मोगँबो - ६

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
1 Apr 2020 - 7:41 am

काहितरी करायलाच हवे, त्या खोलीला एक खिडकी होती . ती उघडायचा प्रयत्न केला. पण एकदम ज्याम होती. कधी उघडलीच नसावी. त्या खोलीत एक पलंग त्यावर मळकट चादर आणि एक बाथरूम होते. मला बसायला एक तोडकी मोडकी खुर्ची.
तो माणूस यायच्या आत इथून पळून जायला हवे. खिडकी उघडतच नव्हती इथून बाहेर जायचा काहीतरी मार्ग शोधायलाच हवा.
मी दारापाशीच उभी राहिले..

मागील दुवा : http://misalpav.com/node/46314
किती वेळ गेला असेल माहीत नाही. मी तशीच दाराच्या जवळ उभी राहिले. जिन्यावर कोणाची तरी पावले वाजली. दाराची कडी उघडल्याचा आवाज. हाच एक क्षण हीच एक संधी. अखेरची. एका नको असलेल्या जगातून बाहेर पडण्याची. त्या माणसाने दार उघडले. दार उघडून त्याने आत पाऊल टाकले. मी एकदम त्याला ढुशी दिली. बरोबर त्याच्या पायात एक सणसणीत लाथ हाणली. हे असे काही होईल याची त्याने कल्पनाच केली नसावी.तो मागे भेलकांडला. दार मोकळे झाले. त्या माणसाच्या बरोबर कोणीतरी आले होते. आणि तो आलेला माणूस या माणसाला वाकून सावरायचा प्रयत्न करत होता. मी त्यालाही जोरदार धडक दिली. आणि मी पुढे जिन्यावर आले. वाकला असल्याने त्याचा तोल गेला. तो जिन्यावर पडला. ते दोघे सावरुन उभे रहाण्याच्या आतच मला पळायचे होते . मी सुसाट पळाले. आणि पळत सुटाले. त्या रस्त्यावरच्या गर्दीची पर्वा न करता. ट्रॅफिकची पर्वा न करता. मी पळत होते. थके पर्यंत. खूप तहान लागली होती , रस्त्यावरच्या एका चहावाल्याकडे पाणी मागितले. त्याने पाणी दिले. न विचारताच चहाचा ग्लास पुढे केला. रस्त्याच्या कडेला बसूनच चहा प्याले. माझा अवतार कसा होता माहीत नाही. त्या चहा वाल्याला द्यायला माझ्याकडे पैसे नाव्हते. तसे त्याला सांगितले. मोठमोठ्याने ओरडायला लागला. घाबरून तेथून पळाले. चहावाल्याकडे गर्दी होती त्यामुळे तो पैसे घ्यायला माझ्यामागे पळाला नाही. मी चहाची चोरी केली …"
आशा बोलत असताना सगळेच श्वास रोखून ऐकत होती. आत्तापर्यंत पिक्चरमधे पाहिलेली कथा त्यांच्या समोर प्रत्यक्ष उभी होती.
" त्या बिचार्‍या कष्टकर्‍याच्या एका चहाची चोरी केली होती. इकडे तिकडे करत तशीच बराच वेळ फिरत राहिले. दुकाने रहदारी गर्दीत चालणारी माणसे, सिग्नलच्या दिव्यावर घोळक्याने थांबणार्‍या गाड्या पहात वेळ काढत बसले. संध्याकाळ झाली एक भयानक गोष्ट जाणवली ती म्हणजे या शहरात मी एकटी होते. दादरस्टेशनला रंजन ताईकडे परत जाता आले असते पण तिथे ती बाई पुन्हा भेटली असती. तीने मला सोडलेच नसते. ज्या दुनियेतून बाहेर पडलो त्यात पुन्हा जावे लागले असते. तशीच इकडे तिकडे फिरत राहिले. समोर कोणतेतरी स्टेशन दिसले. आत गेले. तीच गर्दी. कशीबशी एका बाकड्यावर बसायला जागा मिळाली. सकाळपासून काहीच खाल्लेले नाहिये. भूक जाणवली. समोर एक जण सामोसे विकत होता. त्या वासाने भूक जास्तच वाढली. घरी अशी भूक लागली की फडताळ उघडून पहायचे. काहितरी असायचेच. काही नाही तर सकाळच्या जेवणातला भाकरीचा एखादा तुकडातरी असायचा. त्या तला अर्धा खाल्ला तरी बरे वाटायचे. त्यावर पाणी पिऊन बरे वाटायचे. पाणी प्यायला नळ खूप लांबवर होता. मी त्या बाकड्यावरून उठायचा प्रयत्न केला उठताच येत नव्हते. पाय प्रचंड दुखत होते. सकाळपासून धावतच होते.
