शिक्षणाचे मानसशास्त्र: परीक्षेसाठी शिकणे का शिकण्याचे परीक्षण

राजा वळसंगकर's picture
राजा वळसंगकर in जनातलं, मनातलं
18 Dec 2020 - 12:02 am

खालील परीक्षेत 5 पैकी 2 मार्क मिळाले तर संस्कृत भाषा अवगत आहे असे प्रमाणपत्र द्यावे का?

योग्य पर्याय निवडून उत्तरं द्या : (कुठलेही पाच)

  1. "यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति .... " वाक्य पूर्ण करा.
  2. वसुधैव कुटुम्बकम् मधे कुटुंबकम् हे दक्षिण भारतातल्या गावाचे नाव आहे. बरोबर का चूक?
  3. "सत्यमेव जयते" चा अर्थ .... असा होतो. (सत्य + मेवा संधी करा, पत्यातली सत्ती आहे, सत्याचाच विजय होतो)
  4. गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः हा श्लोक ... भाषेत आहे. (संस्कृत, मराठी, हिंदी, तेलगू)
  5. "सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः" ह्या श्लोकात "सर्वे" म्हणजे .... (आढावा, सगळ्यांना, सर्वेक्षण, भूमापन)
  6. ॐ शांती ॐ चित्रपटाचे नाव ... भाषेत आहे. (इंग्रजी, पर्शियन, संस्कृत, मांडारीन)

(तुम्हाला किती मार्क मिळाले? :-) )

क्षमस्व! या वात्रटपणाचे कारण पुढे येईलच, पण आधी हेतू स्पष्ट करतो (वात्रटपणाच, दुसरं काय?). सर्व जगात जी परीक्षा पद्धत वापरून शिक्षणाचे प्रमाणपत्र दिले जाते, त्या पद्धतीचा गुणदोषांच्या चर्चा होत राहावी हा विचार आहे. सर्व सामान्यात शैक्षणिक धोरणाबद्दल जागरूकता आणि त्यावर येणाऱ्या / असलेल्या विचारांना आणि सुचनांना तर्काचा आधार मिळावा असा आहे. जागरूकता राहीली, तर आहे ते चांगले चालवले जाइल आणि नव्याचा शोध होईल अस विश्वास आहे.

कदाचित आज तूमची मुलं शिक्षण व्यवस्थेत नसतील, त्यामुळे महत्वाचा वाटणार नाही, किंवा शिकत असल्यामुळे त्यांच्या सोयिकडे झुकणारा विचार असेल, पण निष्पक्ष तर्कसंगत विचार अपरिहार्य आहे हे तुम्हाला पटेल. हा दोष किंवा कुठे कमी पडतं हे आता सर्वंश्रूत आहे, तरीही दुरलक्ष होतय, होऊ नये असे वाटते. लक्षात असू दे की आपल्याला, आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना औषध देणारा, आपले घर बांधणारा, दूध, किराणा देणाऱ्यां पासून नौकरी, कामधंदा देणारे ... सर्वच ह्या शिक्षण पद्धतींचे निर्मित / प्रभावित आहेत. इट इझ अ स्मॉल वर्ल्ड.

आहे ते चांगले कसे चालवल जातं? - Work around methods of today

व्यावसायिक आणि शैक्षणिक व्यवस्था (systems) नुसते मार्कांवर अवलंबून राहत नाही.

व्यावसायिक मुलाखतींवर भर देतात. आपण ज्यासाठी भरती करत आहोत ते काम उमेदवार करू शकेल का हे पडताळून पाहतात. नवोदितांना घेताना असे काम ते शिकून चांगले करू शकतील का हे पाहतात. काही वेळा छोटेसे नमुना काम करायला सांगतात. खरच येत का हे तपासलं जातं. व्यावसायिक ज्ञाना बरोबर वैयक्तिक गुणांकडेही बघितले जाते. (प्रश्नांचे महत्व, पहा पूर्वीचा लेख: प्रश्नोपद्व्याप)

शैक्षणिक व्यवस्थेने कॉमन एन्ट्रन्स/ऍडमिशन टेस्ट अशा अधिक परीक्षा जोडल्या आहेत. पसंगी ग्रुप डिस्कशन, इंटर्व्हियु प्रकारही घेऊ शकतात. 10वी 12वी बोर्डाचे प्रयोजन सर्व साधारण (बेसिक) शिक्षण प्राप्तीचे प्रमाण आहे (असे मला वाटतं). ऍडमिशन टेस्ट थोडे जास्त आणि व्यापक तपासणी करण्याकरता आहेत. वर खबरदारी म्हणून पाहिल्या वर्षी उजळणीला महत्व देतात.

परिक्षेसंबंधी मी रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ इंग्लंड येथे परीक्षा विभागाच्या प्रमुखांशी एकदा बोललो होतो. तेव्हा परीक्षा अजूनही मार्मिक चिकित्सक, विस्तृत कशी करता येईल हा प्रश्न आहे असे म्हणाले होते. "द क्वालिटी ऑफ मेडिकल सर्व्हिस इझ ओन्ली एझ गुड एझ द फिजिशियन. ओन्ली द गुड शुड गो अहेड" हे ऐकून मला FRCS डॉक्टरांना का चांगलं म्हणतात आणि परीक्षेला किती गंभीरपणे घेतलं जातं ह्याची कल्पना आली. (गम्मत: FRCS पात्र झालेले सर्जन्स डॉक्टर ही उपाधी सोडून देतात आणि नावापुढे मिस्टर/मिस/ई. लावतात! त्यांना डॉक्टर म्हटलेलं चालत नाही. :-))

नवे का शोधावे - The need to find a better solution

वर्क अराउंड आहेत ना, मग अडचण कुठे आहे? विचार करा की नवीन शोध, दर्जेदार उत्पादन, यशस्वी आणि उत्कृष्ट व्यवस्था अभावानेच का दिसते? परिक्षेतले यश आणि प्रत्यक्ष - का आहे फरक? पुढे जाणारे शिक्षणाबद्दल "नॉट बिकोज, इंस्पाईट ऑफ" असे का म्हणतात? योग्यता प्रमाणित करण्याची परीक्षा स्वतःच फेल होती आहे का?

