दोसतार - ५०

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
16 Jun 2020 - 9:31 am

छाती भरून आली . आपण खरेच शिवाजी महाराजांचे कोणीतरी सैनीक आहोत असे वाटत होते. त्याच धुंदीत घरी आलो.
रात्री मामा ,आईला सांगत होता. विन्याला या दिवाळीत किल्ला करता येणार नाही म्हणाला म्हणून मुद्दाम हा किल्ला दाखवला. गण्या एल्प्या टंप्या मी आमच्या मनातली दिवाळी कधीच संपणार नव्हती.

दिवाळीची सुट्टी संपली . शाळा सुरू झाली. सुट्टी संपल्याच्या म्हणजे शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी शाळेत पटकन जावे आणि अजिब्बात जाऊ नये असे आलटून पालटून दोन्ही वाटत होते. वस्तु ज्या स्थितीत आहे त्याला त्या स्थितीत रहावेसे वाटते. हा न्यूटनचा नियम इथेही लागू होतो. जय न्यूटन महाराज की.
दप्तरात काय घ्यावे तेच समजत नाही. कपाटात जी सापडली ती वही दप्तरात घातली. आणि दप्तर पाठीवर घेवून निघालो. मनात मात्र किल्ला सर करायला निघालोय असे वाटत होते. तानाजी ने कोंढणा सर केला तेंव्हा त्याने त्याचे दप्तर असेच पाठीवर लटकवले असते. पण तानाजीला वर गडावर गेल्यावर लढाई करायची होती. आम्ही वह्या आनि पेनं घेऊन काय लढणार. पेनाने फारतर कोणाला तरी टोचता येईल. पेन्सीलीने टोचायला गेले की टोक केंव्हा मोडेल ते सांगता येत नाही. आणि टोक मोडलेल्या पेन्सीलीने टोचायला गेले की गुदगुल्याच होतात. टंप्याकडे एक पेन्सील आहे. एका बाजूचे टोक तुटले तर असावे म्हणून पेन्सीलीला दोन्ही बाजूनी टोक केले आहे. पण ती दोन्ही टोके नेहमी तुटलेलीच असतात. एल्प्याकडे कॉपिंग पेन्सील आहे. तीचे टोक भिजवून लिहिले की ते जांभळ्या अक्षरात येते. पेन आणि पेन्सील दोन्ही एकातच.
वही आणि पेन्सील दोन्ही एकात ज्या दिवशी येतील त्यादिवशी पेन्सील हरवणे , पेन्सीलीला टोक करणे ,पेन्सील ढापणे . हे पेन्सीलेचे तोटे सगळे एकदम संपलेले असतील.
शाळेच्या पहिल्या दिवशी सोनसळे सरांनी सुट्टीत कोणी काय काय केले ते विचारले. फ्टाके आणि फराळ सोडता इतर काय केले ते संगायचे होते.
संज्या चे आईवडील शिर्डीला गेले होते. महेश ची आत्या सुट्टीला त्यांच्याकडे आली होती. आंजी ने आईला मदत करत कितीतरी किलो चिवडा बनवला होता. सुन्या सुट्टीचे चार दिवस रोज काकडाअरती करत होता. अन्या ने आज्जीसोबत ज्ञानेश्वरी सप्ताह केला. आपी ने मेहेंदी क्लास केले. संध्या ने फास्टरफेणे ची तीन पुस्तके वाचली. अभय ने पुण्याला जादुगार रघुवीर यांच्याकडे जादू शिकायला गेला होता.
संगीता आणि वैजू तीच्या मामाच्या शेतावर गेल्या होत्या. तेथे त्या बैलगाडी चालवायला शिकल्या. शुभांगी ने तीच्या वडीलांच्या फटाक्याच्या स्टॉल वर मदत केली होती. जित्या माने ने त्यांच्या शेतावर रहायला गेला होता. प्रत्येकानेच काय काय भारी केले होते.
एक एकदा सांगूनही प्रत्यकाचे काहीतरी सांगायचे राहून जात होते. अभय पत्त्याची जादू आणि ग्लास ची जादू शिकला . अंजीने फराळाचा चिवडा करताना चिवडा तळायचा कसा कढई वर टणटण करत ऐटीत झारा चालवला. तीची आई म्हणाली देखील की तीच्या इतका छान कोणीच झारा चालवू शकणार नाही. आपीने मेंदी लावताना मेंदी नीट भिजवणे ती काडीने हातावर लावण्यासाठी एक तारी कशी भिजवायची ते शिकताना मेंदीच्या पावडरची सगळी पिशवीच कशी भांड्यात ओतली , संगीता आणि वैजूने शेतातल्या सापाने उंदराला कसे पकडले ते सांगितले.
गमती मधल्या गमती ऐकत तो दिवसच काय पण पुढचे दोन दिवस तीच चर्चा चालली होते.
गुरवारी जेंव्हा घटक चाचणीचे वेळापत्रक आले तेंव्हा कुठे ही चर्चा थांबली. घटक चाचणी ला वीस दिवस होते. पण त्या अगोदर सगळा अभ्यास पूर्ण करणे हे महत्वाचे. शाळा तरी अशी कशी ना. सुट्टी संपल्याच्या पहिल्या आठवड्यातच का कोणी परिक्षेचे वेळापत्रक द्यायचे असते का कधी.
