दोसतार - ३१

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 Jan 2020 - 8:04 am

कौरवांच्या चक्रव्युहात अडकावा तसा तो प्रश्नांच्या गराड्यात अडकला होतात. शाळेत नक्की काय झालंय ते त्याला माहीत होते.
या सगळ्यातून शाळेत वाघ आला होता. तो पाण्याच्या टाकी च्या आसपास फिरताना कोणीतरी पाहिले होते हे समजले .
आमचे चेहरे या वेळेस कोणी पाहिले असते तर त्याला त्यावर भिती आनंद उत्सुकता गम्मत असे सगळे काही नाचताना दिसले असते.

मागील दुवा : http://misalpav.com/node/45852

शाळेत वाघ आला होता. हे सगळ्यांना कळाले. पण वाघ शाळेत का आला ते मात्र कळत नव्हते.
शाळेतच का आला ?
का म्हणजे ?
वाघाला जायला कित्तीतरी ठिकाणे आहेत गावात. तो तिकडे का गेला नाही. प्रतापसिंह उद्यान आहे, गोल बाग आहे झालेच तर कोटेश्वर मैदान आहे.
पण मग तो तिकडे गेला असता तर तुम्ही तो तिकडेच का गेला म्हणून विचारले असते.
हे मात्र खरे . वाघ कुठेही गेला असता तर लोकांनी तो तिकडेच का गेला म्हणून विचारले असते. आणि गम्मत म्हणजे वाघ तिकडे का गेला हे वाघच सांगू शकणार ना.
पण वाघ शाळेत का आला हा प्रश्न मलाही पडला . पण विचारणार कुणाला.
" बहुतेक अजून एक जीप येणार असे दिसतेय" टंप्या
" कशावरून रे"
" ते बघ ना त्या वाघाला पकडायला आलेल्या जीपवर वन खाते असे लिहीलय . दुसरी जीप येईल त्यावर "टू "खाते असे लिहीलेले असेल दोन जीपा आल्या की वाघ आपसूक समोर येईल." टंप्याने नवे संशोधन केले.
टंप्याच्या या संशोधनावर काय बोलावे हे एल्प्यालाच काय मला पण कळेना झाले..
" ए ते वन टू थ्री मधला वन नाहिय्ये. वन खाते म्हणजे जंगल खाते."
मग खाते म्हणजे काय?…. ती जीप काय जंगल खाते काय वन खाते म्हणे.? काय च्या काय बोलतोय." बरोबरच्या सहावीच्या मुलांमोर कुणीतरी आपली चूक दाखवून द्यावी याचा टम्प्याला राग आला. तेथून नुघून जायचे पण अवघड होते. आणि जाणार तरी कुठे . सगळी शाळाच चौकात जमली होती.
अचानक गर्दी हलायला लागली. गर्दीचे एक असते. एखादी बातमी एका टोकाला कळाली की ते दुसर्‍या टोकाला पसरायला वेळ लागत नाही. लवंगी फटाक्याच्या हजारच्या माळेला एका टोकाला उदबत्ती लावली की दुसर्‍या टोकापर्यंत माळ क्षणात पेटत जाते तशी च बातमी ही पसरत जाते.
गर्दीत काहितरी हालचाल दिसू लागली. पुलाखाली आल्यावर पुलाच्या खाम्बामुळे नदीचे पाणी दुभंगावे आणि पुढे गेल्यावर पुन्हा एक व्हावे तशी गर्दी दुभंगून एक होत होती. तो दुभंग आमच्या पर्यंत आला. त्या दुभंगाचे कारण भोसेकर सर होते. शाळेच्या गेट पासून गर्दीच्या मध्यापर्यंत ते आले होते. अगदी आमच्या समोर. सरांनी इकडे तिकडे पाहिले. सगळेजण त्यांच्याकडेच पहात आहेत याची खात्री करून घेतली खिशातून शिट्टी काढली आणि जोरात फुर्र करत शिट्टी फुंकली.
शिट्टीमुळे एक झाले जो काही गलका होता तो एकदम शांत झाला.
हे पहा इकडे लक्ष्य द्या.
सगळ्यांचे लक्ष्य भोसेकर सरांकडे तर होते. तरीपण जी काही कुजबूज सुरू होती ती थांबली. प्रत्येक जण भोसेकर सर काय म्हणतात हे जिवाचे कान करून ऐकू लागला.