आज पुष्कळ लोकांचे मत आहे की मुलांना डिगऱ्या असतात पण काही करता येत नाही. बहुतेक त्यांचा अनुभव काहीसा तसा आहे. एकाने इंजिनियरिंग पास झालेल्या काही विद्यार्थ्यांना सेफ डिपॉझिट लॉकररूमच्या दरवाज्यासाठी कुठला कडी कोयंडा (Aldrop bolt) योग्य असे विचारले. महाग असला तरी चालेल, पण चांगल्या "क्वालिटीचा" हवा असेही सांगितले. बहुतेकांनी महागातला नक्षीकाम असलेला "ब्रास" बोल्ट निवडला. हार्डन्ड स्टील का नको, त्याच्यापेक्षा ब्रास बोल्टची क्वालिटी का चांगला असे विचारले तर गडबडले. चालेल ना असे मोघम उत्तर दिले पण कारण देता आले नाही. सेफ डिपॉझिटरुमला लोखंडी दरवाजा असू शकतो हे त्यांचा लक्षात आले नाही आणि विचारलेही नाही. आम्हाला असे शिकवलेच नाही असेही काही महाभागाने उत्तर दिले.

दुसऱ्या गृहस्तांनी माझ्याकडे 10 hp 3 फेज कनेक्शन आणि सिंगल फेज अर्धा hp पाण्याचा पपं आहे, तर तो जोडण्यासाठी काय करू असे विचारल्यावर "विद्युत मंडळाला अर्ज देऊन सिंगल फेज घ्यावे लागेल" असे उत्तर मिळाल्याचे संगितले!

सर्व विद्यार्थी परीक्षेत मात्र चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. काय चुकलं असेल? शिकवण का परीक्षण? वर्क आराउंड का हवे, लेखी, तोंडी आणि तीन तीन मुलाखती का घेतात याचा अंदाज येतो.

शिकवणी यशस्वी झाली का? – Assessment OF learning

थोडीशी पार्श्वभूमी: परिभाषा (Basic terminology)

शिक्षण यशस्वी झाले का नाही हा मूळ प्रश्न. एक परीक्षा घेऊन निर्णय घ्यावा का ही शंका! यासाठी थोड्या वेगळ्या तांत्रिक बाजू पाहावयास हवे. शिक्षणाच्या मानस शास्त्रात चार अंगाने विचार केला आहे. (या अंगांना मी "दर्शन" Viewpoint/School of thought म्हणतो. एम एड पाठ्यक्रमात 'उपपत्ति' म्हटले अहे.

  1. वर्तनात्मक दर्शन शिक्षणाला वर्तनात दिसणारा बदल प्रमाण करतो (Observed permanent change in behaviour).
  2. संज्ञानात्मक किंवा ज्ञानात्मक दर्शन फरक ग्राह्य धरतो (Observed change in knowledge, unknown to known).
  3. रचनात्मक दर्शन (Constructive, derived knowledge). इथे अनुभव आणि अनुभूतीचा प्रयोग करून मनुष्य ज्ञान निर्मित करतो असे मानले आहे.
  4. मानवतावादी दर्शन (Humanistic) - अब्राहँम मासलो यांच्या प्रमुख प्रणेता आहे. त्याने मानवाचे चार वाढत्या क्रमाचे उद्दिष्ट संकल्पना मांडली. पाहिले चरितार्थ, मग स्थैर्य, नंतर आत्मसम्मान, आत्मसिद्धी. हा अजून नवीन विषय आहे आणि काम चालू आहे (Work in progress - थोडक्यात मला माहित नाही :-) )

आजच्या परीक्षा पद्धती पहिल्या दोन दर्शनांवर अधिष्टीत आहेत. प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्टच्या चेष्टा बिहेवीअरल दर्शन, तर लेखी ही कॉग्नीटिव्ह चेष्टा (Pun/श्लेष मुद्दाम वापरला आहे).

सर्व दर्शनात परीक्षेचे मुख्य उद्दिष्ट अध्ययन प्रयासात मार्गदर्शक म्हणून आहे. त्यामुळे परिक्षणाची कृती प्रश्नोत्तराचे (interaction चे) तीन प्रकार असतात: फॉर्मेटिव्ह - जडण-घडणात्मक, डायग्नोस्टिक - चिकित्सक आणि समेटिव्ह - निर्णयात्मक.

  1. फॉर्मेटिव्ह तुम्हाला दिलेल्या माहितीचे ज्ञान कौशल्यात रूपांतर करतो. उदा. बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार. प्रश्न उलट सुलट विचारून गणिताचा सराव करवून ज्ञान-कौशल्य भक्कम करते. बुद्धीला ताण दिल्यावर स्मृती भक्कम होते. धड्या खाली असणारे प्रश्न (excercise) याच उद्दिष्टाने दिले असतात.
  2. डायग्नोस्टिक प्रकार तुम्ही काय करू/सांगू शकता हे पाहून पुढे काय करावं हे सांगण्यासाठी आहे. कुठे कमी आहे, कुठे चुकतेय तिथे दुरुस्ती दर्शवतो. वर्गातली चाचणी परीक्षा, गृहपाठ ई. सर्व मुलांची प्रगती समान असावी म्हणून तिमाही, सहामाही, वार्षिक डायग्नोस्टिक म्हणूनही घेतल्या जातात.
  3. समेटिव्ह पुढे जाण्याचा सिग्नल आहे. पिवळा हिरवा रंग (गुणांकन) कसे जा हे ही सांगतो. पिवळा सिग्नल किंवा कमी गुण असतील तर अध्ययन उजळणी किंवा विशीष्ट धडे पुन्हा अध्ययन करून सुधारण्याचा संदेश देतो. पुढचे विषय निवडताना विचार करण्यास सांगतो.

वर दिलेली पार्श्वभूमी विविध पैलूंवर विचार करण्यास उपयुक्त आहे म्हणून दिली आहे. आता मुख्य मुद्दा.

