नाही??पण तेव्हढ्यात त्यांनी सांगितले तुमच्याकडे काही खाण्याने पदार्थ आहेत का?? तेव्हा हसावे का रडावे तेच कळेना.
मग मी त्यांना सांगितले की होय आमच्याकडे क्रोसॅंट आणि फ्रूट्स आहेत. आम्ही विमानात खाणार होतो पण झोप आली म्हणून खाल्ली नाहीत. आता हाॅटेल रुमवर खाऊ.
तो म्हणाला तुम्हाला माहित नाही का की खाण्याचे पदार्थ आणू शकत नाही.
मी म्हटलं पण हे तर ॲास्ट्र्लियातलेच आहेत मग काय हरकत ?
तेव्हा त्याचे म्हणणं असं होतं की एका राज्यातून दुसर्या राज्यांत पण नेऊ शकत नाही. आणि तुम्ही कुठे जाणार तिकडची माहिती जाणून मगच प्रवास करायला पाहिजे.
मी त्यांना म्हटलं की साॅरी परत असं होणार नाही.
त्यांनी आम्हाला ते तिकडेच खायला सांगितले आणि आम्ही खाऊन झाल्यावर आम्हाला जाऊ दिले.
आता एव्हढं रामायण झाले पण तेव्हा काही लक्षात आलं नाही पुढे काय वाढून ठेवलंय.
हॅाटेलची रूम खूप छान होती,असं वाटत होतं कि ही रूम वापरणारे आपणच पहिले आहोत. सामान रूमवर टाकले आणि फिरायला बाहेर पडलो.
बाहेर निसर्ग सौंदर्य तर भरपूर होतं पण एक वेगळेच वातावरण वाटत होतं.झाड भरपूर होती ती उंच,उंच झाडे हलली की काहीतरी वेगळेच वाटत होतं.थोडंसं किर्र.
संध्याकाळी रूमवर आलो आणि दमल्यामुळे लवकर झोपलो.
रात्री अचानक १.३०/२ वाजता टीव्हीच्या जोरदार आवाजाने झोपमोड झाली.
आणि नवर्याला फायरींग देणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे या ठाम विश्वासाने नवर्याला म्हटले नेहमीप्रमाणे टीव्ही चालू ठेवून झोपलास ना. नवरा बिचारा ठामपणे सांगत होता अगं मी बंद केला होता.
त्यावेळी असंच वाटलं की टीव्ही बघता बघता झोप लागली असणार.
आम्ही त्या दिवशी पोर्ट आर्थरला जाणार होतो. तिकडे गाईड सांगत होती की हे ब्रिटीशांचे खतरनाक कैद्यांना ठेवायचे तुरुंग आहेत. आणि तिकडे जवळच एक छोटं बेट होते. त्या बेटावर कैद्यांना सोडून द्यायचे आणि अन्नपाण्याशिवाय ते कैदी मरायचे. शिवाय थंडी असायचीच.
असे अगणित मृत्यू बघितलेले होबार्ट हे हॅान्टेड म्हणजे भूताटकीचे शहर म्हणून आळखले जाते. तेव्हा ते सगळं ऐकताना किंवा ते जेल बघताना काहीच भीती वाटली नाही.
संध्या. परत रूमवर आल्यावर टिव्ही लावायचा प्रयत्न केला, एकही चॅनेल जे आम्ही आदल्या दिवशी बघत होतो ते लागत नव्हतं.
आता रिसेप्शनवर विचारूया असा विचार करत असताना सहज चेक केले तर लक्षात आले की चॅनेल चाईल्ड लॅाक झाले होते. आता ते कुणी केले असतील???
रात्री झोपायच्या आधी टिव्हीचा मेन स्विच् बंद केला तरी परत रात्री टिव्ही चालू झाला.पण तेव्हा भीती वाटली नाही. दुसऱया दिवशी जास्त विचार न करता चाईल्ड लॅाक काढले आणि टिव्ही बघितला.
३ रात्र टिव्ही अचानक चालू होत होता आणि आम्ही बघत असलेले चॅनेल चाईल्ड लॅाक होत होते तरी कधी भूत हे करत असेल असं वाटलं नाही पण ................
