दोसतार - ४९

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 Jun 2020 - 12:36 pm

कोण काय म्हणेल त्याला म्हणु देत म्हणत. आपल्या मनातल्या मनात हसण्याने ही ती शांतता मोडायची. ही शांतता डबीत साठवून ठेवता यायला हवी. आपल्याला हवी तेंव्हा बाहेर काढून अत्तरासारखी श्वासात घेता यायला हवी. खूप वेळ गेला सगळे गप्पच होते. कोणालाच ही शांतता मोडावेसे वाटत नव्हते. दरीतून येणार्‍या वार्‍यामुळे आमच्या चेहेर्‍यावर आलेला घामही थंडगार झाला. झेंड्याच्या दगडी बुरुजावरून खाली दरीच्या उतारावर पुढे समोर दरीच्या मधोमध दिसणार जयगड तानुमामाने दाखवला . आम्ही सगळे जयगडच्या दिशेने आपापली पायवाट घेत निघालो.

मागील दुवा http://misalpav.com/node/46966#comment-1070156
दरीतून पुढे गेल्यावर चढ अचानक वाढायला लागला. मघाशी त्या झेंड्याच्या बुरुजावर येणारा वारा खाऊन अंग एकदम गार झाले होते. आत्ता वारा कमी झाला. झाडी आता आणखी दाट झाली. झाडीतून गाळून येणार्‍या उन्हामुळे जमिनीवर उनसावलीची साठ ठिपके साठ ओळी एवढी मोठ्ठी जाळीदार रांगोळी दिसायला लागली. झाडे हलली की ती सावलीची जाळीदार रांगोळी पण हलणार. अगदी गणपतीत ते जिवंत देखावे असतात ना तशी जिवंत रांगोळी. आता डोंगर एकदम चढा व्हायला लागला. आमचे एकमेकांशी बोलणे थांबलेच होते. छातीतून येणारा श्वासाचा मोठा अगदी आगगाडीसारखा फासफुस यायला लागला. एल्प्या आणि टंप्या बरेच मागे पडले राहिले होते. तानुमामा आणि गण्या सगळ्यात पुढे . दम खायला म्हणून जरा उभा राहिलो. तानुमामा म्हणाला थाम्बू नकोस. हळू हळू चालत रहा. थांबून बसलास की मग पुन्हा उठून चालायला जास्त कष्ट पडतील. चालत राहिलास तर स्वतःला पुढे न्यायला कमी ताकद लागते. तानुमामा ने एकदम घाटे सरांनी सांगितलेला न्यूटनचा नियमच सांगितला. वस्तू आहे त्या स्थितीत रहायचा प्रयत्न करते. चालत असलेली वस्तू चालत रहाते स्थिर असलेली वस्तु स्थिर रहायचा प्रयत्न करते. हा नियम गण्याला माहीत असेल पण त्याला आठवला नसेल .म्हणून त्याने त्यावर तानुमामाला प्रश्न विचारला नाही. किंवा दम लागल्यामुळे गण्याच्या तोंडून आवाज फुटत नव्हता म्हणून असेल पण तो गप्प होता.
हळू हळू चालत राहिलो. एल्प्या आणि टंप्या आता बरोबर आले.थोडे हळू चालल्यामुळे मला पण थोडा दम खायला वेळ मिळाला.
आता चढ आणखीनच उभा झाला. अगदी भिंत चढतोय इतका. इकडे तिकडे न बघता वर वर जात रहायचे. न बोलता गेलो की फार दम लागत नाही. कोणीच बोलत नव्हते फक्त वार्‍याचा आवाज , पक्ष्यांचे आवाज. कधी कधी हे आवाज बंद यायचे बंद झाले की आमच्या श्वासाचा फासफूस आम्हालाच जोरात ऐकू येणार.
थोडे पुढे गेल्यावर झाडी कमी कमी व्हायला लागली. छोटी छोटी झुडपे आणि गवतच सोबत राहिले. जंगली जयगडचा माथा जवळ आला होता. एका छोट्या टेकाडासारख्या दगडाला वळसा घालून पुढे गेलो एक दगडी पडकी कमान दिसली. मामा म्हणाला हे गडाचे प्रवेशद्वार. दगडी कमानी जवळ काही दगडी पडकी घरे .
आता आम्ही किल्ल्याच्या मुख्य सपाटीवर होतो. फारसा मोठा नाही असा सपाट भाग. मी मामाकडे पाहिले.हा किल्ला? किल्ल्याची तटबंदी कुठे आहे.