निर्णयात्मक परीक्षा पद्धत - Summative evaluation

समेटिव्ह किंवा निर्णयात्मक परीक्षा पद्धत ही सध्याची पद्धत आहे. त्यात चाचणी, इंटर्नल एक्सटर्नल आणि क्वचित प्रोजेक्ट प्रकार असे भाग असतात:

  1. चाचणी परीक्षा खरतर फॉर्मेटिव्ह असेसमेन्ट आहे, पण विद्यार्थी आणि बरेच शिक्षक त्याला महत्व देत नाहीत म्हणून त्यांचे सरासरी इंटर्नल असेसमेन्ट मधे वर्ग करण्याची मुभा आहे. पण ह्याचे उद्दिष्ट पुढे जाण्याची तयारी करण्याची (विद्यार्थ्यांची) आहे. हे असेसमेन्ट OF लर्निंग नसून असेसमेन्ट FOR लर्निंग आहे.
  2. इंटर्नल असेसमेंट मधे नियम कमी ठेवून शिक्षकाला विद्यार्थ्यांचे प्राप्त ज्ञान परीक्षण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मूळ स्वरूपात ही परीक्षा डायग्नोस्टिक आहे. उत्तरपत्रिका तपासून त्यावर टिप्पणी दिली जाते (feedback). काय आले, काय नाही, कुठे चुकलं हे पाहून विद्यार्थी पुरक / रेमेडिअल शिकवणी घेऊ शकतो. शिक्षकाला एकंदरीत परिणाम पाहून आपल्या टेक्निक मधे कुठे फेरफार हवा हे कळत. त्या अनुषंगाने पूरक / रेमेडिअल शिकवणी आयोजित करता येते. प्रसंगी ही परीक्षा पुन्हा किंवा तोंडी घेता येऊ शकते. व्हायवा किंवा तोंडी परीक्षा सखोल परिक्षणासाठी वाव देते. विद्यार्थ्याला तत्काळ फीडबॅक मिळतो.
  3. एक्सटर्नल असेसमेन्ट प्रत्यक्ष शिकवणारा शिक्षक घेत नाही. निष्पक्ष मूल्यांकनासाठी बाह्यस्त व्यक्ती किंवा संस्था घेतात. ही विद्यार्थ्यांसाठी समेटिव्ह असू शकते. क्वचित प्रसंगी इंटर्नल परीक्षेत एक्सटर्नल एक्झामीनेर बोलावून डायग्नोस्टिक पण करता येते.
  4. समेटिव्ह असेसमेन्ट (वार्षिक, सेमिस्टर एन्ड) या परीक्षेत ऐनवेळी ज्ञान आठवते, वापरता येते का याचे परीक्षण आहे (स्मृती आणि कौशल्य परीक्षा)
  5. प्रोजेक्ट उद्दिष्ट प्राप्त ज्ञानाचा उपयोग करून (प्रोजेक्ट) किंवा सखोल विचार करून विषय पुढे नेण्याची (सेमीनार, व्हाइट पेपर) म्हणजेच शिक्षण अंगीभूत झाले का हे तपासण्याची आहे.

इथे काही अजून मोठ्या त्रुटी लक्षात घेण्यासारखे आहेत.

  1. विद्यार्थी वार्षिक परिक्षेसाठी म्हणून विशेष प्रयास करतात. त्यामुळे रिसन्सी इफेक्ट होतो. काल वाचलेलं (रिसेन्ट) आज आठवत, उद्या आठवेल का? काही विषय पुढे अधिक गहन होतात त्यामुळे मागची उजळणी होते, पण काही तिथेच थांबतात. मग ते विस्मृतीत जातात. उदा. चक्रवाढ व्याजदराचा फॉर्म्युला आठवतो? पुढचे पाट मागचे सपाट?
  2. पुढच्या प्रवेशाचे द्वारपाल, गेट कीपर / गुणांकनाचे प्रेशर - हे वाम मार्गाला प्रवृत्त करतात आणि अनाठायी मानसिक दबाव निर्माण करतात.
  3. महाभारतातील कर्ण आठवा. ऐनवेळी चाक रुतलं हा त्याचा दोष म्हणावा का? या प्रेशर मधे ब्रह्मास्त्र मंत्र आठवला नाही म्हणून तो (कर्ण) धनुर्विद्या शिकला नव्हता, पारंगत नव्हता असे म्हणता येईल?
  4. शिक्षकांच्या मताला वाव नसतो, पण त्यांच्यापेक्षा विद्यार्थ्याच्या ज्ञानार्जनाची कल्पना कुणाला असेल?

त्रुटी असल्यातरी राबवायला सर्वात सोयीस्कर पद्धत, त्यामुळे सगळीकडे सर्रास वापर आढळतो. यापुढील काळात संगणकाचा उपयोग करून अजून सक्षम पद्धत निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहे. पण सध्या तरी हीच पद्धत चलेलासे वाटते.

परीक्षा ही फक्त विद्यार्थ्यांच्यावर टिप्पणी नसते. ती शैक्षणिक संस्था, अध्यापक / शिक्षक, अभ्यासक्रम, आणि समाज व्यवस्था / विचारांवर पण भाष्य करते.

  • परीक्षा आणि संस्था - काय आहे नातं?

विद्यार्थी परीक्षेत उच्च श्रेणीत यशस्वी झाले तर संस्थेला त्याचा क्रेडिट बरोबर आर्थिक आणि लौकिक यशही मिळते. चांगले शिक्षक आणि चांगले विद्यार्थी, दोघेही आकर्षित होतात आणि संस्थेचे नाव लौकिक उत्तरोत्तर वाढते. संस्थेला डोनेशन, ग्रांट्स आणि रिसर्च प्रोजेक्ट्स मिळतात. संस्था अध्यापकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देउ शकते. परीक्षेचा निकाल संस्थेच्या व्यवस्थापनेची गुणवत्ता सांगतो.

  • परीक्षा अभ्यासक्रमावरही भाष्य करते. (सरप्राईझ?)

बघा विचार करून. अभ्यासक्रम फारच सोपा आणि फारच थोडा असेल तर निकालाची टक्केवारी काय असेल? पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्यांची संख्या किती असेल? चांगला/सुमार/बेकार अभ्यासक्रम असल्यास समाजात विविध क्षेत्रात यशस्वी शास्त्रज्ञांची, तज्ञांची, व्यवसायकांची संख्या किती असेल? देशाची अर्थ व्यवस्था, सामाजिक परिस्थिती कशी असेल?

  1. अध्यापक-शिक्षक प्राविण्य परीक्षण होते.

प्रायव्हेट क्लास, कोचिंग, ट्युशन का चालतात? सखोल आणि गंभीरपणे विचार करण्याचा प्रश्न आहे. उत्तम शिक्षक होण्यासाठी अलबर्ट आईन्स्टाईन असण्याची अट नसते. आईन्स्टाईन स्वतः 10वी 12वी साठी चांगला शिक्षक झाला असता का? गुरुपदाचे अनाठायी स्तोम आणि अवडुंबर बाजूला केले तर गुरूला (खर तर गुरू नव्हे - अध्यापक/शिक्षक) आवश्यक ज्ञानाबरोबर ते समजावून सांगण्याची कला, भाषा, वक्तृत्व, विद्यार्थ्यांची अध्ययनाची शैली, क्षमता वेग आणि अजून अनेक अंगांचे ज्ञान हवे. (भाषा चांगली येत नसलेले शिक्षकांचा अनुभव बऱ्याच जणांना असेल, कारण मँथ्स सायन्स करणारे क्वचितच भाषा महत्वाची म्हणून जास्त चांगले, गुणांच्या पलीकडे अध्ययन करतात. त्यात इंग्रजी? ... हे राम!)

