दोसतार - ४८

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 Jun 2020 - 9:16 am

अशा सहा उदबत्त्यांची एक मोठी माळ करायची. आणि पलंगाखाली ठेवायची. सहव्या उदबत्तीच्या शेवटच्या टोकाला मोठ्ठा दंड्या फटाका वातीला बांधून ठेवायचा. सहावी उदबत्ती शेवटच्या टोकापर्यंत यायला सकाळचे पाच साडेपाच होणार. दंड्या फटाका उडणार. येवढा मोठा दंड्या फटका अगदी पलंगाखाली ढाम्म करून उडाल्यावर कुंभकर्णाला सुद्धा जाग यायला पाहिजे.

मागील दुवा http://misalpav.com/node/46878

लवकर उठायचे म्हणून कुंभकर्णाला जाग आणायचा गजर स्वतःसाठीच लावल्यावर झोपी गेलो. आपल्याला सकाळी तानुमामाच्याही अगोदर नक्की जाग येणार . तानुमामा सकाळी काहितरी गम्मत करणार म्हणतोय. पण ते आपण लवकर उठलो तर. अर्थात तानुमामाच्या अगोदर उठणे म्हणजे लवकर उठणेच की. त्या दंडी फटाक्याच्या गजराने तानुमामाच काय पण शेजारच्या कदम काकुंनाही जाग आली असती. जाऊदे . कोण काय म्हणतय त्यापेक्षा आपण लवकर उठणे महत्वाचे.
सकाळी कुठे जायचे असेल तर झोप लवकर येत नाही पण जागही लवकर येत नाही. दहा हाका मारल्या तेंव्हा उठलास तू. हे ऐकावे लागते. आता इतका जोरदार गजर लावलाय म्हणजे कोणी हाका मारायच्या अगोदरच आपण उठणार.
झोपेत काय काय दिसत होते. मी आणि गण्या झाडावर शिवणापाणी खेळतोय. एल्प्या प्रभाकर , श्रीप्या , अब्दुल, टंप्या हे एका फांदीवर आहेत. आणि म्हणताहेत "हे बघ तुझ्या दगडावर" … अर्र हे दगड का माती खेळतोय हो. मला वाटले शिवणापाणी खेळतोय. सम्ज्या समोरून येतोय. मी उभा. संज्याने जोरात बॉल टाकला मी तो हातानीच उंच उडवला. थेट वरच्या मैदानावर. तिथे बरेचप्रेक्षक आहेत. चेंडु उंच उडालाय तो थेट प्रेक्षकात गेलाय. कोणाच्या डोक्यात पडणार काय माहीत. चेंडू उंच उडाला होता. आकाशात एक गरुड उडत होता. त्याच्या चोचीत एक मोगर्‍याचा हार आहे गरुडाने हार सोडून दिला चेंडू घेऊन तो निघून गेला. हार खाली येतोय. प्रेक्षकात उभ्या असलेल्या शुभांगीच्या वेणीत हार पिन सह जाऊन बसला. शुभांगी गोड हसली. म्हणाली ग्रूहपाठ झालाय का नागरीक शास्त्राचा . शुभांगीला वही दाखवायला म्हणून वर्गात आलो. वर्गात मटंगे बाई आज्जीला मालकंस राग शिकवताहेत. आज्जीचा हा सगळ्यात आवडता राग. आज्जी गाणे गातेय. कोयलीया बोले अंबुवा डार पर…….