मुलांना कसलाही आनंद नीट घेऊ द्यायचा नाही हा शाळाखात्याने सगळ्या शाळांना दिलेला गुप्त नियम असावा बहुतेक. बघा ना गाण्याचा तासाला चांगले गाणे रंगात आले आहे. सगळ्यांना गाणे एका सुरात म्हणायला जमायला लागते, इतके सगळे जण गाणे एका सुरात म्हणताहेत . गाणार्‍या प्रत्येकाला गम्मत यायला लागलेली असते. आणि तितक्यात तास संपल्याची घंटा वाजते. मराठीच्या तासाला तेच. कविता शिकताना , कविता समजायला लागली आहे असे वाटत असते आपल्याला एक छान शंका विचारायची असते नेमकी त्या वेळेसच तास संपल्याची घंटा वाजते.
शास्त्राच्या तासाला तेच. गणीताच्या तासाला तेच. इतकेच काय पण शारीरीक शिक्षणाच्या तासालाही तेच. बरे हे तास चालू असताना . छोटी सुट्टी आणि मधल्या सुट्टीचाही तोच प्रकार. आपण सगळ्याना जमवून हात वर करत आपण चकायला सुरवात केलेले असते. किंवा जोडीसाखळी खेळताना आपण कोणालातरी औट केलेले आहे. आपले राज्य त्याच्यावर येणार . आपण ठरवतो की याला आता मस्त पिंगवायचे आणि त्याच वेळेस सुट्टी संपल्याची घंटा होते.
अभ्यास सुरू झाला तशी दिवाळीच्या सुट्टीची आठवण कमी कमी होत गेली.
घटक चाचणीसाठीचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा म्हणून शिक्षकांची ही धावपळ चालेली होती. प्रत्येक विषयाचे ग्रुहपाठ रोजच चालले होते. इतका सगळा ग्रुहपाठ करताना घरी काही करायला वेळच मिळत नाही. शाळेतून घरी गेल्यावर ग्रुहपाठ , अगदी जेवून झोपायला जाईपर्यंत. सकाळी लवकर उठून काल राहिलेला गृहपाठ करा. तेही अगदी शाळेत निघेपर्यंत. नशीब रस्त्यात चालताना गृहपाठ करता येत नाही. नाहितर तेही केले असते. शाळेत येता जाता दिसणार्‍या गमती जमती तरी पहाता येत होत्या.
शाळेच्या कोपर्‍यावरच्या सावजीच्या दुकानात प्लास्टीकची फुले , पतंग, चक्रया, मांजे, दिसायला लागले. थोडे पुढे आल्यायावर कपड्यांचे एक छोटे दुकान होते त्या दुकानाच्या कपाटात लहान मुलांचे नवे कपडे दिसायला लागले. चौकातल्या सुलेमानच्या दुकानाच्या बाहेर उदबत्त्या , सोनेरी चकाकणारे हार , प्लास्टीकची फुले दिसायला लागली. दिवाळीच्या सुट्टी नंतर ही दुकानेही नवी दिसायला लागली. गोल बागेजवळ एक मंडप उभा केलाय. त्यात उसाच्या रसाचे गुर्हाळ येणार आहे.
दुसरा एक मोठ्ठा मांडव बांधताहेत स्टँड जवळ . तेथे म्हणे कसलेसे सम्मेलन की प्रदर्शन येणार आहे. मराठी चे.
शिवाजी उदय मंडळात कबड्डीचे सामने होणार आहेत. श्रीकृष्ण मंडळात ज्ञानेश्वरी सप्ताह होणार आहे. कन्याशाळेत मुलींसाठी कसलेसे सामने भरवले आहेत. नगरवाचनालयात व्याख्यानमाला आहे. कुठे क्रिकेट सामने आहेत. कुठे कॅरम च्या स्पर्धा आहेत, भावगीताच्या स्पर्धा आहेत.गावात कुठे गेलं तरी काहीना काही तरी नवीन दिसतेय. पण ही सगळी गम्मत दिसत असताना आम्ही काय करतोय तर गृहपाठ .
रस्त्यातून शाळेत येताजाताना काय करता येईल तेवढीच मज्जा.
टंप्याने एक गम्मत शोधून काढली. जाधव मामांचे केस कापण्याचे दुकान आहे ना त्यानी त्याला त्याला काचेचा दरवाजा बसवलाय. एका बाजूने आत यायला जायला जागा. बाकी रस्त्याकडची आख्खी बाजू काचेची. मोठ्ठी खिडकीच म्हणाना. आत बसलेल्या माणसाला बाहेर कोण चाललय ते दिसते. बाहेरच्या माणसाला आत काय चाललय ते दिसते. अर्थात काच नव्हती तेंव्हाही ते दिसायचेच. रस्त्याकडची बाजू सगळी उघडीच .
जाधव मामांनी दुकानाला काच लावली. दुकानातही त्यांनी भरपूर आरसे लावलेत.त्यांचे दुकान आता एकदम नवे नवे वाटायला लागलेय. काचेवर रंगाने दुकानाचे नाव लिहीलय. आता आत कोणीतरी बसलय इतकेच दिसते. खुर्चीत बसलेल्या माणासाचा चेहेरा दिसत नाही. जाधव मामा म्हणजे एकदम आयडीयाबाज. आरसे पण असे बसवलेत की खुर्चीत बसलेल्या माणसाच्या समोर आणि मागेही आरसा लावलाय. समोरच्या आरशात मागचा आरसा दिसतो. बसलेल्या माणसाला पुर्वी त्याच्या डोक्याची मागची बा़जू दाखवायला हातात वेगळा आरसा धरून दाखवायला लागायचे. आता त्याला समोरच्या आरशात मागचा आरसा दिसातो. जाधव मामांनी मागच्या " दाढी कटींग चे पैसे रोख द्यावेत असे उल्ट्या अक्षरात लिहून घेतले आहे. . खुर्चीत बसलेल्या माणसाला ते सुलटे दिसते
( क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

16 Jun 2020 - 9:33 am | विजुभाऊ

मागील दुवा http://misalpav.com/node/46993