  • समाजिक व्यवस्था, स्थिती, विचार आणि परीक्षा

कॉपी करणे थांबवण्यासाठी पोलीस बंदोबस्त लागतो, पेपर फुटीचे काळे अर्थकारण ... काही वर्षांपूर्वी पालक बांबूला चिठ्या बांधून, परीक्षा केंद्राच्या खिडकीतून (दुसऱ्या मजल्यावरच्या!), आपल्या पाल्यानं देत होते असा विडिओ चित्रण सोसिल मीडियावर व्हायरल झालं होतं.

समाज व्यवस्थेनं परीक्षेला अध्ययन मार्गदर्शकाच्या पदावरून द्वारपालाची (गेट कीपर) जबाबदारी दिली आणि कागद असल्या शिवाय पुढे (अँडमिशन, नौकरी) जाऊ देऊ नका असे सांगितले! द इंटेन्शन इज टू कीप आऊट, नॉट टू लेट इन उनलेस ... शेष काय सांगणे, आपण सर्वज्ञ आहात.

नव्याने उदभवणारा धोका The new risks - Teaching to the test and Gaming the system

"फार चांगले निकाल हे फार वाईट निकाला इतकेच गंभीर आहेत!" बघा विचार करून.

आपल्यासाठी फार नवीन नाही, पण लातूर पॅटर्न, राजस्थानातले व्यावसायिक कोचिंग क्लासेस - यशस्वी होण्याची अविचारी धडपड ... काही संकट बळावू लागलेत ते पाहून वेळीच सावध होऊ.

इंग्रजीत दोन वाक्प्रचार लोकप्रिय होताहेत - Teaching to the test and Gaming the system.

  • Gaming the system म्हणजे सिस्टिमच्या नियमांचा आणि सवलतींचा व्यक्तिगत हेतू किंवा स्वार्थ साधण्यासाठी अनुचित उपयोग करणे. उदा. नो पार्किंग एरिया मधे गाडीचे इंजिन चालू ठेवून वाट पहात उभे राहणे, आप्तेष्टांच्यासाठी बसमधे जागा अडवणे इ. शैक्षणिक क्षेत्रात आई वडलांनी होमवर्क करण्यापासून मार्क चांगले मिळावेत म्हणून तयार प्रोजेक्ट रिपोर्ट विकत घेऊन सादर करणे ... अपेक्षित प्रश्नसंच पाठ करून परीक्षा देणें ... असे प्रकार येतात. याने शिकण्याचा हेतू साध्य होतो? अश्या पद्धतीने पास झालेल्या व्यक्तीने तुमच्या मुलांवर वैद्यकिय उपचार करावेत? अधिक काय सांगणे?
  • Teaching to the Test हा वाक्प्रचार अलीकडच्या काही
  • वर्षांपासून USA, UK मधे चर्चेत आला आहे. शिक्षक जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना 10वी, 12वी, JET, CAT मार्क मिळण्याच्या उद्दिष्टाने शिकवतात. परीक्षेत विचारण्याची जास्त शक्यता असणारे विषय आणि प्रश्न प्रकारावर जोर देतात. तेव्हा अशा शिक्षकांना, त्यांच्या शिकवणीला "टीचिंग टू द टेस्ट" (परीक्षेत पास होण्याची शिकवण) म्हणतात.

Teaching to the Test चे फायदे तोटे चर्चिले जात आहेत आणि The jury is still out - अजून निर्णय नाही, अशी स्थिती आहे. पण आता काही अभ्यास पत्र उपलब्ध होऊ लागले आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, शिक्षण हे शिकवणाऱ्याला व्यक्तिगत आवडी-निवडी-विचारातून बाहेर येते. शिक्षण पद्धत आणि व्यवस्था यशस्वी होत असल्याचे चित्र उभे राहते. तर दुसरीकडे मार्कांच्या राजकारणात सर्वांगीण विकासाला बगल दिली जाते. विद्यार्थी ज्ञात पद्धतीने उत्तर शोधण्यात इतका गर्क होतो की नवीन काही करण्याचा विचारही करत नाही. लवकर हिरमोड होतो आणि सायंटिफिक इन्कवायरी किंवा शास्त्राधार शोधण्याचा विचार हरवतो.

“The practice of teaching to the test resulted in teaching to a narrow subset of the standards, rather than teaching kids to be able to do the full range of things the standards describe."

R. E. Bennett – Norman O. Frederiksen Chair in Assessment Innovation at Educational Testing Service in Princeton, NJ.
https://news.ets.org/stories/is-teaching-to-the-test-bad-instruction/

नोंद घ्या: बेनेट Narrow subset of standards म्हणतात म्हणजे विद्यार्थी उच्च श्रेणीत पास (स्टॅन्डर्ड्स) होण्या्यासाठी, परीक्षेत विचारण्याची जास्तीतजास्त शक्यता असणारे टॉपिक्स (नँरो सबसेट) वर भर दिली जाते. शिक्षण सर्व उद्दिष्ट नव्हे तर काही विशिष्ट (मर्यादित) उद्दिष्टच साधते. हा प्रकार Blooms taxonomy of learning चा निर्घृण विपर्यास आहे!

सुरवातीच्या वात्रट परीक्षचे प्रयोजन काय आणि का होतं हे आत्ता आपल्याला चांगले लक्षात आलं असेल. परीक्षार्थी शिक्षणाचा दोष मोठा आहे. रोट लर्निंग किंवा पाठांतरीत उत्तरे आणि "प्रश्न विचारू नको सांगतोय तसे कर" संस्कृतीला उत्तेजन देणारे आहे. एकीकडे inquiry learning, experiential learning असे सुधारक विचारांनी सर्वांगीण विकासाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षण पद्धतीला मागे ओढणार आहे.

While there is research to suggest that students will achieve higher grades in some subjects with the “teach to the test” approach, it is a worrying trend that can extinguish a love of learning, lead to poor motivation, and result in superficial learning that prohibits advanced thinking and communication skills.
https://www.sec-ed.co.uk/best-practice/pedagogy-rejecting-teaching-to-th...

