आज काय घडले... माघ शु. १ " अधर्माने राज्य टिकत नसते !"

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
14 Feb 2021 - 11:36 am

angad shosthai

माघ शु. १ या दिवशी श्रीरामचंद्रांनी राजधर्मास अनुसरून व बिभीषणाची संमति घेऊन सामोपचाराचे शेवटचे बोलणे करण्यासाठी अंगदास रावणाकडे पाठविलें.

लंकेभोवती वेढा कायम केल्यावर रामचंद्र आपल्या सहकाऱ्यांसह सुवेलपर्वतावर चढले व तेथून त्यांनी लंकेचे निरीक्षण केले. त्यानंतर प्रत्येक दरवाजावर कोटि कोटि वानर बसविले आणि स्वतः उत्तर दरवाजावर राहून अंगदास शिष्टाईसाठी पाठविले. रामचंद्रांनी अंगदास सांगितले, "अंगदा, मोठ्या धैर्याने या लंकानगरींत तूं जा आणि बुद्धि नष्ट झालेल्या व मृत्यूच्या फेऱ्यांत सांपडलेल्या रावणाला माझा असा निरोप सांग की, 'राक्षसाधमा, ज्या जोरावर सीतेला मायेने हरण करून तूं माझा उपमर्द केलास, तें सामर्थ्य आतां दाखीव. त्या सीतला मुक्त करून तूं मला शरण आला नाहीस तर मी आपल्या तीक्ष्ण बाणांनी तुझ्या लंकेतील सर्व राक्षसांचा निःपात करीन. आणि हा तुझा धर्मात्मा बंधु विभीषण यास लंकेचे सारें राज्य देऊन टाकीन. तूं स्वतः पापी आहेसच. पण तुझ्याभोंवर्ती जमलेले सर्व राक्षसहि मूर्ख आहत. त्यांच्या ध्यानांत हे येत नाही की, अधर्माने राज्याचे व राजाचे कधीहि कल्याण होत नसते."

रामचंद्रांचा निरोप घेऊन अंगद रावणाच्या सभेत येऊन दाखल झाला. आणि स्वतःचे नांव सांगून त्याने रामाचा निरोप रावणास जशाचा तसा निवेदन केला. मदांध झालेल्या रावणाला सद्बुद्धि कोठून सुचणार ! क्रोधाच्या आवेशांत अंगदास पकडण्यासाठी त्याने आपल्या प्रधानाला सूचना केली. चौघे राक्षस अंगदास कैद करण्यास धांवले. त्या चौघांनाहि घेऊन अंगदाने तेथून उड्डाण केले. उडण्याच्या वेगाने ते राक्षस रावणाच्यासमोर धाडकन् खाली आपटले. खुद्द रावणाच्या वाड्यावर चढून अंगदानें शिखरास एवढा मोठा धक्का दिला की, वाड्याच्या शिखराचा मोठा आवाज झाला; त्यानंतर अंगद रामरायापाशी येऊन पोचला. राजवाड्याचे शिखर कोसळलेले पाहून मोठा अपशकुन झाला, असे वाटून रावणास अत्यंत दुःख झाले

इतिहास