आज काय घडले... फाल्गुन व. १४ ज्ञानकोशकार केतकर यांचे निधन !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
13 Apr 2021 - 10:30 am

केतकर

शके १८१८ च्या फाल्गुन व. १४ रोजी महाराष्ट्रीय ज्ञानकोशकर्ते, समाजशास्त्रज्ञ, संशोधक आणि नवविचारप्रवर्तक पंडित डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर
यांचे निधन झाले.

हायस्कूलमध्ये असल्यापासूनच यांच्या बहुश्रुतपणामुळे शिक्षक यांना 'एन्सायक्लोपीडिया' असे म्हणत. येथील शिक्षणक्रम अपुरा असतांनाच ते १९०६ मध्ये अमोरिकेस गेले. आणि तेथील कार्नेल विद्यापीठांत समाजशास्त्राचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आणि थोड्याच अवधींत बी. ए., एम् . ए., पीएच. डी. या पदव्या त्यांनी मिळविल्या. History of Castes in India.आणि Hinduism, its formation and Future या त्यांच्या ग्रंथांमुळे.इंग्लंड-अमेरिकेत त्यांना चागलीच कीर्ति मिळाली. सन १९१२ मध्ये हिंदुस्थानांत आल्यावर प्रथम कलकत्ता विद्यापीठांत थोडे दिवस काम करून देशभर 'राष्ट्रधर्मप्रचारकसंघा' च्या निमित्ताने त्यांनी प्रवास केला. आणि शेवटी सन १९१६ सालापासून ज्ञानकोशाचे काम अंगावर घेतले. या कार्यास लागणारी बुद्धिमत्ता, उद्योगप्रियता, चिकाटी हे गुण त्यांच्या अंगी असल्यामुळेच त्यांना हे प्रचंड काम करणे शक्य झाले. ज्ञानकोशाच्या प्रस्तावना-खंडांतून त्यांची शोधक बुद्धि आणि स्वतंत्र प्रज्ञा दिसून येते. हे. काम चालू असतानाच त्यांनी 'विद्यासेवक' नांवाचे मासिक सुरू केले आणि त्यांतून आपल्या 'परागंदा', 'गोंडवनांतील प्रिंयवदा', 'आशावादी' या कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या. याशिवाय 'गांवसासू', 'ब्राह्मणकन्या', 'विचक्षणा' या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. या कादंबरी-वाङ्मयांतून त्यांनी महाराष्ट्राला एक नवें दर्शन घडवून दिले. आजपर्यंत मराठी कादंबरीचे क्षेत्र केवळ सदाशिव पेठ हेच होते. डॉक्टर साहेबांनी ते क्षेत्र अत्यंत विस्तीर्ण करून त्याला जागतिक स्वरूप दिले. 'एकच जगाच्या कल्पनेचा पुरस्कार केतकरांनीच प्रथम केला. त्यांची दृष्टिच व्यापक होती. संकलनापेक्षां संशोधनाकडे अधिक कल असल्यामुळे 'प्राचीन महाराष्ट्र' नामक ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. त्यापैकी पहिला खंड प्रसिद्धहि आहे.

१० एप्रिल १९३७.

इतिहास