शेवटी

वर दिलेला धोका मी अनेक वेळा अनुभवला. ज्या कामासाठी म्हणून माझ्या कंपनीत भरती केली होती, त्यांनी ते काम 'शिकवलच" नाही म्हणून हात वर केलेले मी अनेक वेळा अनुभवले. त्यांना बर्सचे गुणधर्म पाठ होते, हार्डन्ड स्टील काय असते ते माहीत होतं, उपयोग कुठे होतो हे पण माहीत होते, गुणधर्म, उपयोगावर प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात म्हणून पाठ केले होते. पण ... महाभारतातला कर्ण पुन्हा पुन्हा आठवतो. तो शापित होता का शिकवणारे कमी पडले?

Design of assessment हा एक स्वतंत्र विषय आहे. कोणा तज्ञानेच हे धनुष्य उचलावे. माझ्या अभ्यासातले आणि मला आवडलेले लेखांवर जरूर लिहीन. ही माझी शिकण्याची आणि विचार करण्याची शैली आहे ... तुमचा अभिप्राय आणि विचार हे माझे शिक्षक.

काही वाचनीय लिंक्स:

New techniques in assessment OF AND FOR learning

Evidence of learning: एक परिक्षेवर निर्भर राहण्या ऐवजी संपूर्ण शैक्षणिक प्रयासात छोट्या छोट्या घटनांमधून शिक्षण यशस्वी होते आहे का हे पाहता येते. यात दोन प्रकारचे एव्हीडेन्स ग्राह्य आहेत. डायरेक्ट - सध्याची लेखी परीक्षेचे 3 प्रकारचे क्रिया (फॉर्मेटिव्ह इ. इंटर ऍक्शन, प्रॉब्लेम सोलविंग, डिसीजन मेकिंग इन रिअल लाइफ सीटयूएशन ... ) इनडायरेक्ट एव्हीडेन्स - अटेडन्स, सबमिशन्स, विद्यार्थ्याने विचारलेले प्रश्न, चॅट रूम पार्टीसिपेशन ... जर्नल आर्टिकल्स इ. ही पद्धत मेडिकल शिक्षणात OSCE पद्धत म्हणून वापरली जाते. इंटर्नशिप काळात मेडिकल स्टुडंट्स डॉक्टर्स आणि सर्जन्सना सहायक म्हणून काम करतात (Apprenticeship) आणि त्यांच्या परफॉर्मन्सवर मार्गदर्शन आणि मार्क दोन्ही मिळवतात. (गुरु-शिष्य परंपरा?) इथे Simulation technique चा वापर चांगला होतो. सिम्युलेशनला वैमानिक प्रशिक्षण प्रक्रियेनी सुरवात झाली. आता बऱ्याच क्षेत्रात वापरले जातात. रोल प्ले, सीनारिओ बेस्ड गेम्स, इ. असे टेक्निक्स ह्याच सदरात मोडतात.

राजा वळसंगकर

१७-१२-२०२०

शिक्षणलेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

18 Dec 2020 - 6:52 am | तुषार काळभोर

तुम्ही परीक्षे संबंधित खूप मुद्द्यांना, जे खूप महत्वचे आणि अतिसंवेदनशील आहेत, स्पर्श केलाय.
अगदी काही महिन्यांपूर्वी पर्यंत वाटायचं की भारतीय शिक्षण पद्धती मध्ये गडबड आहे. मार्कांसाठी शिकणे, मार्कांसाठी परीक्षा देणे, इत्यादी. मग होतं काय, परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी काय शिकायचं ते पाहिलं जातं.
'अरे, अमुक टॉपिक वाच. त्यावर सोळा मार्कांचा प्रॉब्लेम नक्की येतो. '
' तो टॉपिक ऑप्शन ला टाकला तरी चालेल, त्यावर जास्त प्रश्न येत नाहीत '
असे संवाद सर्वांनी केलेले असतातच.
आय आय टी मध्ये शिकायचं असेल तर सर्वोत्तम विद्यार्थी निवडण्यासाठी परीक्षा असते. पण त्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत गणित, रसायन अन भौतिक शास्त्रा तलं काय येतं हे बघण्याऐवजी, त्या प्रवेश परीक्षेत उच्च गुण मिळवण्यासाठी वेगळं शिकवलं जातं.
मग हे शिकवण्यासाठी असलेल्या क्लास मध्ये प्रवेश मिळवायला वेगळी परीक्षा. आणि त्या परीक्षेच्या तयारी साठी एक क्लास.

पण मागच्या काही महिन्यात लक्षात आलं की जगभरात कमी जास्त हा प्रॉब्लेम आहेच. भारतात लोकसंख्या, त्यातून येणारी स्पर्धा, यांचं स्वरूप थोडं टोकाचं झालंय. पण इतरत्र सुद्धा परीक्षेत पास होणं, त्यात चांगले मार्क मिळवणं आणि मार्कांसाठी शिकणं, हे आहेच.
मूळ शिक्षण पद्धती कदाचित जास्त चांगली असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता थोडी जास्त असेल, पण मार्क आणि परीक्षा या गोष्टींचं अवडंबर सगळीकडे आहे.

मला काय येतं हे माझ्या मार्कांमधून रिफ्लेक्ट होत नाही, हा प्रॉब्लेम आहे.
मग तो माझ्या शिक्षकांचा, माझा, परीक्षा डिजाइन करणाऱ्यांचा किंवा पेपर तपासून मला मार्क देणाऱ्यांचा असेल. किंवा या सगळ्यांचा. किंवा समाजाचा.

किंवा हा प्रॉब्लेम नसेलच.
हेच नॉर्मल असेल.

राजा वळसंगकर's picture

18 Dec 2020 - 5:04 pm | राजा वळसंगकर

॥॥॥पण मागच्या काही महिन्यात लक्षात आलं की जगभरात कमी जास्त हा प्रॉब्लेम आहेच. ॥॥॥॥
सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे. चांगली गोष्ट अशी की बऱ्याच देशात ह्याचावर काम करून उत्तर शोधत आहेत. एव्हीडेन्स ऑफ लर्निंगकडे कल आहे.
डिझाईन ऑफ अससेसमेंट हा महत्वाचा विषय आहे आणि त्याचे खास चर्चासत्र घेतात. ग्रेडस केवळ लेखणीच्या टक्क्यांवर नसते. सर्वांगीण विचार घेण्याचा प्रयत्न आहे. आणि शैक्षणिक धोरणात (सरकारच्या) याचे पडसाद उमटतात.
पण हेच नॉर्मल नको हे निश्चित!

