मी सध्या काय करतो

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
7 Apr 2020 - 4:47 pm

मी सध्या काय करतो

गेले काही दिवस सक्तीच्या विश्रांतीसाठी अर्धेधिक जग घरात कोंडले गेले आहे त्यात आपली काय कथा? लोक आपापल्या परीने वेळेचा सदुपयोग करताहेत. घरून काम चालले आहे तरी बराच मोकळा वेळ हाताशी आहे. वाचन लेखन चालू आहे. चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे तर आहेच पण खूप दिवसात संपर्कात नसलेले मित्र आणि नातेवाईक यांना फोनवरून आणि व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून भेटणे चालले आहे. गप्पा रंगतात आहेत. कन्येची दहावीची परीक्षा तीन पेपर उरलेले असतांना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेली आहे. त्यामुळे धड अभ्यास न धड सुट्ट्या अशी परिस्थिती. तिचे मित्र-मैत्रिणी रोज ठराविक वेळी ऑनलाईन एकत्र येऊन खेळ-अंताक्षरी-गाणी-डान्स-अभ्यास असे सगळेच आलटून पालटून करताहेत. उद्या रात्री सगळ्यांनी आपापल्या बाबांसोबत ९० सेकंद डान्स करतानाचा व्हिडीओ शेयर करायचा आहे त्यामुळे आज-उद्या मला डान्स शिकवण्यात येणार आहे :-)

* * *

घरात ज्येष्ठ नागरिक आहेत - मधुमेह आणि रक्तदाब दोन्ही त्रास असलेले. त्यांना ४ मार्चपासूनच बाहेर जायला बंदीहुकूम काढला होता. त्यांच्या औषधांचा साठा सध्यातरी पुरेसा आहे. दातांच्या आणि डोळ्याच्या तपासणी सारख्या इलेक्टिव्ह गोष्टी पुढे ढकलायचा सल्ला पटकन स्वीकारण्यात आलेला आहे. घरातल्या घरातच दररोज १०००० पावले चालून तसेच तामिळ-तेलगू देमार हाणामारीचे आणि दिलीप कुमारचे खूप जुने भावुक करणारे चित्रपट पाहून त्यांचा वेळ व्यवस्थित जातो आहे. त्यांची बडदास्त उत्तम राखली जात आहे. टीव्हीवर कर्कश्य आवाजातल्या बातम्या पुनःपुन्हा पाहण्याच्या त्यांच्या आग्रहाचा थोडा त्रास होतो, उदास आणि निराश वाटते. त्यांचाही फोनवर स्वमित्रांशी संपर्क आहेच. मोकळा वेळ असल्यामुळे उनो आणि बिगफूल सारखे पत्त्यांचे डाव अधेमधे होत आहेत - हातातले फोन बाजूला ठेवून सगळे कुटुंब एकत्र येण्याचा दुर्लभ योग.

* * *

एक दिवस काही जुनी कागदपत्रे नीट चाळून फायलिंग केले. त्यातील जुनी पत्रे वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. एक गोष्ट लक्षात आली की गेल्या २० वर्षात कोणालाही पत्र लिहिलेले नाही. पुढे लिहिण्याची शक्यता वाटत नाही. जुन्या बाडातले पणजोबांच्या पश्च्यात सम्राट पंचम जॉर्जच्या स्टॅम्पपेपरवर १९०८ साली केलेले वाटणीपत्र फार मजेशीर वाटले. 'आपसात पटत नसल्यामुळे वाटणी करत आहोत' असे रोखठोक कारण लिहितांना तिन्ही आजोबा बंधूनी पुतण्यांना मात्र स्वतःची इस्टेट आनंदानी लिहून दिलेली आहे :-)

आईचे स्वाक्षरीचे आणि अशिक्षित आजीचे अंगठा उमटवलेले मृत्युपत्र वाचून ह्या द्रष्ट्या स्त्रियांबद्दल कौतुक वाटले. तात्काळ प्रेरणा घेऊन स्वतःचे राहून गेलेले मृत्युपत्र लिहून तयार केले. त्यामुळे येत्या काही वर्षासाठीच्या वित्तनियोजनाचा उप-प्रकल्प आपोआपच पार पडला. करोना काय जाईलही, जगलो तर एव्हढा रिकामा वेळ पुन्हा कधी मिळणार :-)

* * *

बाहेर निसर्ग फुलला आहे . झाडांवर फुलांचे घोस आणि झाडांखाली फुलांचा खच ! पण निसर्गाचे सर्व विभ्रम सध्या 'टच मी नॉट' आहेत.

