लघु गुरु कसे ओळखावेत - सूक्ष्मभेद आणि बारकावे
कळीचा नियम: ज्या अक्षराला उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो ते लघु, आणि जास्त वेळ लागणारं अक्षर गुरु.
.
पण अनेक वेळेला नियम खूप संक्षिप्त असेल तर तो पुरत नाही. पुढे आलेले उपनियम या एकाच नियमाहून ओघाने आलेले आहेत. त्यातले सूक्ष्मभेद आणि बारकावे थोड्या विस्तारानं पुढे देतोय.
.
१) आपण शुद्धलेखनात जे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहितो ते ढोबळमानानं लघु किंवा गुरु असतात.
मुले आणि भिणे या शब्दांची पहिली अक्षरे ऱ्हस्व आली आहेत म्हणून ती लघु.
मूल आणि भीत-भीत या शब्दांची पहिली अक्षरे दीर्घ आहेत म्हणून ती गुरु.
.
२) काही वेळेला वृत्तात बसावं म्हणून नेहमीच्या लेखनात असलेलं ऱ्हस्व अक्षर दीर्घ आणि दीर्घ अक्षर ऱ्हस्व केलं जातं.
.
'गीताई माऊली माझी तीचा मी बाळ नेणता' या ओळीमध्ये विनोबांनी 'तिचा' हा शब्द वृत्तात बसण्यासाठी 'तीचा' असा लिहिला आहे. म्हणून 'ती' अक्षर गुरु गणलं जाईल.
.
'भंगु दे काठिन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे' या ओळी मध्ये 'भंगू दे' असं न लिहिता मर्ढेकरांनी 'भंगु दे' असं वृत्तात बसवलं आहे. म्हणून 'गु' हे अक्षर लघु आहे.
.
३) काळ, केळ, कोळ आणि कौल या शब्दांची पहिली अक्षरं उच्चारायला दुसर्या अक्षरापेक्षा जास्त वेळ लागतो म्हणून आ, ए, ओ आणि औ-कार असलेली अक्षरं गुरु असतात.
टीप - ही अक्षरं मराठीमध्ये गुरू असतात पण हिंदीमध्ये वेगळी हाताळली जातात. त्याच्यावर पुढे लघुलेख लिहायचा विचार आहे.
.
४) आता थोडासा अवघड नियम: जोडाक्षर उच्चारताना आधीच्या अक्षरावर जोर पडत असेल तर *आधीचं* अक्षर गुरू होतं. (जोडाक्षराच्या लघु किंवा गुरुत्वामध्ये फरक पडत नाही)
.
भव्य हा शब्द उच्चारताना आपण भव् + य असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात 'भ' वर जोर पडतो आणि उच्चार करायला जास्त वेळ लागतो. म्हणून या शब्दात भ गुरु आहे. व्य हे अक्षर लघु आहे म्हणून लघुच राहतं.
.
तसंच अर्थ, लक्ष, जन्म, प्रश्न या शब्दांचा उच्चार अर् + थ, लक् + ष, जन् + म, प्रश् + न असा करताना पहिल्या अक्षरांवर जोर पडतो आणि उच्चार करायला जास्त वेळ लागतो. म्हणून या शब्दांची पहिली अक्षरं गुरु होतात.
.
५) पण जपून रहा -
* 'गुण्यागोविंदानं' हा शब्द उच्चारताना आपण गु वर जोर देऊन गुण्+ ण्यागोविंदानं किंवा गुण्ण्यागोविंदानं असं करत नाही. गु चा उच्चार करायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून ण्या हे अक्षर जरी जोडाक्षर असलं तरी आधीचा गु हा लघुच राहतो.
.
पण 'गुत्त्यात' या शब्दांमध्ये गु या अक्षरावर जोर पडतो. म्हणून या शब्दांमध्ये गु गुरु आहे.
.
भल्या, बुऱ्या, पुऱ्या, कुण्या ही आणखी उदाहरणं. यांच्यामध्ये पहिल्या अक्षरावर जोर पडत नाही आणि ती लघुच राहतात.
.
स्पष्टीकरणासाठी अजून एक उदाहरण देतो. 'लावण्यासाठी' या शब्दांमध्ये आपण 'व' या अक्षरावर जोर देत नाही, पण 'लावण्य' शब्दांमध्ये 'व' वर जोर येतो. म्हणून 'व' हे अक्षर पहिल्या शब्दात लघु आणि दुसर्या शब्दात गुरु आहे.
.
६) कधीकधी गझलसारख्या प्रकारांमध्ये मात्रावृत्तात बसवण्यासाठी नेहमीच्या सुट्या दोन अक्षरांचं जोडाक्षर बनतं. तेव्हा त्याला वरच्या #४ नियमाप्रमाणे हाताळावं.
.
उदा. सदानंद डबीर यांची 'एकेक याद माझी' ही गझल:
एकेक याद माझी डोळ्यात पाझरू दे
ओठात नाव माझे हलकेच थर्थरू दे
.
'थरथरू' हा शब्द वृत्तात बसवण्यासाठी 'थर्थरू' असा लिहिला आहे. त्यामुळे या शब्दाचं पहिलं अक्षर थ गुरु होईल.
.
७) विशेष प्रकरण
कधीकधी वृत्ताच्या चालीत बसवण्यासाठी आपण ऱ्हस्व अक्षरं लांबवून उच्चारतो. "यदा यदाहि धर्मस्य" ह्या श्लोकाचं मराठी रूपांतर करताना विनोबांनी असं केलं आहे
.
गळूनि जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना ।
अधर्म उठतो भारी तेंव्हा मी जन्म घेतसे ॥
.
आता आपण श्लोकाच्या चालीत म्हणताना धर्म हा शब्द आपण धर्मऽ असा लांबवून उच्चारतो. म्हणून 'र्म' हे अक्षर गुरु गणलं जाईल.
.
माफक विस्ताराने द्यायचा प्रयत्न होता पण लेख बराच सविस्तर झाला आहे. असो.
छान
अतिशय उपयोगी लेखमाला.
लेख आवडला.
.
लघुगुरू नाही, यती
याच्यात तर लघु गुरू काटेकोरपणे पाळलेत
इतिहासकार राजवाडे ही त्यांची
मराठी व्याकरण शास्त्राची छान
नमस्कार धष्टपुष्ट
एक गम्मत ..
.
...
Hindi
ह्याच प्रकारावर नुकताच लेख
छान माहिती