काल शाळेत वाघ दिसल्याची बातमी आहे. वन विभागाला आम्ही ही गोष्ट कळवली आहे. वन विभागाचे कर्मचारी वाघाचा मागोवा घेत आहेत. शाळेतील मुलांना कसलाही धोका नाही याची खात्री झाल्या नंतरच मुलांना वर्गात जाउ देण्यात येईल. काल शाळेत वाघ दिसल्याची बातमी आहे. वन विभागाला आम्ही ही गोष्ट कळवली आहे. वन विभागाचे कर्मचारी वाघाचा मागोवा घेत आहेत. शाळेतील मुलांना कसलाही धोका नाही याची खात्री झाल्या नंतरच मुलांना वर्गात जाउ देण्यात येईल. हे काम करण्यास वन विभागाने आजच्या दिवसात दुपारपर्यंत मुदत घेतली आहे.
वन विभागाला काम करायला मिळावे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे या साठी आज शाळेच्या कामकाजास सुट्टी दिली आहे.
"है…...…. " सुट्टी म्हंटल्यावर भोसेकर सरांच्या आसपास होती त्यां मुलांनी एकदम गलका केला.
जे मागे होते त्यांना का गलका झाला ते कळेना. त्यांना वाटले की वाघ सापडला. त्यांनीही जोरात" है...…" केले. मला भिती होती की मुलांच्या "है...." च्या आवाजाला उत्तर म्हणून वाघ डरकाळी फोडायचा. अर्थात त्यामुळे वाघकुठे लपलाय ते लग्गेच कळाले असते. पण वाघाने तसे काही केले नाही.
ज्यांना सुट्टी मिळाल्याचे कळले ते उड्या मारत घरी ग्राउंडवर क्रिकेट खेळायला निघाले ज्यांना ज्यांना भोसेकर सरांनी वाघ पकडलाय असे वाटले ते सरांच्या जवळ येवू लागले. कोण नक्की काय करतय तेच कळेना झाले. भोसेकर सरांनी शिट्टीने पुन्हा एकदा फुर्र केले. पण या वेळेला तो मघाचा परीणाम झाला नाही.
कोणी पकडला, कुठे लपला होता. कोणता वाघ आहे. केवढा आहे. कुठे ठेवलाय. आम्हाला पहायला मिळेल ? त्याला मिशा आहेत?
एका मागून एक प्रश्न येत होते. इतके प्रश्न त्या वाघाला विचारले असते तर तो उत्तरे देताना डरकाळी ठोकायलाच विसरला असता.
"सर आम्हाला वाघ बघायचाय." या आंजीला ना कुठे काय बोलायचे तेच कळत नाही.
""ए.... पिवळी होईल वाघ समोर दिसल्यावर." संज्याने अंजीला टोमणा हाणत मागच्या कुठच्यातरी टोमण्याची फिट्टंफाट करून घेतली.
"ख्या ख्या ख्या… " सगळे हसले. पिवळी होईल यात हसण्यासारखे काय आहे काय माहीत पण या वाक्याला लोक ,मुलंच काय पण मोठी माणसेही हमखास हसतात.,
"होऊ दे. आमचं आम्ही बघु काय होईल ते. तुम्हाला विचारलं नव्हतं , चोंबडेपणा करायला. " अंजीला भांडायला कोणीतरी लागतंच. आणि तीला ते तसं मिळतंही.
"जाऊ दे. आम्ही मूर्खांशी भांडत बसत नाही." नित्या.
" तुम्ही नसाल भांडत मूर्खांशी. पण आम्ही भांडतो.: अंजी ला मघाचा अपमान बराच झोंबला होता. ती माघार घ्यायला तयार नव्हती.
यावर अंजीच्या नादाला लागून उगाच शब्दाने शब्द वाढवत बसण्यापेक्षा वाघाचे काय झाले असावे याची नित्या जास्त उत्सुकता होती.
" अरे सापडला……. वाघः कोणीतरी पुन्हा ओरडले.
"है………. " पुन्हा एकदा घोळक्यातून एका सुरात आवाज आला.
"बोला भारत माता की...….. " घोळक्यातून कोणीतरी ओरडले.
"जय. " घोषणेला एक दोन आवाजांनी उत्तर दिले.
"दगडी शाळेचा ........" सहावी क मधला असेल बहुतेक एक काटकोळा बारकुडा मुलगा हात वर करून घोषणा द्यायला लागला.