मामाने डोळे मिचकावले. आम्हाला थोडे पुढे इथे जयगडला संह्याद्रीच्या जंगलाची भक्कम भिंत आणि हा उभा चढणीचा डोंगर ही तटबंदी
नाही. एक दगडी चौथरा मागे टाकत पुढे आलो. एक छोटेसे मंदीर आणि त्यासमोर उभी असलेली दीपमाळ . मामा म्हणाला कोयनेच्या भूकंपातही ही दीपमाळ पडली नाही. मंदीरात पूर्वी एक देवीची मूर्ती होती. गडजाई देवीची. चांदीचे चमकते डोळे असलेली .
समोर डोंगराची आणखी एक चढण आमची वाट पहात असल्यासारखी उभी होती. मामाने विचारले पुढे जायचय का? एल्प्या ने टंप्या कडे पाहिले मग माझ्या कडे पाहिले. आम्ही एकमेकांकडे बघतोय हे पाहिल्यावर गण्याला काय झाले काय माहित. तिथे पडलेल्या एका दगडावर पाय रोवून कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि तलवारीची मूठ हातात धरली आहे अशा अविर्भावात म्हणाला. हर हर महादेव. शिव छत्रपतिनी कधीच संकटाला घाबरून माघार घेतली. नाही. संकटे आली आणि गेली संकटांवर मात केली म्हणून तर स्वराज्य निर्माण झाले. हर हर महादेव. गण्याने हवेत हाताची मूठ उंचावत घोषणा दिली . त्या हर हर महादेव च्या घोषणेने जादू केली.
पायात एकदम जोर आला. थकलोय दमलोय असे वाटणे पळून गेले. नवा उत्साह आला. हा पुढचा चढ इवलासा वाटू लागला. आम्ही चौघेही झपझप चालायला लागलो. जमिनीवर गवत होते त्यामुळे पाय घसरत नव्हते. वेगात चालता येत होते . असेच चालत राहिलो तर चंद्रावर पण पोहचलो असतो. डोंगर संपला. इथे पुन्हा एक दगडी बुरूज दिसला. तसाच थोडी पडझड झालेला. मामा म्हणाला याचा पूर्वी टेहाळणी साठी उपयोग व्हायचा. त्या बुरुजासमोर एक दगडी चौथरा.आणि एक विहीर. हा राजवाड्याचा चौथरा. शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचा चौथरा. महाराज इथे कधी आले असतील हेरांसोबत काही खलबते केली असतील या कल्पनेने खूप काहितरी मोठ्ठं वाटायला लागलं, शिवाजी महाराज हे स्वराज्याचे छत्रपती होते पण ते कधी मुघल बादशहांसारखे गाद्यागिरद्यांवर लोळत हुकूम देत असतील असे कधीच वाटत नाही. ते कधी श्रीखंड बासुंदीपुरी खात सोन्याच्या ताटात जेवत बसलेले असतील असे मधीच डोळ्यापुढे येत नाही. मोठ्या महालात असतील असेही कधी डोल्यासमोर येत नाही. शिवाजी महाराज त्यांच्या सैनीकांसारखेच घोड्यावरून फोरत असती; सैनीकांसारखेच कौलारू घरात रहात असतील. मावळ्यांइतकेच वागाबोलायला साधे असतील. तो बुरुजावरचा राजवाड्याच्या चौथरा पाहून शिवाजी महाराज तिथे एका बाजूला बसले असतील आणि नेताजी पालकर बहिर्जी नाईकांसोबत पुढच्या हालचालींचे बेत करत असतील. त्यावेळेस हा गड भोवती आणखी घट्ट झाडीत लपलेला असेल. गण्या टंप्या एल्प्या मी सगळे मनाने महाराजांच्या त्या राजवाड्यात होतो.
तानुमामाने हाक मारली .इकडे या रे गम्मत दाखवतो. तानुमामाच्या आवाजाच्या रोखाने निघालो. तानुमामा गडाच्या एका टोकावर उभा होता. दरीच्या टोकावर. तिथे पोहोचलो तर काय. समोर एक हिरव्या गार डोंगरांच्या पायघड्याचा गालीचा होता. समोर जिकडे पहावे तिकडे हिरवे च हिरवे . दाट गच्च झाडी.
