शनिपीठ दर्शन

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जनातलं, मनातलं
18 Jan 2021 - 10:22 am

आपल्या महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तीपीठं आहेत. तशीच भारतात शनि देवाची पण साडेसात शक्तीपीठं आहेत.
त्यातील साडेतीन शक्तीपीठं स्वतः प्रभु रामचंद्रांनी स्थापन केलेली आहेत.
एक मध्यप्रदेशातलं उज्जैन सोडलं तर बाकी अडीच नाशिक व बीड जिल्ह्यात. आम्ही तीघी मैत्रिणींनी हि अडीच पीठं तरी जाऊन येऊ असं ठरवलं.
तसंही लाॅकडाऊन पासून म्हणजे मार्च 2020 नंतर भटकंती बंदच होती. आताशा सगळं नाॅर्मल होतय हळुहळू तर आपण योग्य काळजी घेऊन जाऊन येऊ असं म्हणून निघालो.
जानेवारी महिना असूनही जास्त थंडी नव्हती. सकाळी सहाला च मोकळ्या रस्त्यांवर आमच्या चक्रधरांनी गाडी सुसाट सोडली. उजव्या बाजुला उगवत्या सुर्याचा लाल तांबडा गोळा वरती वरती येताना दिसत होता. आकाशात लाल केशरी रंगाची उधळण सुरू होती. अशा प्रसन्न वातावरणात आमचा प्रवास सुरू झाला.
आसनगाव -शहापूर जवळ डायमंड फुड वे मधे छानसा नाश्ता करून पुढे निघालो. कसारा घाटातली झोकदार वळणं नी बाहेरचं मन प्रसन्न करणारं सृष्टी सौंदर्य बघताना मन हरखून गेलं. नाशिक नंतर निफाड लासलगाव वगैरे गावं लागली. मधेमधे छान हिरवीगार शेतं दिसत होती. ज्वारी, गहु, आलं तर कुठे डाळींबं व लींबाची शेतं. गावातली घरं पण काही मातीची तर काही अगदी टुमदार दिसत होती. रस्ते काही ठिकाणी चांगले, तर कुठे थोडे खराब.
बाहेर गावांमधे रस्त्यांवर 'मास्कधारी' क्वचितच दिसत होते.
लासलगावला लाल लाल ताज्या कांद्यांनी भरलेल्या टेंपो आणि बैलगाड्या दिसल्या. चिरताना हमखास रडवणा-या कांद्याचं, ताजं असतानाचं सुरेख रूपडं बघुन फारच मजा वाटली.
पुढे मनमाड ते नांदगाव छानच रस्ता होता. थोड्याच वेळात नस्तनपुरला पोहचलो.
नस्तनपुर हे नावही प्रथमच ऐकलेलं. नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावर नांदगाव पासून अठरा कि मी वर हे मंदिर आहे. नऊ किमी अलिकडे उजवीकडे मोठी कमान आपल्या स्वागताला उभी दिसते. तिच्यातून आत एक पक्का रस्ता आपल्याला मंदिराच्या वाहनतळापर्यंत घेऊन जातो.
परिसर खुपच मोठा व प्रशस्त आहे. झाडा झुडूपांनी वेढलेला आहे. त्यामुळे भर दुपारीही थंडगार वातावरण होतं.
हे शनिदेवाचं स्वयंभू असलेलं पूर्ण पीठ प्रभुरामचंद्रांनी स्थापन केल्याचं समजलं. शनिदेवासाठी आम्ही बरोबर नेलेलं तीळाचं तेल व काळेउडीद मनोभावे अर्पण करून इथे स्थापित शनि महाराजांच्या मुर्तीला मनापासून नमस्कार केला. परिसरात शांतपणे फिरून बघितलं.
इथे भक्तनिवासही आहे. पण कोवीड काळानंतर नुकतच मंदिर उघडल्यामुळे अजून सुरू केलं नाही.
एरवीही फक्त रहाण्याचीच सोय आहे.
परिसरात हनुमान आणि राम यांची छोटी मंदिरं तसंच बगिचा, मुलांसाठी खेळायला जागा, होम हवनासाठी एक छत टाकून मोठा गोल चौथरा केलेला आहे. पुजा साहित्य दुकानांसाठीही गाळे आहेत. पण सध्या सगळेच बंद होते.

इतक्या पुरातन मंदिरावर कोणत्याही राजाने कधीही आक्रमण केल्याचा इतिहास नाही कि कधी कोणत्याही नैसर्गिक आपत्ती जसे भुकंप पुर वगैरे मुळेही या मंदिराचं काही नुकसान झालेलं नाही एवढं जागृत असं हे शनि महाराजंचं देवस्थान आहे.