आज्जीचा आवाज रेडीयोमधून येतोय. " इयम आकाशवाणी ,संस्कृत वार्ताहा श्रुयंताम. प्रवाचक बलदेवानंद सागरः. मधूनच बातम्यात एल्प्या आणि टम्प्याचे आवाज येतात. टम्प्या कधीपासून रेडीओवर संस्कृत बातम्या द्यायला लागला. हे अवघडच झाले. टम्प्प्याचे संस्कृत म्हणजे काही विचारायला नको. इंग्रजी आणि संस्कृत कायम एकमेकात मिक्स करतो. गो या संस्कृत शब्दाचा अर्थ जाणे असा सांगणार. आणि भिंतीवर पाल दिसली की गो पाल गो पाल असे म्हणत बसणार. पण टम्प्या बातम्या का देतोय तेही रेडीओवर. माझ्या खांद्यावर कुणीतरी थापट्या मारतय. अरे उठ उठ. बघ कोण आलय. चल पटकन आवर. मी समोर बघतो. समोर एल्प्या आणि टम्प्या बसलेत. अरे हा टम्प्या पाटणला रेडीओमधून आला ! स्वप्न दिसतय हे. मी हसतो. टंप्या माझा हात हातात घेतो. उठ रे. चला आवर लवकर.
अरे टंप्य अखरंच आलाय. मी उठून बसतो. टंप्या आणि एल्प्या माझ्या समोर . आईने त्यांना चहा दिलाय. मी तोंड सताड उघडून नुसता बघत बसलोय. हे दोघे इथे कसे आले.
"विनू चल लवकर आवरून घे. अंघोळीचं पाणी ठेवलय. अंघोळ करूनच ये. तुम्ही सगळे जंगली जयगड ला चाललाय. " आईने माझ्या डोक्यातले प्रश्न बाजूला केले काय करायचंय ते सांगितले. माझ्या डोक्यातले प्रश्न तसेच. आंघोळ करताना डोक्याला साबण लावला की जातील धुवून.
पण आपला गजर का वाजला नाही. मी पलंगाखाली पहातो. दंड्या फटाकाचा टाईम बाँब तेथे अजून दिसतोय. पण उदबत्ती विझलीय.
" अरे जतोस ना आवरायला. उशीर करून नकोस." आईच्या बोलण्याने मी लगेच उठलो. पण टम्प्या आणि एल्प्या हसताहेत.
आंघोळ म्हणजे काय कावळ्याची अंघोळ. अगोदर एक तर थंडी .त्यात त्या जंगली जयगड ला निघायचय. एरवी अंगभर लावलेला मोती साबणाची फेस अगदी पाणी बादलीच्या तळाला गेले तरी चेहेर्‍यावर कुठेतरी राहिलेला असतो. पण आज साबणालाही घाई असावी. अर्ध्या बादलीतच अंघोळ झाली.
मी तयार होऊन बाहेरच्या खोलीत आलो. आता टंप्या च्या हातात लाडू शेवेची बशी होते. त्यांच्या सोबत माझाही फराळ झाला. अरे पण तुमी इकडे कसे या प्रश्नाला एल्प्या आणि टम्प्याने " जंगली जयगड ला जायचंय म्हणून " हे उत्तर दिले. हे काय उत्तर झाले का. एखाद्याला विचारावे की दादा किती वाजले तर त्याने " कालच्या इतकेच" असे उत्तर द्यायचे काय? म्हणजे व्याकरण बरोबर पण वाक्य चूक.
मी दंड्या फटाक्याच्या टाईम बॉंब चे काय झाले हे विचारले नाही. तानुमामा ने त्याचे उत्तर दिले असते आणि आई ने त्यावर अजून प्रश्न विचारले असते.
आमचा फराळ होतोय तोवर गण्या ही डबा पिशवी घेवून तयार होऊन आलाच. आईने त्याच्या हातावर लाडू ठेवला.
जंगली जयगडला जायच्या कट तानुमामाने रचला होता. टम्प्या आणि एल्प्याला बोलवून घ्यायची आयडीयाही त्याचीच. ते दोघेही पहाटेच्या गाडीने इकडे आले होते.आम्ही पाटणला आलो तेंव्हाच आईने त्यांच्या घरी मुलांना दिवाळी झाली की एक दिवस पाठवा म्हणून सांगून ठेवले होते. मला मात्र कोणीच याची काहीच कलपना ही दिली नव्हती. तानुमामा माझ्याकडे पाहून हसला. मी पण तोंडभरून की कसे ते हसलो. तानूमामा आहेच आयडीयाबाज. एकदम भारी.