जायच्या दिवशी जे झालं त्यामुळे घाबरगुंडी उडाली आणि खात्री झाली की नक्कीच इथे कुणाचा तरी वावर आहे.
नवरा आंघोळ करायला गेला होता आणि मी टीव्हीवर गाणे ऐकत होते आणि ................................
धडाम् एकदम चॅनेल आपोआप बदलले
टिव्हीचा रिमोट टिव्हीजवळ होता म्हणजे माझ्यापासून ८ फुटांवर आणि नवरा पण बाथरूममध्ये
परत धडाम् ....................
परत चॅनेल बदलले ..............
परत धडाम् .........
असं ३/४ वेळा झाले माझी पाचावर धारण बसली होती. नवरा बाथरूममध्ये ,माझ्या तोंडातून शब्द पण फुटत नव्हता.
नंतर मी आंघोळ न करण्याचे ठरवले पण कपडे तरी कसे बदलायचे?????
कोण बघतंय??
कुठून बघतंय काहीच कळत नव्हतं.
लवकरात लवकर त्या रुममधून बाहेर पडायला हवे याशिवाय दुसरं काही सूचत नव्हतं.
सामान आवरलेलं होतं कारण आंघोळ झाली की चेक आऊट करणार होतो.
शेवटी ठरवलं ते जे कुणी होतं त्याच्याशी बोलायचे.
खरंतर हा विचार वेडेपणाचा होता. कारण कोण होतं? कुठच्या भाषेत बोलायचे????
पण तरी मी संवाद साधायचा ठरवला आणि प्रथम ईंग्लीश , नंतर हिंदी ,मराठी भाषेत त्याला सांगितलं.
की बाबा रे तू कोण आहेस मला माहित नाही म्हणजे स्री का पुरूष??
पण मला माहित आहे आम्ही तुझ्या हद्दीत घूसखोरी केली आहे .आम्हाला माहित नव्हतं नाहितर आम्ही आलोच नसतो.
पण आता आम्ही तुझी हद्द सोडून जात आहोत. तू आम्हाला काही संकेत दिलेस पण आम्हाला ते ओळखता आलं नाही. पण आज लक्षात आलंय की आम्ही नकळत कुणाच्या तरी हद्दीत आलोय. नकळत झालेल्या चुकीबद्दल आम्हाला माफ कर.
त्या कुणाला मी जे बोलले ते कळलं की नाही त्याचा मी विचार केला नाही पण मला शांत झाल्यासारखं वाटलं. आणि हे सगळं मी मनांत न बोलतां मोठ्याने चारी बाजूला नजर फिरवत न घाबरतां बोलले होते.
नंतर बाहेर पडताना परत गुडबाय केलं, सॅारी म्हटलं आणि रिसेप्शनवर येऊन बसलो.
रिसेप्शनीस्टला सगळं सांगितलं पण ती हसायला लागली.
हे सगळं वाचून कदाचित तुमचा पण विश्वास नाही बसणार.
पण मला नक्की खात्री आहे की ते भूतच होतं
सौ सरिता सुभाष बांदेकर
◦
वाचने
8207
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
कम ब्याक अगेन अशी पाटी असते ना हाटेलात?
Dennis the Menace (1959 TV series)
टिव्ही बिघडलेला असेल हो. :)
In reply to टिव्ही बिघडलेला असेल हो. :) by सतिश गावडे
+++111 गावडे सर ! हाच ऐहिक
भारी किस्सा आहे
सगा, मला एक प्रश्न पडलाय. इलेक्ट्रीकचा आहे.
हाटेल
त्या रुममधला टीव्ही शेजारच्या
तुम्ही वेळीच माफी मागितलीत ते फार योग्य केलत...
हा अनुभव / कथा वाचुन १३बी ,
टिवीचे रिमांइडर
मजेशीर
माझ्या एका भाच्याचा भुताचा (?) अनुभव
ही कदाचित त्या हॉटेलची
टुकुल यान्च्यासारखाच अनुभव
माझा अनुभव
भूत कथा आली,पण पांडू नै आला!
In reply to भूत कथा आली,पण पांडू नै आला! by अत्रुप्त आत्मा
अरे हो....
वाचायला मजेशीर वाटतंय
In reply to वाचायला मजेशीर वाटतंय by तुषार काळभोर
होय, बरोबर आहे.
धन्यवाद