झाडांवरच्या पक्ष्यांचं मधूर कुजन ऐकुन आणि शनिदेवांच्या प्रसन्न दर्शनाने मनाला एकप्रकारची शांती लाभली होती.
जवळच खोजा नामक राजाने बांधलेला ऐतिहासिक किल्लाही आहे. वेळेअभावी तो काही बघता आला नाही.

पुढे औरंगाबाद मुक्कामी राहून, पुढील दिवशी सकाळीच बीड जिल्ह्यातील राक्षसभुवनला गेलो.
इतिहासात राक्षसभुवन, पेशवे व निजामाच्या इ स 1763 मधे झालेल्या लढाईसाठी प्रसिध्द आहेच.
तसंच पौराणिक संदर्भांसाठी ही प्रसिध्द आहे.
या स्थानाला दत्तप्रभुंचे आद्यपीठही मानतात.
याच स्थानी प्रभु रामचंद्रांना सीतामातेसह दत्तात्रेयाचे दर्शन झाले होते. इथे असलेल्या वरद दत्त मंदिराची रचना अगदी वेगळी आहे. शिखर नसलेले असे आश्रमासारखे मंदिर आहे. एकमुखी षडभुजा असलेली वालुकामय दत्तमुर्ती खोल गाभा-यात आहे. तसेच हे एकमेव मंदिर आहे जीथे 'दत्तयंत्र' आहे.
बाजुलाच शिवमंदिरही आहे. अनुसूयेचे सत्वहरण करायला आले तेव्हा शिवाने आपले वाहन नंदीला बरोबर आणले नव्हते त्यामुळे येथे शिवासमोर नंदी नाही.
हा भाग पूर्वी दंडकारण्याचा भाग होता. प्रभु रामचंद्र जेथे दोनदा येऊन गेले अशी हि एकमेव जागा आहे. सीताहरणापूर्वी आणि नंतर शनिस्थापनेसाठी असे दोनदा प्रभु रामचंद्र याठिकाणी आले होते. "रक्षोभुवन महात्म्य" या संस्कृत ग्रंथात येथील शनिचे महत्व वर्णन केले आहे.
गोदावरी नदीच्या तटावरच वसलेल्या या पुरातन शनिमंदिरात शनि च्या एका बाजुच्या काळ व एका बाजूला वेळ /यमी ची मुर्ती आहे. प्रथेनुसार आधी काळाची पुजा होते मगच शनिची. या ठिकाणी प्रत्यक्ष काल किंवा यम यांची स्थापना शनिमहाराजांबरोबरच केलेली आहे. तसेच यमी किंवा घटी, वेळ यांचीही. शनि, काल, यमी यांच्या मुर्ती समोर व त्यांच्या पायाशी खाली राहु व केतु व बाजूला बृहस्पतींची स्वतंत्रपणे स्थापना केलेली आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष नवग्रह अवतीर्ण झालेले आहेत म्हणून इथे नवग्रह शांतीपुजा केल्यास शनिदोष निवारण होते अशी मान्यता आहे.
रक्षाभुवन असं खरं नाव असलेलं आता अपभ्रंश होऊन राक्षसभुवन असं नाव झालेलं हे केवळ अकराशे लोकवस्तीचं खेडेगाव औरंगाबादपासून 89 किमी अंतरावर असून बीड राष्ट्रीय महामार्ग 211पासून केवळ अकरा कि मी आत आहे.
इथे मंदिराच्या आसपास अस्वच्छता जाणवली. नदीचं पात्रही फारसं स्वच्छ नव्हतं. इथे रहाण्याची किंवा जेवण खाण्याची कसलीही सोय होऊ शकत नाही.
गुरूजींनी पुजाविधी व्यवस्थित करवून घेतला त्यामुळे प्रसन्न वाटलं.
पुढे त्रेपन्न कि मी वर असलेल्या बीड शहरात आलो. बीड शहराचं पुरातन नाव चंपावती नगरी. इथल्या अर्धे पीठ अशी मान्यता असलेल्या शनिमंदिराचा खुप शोध घेत घेत छोट्या गल्ली बोळातून विचारत विचारत जावं लागलं. मंदिर सापडलं पण तीथे बांधकाम चालु होतं. एका छत नसलेल्या चौथ-यावर शनिचा काळ्या पाषाणातला केवळ मुखवटा असलेली मुर्ती स्थापित होती. विक्रमादित्याच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची अख्यायिका आहे. पूर्वी