घराच्या मागे वनखात्याच्या ताब्यातला डोंगर आहे. त्यामुळे आधीपासूनच बरेच पक्षी येतात. कबुतरांचा नकोसा सहवास रोखण्यासाठी जाळी बसवून घेण्याचा पर्याय अजूनही पटला नाही. त्यामुळे चिमण्या, बुलबुल, मैना, साळुंक्या आणि पोपटासारख्या अन्य सुंदर पक्ष्यांना अटकाव होईल असे वाटते. मागच्या वर्षी बुलबुल पक्ष्यांचे बाळंतपण आमच्या टेरेसवर पार पडल्यापासून 'जाळी नकोच' हे मत दृढ झाले आहे. सध्या वाहनांचा आणि एकूणच आवाज कमी असल्यामुळे सकाळ-दुपार पक्ष्यांचे आवाज अधिक स्पष्ट ऐकू येतात. पक्षी धीट झालेत असे उगाचच वाटते. आपण जवळ गेलो तरी घाबरत नाहीत आणि उडूनही जात नाहीत - ही पहा एका पायावर तपस्या चाललीय

* * *

घराच्या तीनपैकी दोन टेरेसवर बाग केली आहे. माळीकाका स्वतःच असल्यामुळे हे काम करायची सवय आणि आवड आहे. नंतर करू म्हणून आधी टाळलेली कामे, रिपॉटिंग, छाटणी, फवारणी आणि टेरेसच्या डीप क्लीनिंगची कामे २-३ दिवसात थोडी थोडी केली. पाठदुखी उफाळून आल्यावर उत्साहाला आवर घालावा लागला पण तोवर बहुतेक कामे योग्यप्रकारे करून झाली होती.

* * *

महिन्याचे सामान तसेही थोडे जास्तच आणले जाते त्यामुळे ती चिंता नाही. लॉकडाऊन होईल अशी शक्यता जाणवल्यामुळे घरकामातल्या दोन्ही मदतनीस, स्वयंपाक करणाऱ्या ताई आणि गाडीचा सारथी यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा पगार देऊन थोडी आधीच पूर्ण सुट्टी दिली होती. सफाई कर्मचाऱ्याला थोडे अधिकचे पैसे हवे होते ते दिले. आता सर्व काम स्वतः करावे लागत असल्यामुळे मदतनीसांची खरी किंमत आणि त्यांचे कष्ट कळत आहेत, आपले रोजचे जीवन सुकर आणि आरामाचे करण्यासाठी राबणाऱ्या हातांबद्दल कृतज्ञता वाटते आहे. फळे आणि भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकरी कुटुंबाकडून हवा तो माल घरपोच (गृहसंकुलाच्या दाराशी) येतो आहे. सर्वात जास्त दुर्लक्षित असलेले कृषीक्षेत्र आणि शेतकरीच आज आपल्याला जगवत आहेत.

* * *

घरातल्या सगळ्यांचेच गृहकृत्यदक्षता अंगी बाणवणे चालले आहे. किचनमधला वावर वाढला आहे आणि कधीतरी करून पाहू म्हणून राहून गेलेल्या पाककृती कमीत कमी साधनात बनवण्यात येत आहेत. सवय न राहिल्यामुळे फजिती होते कधीकधी पण त्यातही मजा आहे. मुळातच खादाड प्रवृत्ती असल्यामुळे जिभेवर ताबा ठेवणे सोपे नक्कीच नाही पण वजन आणि रक्तशर्करा आटोक्यात ठेवण्यासाठी निग्रहाने करावे लागत आहे.

* * *

परिचयातील सर्व मुलांना रोज एक तरी 'करियर ऑप्शन' वर दोन पानी निबंध / अहवाल लिहायचे काम दिले आहे. इंटरनेटची मदत घेऊन नवीन जगात उपलब्ध होणाऱ्या संधींबद्दल त्यांचा आपापल्या परीने हसत खिदळत अभ्यास चालला आहे. रात्री झोपण्यापूर्वी अहवालाचे सादरीकरण बघतांना आपल्याला वाटतात त्यापेक्षा मुले जास्त हुशार, धीट आणि अतरंगी आहेत ही जाणीव सुखावणारी आहे.

