Skip to main content

आज काय घडले.... पौष शु.६ न्या. माधवराव रानडे यांचा जन्म !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 25/01/2021 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
nyaymurti ranade आज काय घडले.... पौष शु.६ न्या. माधवराव रानडे यांचा जन्म ! शके १७६४ च्या पौष शु. ६ रोजी हिंदुस्थानांतील प्रसिद्ध राजकारणी, समाजसुधारक, दूरदृष्टीचे विवेचक, अर्थशास्त्रज्ञ व स्वतंत्र भारताचे द्रष्टे न्यायमूर्ति माधव गोविंद रानडे यांचा जन्म झाला. पेशवाईच्या अखेरीस कोंकणांतील मोभार पाचोरी गांवाहून यांचे घराणे देशावर आले. माधवरावांचे निपणजे भगवंतराव यांनी पंढरपुरास वास्तव्य करून आपला जम बसविला. भगवंतरावांचा मुलगा भास्कर आप्पा यांनी आपला ज्योतिषाचा धंदा सोडून शिपाईगिरीत नाव कमाविले. यांचे चिरंजीव अमृतराव; आणि यांचे चिरंजीव म्हणजे माधवरावांचे वडील गोविंदराव. हे अहमदनगर जिल्ह्यांतील दुय्यम कलेक्टरच्या हाताखाली कारकून होते. माधवरावांच्या बालपणींची एक विलक्षण घटना नमूद करण्यासारखी आहे. त्यांची मातुःश्री गोपिकाबाई ही आपल्या तीन वर्षांच्या लहानग्या माधवास घेऊन निफाडहून कोल्हापुरास निघाली होती. त्या वेळी दळणवळणाची साधने आजच्यासारखी नव्हती. गोपिकाबाई बैलगाडीनेच निघाल्या होत्या. दिवसभर विश्रांति घेऊन रात्रीचा प्रवास त्या वेळी सुखकर होत असे. मार्गात एक घाट होता, त्यांतून शिळोप्याच्या सुमारास 'माधवा' चा प्रवास सुरू झाला. डोंगराच्या थंड हवेमुळे गाडीतील सर्व मंडळींना झोप लागली. उतरणीवरून बैल भरधांव पळत होते. या वेळी पांघरुणांत गुरफटलेले माधवराव एखाद्या गांठोड्याप्रमाणे खाली पडले. कोणालाहि याचा मागमूस नव्हता. वेळ रात्रीची होती. निर्मानुष प्रदेश असल्यामुळे माधवरावांचा चरित्रक्रम येथेच आटोपण्याची वेळ आली होती. परंतु या माधवाच्या हातून अलौकिक कामगिरी व्हावयाची असल्यामुळे हा भयानक प्रसंग टळला. त्यांचे चुलते घोड्यावरून येत होते. कोणा मुलाच्या रडण्याचा आवाज आला म्हणून ते पाहतात तो लहानगा: माधव! “मोठी स्वैर झाली" म्हणून त्यांनी त्याला उचलून घेतले. याच माधवाने पुढे अलौकिक पराक्रम केला. त्यांनी आपल्या अद्वितीय विद्वत्तेनें, धोरणानें, कर्तबगारीने राष्ट्राला नवें वळण लाविले. -१८ जानेवारी १८४२
लेखनविषय:

वाचने 603
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया