पाप आणि पुण्य

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Jul 2020 - 3:28 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

देवाला आपण माणसासारखं उभं केलं. म्हणजे देवाची मूर्ती आपण माणसाच्या रूपासारखी बनवतो. आपल्याच रूपात आपण त्याला पहात आलोत. राग, लोभ, प्रेम, काही प्रमाणात दोषही माणसासारखेच आपण त्याला बहाल केले. माणूस आनंद व्यक्‍त करतो वा रागावतो तसा देवही प्रसन्न होतो वा कोपतो. याचा अर्थ माणसाच्या रूपातच सर्व देव आहेत. सगळ्या देवांवर आपण माणसासारख्या नाना तर्‍हा आरोपीत केल्या. काही देवांना आपण आपल्या वासना सुध्दा बहाल केल्या. माणसापासून आपण देवाला खूप दूर जाऊ दिलं नाही.
माणुसकी हे मानवी समाजाचं मूल्य आहे. संस्कृती सोबत अधिक प्रगल्भ होत गेलेलं तत्व म्हणजे माणुसकी. माणसात माणुसकी आली की देवत्व फार लांब नाही. म्हणूनच आपली नैतिक उन्नती करून घेण्यासाठी अध्यात्म असतं. जगण्याला धर्माचं अधिष्ठान असतं. धर्म म्हणजे जगण्याचं तत्व. धर्म म्हणजे पूर्वसुरींनी तयार केलेली सामाजिक आचारसंहिता. धर्म आणि अध्यात्म हे देवत्वाचं वा कर्मकांडांचं देव्हारे माजवणारं साधन नव्हे. कोणताही अध्यात्मिक माणूस अन्य धर्माचा व्देष करत नाही. परधर्माचा व्देष करताना कोणी दिसलं की समजावं,या तथाकथित माणसाचं अध्यात्म नकली आहे! सत्ता मिळवण्यासाठी तर धर्माचं अस्तित्व मुळीच नाही. पण माणूस इथंही गल्लत करत धर्माचा वापर करतो.
देवाची आराधना करताना ठरावीक साच्यातील पाप- पुण्याच्या संकल्पनाही आपण आपल्यापुरत्या निश्चित करून टाकल्या. म्हणजे पोथी पुराणातला स्वस्त- प्रक्षिप्त मजकूर वाचून आपण पाप- पुण्याची गणना करतो ती मुळातूनच अज्ञानावर आधारीत आहे. पापक्षालन करता येतं, असा समज असल्यानेच पाप करायला माणूस धजावतो. पापक्षालन करण्याचे उपायही स्वस्त- सोपे आहेत. एखाद्याचं पापक्षालन एका नारळाने होतं तर कोणाचं, सोन्याचा मुकुट देवस्थानाला (देवाला नव्हे, गरजवंताला नव्हे) दान केल्याने होतं.
शारीरिक व्यंगाकडे पाहताना देवभोळे- भाबडे लोक आजही पाप- पुण्याचा पारंपरिक पगडा असलेला दृष्टीकोन ठेवतात. या जन्मी नसलं तरी पूर्वजन्मी पाप केलं असावं म्हणून भोग भोगावे लागतात, असा लोकसमज होता- आजही आहे. (काल परवापर्यंत जातीव्यवस्थेकडे पाहताना सुध्दा हाच दृष्टीकोन होता.) हातून पाप झालं असेल म्हणून अमुकच्या वाट्याला हे दु:ख आलं, असं सहज सांगितलं जातं. आजच्या निष्पाप माणसाच्या मागच्या जन्मातल्या पापाबद्दल चर्चा करून आपण आजच ‘निंदकाचं’ पाप करत असतो, हे आपल्या गावीही नसतं. स्वत:ला धार्मिक- अध्यात्मिक समजणारे काही तथाकथित आस्तिक लोक असा ‘निंदनीय’ प्रचार करतात, हे आणखी एक दुर्दैव.
आजच्या आधुनिक जगातील शिक्षित माणसांतही लोकश्रध्देचं ओझं वाहणारे अनेक अंधश्रध्द लोक आढळतात. कोणाच्या शारीरिक दुर्बलतेकडे आपल्या मनाचे लाड पुरवून घेण्यासाठी सोयीस्कर पारंपरिक दृष्टीकोनातून पाहतात. शारीरिक दुर्बल माणसाने शारीरिक तंदुरस्त माणसाचा कायम सहानुभुतीचा विषय व्हावा, अशी अपेक्षा केली जाते. दुर्बल व्यक्‍‍ती आपल्या अथवा सामाजिक न्याय हक्कासाठी भांडत असेल, तर काहींना त्या व्यक्‍‍तीचा आजही तो आगावूपणा वाटतो. सत्य वचन बोलणं म्हणजे फटकळ, खडूस आणि सत्य लपवून वरून गोड गोड बोलणं म्हणजे तोंडावर स्तुती करणं, याला लोक चांगुलपणा वा सज्जनपणा समजतात.
पाप आणि पुण्य या संकल्पना केव्हाही सापेक्ष ठरतात. आधीच्या जन्माचा वचपा देव दुसर्‍या जन्मात काढत असेल तर देव आणि माणूस यात फरक काय राहिला! खरं तर माणूस सुध्दा आधीच्या जन्माचं वैर (पुढच्या जन्मातच नव्हे तर त्याच जन्मात) विसरून जातो. आणि देव तर माणसाइतका क्रूर नाही. (पाप-पुण्य आणि योग्य कर्माची जबाबदारी आपल्या स्वत:वरच आहे,ती देवावर टाकू नका, हे देवाने या करोना काळात आपली दारं बंद करून अप्रत्यक्षपणे सुचीत केलं आहे.)
एकाच्या दृष्टीकोनातून जे पाप असू शकतं ते दुसर्‍याच्या मते पुण्य ठरू शकतं. म्हणून पाप- पुण्याची परिमाणं जोपर्यंत वैश्विक दृष्टीकोनातून बदलत नाहीत, तोपर्यंत पुण्य म्हणजेच देवत्व, संतत्व आणि मनुष्यत्वही आपल्यापासून कित्येक कोस दूर असेल. ‘पुण्याची गणना कोण करी’ हा ‍हरिपाठ फक्‍त घोकण्यासाठी नाही!
(‘सगुण- निर्गुण’ मटा, दि. 10-6-2020 च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2020 - 3:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विचार आवडला.