* * *

अनेक मित्रांनी घरातले फोटो अल्बम काढून वगैरे बघितल्याचे सांगितले. फोटो प्रिंट काढण्याचा काळ कधीच लोटला असे वाटत असतानांच घरात काही शे प्रिंट फोटो आहेत आणि त्यापैकी जुन्यांचे रंग धूसर होत असल्याचे दिसले. दोन दिवस खपून त्यांचे डिजिटलायझेशन केले. मग कामात काम म्हणून त्यापेक्षा काही पावले पुढे जाऊन जुने कॅमेरे, बाबा आदम कालीन तीन ब्लॅकबेरी फोन, जुनी मेमरी कार्ड्स, जुने वापरात नसलेले अन्य स्मार्टफोन, मान टाकलेला जुना लॅपटॉप, एक्सटर्नल डिस्क अशा विविध ठिकाणी विखुरलेल्या हजारो डिजिटल फोटोना एकेठिकाणी केले, त्यातील अनेकदा कॉपी झालेले, ब्लर-अस्पष्ट झालेले, एकाच प्रसंगाचे एकाच फ्रेममधले उगाच १०-१० काढलेले, फोटोत डोळे मिटलेल्या अवस्थेत लोक असलेले, फोटो-बॉम्बिंगच्या केसेस असलेले असे फोटो नष्ट केले. आता मूड लागेल तस त्यांचे व्यवस्थित वर्गीकरण करणार आहे. ह्या प्रकल्पाचा उपप्रकल्प म्हणून चार्जेर-बॅटऱ्या-वायरी-ऍडॉप्टर-जुने फोन आणि वापरात नसलेल्या अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा बराच इ-कचरा जमा झाला आहे आणि थोडे स्थिरस्थावर झाल्यावर त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावायची आहे.

* * *
स्वतःचे कपाट उपसून पुन्हा नीट लावतांना नावडत्या - गचाळ फिटिंगच्या - कंटाळा आलेल्या - वापरण्याची शक्यता नसलेल्या - सगळ्या कपड्यांना भावपूर्ण निरोप दिला. 'ओन्ली द बेस्ट फॉर मी' असे ब्रीदवाक्य ठेवून सर्व नको असलेल्या अन्य वस्तूही कपाटाबाहेर केल्या. कोनमारी आणि मिनिमलिझम नुसतेच वाचून काय उपयोग ?

लॉंड्री आवडता प्रांत आहे. कपडे मशीनला लावणे, वाळवणे, घडी घालून / प्रेस करून ज्याचे त्याच्या कपाटात लावून देणे इतक्यावरच न थांबता चादरी, टॉवेल, पडदे, सोफा कव्हर, शूज, पायपुसणी आणि मग खुद्द वॉशिंग मशीन असे सर्व क्रमाक्रमाने स्वच्छ करून दिल्यामुळे माबदौलत घरातील सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. कौतुकामुळे उत्साहाचे भरते येऊन पुढची पायरी म्हणून फ्रीजसुद्धा अंतर्बाह्य स्वच्छ करून दिला असता पण चुकीच्या शब्दात सत्य सांगणे भोवले. 'आपल्या घरातील फ्रीज हा अन्नपदार्थ कुजवण्याचा कारखाना झाला आहे' असे प्रज्वल-उज्वल सत्यार्थक विधान करायला नको होते. अब क्या करें के तीर छूट गया कमान से .....

* * *

इमारतीला लागून असलेला एक मोठा प्लॉट रिकामा आहे. त्यापलीकडे काही अंतरावर इमारतींचे बांधकाम सुरु आहे. त्यासाठी आलेल्या मजुरांची पत्र्यांची छोटी घरे मला खिडकीतून दिसतात. त्यांचे काम सध्या पूर्ण बंद पडले आहे. सगळे मजूर मुलाबाळांसह घरीच आहेत. सकाळी लहान मुलांच्या आंघोळी आणि बायकांची स्वयंपाकाची लगबग दिसते. पुरुष मंडळी मात्र फक्त फोनवर किंवा पत्ते कुटतांना दिसतात. त्यांचा कंत्राटदार दोनदा पैसे वाटून गेला आहे, रांगा लावून पैसे घेतांना मंडळी दिसली, राशनही असावे. बघून बरे वाटले. पण तो पुन्हा येईल का माहित नाही. कामच नसेल तर त्याला तरी पैसे मिळतील का असा विचार मनात येतो.