अधूनमधून दिसणारी छोटी छोटी गावे. त्या गावांना जोडणारी मधुनच कुठेतरी डोकावणारी पायवाट. ती पांढरवाडी. ती भैरीवाडी , ते कोळके , ती कुंभार्ली , ते हेळवाक , मामा एक एक गावांची नावे सांगत होता. त्या प्रत्येक गावात छोटी छोटी घरी होती. दिवाळीच्या किल्ल्यात असावीत इतकी छोटी. खाली दरीत पोफळी चे लाईट हाऊस दिसत होते. एकीकडे कोळकेवाडी जलाशय तर दुसरीकडे कोयनेचा शिवसागर जलाशय त्यात तरंगण्यार्‍या ठिपक्या एवढ्या बोटी. हे सगळे जोडत जाणारा नागमोडी पोफळी घाट. कुंभार्ली घाट. घाटातली लाल चुटूक दिसणार्‍या एश्टी च्या बस, खेळण्यातले असावेत इतके छोटे दिसणारे ट्रक. अख्खं तळ कोकण दिसत होतं. इतिहासात म्हणे कुंभार्ली घाटावर नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता.
मामाने आडवा हात करत लांब क्षितीजावर महिमान गड , वासोटा किल्ला , रसाळ गड सुमार गड महिपत गड दाखवले.
पोफळी घाटाच्या पलीक्डचा भैरव गड. पांढर्‍या रेघेसारखी दिसणारी वसिष्ठी नदी आणि त्याच्या बाजूने अंधूक दिसणारे चिपळूण.
दिवाळीचा किल्ला प्रत्यक्ष डोळ्या समोर होता. खराखुरा किल्ला.
काय नव्हतं म्हणू नका या किल्ल्यात. नागमोडी घाटाची वाट होती , त्या वाटेवरून उतरणारे ट्रक गाड्या , मधेच कुठेतरी चमकून दिसणारी तळी, हिरवागार पसरलेला झाडांची दाटी, त्या दाटीत कुठेतरी गुहेत रहाणारा वाघोबा, सलाईनच्या बाटलीतून आलेल्या पाण्याची नाहीतर खारीखुरी रेघेसारखी वहात जाणारी नदी , किल्ल्याच्या पायथ्याला गावे होती. त्या गावात रस्ते होते घरे होती. घरात जिवंत माणसे होती. किल्ल्यावर बुरूज होता. झेंडंयाची काठी होती. बुरुजावर तोफ नसली म्हणून काय झाले देवळाच्या समोर दीपमाळा उभी होती.
या सगळ्यावर नजर ठेवणारे शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही होतो. मामाच्या भाषेत बोलायचं तर शिवाजी महाराज आमच्या मनाच्या सिंहासनावर कायमचे आहेतच.
एरवी दिवाळीचा किल्ला आपण बाहेरून बघतो. हा दिवाळीचाआम्ही किल्ला जगत होतो.
छाती भरून आली . आपण खरेच शिवाजी महाराजांचे कोणीतरी सैनीक आहोत असे वाटत होते. त्याच धुंदीत घरी आलो.
रात्री मामा ,आईला सांगत होता. विन्याला या दिवाळीत किल्ला करता येणार नाही म्हणाला म्हणून मुद्दाम हा किल्ला दाखवला. गण्या एल्प्या टंप्या मी आमच्या मनातली दिवाळी कधीच संपणार नव्हती.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मस्त चाललंय हो विजुभाऊ.

पूर्ण झाल्यावर एकत्रितपणे वाचनासाठी पुस्तक इज मस्ट.

झाडीतून गाळून येणार्‍या उन्हामुळे जमिनीवर उनसावलीची साठ ठिपके साठ ओळी एवढी मोठ्ठी जाळीदार रांगोळी दिसायला लागली. झाडे हलली की ती सावलीची जाळीदार रांगोळी पण हलणार. अगदी गणपतीत ते जिवंत देखावे असतात ना तशी जिवंत रांगोळी.
सुरेख वर्णन.
पांढर्‍या रेघेसारखी दिसणारी वसिष्ठी नदी आणि त्याच्या बाजूने अंधूक दिसणारे चिपळूण. या वाक्यानं संपणारा खर्‍याखुर्‍या किल्ल्यावरून दिसणारा देखावा अतिशय आवडला.
मालिका छान चालली आहे.

विजुभाऊ's picture

13 Jun 2020 - 4:32 pm | विजुभाऊ

_/\_

विजुभाऊ's picture

16 Jun 2020 - 9:32 am | विजुभाऊ

पुढचा दुवा http://misalpav.com/node/47027