-दिलीप बिरुटे

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Jul 2020 - 10:14 am | डॉ. सुधीर राजार...

खूप खूप धन्यवाद.

म्हणून पाप- पुण्याची परिमाणं जोपर्यंत वैश्विक दृष्टीकोनातून बदलत नाहीत

वैश्विक दृष्टीकोनातून म्हणजे नेमकं का आणि हा दृष्टीकोन कोण ठरवतं?

तोपर्यंत पुण्य म्हणजेच देवत्व, संतत्व आणि मनुष्यत्वही आपल्यापासून कित्येक कोस दूर असेल
तुम्हीच म्हणलात तसं जर पाप आणि पुण्य या संकल्पना केव्हाही सापेक्ष ठरतात तर हा वरचा निष्कर्ष तुमच्यासापेक्ष आहे असं म्हणता येईल ना?

लेख खुपच गोल-गोल वाटला (Beating around bush).

- (पाप-पुण्याच्या पलीकडचा) सोकाजी

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Jul 2020 - 10:15 am | डॉ. सुधीर राजार...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्या मताचा आदर

सुबोध खरे's picture

15 Jul 2020 - 7:56 pm | सुबोध खरे

मला अध्यात्म समजत नाही किंवा त्यात रस सुद्धा नाही

परंतु एक साधं संस्कृत सुवचन आहे. त्यात या सगळ्याचं सार आहे असे मला वाटते.

अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचन द्वयं
परोपकार: पुण्य : पापाय: परपीडनम!

अठरा पुराणांचे सार एकच आहे.

दुसऱ्याला मदत करणे हे पुण्य आहे.

दुसऱ्याला त्रास देणे हे पाप आहे.

सहमत

आजचा सुविचार - नेहमी खरे बोलावे.
प्रत्यक्ष असते का? हेच पाप पुण्य याबाबत. विचार करणे सोडून द्यावे, की सत्य सत्य म्हणून व्यावहारिक सहसंबंध बिघडून घ्यायचे? मुळात काही लोकांना नैतिकता, शास्त्रीय दृष्टीकोन, मानवता या नावाखाली काहीही अपेक्षा कराव्यात का?

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Jul 2020 - 10:17 am | डॉ. सुधीर राजार...

सहमत.

चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद
एकाच्या दृष्टीकोनातून जे पाप असू शकतं ते दुसर्‍याच्या मते पुण्य ठरू शकतं.>>>>>>>>>>>हे वाक्य पटले

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Jul 2020 - 10:18 am | डॉ. सुधीर राजार...

खूप खूप धन्यवाद