लहान मुलें त्यांचे खेळ स्वतःच शोधतात. हसऱ्या चेहऱ्याने घरासमोर झाडू - सडाशिंपण आणि उगाचच लाकडाच्या झिलप्या इकडच्या तिकडे रचणे, खोटे-खोटे पाणी आणणे असे खेळ (!) ती मुलं खेळतांना दिसतात. त्यांना बघून आनंद वाटावा की दुःख हे मात्र मला समजत नाही.

जीस्त करने के लिए उम्र बहुत थोडी है
अपनी दुनिया से अलग क्या कोई दुनिया देखें

* * *

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

7 Apr 2020 - 5:15 pm | कुमार१

आवडले. चित्रेही सुंदर !

धर्मराजमुटके's picture

7 Apr 2020 - 5:21 pm | धर्मराजमुटके

मस्त लेख ! आवडला.

प्रमोद देर्देकर's picture

7 Apr 2020 - 6:37 pm | प्रमोद देर्देकर

लेख आवडला आमचेही घरी तेच स्वयंपाक घरात लुड्बुड चालु आहेच तसेच बाजाराहाट सध्या आमच्यावर आलीये.

निसर्गाचे सगळे फोटो कातिल आले आहेत. बहावा तर सुंदर फुलला आहे.

प्रचेतस's picture

7 Apr 2020 - 8:38 pm | प्रचेतस

लेख खूप आवडला.
आजोबांच्या वाटणीपत्राचा किस्सा खूपच भारी.
खरेच ह्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळे आपल्या आवडीनिवडी जपता आल्या, नवीन काही करता आले. जुन्या आठवणी उगाळत्या आल्या.

सतिश गावडे's picture

7 Apr 2020 - 8:50 pm | सतिश गावडे

हेच म्हणतो...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2020 - 12:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजोबांच्या वाटणीपत्राचा किस्सा खूपच भारी.

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

किल्लेदार's picture

7 Apr 2020 - 9:20 pm | किल्लेदार

छान. मला उन्हाळा फार आवडतो. खासकरून पुण्यात डेक्कनला फिरताना एके ठिकाणी बहावा आहे. तो इतका फुलून येतो कि नुसता बघत राहावा. नीलमोहर सुद्धा सध्या फुलावर आला असेल. बोगनवेल तर विचारायलाच नको. माझ्याकडे गच्चीत मी चार बोगनवेल लावले आहेत. त्यांच्याकडे डोळेभरून बघतो आणि सोसायटीच्या कचऱ्याच्या तक्रारींकडे "काणा-डोळा" करतो.

परीक्षित's picture

8 Apr 2020 - 6:41 pm | परीक्षित

मस्त

अनिंद्य's picture

9 Apr 2020 - 2:30 pm | अनिंद्य

सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार.

... बहावा ...

फोटोतला पिवळ्या फुलांचा वृक्ष बहावा नाही. पण बहावा आता फुलेलच थोडे ऊन वाढले की.

किल्लेदार's picture

9 Apr 2020 - 4:43 pm | किल्लेदार
किल्लेदार's picture

9 Apr 2020 - 7:19 pm | किल्लेदार

IMG_20160427_084736_HDR

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2020 - 12:34 pm | चौथा कोनाडा

मस्त लेख ! आवडला.
खरंच, मुलांच जग किती निरागस असतं, कोणत्याही वस्तूला वेगळं काहीतरी समजून खेळत असतात !
बालपणी आम्हाला सिनेमे बघायला मिळत नव्हते, कचर्‍यात सापडलेल्या फिल्म, बॅटरी, आरसा, भिंग असल्या गोष्टी वापरून आम्ही सिनेमा बनवायचो, स्टोरी, डॉयलॉग सगळं आम्हाला हवं तसं, त्याची आठवण झाली !
फुलांचे फोटो अप्रतिम आहेत.

