निर्ढावलेपणाचा प्रवास
तसे आपण सर्वच काही ना काही गोष्टींना निर्ढावलेले असतो किंवा हळू हळू आपण त्या गोष्टींशी जमवून घ्यायला सुरुवात करतो. आपल्यातले काही जण तर सर्वसाधारण जाणीवांच्यापलीकडे जाऊन स्थितप्रज्ञ झालेले असतात. हॉस्पिटलमध्ये काम करणारा स्टाफ हा पेशंटच्या वेदना आणि अडचणी यांनी फारसा बाधित न होता आपले काम आणि आपले जीवन व्यवस्थित जगायला शिकतो. ज्या गोष्टींमुळे सामान्य माणसं हलून जातात तिथे हि माणसं निर्विकारपणे आपलं काम करीत राहतात. आणि असं निर्विकार होणं हे आवश्यक पण असते.
पण आपल्यातले बऱ्याच उदारमतवादिनीं काही काळ का होईना गेल्या काही वर्षात मोठे भावनात्मक आव्हान पेलले असण्याची शक्यता आहे. आणि आपापल्या वकुबानुसार चटकन ते मोठ्या कष्टाने हा निर्ढावण्याचा प्रवास केला असेल. तर असा माझा स्वतःचा निर्ढावण्याचा प्रवास मी येथे सांगत आहे.
सुमारे बारा वर्षांपूर्वी मिपाशी ओळख झाली. जी काही ओळख झाली ती काही फारशी सुखावह नव्हती. कुठल्यातरी चर्चेत 'या संस्थळावर गांधींना शिव्याच दिल्या जातील' अशा अर्थाचे, मिपाचे एकूणच धोरण स्पष्ट करणारे वाक्य वाचनात आले. तरीपण इतर चर्चा आणि खास करून राजकीय चर्चा या बऱ्याच मर्यादशील म्हणता येतील अशा असत.
२०१३ च्या उत्तरार्धात राजकीय क्षितिजावर ब्रह्मांडनायकांचा उदय झाला आणि त्याच दरम्यान कायप्पा विद्यापीठाची स्थापना झाली. ब्रह्मांडनायकांचा राज्याभिषेक होऊपर्यंत तर कायप्पा विद्यापीठात नवनवीन, दैदिप्यमान असे इतिहासकालीन आणि शास्त्रीय दाखले देणाऱ्या गिरण्याच सुरु झाल्या. यातील एक गिरणी तर ब्रह्मांडनायकांचे अर्थशास्त्रीय सल्लागार संजीव सन्याल चालवीत असत. याचा फार त्रास व्हावा इतका काही मी संवेदनशील नव्हतो. पण दुःखी व्हावे असे प्रसंग नंतर आले.
दोन-तीन वर्षांपूर्वी अचानक एका मित्राचा फोन आला. मी जी कंपनी सोडून जवळपास एक तप झाले होते त्याच्या माजी सहकाऱ्यांनी कायप्पा ग्रुप तयार केला होता. सुरुवातीला सर्व काही आलबेल होते. पहिल्या दोन-चार दिवसात तर मैत्रीच्या कारंज्याचा फव्वारा काही विचारायलाच नको. एकमेकांना टोपण नावांनी संबोधने, आपली घरे, मुलं यांचे फोटो टाकणं वगैरे सर्व झाले. आणि नंतर उजवीकडील मंडळी कार्यरत व्हायला सुरुवात झाली. आपलीच काही मित्रं दुखावू शकतात याचा विचार न करता आरक्षण, दंगली, अमुक धर्माचे लांगुलचालन वगैरे विषयावरील चिथावणीखोर संदेश यायला सुरुवात झाली. गरळ ओकताना अतिशय विखारी भाषा तर ब्रह्मांडनायकांचे कौतुक करताना तर इतकी मधाळ भाषा कि नजरदेखील उचलता येत नव्हती.
जेंव्हा निर्ढावलो नव्हतो तेंव्हा मुद्देसूद माहिती देऊन उजव्यांचे मतपरिवर्तन करण्याचा खुळचट प्रयत्न मी देखील केला. पण उजव्यांना आपण खोटं ठरतोय याची भीती नव्हतीच. 'हे सर्व इंग्रज आणि काँग्रेसनं मुद्दाम शिकविलेल्या इतिहासाचा परिणाम आहे' असा पवित्र मंत्र त्यांच्याकडे तयार असायचा. शेवटी या आणि अशा बऱ्याच कायप्पा ग्रुपवरून मी माघार घेतली. पण दुर्दैवाचे फेरे काही संपले नव्हते. ब्रह्मांडनायक मधुचंद्र संपवून नव्या जोमाने परत आले. माझ्यासाठी वाईट हे कि 'बघा! शेवटी सत्याचाच विजय झाला!!' अशा अर्थाचे संदेश मित्रांनी वैयक्तिकरीत्या पाठवले. तिकडे चेपुवर तर हि मंडळी सुटलीच होती. शेवटी तिथे पण या मित्रांना अनफॉलो करून टाकले.
दुसऱ्या बाजूला पुण्यातील खाऊ गल्यांच्या बाजूला होणारी गर्दी आणि उलट दिशेने वाहन चालवणारे हेही डोक्यात जात. आताशा असेच आपण संपायचे अशी समजूत करून घेऊन थोडी फार मनःशांती मिळवत आहे. सुख हे किती व्यक्तिसापेक्ष असते याचा अनुभव या निमित्ताने मिळतो. उजवे, खादाड आणि नियम तोडणारे यांच्या दृष्टीने तर सध्याचा काळ म्हणजे तर रामराज्यच!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पूर्वी या धाग्याने हा हा
फार जळजळ होते आहे का?
काका
परिवर्तन हा निसर्ग नियम.
आपल्या मताशी न जुळणाऱ्या
ब्रोबर.
तेव्हा उठून दोन मुस्काडात
हतबलता.
मुद्दा मागे पडून हिंसक विचार
मी बोलघेवडा पण ....
खरंय..!
निर्ढावलेले कोण?
'या संस्थळावर (राहुल)
एक इनो पोस्टकार्ट्यासाठी आणि
तुमचे म्हणणे मान्य आहे. आपले