आज काय घडले... माघ शु.३ शनिवारवाड्याचे वैभव !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
14 Feb 2021 - 11:38 am

shanvar wada

शके १६५१ च्या माध शु. ३ रोजी पुणे येथे पहिल्या बाजीरावाच्या कारकीर्दीत प्रसिद्ध अशा शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.

बाजीराव मधून मधून पुण्यास येत असे तेव्हा त्याचा मुक्काम कसब्यांत धडफळे यांच्या वाड्यांत असे.-" शके १६५० मध्ये पुरातन नदीकिनारा कोटकिल्ले, हिसार मोगलाई ठाणे होते. तो कोट बाजीरावांनी पाडून मैदान केले आणि मुत्सद्दी वगैरे लोकांस घरे बांधावयास जागा दिली. आणि पूर्वेच्या बाजूस दोन गांव होते ते मोडून कसबा केला. हा कसबा शाहू राजांनी पेशव्यांस इनाम दिला. शके १६५१ व मावळ वेसीजवळ जागा घेऊन वाडा बांधावयास आरंभ केला. नवबुरजी कूस वाड्यास घालून आंत इमारत केली-" या वाड्यांत जयपूर येथील कारागिरांकरवी भिंतीवर सुन्दर चित्रे बाजीरावांनी काढून घेतली. प्रथमच्या इमारतीत दोन मजले व दोन चौक होते. पुढे नानासाहेब पेशवे यांनी त्यांत अनेक फेरफार करून तो मोठा केला. काही भागाचे सहा मजले करून चार चौक केले. चौक फरसबंदी असून मध्ये कारंजी होती. सभोंवतींचा कोट नानासाहेबांनी सन १७५५ त बांधला तो अद्यापि आहे. महाराष्ट्रांतील सर्व मोठ्या वाड्यांप्रमाणे शनिवारवाड्याचे तोंडहि उत्तरेकडे आहे. त्यासच दिल्ली दरवाजा असें नांव होते. मराठे सरदारांची दृष्टि नेहमी उत्तरेस दिल्लीवर खिळून राहिलेली असायची. शिवशाहीच्या पूर्वीपासूनच रामदास बलशाली दैवत हनुमान यासहि हीच प्रार्थना करतात की-कोटिच्या कोटि उड्डाणे झेपावे उत्तरेकडे-' शनिवारवाडा सागवानी लाकडाचा असून आंतील नक्षीचे काम प्रेक्षणीय होते. “ शनिवारवाडा इंद्रप्रस्थ येथील पुराणप्रसिद्ध वाड्याचे बरहुकूम बांधला आहे. वाड्यांतील कारंजांपैकी कमलाकृति कारंजें हिंदुस्थानांत सर्वांत मोठे असून त्या कल्पनेचा उगमहि भारतीयच आहे.-" असा उल्लेख या वाड्यासंबंधी सांपडतो. याच शनवारवाड्यांतून मराठ्यांचे राजकारण चालत असे. येथे अनेक ऐतिहासिक संस्मरणीय अशा घटना घडल्या.
१० जानेवारी १७३०

इतिहास

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

14 Feb 2021 - 5:35 pm | चौथा कोनाडा

शनिवारवाडा इंद्रप्रस्थ येथील पुराणप्रसिद्ध वाड्याचे बरहुकूम बांधला आहे.

इंद्रप्रस्थ वाड्याबद्द्द्ल काही माहिती मिळू शकेल काय ? कोणत्या राज्यात होता हा ?

सौंदाळा's picture

14 Feb 2021 - 7:09 pm | सौंदाळा

बाजीरावाने या जागी ससा कुत्र्याच्या मागे धावत असताना पाहिले आणि हीच जागा नक्की केली अशी आख्यायिका वाचली होती.

श्रीरंग_जोशी's picture

16 Feb 2021 - 1:25 am | श्रीरंग_जोशी

शनिवारवाड्याची थोडक्यात पण उत्तम माहिती.
हा फोटो किती जुना असावा. शंभर वर्षांपूर्वीचा नक्कीच वाटतो. कदाचित अधिक जुना असू शकेल.

चौथा कोनाडा's picture

16 Feb 2021 - 1:14 pm | चौथा कोनाडा

शंभर वर्षांपूर्वीचा नक्कीच. "इंग्रजी राजवटीतला शनिवारवाड्या समोरील बाजार" या मथळ्याखाली "जुन्या पुण्याचे फोटो" मध्ये हा पाहिल्याचे आठवते.

डिझाईन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी त्या सातमजली शनिवारवाड्याचे संगणकीय त्रिमिती आभासी मॉडेल केलेले मी आंजावर पाहिलेले आठवते.
सुंदर केला होता, पण आता सापडला नाही

सौंदाळा's picture

16 Feb 2021 - 2:08 pm | सौंदाळा

पर्वतीवर एक संग्रहालय आहे तिकडे पण हा फोटो पाहिला आहे. त्याखाली तारीखपण होती पण आता आठवत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2021 - 10:16 pm | श्रीरंग_जोशी

धन्यवाद चौथा कोनाडा व सौंदाळा.

पर्वतीवरच्या संग्रहालयाला भेट द्यायचे राहून गेले आहे. भविष्यात नक्की जाईन.

चौथा कोनाडा's picture

18 Feb 2021 - 1:02 pm | चौथा कोनाडा

पर्वतीचे संग्रहालय खुप छान आहे.
कारखानिस, फडणिस, पागनिस, शिकलगार ई आडनावे कशी तयार झाली हा इतिहास भित्तीपत्रकावर लिहिला आहे. हे मला रोचक रोचक वाटले.