बर्याच वेळाने उट्।ऊन पाणी प्यायली. आणि त्या बाकड्यावर पुन्हा येऊन बसले. रात्र आता दाटून आली. प्लॅटफॉर्मवरची गर्दी संपली. गाड्यायायच्याही थांबल्या.
त्या बाकड्यावर बसल्या बसल्या झोप येत नव्हती पण मला कसलीशी गुंगी येवू लागली. घराची आईची लालाची खूप आठवण येउ लागली. डोळे भरून आले. घरी असते तर आईच्या कुशीत शिरून खूप रडले असते. रंजन ताई असती तरी बरे झाले असते. तीच्या कुशीत रडत राहिले असते. बराचे वेळ बसले. कधितरी सकाळ झाली.
एक गाडी आली , त्यातून लोक उतरायला लागले. त्या गाडीत बसून गावाकडे परत जावे वाटायला लागले. बाकावरून उठता येत नव्हते. इतके अंग दुखत होते. बहुतेक तापही होता. कशीबशी उठले. पाण्याच्या नळावर जाऊन तोंड धुतले. या शहरात रहायचे तर हातात पैसे हवेत. चहाला दहा रुपये. वडापाव ला वीस रुपये. समोसा घेतला तर पंचवीस . पाण्याची बाटली वीस रुपये. आपल्याला पैसे मिळवायलाच हवेत. पैसे….पैसे.... पैसे.
आणि हे पैसे कशासाठी तर स्वतःला जगवण्यासाठी फक्त. आईसाठी लालासाठी त्यात काहीच नाही. पैसे ... पैसे.... इथून कुठेतरी पळून जावं
या येणार्‍या जाणार्‍या लोकांकडे मागावेत पैसे? की कुणाची तरी पर्स घेवून पळून जायचं. आयुष्यात भीक कधी मागितली नव्हती. बाबानं कर्ज घेतलं होतं त्या कर्जाने त्याचा जीव घेतला. कर्ज संपलं नाही ते नाहीच. कर्ज हे पण भीकच आहे की एक प्रकारची. त्या बदल्यात त्याने भीकेने आम्हा सगळ्यांची आयुष्ये घेतली.
कोणापुढे हात पसरायचा नाही एकदा हात पसरला की त्या बदल्यात काय काय द्यावे लागेल हे माहीत नसते.
काम कोणते करणार. आणि देणार कोण. मला तर कुठे जायची भितीच वाटायला लागली. पण पैसे तर मिळवायला हवेतच. रंजन ताईला ती काय काम करते विचारल्यावर ती कसनुसे हसली होती. काय काम करते सांगायचं तीने टाळले. काहीतरी लाज वाटावसं काम असेल बहुतेक. समोरून एक रंजनताई सारखी भरपूर पावडर लाली लावलेली पुरुषी चेहेर्‍याची एक बाई येत होती. तीने कोणाच्यातरी डोक्यावरून हात फिरवला आणि टाळी वाजवली.त्या माणसाने तीला पैसे दिले. मग ती आलेल्या रेल्वेत बसून निघुन गेली. पुरुषांच्या डब्यातून.
हे करता येईल का? का नाही करता येणार ! काल च्या त्याबाईने दिलेल्या पर्समधे पावडर ची डबी आणि लिपस्टीक आहे.
पावडर लिपस्टीक लावून मी उभी राहिले. प्रचंड चक्कर येत होती. रेल्वे पकडण्यासाठी जिना ओलांन पलीकडे जावे लागणार. मी जीना चढायला सुरवात केली. वर पाहिल्यावर ती कालची बाई जीना उतरत होती. खूप घाबरले. तीने मला पहायच्या आत पळायला हवे. मी स्टेशनच्या दारातून बाहेर पडले.आणि बाहेरच्या गर्दीत मिसळले. भुकेने अंगात त्राण नव्हते. चक्कर येत होती डोळ्यापुढे अंधारी येत होती तरीही चालत राहीले. पळत राहीले. आणि या दादांच्या गाडीला धडकले."
आशा सांगत होती . ऐकणारे नि:शब्द झाले होते.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

छान चाललीये कथा... पुभाप्र

विजुभाऊ's picture

8 Apr 2020 - 11:54 pm | विजुभाऊ

पुढील दुवा http://misalpav.com/node/46406