घरातून निघताना प्रत्येकाच्या हातात एक एक पिशवी. पिशवीत पाण्याची बाटली , फराळाचे पुडे , टोपी वगैरे.
बस स्टँडवरून कोयननगर नवजा जाणारी बस पकडली. बस पण उत्साहात दिसत होती. उगाच रॅव रँव रडत नव्हती. घाट चढून दमले थकले वगैरे काही म्हणत नव्हती. पाटण ते कोयना नगर हा रस्ता एकदम मस्त . रस्त्यात कोयना नदी कायम सोबत असते. बस मधे बसल्यावर तर खिडकीतून फक्त नदी आणि डोंगर दिसतात. आपण रस्त्यावरून नाही तर बोटीतून चाललोय असेच वाटते. नवज्याला येईपर्यंत तर तो आणखीनच मस्त झाला आजूबाजूला हिरवी गच्च झाडी मधूनच चमकणारं धरणाचं पाणी आणि त्या झाडीतून भांग पाडल्यासारखा जाणारा रस्ता.
इतक्या सकाळी सकाळी नवज्याला उतरणारे आम्हीच. तानुमामाला वाट माहीत आहे. उतरल्या उतरल्या त्याने चालायला सुरवात केला. पंचधारा बोगद्याकडे या पाटीखालून आम्ही निघालो. नवजा गाव मागे पडले. तो पंचधारा बोगदा आला . बोगद्याच्या अलीकडून मुख्य रस्ता सोडून एक पायवाट धरली. आणि डोंगराच्या बाजूला निघालो. डोंगराच्या बाजूला असे फक्त म्हणायचे. सगळीकडे डोंगरच . पायवाटेने जिथे चढ होता त्या बाजूला निघालो. झाडांमुळे ऊन काही फारसे वाटतच नाही. आणि ही झाडे पण कसली मस्त एकदम उत्साहात दिसत होती. बोलता आले असते तर त्यानी आमाला " कोन गाव पावनं" असे नक्की विचारले असते.
थोड्या वेळाने पायवाट सपाटीवर आली. समोर जयगड दिसायला लागला. इतका सरळ उंच किल्ला. मी कधी पाहिलाच नव्हता. सातारला अजिंक्य तारा आहे. पण तो कसा निवांत मांडी घालून ऐसपैस बसला आहे असा दिसतो. हा जंगली जयगड एकदम उभाच राहिलेली आहे. डोंगरावर सपाटीवररून थोडे चालल्य नंतर एका वळणावर अचानक एक पाण्याचा झरा दिसला. घोडेतळ या ठिकाणचं नाव. इतके सुंदर . इंग्रजांच्या काळात जंगली जयगडला येणारे अधिकारी या ठिकाणी आपली घोडी उभी करून पुढे पायी गडाकडे जात असत. त्यामुळे या ठिकाणास घोडेतळ म्हटले जाते. इथेच थांबूया असे वाटत असतानाच येताना इथे थाम्बूया म्हणत तानुमामाने आम्हाला पुढे ढकलले. चालताना शाळेतल्या गप्पा च चालु होत्या. गण्याला प्रश्न विचारायचा वेळच मिळत नव्हता. मधेच आम्ही पायवाट बदलली डिचोली गावाकडे जाणारी . वाटेवरची झाडी आता दाट होत चालली. घट्ट म्हणावी इतकी दाट. कसल्या कसल्या झाडांमधून पुढे जायला लागलो. आंबा चिंच जाम्भूळ आवळा बांबू अशी काही ओळखीची झाडे काही एकदम अनोळखी. चढ चढताना आमच्या गप्पा मधेच थांबायच्या. गप्पा थांबल्या की जोरात श्वास