किल्लेदार's picture

28 Apr 2020 - 1:43 am | किल्लेदार

जपानमध्ये साकुराचा (चेरी ब्लॉसम) उत्सव असतो. बऱ्याच ठिकाणी चेरी ब्लॉसम साठी विशेष पार्क्स आहेत. चेरी ब्लॉसम जेमतेम एक आठवडा टिकतो. आपल्याकडे नीलमोहर, बहावा किंवा गुलमोहर उत्सव का नसावा? महिनाभर तरी चालेल.

खरंच खेद वाटतो.

अनिंद्य's picture

11 Apr 2020 - 11:21 am | अनिंद्य

@ किल्लेदार,

सुंदर फुलला आहे तुमचा बहावा. मला फार आवडतो. खास देशी वृक्ष असूनही फारशी लागवड दिसून येत नाही. मी सहा वर्षांपासून घरी बियांपासून रोपे तयार करतो आहे. सक्सेस रेट खूपच कमी आहे. साधारण १२० बिया पेरल्या तर १० रोपं मिळतात. माझ्याकडे कुंड्यांमध्ये ६ वर्षाची झालेली रोपं कुठलातरी रोग पडून गेली. ज्यांना जमिनीत लावायला दिली त्यांच्याकडे मात्र १२ फूट वाढली आहेत आता :-)

जपानमध्ये साकुराचा (चेरी ब्लॉसम) उत्सव असतो. बऱ्याच ठिकाणी चेरी ब्लॉसम साठी विशेष पार्क्स आहेत. चेरी ब्लॉसम जेमतेम एक आठवडा टिकतो. आपल्याकडे नीलमोहर, बहावा किंवा गुलमोहर उत्सव का नसावा? महिनाभर तरी चालेल.

खरंच खेद वाटतो.

अनिंद्य's picture

28 Apr 2020 - 8:19 pm | अनिंद्य

@ किल्लेदार,

तुमची कल्पना फारच छान आहे. आपल्याकडे नसला तरी थायलंडमध्ये बहावा उत्सव खरंच साजरा होतो.
आपल्याकडेही काही रसिक प्रयत्न करतच असतील. दोन उदाहरणे :-

माझ्या एका परिचितांनी निवृत्तीपश्चात राहायला म्हणून एक प्लॉट घेतला, छोट्याच जागेत त्यांनी १०-१२ बहावा शिस्तीत लावले. पुढे घर बांधले. आता अनेक वर्षानंतर त्यांच्या बंगलीवर बहाव्याचे सोनछत्र धरलेले दिसते या दिवसात !

असेच एका बिल्डरने त्याच्या रिकाम्या प्लॉटवर भिंतीला लागून डझनभर गुलमोहोर लावले आहेत, सध्या यौवनात आहेत. येता जाता तो लाल फुलांचा खच दिसला की कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

प्रचेतस's picture

28 Apr 2020 - 8:46 pm | प्रचेतस

गुलमोहरासारखी परदेशी झाडे घराच्या बाजूला लावायला तशी भीतीच वाटते. सोसाट्याच्या वारा पावसात ही झाडं सहज उन्मळून पडतात. वड, आंबा आदी देशी वृक्ष घराबाजूला उत्तम. पिंपळही उत्तम पण त्याच्या मुळ्या नुकसान करतात.

अनिंद्य's picture

28 Apr 2020 - 9:00 pm | अनिंद्य

गुलमोहोर स्थानिक नाही हे बरोबर पण देखणा खूप.
बहावा देशी पण आणि देखणा पण त्यामुळे त्याचे कौतुक जास्त.

प्रचेतस's picture

28 Apr 2020 - 9:05 pm | प्रचेतस

बहावा देशीच,
अप्पर वैतरणाच्या काठावर बहाव्याचे कित्येक वृक्ष आहेत.

पत्ता द्या कि त्यांचा.

अनिंद्य's picture

13 Apr 2020 - 12:47 pm | अनिंद्य

जेष्ठ मैत्रिण कवयित्री अनुराधा काळे यांनी पाठवलेली मिष्किल प्रतिक्रिया इथे डकवतो आहे (त्यांना मिपा उघडतांना अडचणी येत आहेत)

सारे काही सांगे लेखाचे नाव
काय आहे सकलांचे वास्तव
मिष्किलतेचा हलकाच भाव
नृत्य कलेला मिळेल की हो वाव

प्रत्येकाची समस्या आगळीवेगळी
जुने चित्रपट बडदास्त ज्येष्ठांची खुले कळी
उदासीन बातम्या नको वाटती वेळोवेळी
पण एकत्र कुटुंब भोजन मजा आगळी