आनन्दा's picture

18 Dec 2020 - 2:20 pm | आनन्दा

खूप मोठा लेख आहे.
सवडीने वाचतो.

कृपया लेखमाला करावी, म्हणजे मागचे पुढचे एकत्र वाचता येतील

Bhakti's picture

18 Dec 2020 - 3:04 pm | Bhakti

हा लेख चार-पाच वेळा वाचला, तेव्हा समजला.अगदी एकूण एकूण एक मत १००% खरं आहे.परीक्षा कशी पाहिजे याचे उत्तर शेवटच्या paragraph मध्ये आहे.

राजा वळसंगकर's picture

18 Dec 2020 - 7:47 pm | राजा वळसंगकर

अगदी मनापासून धन्यवाद!
लेखाचे उद्दिष्ट टिचिंग तू द टेस्ट चे दुष्परिणाम दाखवत एव्हीडन्स ऑफ लर्निंगकडे जाण्याचाच आहे. अजून ही पद्धत प्रायोगिक अवस्थेत आहे म्हणून फक्त निर्देश करतो आहे. सर्टिफिकेट आणि शिकणे फरक केला पाहिजे.

राजा वळसंगकर's picture

18 Dec 2020 - 7:50 pm | राजा वळसंगकर

अगदी मनापासून धन्यवाद!
लेखाचे उद्दिष्ट टिचिंग तू द टेस्ट चे दुष्परिणाम दाखवत एव्हीडन्स ऑफ लर्निंगकडे जाण्याचाच आहे. अजून ही पद्धत प्रायोगिक अवस्थेत आहे म्हणून फक्त निर्देश करतो आहे. सर्टिफिकेट आणि शिकणे फरक केला पाहिजे.

आनन्दा's picture

18 Dec 2020 - 8:21 pm | आनन्दा

लेख पटला, पण याबाबतीत एक मूलगामी प्रश्न विचारावासा वाटतो..

आपण चाकोरीबाहेर जाण्याची एक नवीन चाकोरी तर तयार करत नाही ना?
बहुतांश माणसे ही चाकोरीबद्ध जीवन जगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.. त्यांना कोणत्याही प्रकारे चाकोरी मोडायला भाग पाडले तरी ते शेवटी ते चाकोरीतच राहतात, चाकोरी बदलते इतकेच..

यालाच मी मागच्या वेळेस gunpoint questions म्हणालो होतो.. काही लोकांना प्रश्न पडतच नाहीत, पण प्रश्न न पडणे हा कमीपणा आहे हे एकदा मनावर ठसले, की मग त्या नवीन चाकोरीत बसण्यासाठी काहीही प्रश्न तयार करून विचारले जातात.

अशांचे काय करणार?

चाकोरी होऊ नये म्हणून तर नवनवीन बदल सतत दिले पाहिजे.

राजा वळसंगकर's picture

18 Dec 2020 - 8:56 pm | राजा वळसंगकर

धन्यवाद. प्रत्येकाला आपले जीवन कसे जगावे हे ठरवण्याचा अधिकार आहे. ते चांगले का वाईट ह्याच्यावर माझे मत असू शकते पण मी तिथंच थांबले पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्याचा मान राखला पाहिजे. कुठलाही अतिरेकी आग्रह अयोग्य - मग तो धर्माचा असो राजकारणाचा असा किंवा सामाजिक वागणुकीचा (प्रश्न विचारण्याचा). त्यामुळे ज्याला प्रश्नच पडत नाहीत किंवा जो चाकोरीत धन्यता मानतो त्याला त्याचे आयुष्य त्याचा मर्जीने त्याला जगु द्यावे हे माझे मत.

प्रश्न न पडणे हा कमीपणा नाही, सीकरलेली जीवन शैली आहे. पण शिक्षण व्यवस्थेला प्रश्न न विचारण्यावर पण प्रश्न पडला पाहिजे आणि तो प्रोबिन्ग स्वरूपाचा :-) एक तर समजलंय, नाही समजलं किंवा थोड्या वेळ हवा आहे विचार कराय्ला.

Gunpoint questions are rhetoric questions – the answer is not expected – it is assumed or taken for granted.

आनन्दा's picture

19 Dec 2020 - 11:42 am | आनन्दा

हे पटले.
पण बऱ्याच वेळेस चाकोरी मोडताना आपण फक्त चाकोरी रुंदावत असतो..
खरे तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपल्या मेंदूची क्षमता मर्यादित आहे.. त्यामुळे आपण रूढार्थाने एखादी चाकोरी जेव्हा मोडतो, तेव्हा त्या बाबतीत कक्षा रुंदावत असेल, पण अन्य काही बाबतीत चाकोरी आक्रसत जात असते.. म्हणजे उदाहरणार्थ कुशाग्र बुद्धेमत्तेची काही माणसे भावनांच्या बाबतीत अगदीच सुमार असतात. कारण मुळात उत्क्रांतीची चाकोरी आपण मोडू शकत नाहीच!!

बाकी तुमच्या प्रतिसादातील भावनांशी सहमत आहे. होते काय, आपण सामाजिक नियमांची एक चौकट तयार करतो, आणि त्या चौकटीच्या बाहेर असणाऱ्यांना विकृत, मतिमंद किंवा extra ordinary म्हणतो.. प्रत्यक्षात ते आपल्या चाकोरीत बसणारेच लोक असतात.. त्यामुळे सर्वसमावेशक अशी शिक्षणपद्धती हे माझ्यामते अजूनही एक मिथच आहे. प्रत्येकाची शिकण्याची क्षमता कायमच वेगळी असणार आहे, आणि आपण कितीही सुधारणा केल्या तरी एक नवीन चाकोरी तयार करण्याव्यतिरिक्त आपण काहीही करणार नाही आहोत, असे मला वाटते.

सिरुसेरि's picture

18 Dec 2020 - 9:05 pm | सिरुसेरि

या संदर्भात चर्चा करताना बरेचदा मुलांनी विद्यार्थी असावे की परिक्षार्थी असावे असा शब्दप्रयोग केला जातो . शिक्षणातील विषय हे व्यवस्थित समजुन घेण्यासाठी त्या विषयांचा सखोल अभ्यास करणे हे एक विद्यार्थी म्हणुन आवश्यक आहे . त्याचबरोबर , अभ्यास केलेल्या विषयांचे परिक्षेमधे योग्यरीत्या सादरीकरण करणे हे एक परिक्षार्थी म्हणुनही आवश्यक आहे .