घेतल्याचा नुसता फासफुस आवाज . चढ चढताना वाटेत येणारी झुडपे वेली बाजूला करत पुढे निघालो. एका जागी पायवाट संपली. माणसांच्या जगातला रस्ता इथपर्यंतच येतो. समोर दरी दिसायला लागली. याच्या पुढे कसे जायचे हे आपणच ठरवायचे. किती मस्त ना. आपला रस्ता आपण तयार करायचा. उगाच दुसर्‍याने केलेल्या रस्त्याने जाऊन त्याला दिसलेलेच पहायचे. त्यापेक्षा आपला रस्ता आपण पाडायचा. जो काय येईल तो आपला स्वतःचा अनुभव. शाळेत निबंध गायडातून पाठ करून लिहीण्या पेक्षा स्वतः लिहिल्या सारखं. दरीच्या माथ्यावर उभे आलो तर समोर एकदम हिरव गार जंगल इतकं हिरवं आणि दाट की या जंगलात टारझन रहात असेल . समोर पहाताना आम्ही बोलायचेच विसरलो. एकदम शांतता. पक्ष्यांचे आवाज वार्‍याचा आवाज आणि पानांची सळसळ इतकेच काय ते आवाज. ठण्ण आवाज करणारी देवळातली मोठी घंटा वाजवल्या नंतर कानाला दडे बसले की कानात येतो ना घुम्म असा आवाज तसा काहीसा. शांततेचा आवाज , उगाच बोलून ही शांतता मोडू नये. आईने धुतलेल्या पांढर्‍या स्चच्छ शर्टवर शाईचा ठिपका पडू नये म्हणून आपण जपतो ना तशी ही शांतता जपून ठेवावी असे वाटायला लागले. मनात आनंद उत्साहएक वेगळीच गम्म्त होत होती. एकसारखे हसावेसे वाटत होते. त्या सावजीच्या दुकानाच्या कोपर्‍यावर कधी कधी पालथी मांडी घालून बसलेला असतो ना त्या खुळ्यासारखे स्वतःशीच हसावेसे वाटत होते. खुळचटा सारखे . कोण काय म्हणेल त्याला म्हणु देत म्हणत. आपल्या मानातल्या मनात हसण्याने ही ती शांतता मोडायची. ही शांतता डबीत साठवून ट्।एवता यायला हवी. आपल्याला हवी तेंव्हा बाहेर काढून अत्तरासारखी श्वासात घेता यायला हवी. खूप वेळ गेला सगळे गप्पच होते. कोणालाच ही शांतता मोडावेसे वाटत नव्हते. दरीतून येणार्‍या वार्‍यामुळे आमच्या चेहेर्‍यावर आलेला घामही थंडगार झाला. झेंड्याच्या दगडी बुरुजावरून खाली दरीच्या उतारावर पुढे समोर दरीच्या मधोमध दिसणार जयगड तानुमामाने दाखवला . आम्ही सगळे जयगडच्या दिशेने आपापली पायवट घेत निघालो.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

गणेशा's picture

7 Jun 2020 - 9:45 am | गणेशा

पहिल्या भागापासून वाचायला घ्यावे लागेल का?

मिपा वर नव्हतो जास्त आधी.. सो आधीचे भाग वाचलेले नाहीत..

असा मी असामी's picture

9 Jun 2020 - 2:50 pm | असा मी असामी

सगळे भाग एकदम वाचा. मस्त लिहले आहे. लहानपणीच्या आठवणी जाग्या होतील.

विजुभाऊ's picture

11 Jun 2020 - 10:10 am | विजुभाऊ

_/\_
धन्यवाद

विजुभाऊ's picture

11 Jun 2020 - 12:49 pm | विजुभाऊ

दोसतार - ४९ http://misalpav.com/node/46993