जुनी पुराणी पत्रे म्रुत्यु पत्रे करारनामे
फावला वेळ---वेळ आणली कोरोनाने
लक्ष वेधले कधी नव्हे ते खिडकीने
सुंदर रुप धारण अस्पर्शित निसर्गाने

पाकळ्यांची पखरण पक्षांची किलबिल
दारी येई प्रसवण्या बुलबुल
अर्धोन्मिलित कळ्या अन् ती फुलं
तयांसी निरखता धुलाई कार्य उरकलं
लक्ष वेधे बाह्य जगतात काय हो चाललं
"अपनी हालत तो बहुत अच्छी।"
हे मनोमनी पटलं

अनुराधा काळे

संजय क्षीरसागर's picture

28 Apr 2020 - 11:52 pm | संजय क्षीरसागर

छान रमवलंय तुम्ही स्वतःला.

जिंदा है यही काफी है जश्नके लिए
यूं बहाने तो हजारों है नाऊम्मीदीके |

अनिंद्य's picture

29 Apr 2020 - 8:38 am | अनिंद्य

जिंदा है यही काफी है जश्नके लिए

सध्यातरी असेच आहे :-)

Thank you.

जव्हेरगंज's picture

29 Apr 2020 - 9:00 am | जव्हेरगंज

सर्वच फोटो आवडले. मस्त!!

अनिंद्य's picture

29 Apr 2020 - 9:09 am | अनिंद्य

मोबाइल कँमेराची कृपा.

चित्रगुप्त's picture

29 Nov 2020 - 6:40 am | चित्रगुप्त

वा. खूपच छान, प्रेरणादायक लिखाण आहे. कमालीचे उद्योगी आहात भाऊसाहेब तुम्ही. आता तुमचे सगळे लिखाण शोधून हळूहळू वाचतो. डोळ्यांच्या घटत चाललेल्या शक्तिमुळे आताशा वाचनावर पडलेल्या मर्यादांची जाणीव असे काही सुंदर वाचले की फारच होते. अनेक आभार.

कौतुकाच्या शब्दांबद्दल आभारी आहे. 🙏
सध्या 'कोविडकंटाळा' ह्या रोगाने पछाडले आहे मला 😀

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Nov 2020 - 12:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

इतका सुरेख लेख वाचायचा राहून गेला होता.
छान लिहिले आहे.. फोटो विषेश आवडले
पैजारबुवा,

अनिंद्य's picture

30 Nov 2020 - 4:34 pm | अनिंद्य

आभार !

नंतर नंतर ‘लॉकडाऊन स्पेशल‘ लिखाणाचा महापूर आला होता जालावर !

केशवा माधवा गोविंदा पांडुरंगा ! ७ एप्रिल २० ते आज ७ एप्रिल २१ एक वर्ष झाले हे लिहून. आता परत मिनी लॉकडाऊन - निर्बंध - संचारबंदी - जमावबंदी चालू झालेय. :-(

वर्षभरात कितीतरी पडझड झाली, काही जवळची माणसे सोडून गेलीत, काही त्रास भोगताहेत...कित्येकांच्या नोकऱ्या-रोजगार गेले. एका विषाणूमुळे आयुष्य बदलून गेले आहे. हे लवकर संपून आयुष्य आधीसारखे होण्याची वाट बघतो आहे _/\_

आयटी क्षेत्रांत आमुलाग्र बदल होतील...

मास्क, सॅनिटायझर हे दैनंदिन वापरात, पुढील 2-3 वर्षे तरी राहतीलच...

हाॅटेल व्यवसाय, पुढील 1-2 वर्षे तरी, आर्थिक मंदीतून जाईल

ऑन लाईन, वस्तू मागवण्याचे प्रमाण वाढेल...

अनिंद्य's picture

8 Apr 2021 - 1:34 pm | अनिंद्य

सहमत.

मराठी_माणूस's picture

7 Apr 2021 - 2:48 pm | मराठी_माणूस

एका विषाणूमुळे आयुष्य बदलून गेले आहे.

एक दुरुस्ती सुचवतो. आयुष्य बदलून गेले आहे पण फक्त विषाणू मुळे नाही.