बिंदुसरा नदिजवळ हे मंदिर होतं. नदि आटत गेली तशी नदिपात्र आणि मंदिर या मधे वस्ती निर्माण झाली. जीर्णोध्दाराचे काम जोरात चालु आहे. त्यात भाविक लोकांचेही योगदान आहे. मंदिर परिसरात दोन मोठ्या विहीरी आहेत दोन्हींचे पाणी पिण्यायोग्य असून दुष्काळातही या विहीरींतून पाणी पुरवठा सुरू असतो. देवस्थानच्या जमिनीचा वाद कोर्टात आहे तो मिटला तर देवस्थानचा विकास व भाविकांसाठी सोयींसुविधा करता येतील असं तिथे समजलं.
बीडमधे अजून एक पुरातन असं कनकालेश्वर मंदिर आहे. मंदिर 84 मीटर चौरसाकृती तलावातच बांधलेलं आहे. मंदिराभोवतीचं पाणी उन्हाळ्यात वाढतं आणि पावसाळ्यात कमी होतं. एका मोठ्या लोखंडी कठडे लावलेल्या सिमेंटच्या पुलावरून मंदिरापर्यंत जाता येते. आम्ही गेलो तेव्हा पुलावरही पाऊलाच्या वर येईल एवढं पाणी होतं. त्या पाण्यातूनच आम्हाला जावं लागलं.
मंदिराचं बांधकाम अकराव्या शतकातील चालुक्य काळातील आहे. मंदिर संपुर्ण दगडाचच आहे. दगडी खांबांवर विविध शिल्पं कोरलेली आहेत. चालुक्य काळात स्त्रिया लढाईत सहभाग घेत असत त्यामुळे तशी शिल्पं कोरलेली आहेत. शिल्पांवर ग्रीक शैलीचा प्रभाव आढळतो. जैन धर्मियांचे नेमिनाथ आर्यनाथ या दोन तीर्थंकरांचे शिल्पही आहेत. शक्ती ब्रह्मदेव आणि शिवसंप्रदायातील देवीदेवतांची शिल्प तसेच विष्णुचे दहा अवतार व अष्टदिक्पाल दाखवले आहेत.
मंदिरातील खांब मोजले तर कधीही एक आकडा येत नाही असं स्थानिकाने सांगितलं.
समोरच्या कालभैरव मंदिरात कालभैरवाष्टकाचे सूर ऐकु येत होते. "काशिकापुराधी नाथ कालभैरवं भजे.."
शिवपिंडीचं दर्शन घेऊन बाहेर आलो. एक निवांत संध्याकाळ अनुभवास आली. वरती आभाळात सांजरंग उतरत होते त्याचं प्रतिबिंब मंदिरा सभोवतीच्या पाण्यात दिसत होतं. शिवशंभोच्या प्रसन्न दर्शनाने आजच्या दिवसाची सांगता झाली.
दोन दिवसात तीन शनिमंदिरं आणि वरददत्त व शिवशंभो यांच्या दर्शनाचा छानच योग जुळून आला मन अगदी प्रसन्नतेनं, समाधानानं काठोकाठ भरून आलं होतं.
आणि तरिही मनाला मात्र उद्याच्या परतीच्या प्रवासाचे वेध केव्हाच लागले होते.
©️वृंदा मोघे.#
फोटोंसाठी माझा ब्लाॅग vgmblogs.blogspot.com वर पाहावे.

लेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 Jan 2021 - 10:39 am | मुक्त विहारि

फोटो हवे होते.

माफ करा पण फोटो टाकण्याचं तंत्र अजून अवगत नाही झालंय. खुप धडपडून ब्लाॅगवर टाकलेत. कृपया ब्लाॅगवर बघा. धन्यवाद !

मुक्त विहारि's picture

18 Jan 2021 - 10:56 am | मुक्त विहारि

तुमची अडचण समजू शकतो.

ब्लॅागच्या फोटोवर राइट क्लिक करून लिंक। मिळते ती इथे वापरायची.
किंवा
<img src="लिंक" width ="80%"/>
या टेम्पलेटात टाकून कॅापी। पेस्ट करायचे।

कंजूस's picture

18 Jan 2021 - 11:14 am | कंजूस

गोरगावलेकर's picture

18 Jan 2021 - 2:15 pm | गोरगावलेकर

छान प्रवास वर्णन . ब्लॉगवरचे फोटोही आवडले.

VRINDA MOGHE's picture

18 Jan 2021 - 4:59 pm | VRINDA MOGHE

धन्यवाद