एका तळ्यात होती...

Primary tabs

शब्दसखी's picture
शब्दसखी in जनातलं, मनातलं
26 Feb 2021 - 7:52 pm

खूप लहान असल्यापासून एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गाणं सतत कानावर पडत आलंय. हळूहळू त्याचा अर्थसुद्धा समजायला लागला. बदकाच्या पिल्लांपेक्षा वेगळ्या किंवा कुरूप दिसणाऱ्या राजहंसाच्या पिल्लाला एकटेपणाचा आणि अवहेलनेचा सामना करत अखेर स्वतःच्या राजहंस असण्याची आणि पर्यायाने त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असण्याची जाणीव होण्याचा हा प्रवास. त्यावेळी हे गाणं संपताना त्या राजहंसासाठी छान तर वाटायचंच पण बदकांची बरी जिरली असं पण वाटायचं.

आता मात्र प्रश्न पडतो की त्या राजहंसाचं पुढे काय? म्हणजे तो इतरांपेक्षा जास्त सुंदर, डौलदार आहे म्हणून आता त्याला रुपावरुन कोणी हिणवणार नाही हे ठीक. पण त्याला आता तरी कोणी आपल्यात सामावून घेईल का? की आता इतरांना त्याची ईर्ष्या वाटते म्हणून तो पुन्हा एकटाच पडेल? किंवा आपल्या रूपाचा गर्व होऊन तो बदकांना हिणवून माज करून दाखवेल? याहूनही पुढे जाऊन विचार करायचा झाला तर, तो मुळात राजहंस होता तरी. समजा तो खरंच कुरूप बदक असता तर त्याच्या वाटणीला आलेली वागणूक समर्थनीय झाली असती का? फक्त इतरांपेक्षा वेगळा/कुरूप आहे म्हणून?

माणसाच्या आयुष्यावरचं रूपक म्हणून मी ह्या गाण्याकडे पाहायचा प्रयत्न केला. आपली खरी हुशारी अजून जगाला दिसलीच नाहीये असं वाटणारा प्रत्येक माणूस नक्कीच त्या कुरूप वेड्या पिल्लामध्ये स्वतःला बघत असेल. पण जगण्याचे इतके विविध पैलू असतात प्रत्येकाच्या आयुष्यात की आपण सगळेच काळवेळेप्रमाणे कधी बहुसंख्येतले बदक असतो तर कधी एकटं पडलेलं कुरूप पिल्लू. आणि बऱ्याच वेळेला बहुसंख्येत असताना एकट्या पडलेल्या किंवा पाडलेल्या व्यक्तीच्या व्यथा पोचतच नाहीत आपल्यापर्यंत. जरी दुसऱ्या एखाद्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्यावर तीच वेळ येत असली तरी. जमेल तितकं समूहाच्या बरोबर राहून समूहाची सुरक्षितता मिळवण्याची मानसिकता असल्यामुळे असेल कदाचित, वेगळं काही करणारं कोणी दिसलं कि हिरीरीने त्याचं कसं चुकतंय म्हणून बाण मारले जातात. अश्या प्रत्येक बाणाबरोबर समूहातलं आपलं स्थान खुंटा हलवून बळकट केलं जातं. कदाचित आपल्यावरचे जुने व्रण भरून निघतील त्याने असं वाटत असावं. हा दुतोंडीपणा जाणवतही नाही बऱ्याच वेळेला...

परत हा संघर्ष मी विरुद्ध इतर एवढाच नसतो. बऱ्याच वेळा तो मी विरुद्ध मी असा पण होतो. आपल्याच एखाद्या आवडीला नाहीतर स्वभाववैशिष्ट्याला आपणच चुकीचं, अतरंगी, नाहीतर काहींच्या काही असं विशेषण लावून मोकळे होतो. आपणच आपलं वेगळेपण लपवायला तरी लागतो नाहीतर त्याच्याबद्दल अपराधी तरी वाटून घेतो. चाकोरीबाहेर पडण्याची एखादी उर्मी लोकांच्या भीतीने बाहेर येण्याआधीच मरून जाते. आपणच पसरलेल्या चूक बरोबरच्या जाळ्यात आपलाच पाय गुरफटत जातो. आपल्यातलाच बदकांचा थवा आपल्यातल्याच कुरूप पिल्लाला एकटं पाडतो. त्याच्या राजहंस असू शकण्याची शक्यता लक्षातही न घेता...

स्वतःमधल्या कुरूप पिल्लाचा स्वतःमधल्याच बदकांच्या पिल्लांकडून स्वीकार करता आला तरी खूप झालं.... मग पुढे त्याचा राजहंस होवो अथवा न होवो.....

मुक्तकप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

26 Feb 2021 - 9:00 pm | उपयोजक

आवडले!

मुक्त विहारि's picture

26 Feb 2021 - 9:05 pm | मुक्त विहारि

गुलामगिरीतच सुख मानणारे म्हणजे, बदके

तर

गुलामगिरी न मानणारे म्हणजे, राजहंस

साहित्य विविध नजरेतून बघता येते.

स्वतःमधल्या कुरूप पिल्लाचा स्वतःमधल्याच बदकांच्या पिल्लांकडून स्वीकार करता आला तरी खूप झालं.... मग पुढे त्याचा राजहंस होवो अथवा न होवो.....

>>
आवडलं..

सविता००१'s picture

27 Feb 2021 - 6:17 pm | सविता००१

मस्तच लिहिलंय, खूप आवडलं आणि पटलंही

शब्दसखी's picture

1 Mar 2021 - 1:16 pm | शब्दसखी

धन्यवाद उपयोजक, मुवि, तुषार काळभोर, सविता००१!!

>>साहित्य विविध नजरेतून बघता येते.
नक्कीच... मला बदकांमध्ये प्रवाहाबरोबर जाऊन त्यातच धन्यता मानणारे आणि राजहंसामध्ये प्रवाहाविरुद्ध पोहणारे दिसले..

चौथा कोनाडा's picture

1 Mar 2021 - 2:40 pm | चौथा कोनाडा

स्वतःमधल्या कुरूप पिल्लाचा स्वतःमधल्याच बदकांच्या पिल्लांकडून स्वीकार करता आला तरी खूप झालं !
अगदी !
मस्त लिहिलेय !

शब्दसखी's picture

3 Mar 2021 - 11:01 am | शब्दसखी

धन्यवाद चौथा कोनाडा!!

स्मिताके's picture

4 Mar 2021 - 7:26 pm | स्मिताके

>> स्वतःमधल्या कुरूप पिल्लाचा स्वतःमधल्याच बदकांच्या पिल्लांकडून स्वीकार करता आला तरी खूप झालं.... मग पुढे त्याचा राजहंस होवो अथवा न होवो.....

छान लिहिलंत. अगदी पटलं.

शब्दसखी's picture

8 Mar 2021 - 12:02 pm | शब्दसखी

धन्यवाद स्मिताके!