अंतहीन

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
17 Aug 2020 - 1:00 pm

हे सगळं सुरू झालं ते मिथिला पालकरच्या इंस्टा रील पासून काल रात्री बाहेर पाऊस बरसत असतांना, इन्स्टाग्रामवर तिने sing song saturday मध्ये 'जाओ पाखी' गाण्याच्या काही ओळी गुणगुणल्या होत्या. बाहेर पाऊस आणि तिचा गोड बासुंदी आवाजात म्हणलेल्या त्या दोनच ओळी खूप आवडून गेल्या. मग तू नळीवर सर्च केलं तर त्या ओळी  अनिरुद्ध रॉय चौधुरी च्या 2009 च्या 'अंतहीन' मधल्या होत्या.  तू नळी वर तो चित्रपट ही सापडला आणि अधाशा सारखा पाहून पूर्ण केला. अंतहीन पाहतांना तो चित्रपट नाही तर दोन अडीच तासांची एक सुरेल कविता पाहतोय की काय असं वाटतं.  कलकत्ता पोलिसांत असणारा अभिक (राहुल बोस) आणि एका वृत्त वाहिनीत शोध पत्रकार म्हणून काम करणारी ब्रिंंदा (राधिका आपटे).  व्हर्चुअली डेट करत असतात. हा प्रवास सुरु असतांना योगायोगाने त्यांची भेट होते. एकमेकांना पूर्णपणे अनभिज्ञ असणारे हे दोघे एकमेकांकडे ओढले जातात. याच सोबत एक समांतर स्टोरी चालते ती  पारो आणि रंजन ची एकमेकांपासून वेगळे राहत असले तरीही कुठल्याशा अनामिक धाग्याने अजूनही गुंफले गेलेले आहेत.  या सगळ्या नात्यांच्या कथेचं पुढे काय होते हे चित्रपटातच पाहिलेलं बरं. 

आता पर्यंत 'प्रेमम' आणि '96' सारखे दाक्षिणात्य भाषेतले चित्रपट पाहिले होते, पण बंगाली भाषेतला मी पाहिलेला हा पहिलाच चित्रपट आणि प्रचंड आवडला आहे. याचं कारण बंगाली मिठाई सारखी गोड अशी भाषा तर आहेच पण यातल्या कलाकारांचे अभिनय अतिशय सुरेख आहेत. विशेषतः राधिका आपटे चं कॅरॅक्टर मला खूप आवडलं. कसली गोड दिसली आहे ती अगदी रोशोगुल्लाच जणू. आताची आपल्याला दिसणारी राधिका आणि 2009 ची राधिका आपटे यात जमीन आसमान चा फरक आहे. तिचं टॅलेंट बंगाली लोकांनी 2009 सालीच ओळखले होतं म्हणायला हरकत नाही. या बरोबरच चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे गाणी आणि संगीत. जाओ पाखी तर काल पासून लूप वर वाजतंय माझ्या मोबाईल मध्ये. लॉकडाऊन मध्ये जर सारखे सारखे मर्डर-मिस्ट्री- हिंसा असलेले चित्रपट/ वेब सिरीज पाहून कंटाळले असाल तर हा चित्रपट म्हणजे त्या सगळ्या कंटाळ्या वर उतारा आहे. 

antheen

कलाचित्रपटप्रकटनविचारआस्वाद