आनन्दा's picture

19 Dec 2020 - 11:43 am | आनन्दा

या बाबतीत सहमत आहे

>>> अभ्यास केलेल्या विषयांचे परिक्षेमधे योग्यरीत्या सादरीकरण करणे हे एक परिक्षार्थी म्हणुनही आवश्यक आहे

सादरीकरण तपासायचे असेल तर open book exam एक पर्याय चांगला वाटतो... किती दिवस memory चेक करणार
ज्याला विषय कळलाय तो कशी अनेक पुस्तके वापरून योग्य सादरीकरण करून शकत़ो..जरा पाहिलं नेटवर तर कोरोना काळात अशा परीक्षांवर विचार झालाय. :) एक नमुना.
https://m.timesofindia.com/home/education/news/open-book-examination-wha...

सुबोध खरे's picture

21 Dec 2020 - 7:08 pm | सुबोध खरे

लेखात अक्षरशः असंख्य मुद्दे मांडलेले आहेत प्रत्येक मुद्याचा ऊहापोह करणे शक्य नाही म्हणून केवळ माझ्या विषयापुरते मी बोलतो.

वैद्यकीय शिक्षणात मी १२ च्या विद्यार्थ्यांना एम बी बी च्या प्रवेश परीक्षेसाठी एक वर्ष क्लास मध्ये शिकवले आहे. तसेच एम बी बी एस नंतर पदव्युत्तर प्रवेश परीक्षे साठी पण क्लास मध्ये शिकवले आहे. याशिवाय क्ष किरण शास्त्र( radiodiagnosis) सहाय्यक, उप आणि प्राध्यापक ( assistant professor, associate professorआणि professor) म्हणून एम बी बी एस आणि एम डी ला तेरा वर्षे शिकवले आहे.

१२ विच्या मुलांना फक्त परीक्षार्थी म्हणून शिकवणे आवश्यक आहे कारण आपल्याला ज्ञान किती पेक्षा तुम्ही परीक्षेत गुण मिळवून गुणवत्ता यादीत येत कि नाही हे महत्त्वाचे ठरते. जर आपल्याला १२ वि पर्यंत विषयाचे उत्तम ज्ञान आहे परंतु गुणवत्ता यादीत आपण आला नाहीत तर आपण डॉक्टर होऊ शकत नाही आणि त्या ज्ञानाची किंमत राहत नाही.

येथें क्लास मधेय शिकवणारे बहुसंख्य शिक्षक अतिशय उत्तम शिकवतात कारण तेथे भरायचे शुल्क लाखात आहे. येथे उत्तम गुण मिळवून एम बी बी एस ला प्रवेश मिळवणारे विद्यार्थी पहिल्या सहा महिन्यात अतिशय नाउमेद होतात कारण एम बी बी एस च्या पहिल्या वर्षाला असणारे शिक्षक हे केवळ पदव्यत्तर परीक्षेत चांगल्या विषयात प्रवेश न मिळाल्याने नाईलाजाने अशा विषयात पद्व्यूत्तर शिक्षण घेऊन शिक्षक झालेले असतात. आणि सरकारी नोकरी लागल्यावर काम करा नाही तर करू नका चालून जातंय अशा वृत्तीचे असतात. या दोन वर्षात नाउमेद झालेले विद्यार्थी मग आपल्याला काय करायचंय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवून चांगल्या विषयात तज्ञ व्हायचे असाच दृष्टिकोन ठेवून असतात.

एम बी बी एस झालात कि आपल्याला वैद्यकीय विषयात मूलभूत ज्ञान असणे अपेक्षित आहे. परंतु आजकाल तुम्हाला एम बी बी एस च्या चारही वर्षत किती गुण मिळतात हे महत्त्वाचे नसून पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवणे आवश्यक ठरते.

या परीक्षा आपले पुस्तकी ज्ञान उत्तम तर्हेने तपासतात. परंतु प्रत्यक्ष त्या डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्याला रुग्ण कसा तपासायचा स्टेथेस्कोप मधून हृदयाचे ठोके कसे ऐकायचे किंवा रुग्णाचे यकृत कसे तपासायचे याचे शून्य ज्ञान असले तरी चालते पण यकृताला सूज येण्याची ३५ कारणे माहिती असावी लागतात किंवा हृदयाच्या झडपांचे १५ विकार काय आहेत ते सांगू शकतात पण समोर आलेल्या रुग्णात कोणता विकार आहे हे मात्र त्यांना सांगता येत नाही.

या चाळणीतून तावून सुलाखून पदव्युत्तर वर्गात प्रवेश घेतलेले विद्यार्थी आले कि त्यांची खरी कसोटी लागते. चांगले विद्यार्थी ढोर मेहनत करतात. परंतु त्यांचे मूलभूत ज्ञान कच्चे असलेले शिक्षकांच्या लक्षात येते. आणि चान्गला शिक्षक अशा विद्यार्थ्यांना त्यांचे मूलभूत ज्ञान कसे उत्तम पातळीवर आणता येईल यात मदत करतात.

येथे दोन तर्हेचे विद्यार्थी दिसून आले.

१) मी ए एफ एम सी मध्ये ७ वर्षे शिकवले तेथील जवळ जवळ सर्वच विद्यार्थी अतिशय चांगल्या दर्जाचे आणि स्वतःच्या गुणवत्तेमुळे निवडून आलेले होते आणि तेथे शिकवणे हा माझ्या आयुष्यातील एक आनंदाचा काळ होता. हे सर्व विद्यार्थी आज ज्ञान आणि समाजातील त्यांची पातळी यात माझ्या कितीतरी पुढे गेलेले आहेत हे नमूद करताना मला अभिमान वाटतो.

२) खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात ६ वर्षे शिकवले तेथील सर्व विद्यार्थी आपल्या तीर्थरुपांच्या गुणवत्तेमुळे आलेले होते. ( देणगी मूल्य २ कोटी रुपये फक्त). त्यामुळे त्यांना मूलभूत ज्ञानात फारसा रस नव्हता.सन्माननीय अपवाद वगळता आपल्याला डायग्नोस्टिक सेंटर हा व्यवसाय म्हणून कसा चालवता येईल या दृष्टीने विचार करणारे होते. तेंव्हा त्यांना हवे तेवढे ज्ञान ते घेत असत. आज असे अनेक विद्यार्थी आपापली डायग्नोस्टिक सेंटर चालवून आर्थिक आघाडीवर अतिशय प्रथितयश म्हणून समाज मान्यता मिळवून आहेत.