अनिंद्य's picture

8 Apr 2021 - 1:48 pm | अनिंद्य

आजघडीला विषाणूच ब्रम्ह हो, बाकी मिथ्या :-)

कुमार१'s picture

7 Apr 2021 - 6:36 pm | कुमार१

ठीक आहे. यंदा मी काय करतोय ?
चार आघाड्यांवर थोडक्यात सांगतो.

अभ्यास : नाईलाजाने मागच्या वर्षीचाच म्हणजे चालू महासाथीचा विषय. वाचन, लेखन आणि प्रश्नोत्तरे. यामुळे अन्य अनेक आरोग्य विषय वाचायचे डोक्यात आहे ते मात्र जमत नाही. त्याची खंत.

स्वयंपाक : घरामध्ये तीन पिढ्यांपासून उपमा केला जातो तो भाजलेल्या रव्याचा असायचा. मध्यंतरी ऐकले की दक्षिण भारतात कच्च्या रव्याचा करतात आणि छान असतो. काल कच्चा रव्याचा उपमा केला आणि हा बदल नक्कीच आवडला.

संगणक : अधून-मधून मिपावर थोडाफार एचटीएमएलचा सराव करतो. आता वर्डचे जेपेग करणे स्वतःलाच जमू लागले व गती आली आहे. पूर्वी अन्य कोणाची मदत घेत होतो.

करमणूक : यावर्षी मात्र ओटीटी वरील चित्रपट मनापासून बघावेसे वाटत नाहीत. कंटाळा आलाय, मागच्या वर्षी फारच पाहिल्यामुळे. त्यामुळे अगदीच नाईलाज झाला तर पाहतो.
पण बदल म्हणून आता दक्षिण भारतीय दोन पाहिले. दृश्यम 2 (मल्याळम) आणि आमी (तेलगू). दोन्ही आवडले

चार आघाड्यांवर उत्तम चालायय की तुमचे ! तुमचे आरोग्यविषयक लेखन आणि प्रश्नोत्तरे वाचत असतो पण हे संकट लवकर संपावे असे वाटते ... कोरोना, तुमचे लेखन नाही :-) हे दिवस संपले की तुम्हाला नैराश्य, राग-चिडचिड, भीतीजन्य गंभीर मानसिक रोग इत्यादींवर लिहावे लागणार हे नक्की.

तामिळ-तेलगू-मल्याळम चित्रपट विंग्रजी टायटलसह बघायला मजा येते, शॉर्ट फिल्म्स बघतो कधीकधी.

सगळेच 'आवडून घेण्याचा' प्रयत्न करतोय पण कंटाळा आलाय.

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 5:51 pm | मुक्त विहारि

कंटाळा येणे ही मानसिक दृष्टीने योग्य गोष्ट नाही ....

जमत असेल तर,

स्वैपाकात मन रमवा

जर्मन, फ्रेंच, अशा परदेशी भाषांची जुजबी ओळख करून घ्या.

मॅजिक क्यूब, सोडवा

विशेष पर्व, नावाचे पुस्तक जरूर वाचा...ज्यू मामा-भाचे, जवळपास दीड ते दोन वर्षे, तळघरात कोंडून गेले होते... त्यामानाने आपण खूपच सुखी आहोत...

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 6:02 pm | मुक्त विहारि

हे पुस्तक वाचा

दुसर्या महायुद्धाच्या काळांतील "घेट्टो" आणि आपली स्थानबद्धता यात थोडे साम्य आहे...

ते पण बाहेर आले तसेच आपण पण ह्या संकटातून बाहेर येणारच ...... मन करा रे प्रसन्न, सर्व चित्तीचे साधन...

अजून एक साधा उपाय देतो ... जो मी करतो ....

रोज एका तरी मिपाकराला फोन करा... खूप फायदा होईल...

अनिंद्य's picture

8 Apr 2021 - 6:40 pm | अनिंद्य

केली सुरुवात, आभार.

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 6:58 pm | मुक्त विहारि

मिपाकरां बरोबर गप्पा मारल्या की कधीच कंटाळा येणार नाही...

Creative mind ठेवा...

ओरिगामी, स्वैपाक, गाडी साफ करणे, पुस्तकांची साफ-सफाई, संगणकातील अनावश्यक घाण साफ करणे, खूप काही करण्यासारखे आहे...

कधीही फोन करा... शिळोप्याच्या गप्पा मारणे हा माझा आवडता धंदा आहे....