"विजय असो. ' या घोषणेलाही त्याच दोन तीन आवाजांनी उत्तर दिले. घोषणा कशासाठी देत होते काय माहीत. इथे कसलीच मॅच जिंकली नव्हती, प्रमूख पाहुणे नव्हते. वाघही सापडलेला नव्हता.
"जिंकली रे जिंकली...…." तो घोषणा देणारा मुलगा आता रंगात आला होता.
" फुर्र्र्र्र्र्र्र्र....."जिंकली रे जिंकली …. या घोषणेला काही उत्तर यायच्या आतच भोसेकर सरांनी शिट्टी फुंकली आणि घोषणा बंद पाडली.
"अरे काय लावलंय. इथे काय चाललंय आणि तु घोषणा कसल्या देतो आहेस." भोसेकर सर.
" सर वाघाला पकडला ना त्यांनी….." तो घोषणावाला बारकुडा मुलगा.
" थेट शालाप्रमुख सरांकडे न्या त्याला. अंगटेह धरून उभे करायला लावा त्याला दिवसभर. " तो बारकुडा मुलगा बोलायचे थांबतच नव्हता.
" काय मज्जा येईल रे असे झाले तर " टंप्या माझ्या कानात सांगायला लागला " त्याच्य डोळ्यांपुढे तो न पाहिलेला पट्टीवाला वाघ शालाप्रमुख सरांच्या कार्यालयात अंगठे धरून वाकून उभा आहे. आणि अधूनमधून शालाप्रमुख सर त्याच्या कडे काम करताना चष्म्याच्या वरून रागाने पहाताहेत. थोड्या वेळाने ते त्या वाघाला उद्या पालकांना घेवून ये. असे सांगताहेत. दुसर्‍या दिवशी वाघ त्याच्या बाबांना घेवून आला आहे. वाघाचे बाबा शालाप्रमुख सरांच्या खोलीत त्यांच्यासमोर खुर्चीत बसले आहेत. आणि शालाप्रमुख सर त्याना काहीतरी सांगताहेत. असे चित्र आले.
" नुसती कल्पना कर" असे म्हणून टंप्या पोटावर हात ठेवून हसायला लागला.
"ए काय रे काय झाले हसायला"मी आणि टम्प्या काहीतरी बोलतोय आणि दोघेच हसतोय हे पाहून एल्प्या समोरच्या बाजूला होता तो आमच्या बाजूला आला. तसे येताना दोनतीन पोरांच्या पायावर पाय दिला. हाय हुई करत ती पोरे बाजूला झाली.
एल्प्याला तसा येताना पाहून काहितरी गम्मत पहायला मिळणार म्हणून अजून एक तीन चार पोरेही त्याच्या मागोमाग आली.
त्या घोषणा, घोळका, हाय हुई चे आवाज ,एल्प्याचे गर्दीला बाजूला करत आमच्या कडे येणे हे पाहून इथे मारामारी चालली आहे असेच वाटले असते एखाद्याला.
" फुर्र...……" सरांनी पुन्हा एकदा शिट्टी फुंकली. " आज शाळेला सुट्टी आहे. सगळॅ जण घरी परत निघा."
" पण सर आम्हाला वाघ पहायचाय" असल्या बाबतीत पोरांची उत्सुकता कायम असते.
" तो पकडल्यावर दाखवू….. तुम्ही आधी इथून जा . वन विभागाच्या लोकाना काम करू द्या " भोसेकर सर.
भोसेकर सरांच्या बोलण्यावर पोरांचा विश्वास बसला. सावजीच्या दुकानासमोरच्या चौकातली गर्दी झटक्यात हटली.
मुले घरी गेली खरी पण तासा दोन तासाच " दगडी शाळेत वाघाची मादी तीच्या तीन पिल्लांसह आली आहे" ही बातमी ज्यांना माहीत नव्हती त्यांनाही समजली.
टम्प्याला घरी जायचे नव्हते. एल्प्याला पण . वाघ आला म्हणून शाळेला अचानक सुट्टी मिळाली हे कारण कितीही सांगितले तरी घरात कोणालाच पटले नसते.
घरी कारण काय सांगायचे हा प्रश्न होता. खरे सांगितलेले खोटे वाटले असते खोटे सांगायचे तर पुढे कधीतरी शाळेत वाघ आला होता तेंव्हा तुम्ही कुठे होता याचे स्पष्टीकरण देत बसावे लागले असते.
