आज काय घडले.... पौष व. ३० दोन जन्मठेपींची शिक्षा!

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
14 Feb 2021 - 11:35 am

sawarkar

शके १८३२ च्या पौष व. ३० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दुसऱ्या खटल्याचा निकाल लागून त्यांना दुसरी जन्मठेप-काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

मायदेशी सावरकर आले ते नाशिकच्या तुरुंगांतच अटकेत राहिले. जॅक्सनच्या खुनामुळे सरकार बिथरून गेले होते. सेशल ट्रिब्यूनलपुढे खटल्याचे काम सुरू झाले. एकूण सत्तर दिवस खटल्याचे काम चालले. शेवटीं मार्गशीर्ष व.८ (२४-१२-१९१०) या दिवशी निकाल सांगण्यात आला. त्यांत पहिली शिक्षा सावरकरांना जन्मठेप-काळ्यापाण्याची झाली. सावरकरांना याची जाणीव होतीच. आदल्याच दिवशी त्यांनी एक सुंदर काव्य लिहिले होते. त्यांत ते मातृभूमीस म्हणतात, "ऋण ते फेडाया । हप्ता पहिला तप्त स्थंडिली देह अर्पितों हा। जननी देह अर्पितों हा”

यानंतर जॅक्सनच्या खुनास मदत केल्याच्या दुसऱ्या खटल्यात सुरुवात कटाच्या खटल्यांत सावरकर यांना जी शिक्षा झाली तिने सरकारचे समाधान झाले नाही. सरकारने हट्टाने हा दुसरा खटला उभा केला. त्या अर्थी सावरकरांना शक्य तर फासावर लटकावण्याचा सरकारचा उद्देश आहे असे लोकांना वाटूं लागले. या खटल्यांत सावरकरांनी आपली बाजू मांडली, " जॅक्सनच्या खुनाला मदत करण्याच्या बाबतीत माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने काहिही संबंध नाही." न्यायमूर्तीनी अर्थातच त्याला मान्यता दिली नाही. विलायतेस जाण्यापूर्वी आरोपीचे चरित्र, इंग्लंडमधील त्याची कृत्ये, इत्यादीवरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की, आरोपीने दोन पिस्तुले सरकारी अधिकाऱ्यांचा खून करण्यासाठीच धाडली होती, आणि यासाठी सावरकरांना दुसऱ्यांदा जन्मठेप - काळ्यापाण्याची शिक्षा झाली. यावर या क्रांतिसिंहाने उद्गार काढले, "तुम्ही जी परमावधीची शिक्षा सांगितली ती निमूटपणे सोसण्याला मी सिद्ध आहे. आमची प्रिय मायभूमि शाश्वतीच्या विजयाप्रत पोचावयाची ती हाल, अपेष्टा व सार्थत्याग या मार्गांनीच पोचेल अशी माझी श्रद्धा आहे." सावरकरांचे सर्वच जीवित याप्रमाणे अद्भुत घटनांनी भरलेले आहे.

इतिहास