एम डी परीक्षेत परीक्षक म्हणून काम करतानाचा एक अनुभव-- ए एफ एम सी मध्ये बाह्य परीक्षकाने एका विद्यार्थ्याला अमुक तमुक येत नाही म्हणून त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याना मी नम्रपणे एवढेच सांगितले कि सर मी पण "आपल्याला" प्रश्न विचारले तर त्यातील बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्यालासुद्धा देता येणार नाहीत.
आपण परीक्षक म्हणून विद्यार्थ्याला किती येत नाही हे तपासायला आलो नाही तर त्याला एम डी परीक्षेत पास करण्यापूर्वी त्याला समाजात तज्ज्ञ म्हणून व्यवसाय करण्यासाठी रुग्ण सेवेचे किमान पातळीचे ज्ञान आहे कि नाही हे तपासायला आलो आहोत.

एम डी झालेला विद्यार्थी हा तज्ज्ञ म्हणू काम करताना त्याला उच्च पातळीचे ज्ञान असलेला असायला पाहिजे आणि हि उच्च पातळी त्याने गाठली आहे का आणि येणाऱ्या काळात येणारे अद्ययावत ज्ञान त्याला आत्मसात करता येण्याची त्याची क्षमता आहे का हे आपल्याला तपासायचे आहे.

माझ्या एम डी च्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगत असे कि तुम्ही एम डी पास झालात याचा अर्थ असा आहे कि तुम्ही नदीच्या उगमापासून समुद्राच्या मुखाशी आला आहात. ज्ञानाचं उपसागर नंतर सागर आणि महासागर तुमच्या पुढे आहेत.

किती ज्ञान मिळवायचे याला अंत नाही. आता पासून तुम्ही ज्ञानार्थी झाला आहात परीक्षार्थी नाही

असो

एकच मुद्दा मांडायचा आहे. बिगरी पासून मॅट्रिक आणि पदवी पासून पदव्युत्तर परीक्षा ते एम डी /पी एच डी आणि त्यासाठी लागणारे शिक्षण यांचे निकष हे संपूर्ण वेगळे आणि अतिशय गुंतागुंतीचे आहेत.

राजा वळसंगकर's picture

22 Dec 2020 - 2:16 am | राजा वळसंगकर

सुबोध खरे Sir, लेखाचा शेवटी मला ऑब्झरव्ड स्ट्रक्चर्ड क्लिनिकल एक्सामीनेशन (OSCE) पद्धती वरून एव्हीडन्स ऑफ लर्निंग कडे यायचे होतो. पण पूर्वार्ध जड आणि OSCE वर लिहिण्याचा अधिकार काय (मला) अश्या शंकांमुळे द्विधा मनस्थिती झाली. आपल्यासारख्या कुणी OSCE पद्धतीवर जर लिहिले तर सर्वांना विचारला चालना देऊन विषय पुढे नेता येइल. Thanks for the read and response.

सुबोध खरे's picture

22 Dec 2020 - 12:01 pm | सुबोध खरे

OSCE
Objective Structured Clinical Examination
https://www.usd.edu/medicine/osce#:~:text=OSCE%20(Objective%20Structured%20Clinical%20Examination,direct%20observation%20of%20student%20performance.

हे येथे वाचता येईल.

परंतु या मध्ये फार महत्त्वाचा एक घटक आहे तो म्हणजे जो शिक्षक निरीक्षक म्हणून काम करणारा असेल तो पूर्वग्रहापासून दूर आणि निष्पक्ष असायला हवा.

मी ए एफ एम सी मध्ये एम डी ला शिकवत असताना एक विद्यार्थी पहिल्या बाकावर बसून पेंगत असे. अर्थात लेक्चर दुपारी २ ते साडे तीन असे जेवणानंतर असल्यामुळे असे होणे जास्त सहज शक्य आहे. मूत्रमार्गाची प्रणाली (urinary system) पूर्ण शिकवून झाल्यावर प्रत्यक्ष त्याची चाचणी घेतली असता त्याला सर्वाधिक गुण मिळाले होते. हि चाचणी झाल्यावर त्याचे विश्लेषण करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे कोठे कमी पडले हे समजावून दिले जात असे. तेंव्हा मी सर्व विद्यार्थ्यांसमोर स्पष्टपणे सांगितले कि हा विद्यार्थी माझ्या लेक्चर मध्ये सर्वाधिक झोपला होता परंतु त्याने लेखी आणि तोंडी परीक्षेत सर्वात चांगली उत्तरे दिली आहेत त्यामुळे तो प्रथम आला आहे.

यात निरीक्षकाला आपला अहंगंड आणि बाहेरून येणार दबाव बाजूला ठेवता आला पाहिजे.

सध्याच्या डीम्ड ( डूम्ड) विद्यापीठात विद्यार्थ्याला नापास करणारा शिक्षक व्यवस्थापनाला परवडत नाही. ( काही कोटींचा आणि विद्यापीठाच्या "कीर्ती"चा प्रश्न असतो). त्यातून तुम्हाला जे शिकवायचे आहे ते विद्यार्थ्याला शिकायचे आहे का? असा प्रश्न असतो.

वैद्यकीय शिक्षणात प्रत्यक्ष सहभाग हा जास्त महत्त्वाचा असतो. तुम्ही एखादी तपासणी शल्यक्रिया प्रथम पाहावी लागते त्यानंतर त्यात दुय्यम सहाय्यक म्हणून सहभाग घ्यावा लागतो यानंतर स्वतः प्रथम चिकित्सक म्हणून अनुभवी शिक्षकाच्या देखरेखीखाली काम करता येते.

हि प्रक्रिया तीन वर्षाच्या शेवटी घेतलेल्या एकमेव परीक्षेत तपासून पाहणे अशक्य आहे. यामुळेच वैद्यकीय शिक्षणात वस्तुनिष्ठ आणि संरचित चिकित्सा तपासणीला अनन्य साधारण महत्त्व आहे. Objective Structured Clinical Examination

एखाद्या विद्यार्थ्याला पदवी दिली आणि त्याला किमान ज्ञान आणि अनुभव नसेल तर त्याला व्यवसायात फार मोठा धोका संभवू शकतो. यामुळेच विद्यार्थ्यांचा यात सक्रिय सहभाग साधारणपणे दिसून येतो. केवळ ब बा बे (बडे बाप के बेटे) यांचे सन्मान्य अपवाद वगळता.