"दुनीया खर्‍याची राहिली नाही बघ" एल्प्या च्या समोर घरी पटेल असे खोटे काय सांगावे हा गहन प्रश्न होता .
" आपण सगळे आमच्या कडे जाऊ या " सगळे सोबत असले की बोलणी कमी खावी लागतात हा टंप्याचा नेहमीचा अनुभव .
"नकोतुमच्याकडे नको . तुझी ताईच म्हणते ना की एल्प्याची संगत सोड म्हणून...… " एल्प्याचेही बरोबर होते. नापास मुलांची संगत वाईट . त्यामुळे आपण नापास होतो. हे तीचे म्हणणे. पण एखादा मुलगा नापास होणार आहे हे कधी माहीत असते का कुणाला. तसे माहीत असते तर एल्प्या आणि टंप्या दोघानीही एकमेकांची संगत धरली नसती.
"ताई म्हणते की आपण हुशार मुलांची संगत धरावी म्हणजे पास होतो. पण हुशार मुलांच्या घरातल्यांनीही त्यांना असेच सांगीतले असेल तर मग नापास मुलांची संगत कोण करणार. ती कायमच नापास होत रहाणार." टम्प्याच्या प्रश्नाला उत्तर नव्हते. मला हे माहीत नव्हते त्यामुळे आमची संगत जमली होती. आता यामुळे मी नापास होणार की ते दोघे पास होणार हे अजून ठरायचे होते.
टंप्या ,एल्प्या आणि मी तिघांची वरात आमच्या वाड्यात आली. आई कुठेतरी महीला मंडळात गेली होती. तीने काही विचारायचा प्रश्न आला नाही.
दुपारपर्यंतचा वेळ शाळेच्या वेळापत्रकानुसार आम्ही इतिहासातल्या पुस्तकातले धडे गोष्ट म्हणून वाचणे, इंग्रजीच्या कवितेचा अर्थ एकमेकांना समजावणे, डबा खाणे वगैरे करत घालवला.
दुपारचे चार वाजले. एल्प्याची गणीताशी लढाई चालली होती. अजून थोड्या वेळाने शाळेत शारीरीक शिक्षणाचा तास सुरु झाला असता. शारीरीक शिक्षणाचे सर रजेवर होते. त्यामुळे ऑफ तास होता. त्या वेळेत काय करायचे हे हे माहीत नव्हते.
" छॅ !सुटत नाहीय्ये. ही केल्या . पुढच्या तासाला सोडवू या का हे." एल्प्या.
" शारीरीक शिक्षणाच्या तासाला कोणी गणीत सोडवते का. आपण वेळापत्रकानुसार अभ्यास करायचा हे ठरले आहे ना" टंप्याला एल्प्याने अभ्यासाच्या तासाला जर खेळ चालत नसतील तर खेळाच्या तासाला अभ्यास कशासा करायचा हे आवडले नाही.
"काय अडले आहे"
"काय अडले आहे बघू. आत्ता सोडवुया पाच मिनीटात." टम्प्या गणीत सोडवायला एल्प्याला मदत करत होता.
" हे बघ २ क्ष + ३ य = ५०
आणि ४ क्ष - ५ य = १००
तर क्ष आणि य ची किम्मत काय ?
हे गणीत चतुष्पदीने सोडवायचे आहे.
तू काय केले आहेस बघू
बराच वेळ एल्प्या आणि टंप्या वहीवर काही तरी करत होते.
आणि उत्तर बघत होते. पण काही जमत नव्हते.सव्वाचार वाजले. टंप्याने जवळच्या स्टीलच्या तांब्यावर पेन आपटून तास संपल्याची घंटा वाजवली.
"गणीताचा तास संपला. आता वह्या मिटा. शारीरीक शिक्षणाचा तास आहे. "
"तो तर ऑफ तास आहे ऑफ तासाला गणीते सोडवली तर. " एल्प्या गणीतात चांगलाच अडकला होता. त्याला ते सोडवायचे होते.
"ऑफ तासाला गणीते करायची नाहीत. " टंप्या नियम दाखवत होता. " ऑफ तासाला फार तर गप्पा मारू शकता"
" वाघ सापडला असेल का हे विचारू शकतो का" एल्प्याने विचारले.
"हो तर विचारू शकता. इतकेच काय पण वाघ शोधूही शकता" एल्प्या जणू शाळेचा पर्यवेक्षक झाला होता. तो त्यांच्याप्रमाणेच बोलत होता.
" पण तो सापडणार नाही" एल्प्या ठामपणे म्हणतो आहे याचा अर्थ त्याला नक्की माहीत आहे काय झालंय ते.
" कशावरून म्हणतोस"
मला असं वाटतय.
पण कशावरून ते उद्या कळेल शाळेत.
त्याना वाघ सापडणारच नाही.
ते का?
"नीट विचार कर . तुलाच कळेल. डिटेक्टीव्ह घंटाकर्ण" एल्प्या ने गेल्या आठवड्यात वाचलेले पुस्तक असणार हे. आणि हे त्या पुस्तकातल्या माणसाचे वाक्य असणार. एखादे पुस्तक वाचले की एल्प्या त्यातली वाक्ये अधूनमधून फेकत असतो.."
"त्यात विचार काय करणार. वाघ शाळेत आला होता... आला होता. त्याचं काय" टंप्या अजून पर्यवेक्षकांची भूमिका सोडायला तयार नव्हता.
" वाघ शाळेत आला होता. हे वाक्य आहे नीट विचार कर"
" वाघ शाळेत आला होता. शाळेकडून वाघाचे येणे झाले होते. बघ चेंज ऑफ व्हॉईस केला की नाही एकदम बरोबर." टंप्याच्या वाक्याचा अर्थ सोनसळे सरच लावू शकले असते.
" एक शाळेकडून नाही. वाघाकडून शाळेत येणे झाले होते. वाघ हा कर्ता आहे आणि शाळा हे कर्म आहे. झाले हे क्रीयापद आहे. सकर्मक कर्तरी प्रयोग." माझ्या या वाक्याला कोणी चूक म्हणाले असते तर दुसर्‍या तासापासून मधल्या सुट्टीपर्यंत वाद घालायची तयारी आहे माझी.
" कर्म माझे….. व्याकरण कसले चालवताय. अरे वाघ शाळेत आला होता. या चा विचार करा." एल्प्या ;आम्ही दोघे कसले येडबंबु आहोत. हे दाखवायचा चान्स सोडणार नाही.
" म्हणजे काय करायचे" अजूनही मला आणि टंप्याला एल्प्या काय म्हणतोय तेच कळाले नाही.
" वरून साध्या दिसणार्‍या वाक्या मागे बरेच अर्थ दडलेले असतात. त्या अर्थांचा शोध घ्यायचा म्हणजे गुन्हेगार सापडतो ' एल्प्या ने ते गेल्या आठवड्यात वाचलेले डिक्टेकटीव घंटाकर्णचे पुस्तक पाठ केले असावे.
' पण वाघाने कसला गुन्हा केलाय."
" अरे विचार करा जरा… वाघ शाळेत कशाला आला असेल , इथे तीन तीन पिलांसोबत इथे येण्यात त्याचा काय उद्देश असेल? आपणअगदी मुळापासून विचार करुया. लोक शाळेत का येतात. तेही मुलांना घेऊन." एल्प्या आता डिक्टेटीव्ह घंटाकर्ण झाला होता. "गुन्हेगाराच्या नजरेतून गुन्ह्याचा विचार करा गुन्हेगाराने सोडलेले सगळे पुरावे आपसूक समोर येतात."
" पण शाळेत येणे हा गुन्हा होतो का. आपण पण येतो की रोज शाळेत. आपल्याकडून रोज शाळेत येणे होते " टम्प्या व्याकरण सोडायला तयार नाही.
" ते नाही. पण विचार कर एखादे पालक त्यांच्या तीन मुलांना शाळेत घेऊन कशासाठी येतील? ' एल्प्या
" मुलाबद्दल तक्रार केली असेल कोणीतरी; म्हणून आले असतील ."
" हं ही शक्यता ज्यांची मुले याच शाळेत शिकतात त्यां पालकांसाठी बरोबर आहे. मुले जर या शाळेत शिकत नसतील तर मग कशासाठी पालक शाळेत येतील "
" सोपे आहे. शाळेत मुलांना प्रवेश घेण्यासाठी" टंप्या काहीही बोलतो. वाघाच्या मुलांनी आमच्या शाळेत प्रवेश घेतलाय आणि वाघाची ती तीनही मुले आमच्या मागच्या बाकावर बसून २क्ष+५ य = ५० हे गणीत सोडवून घाटे सरांना दाखवताहेत. किंवा पर्यवेक्षक सर वाघाच्या मुलांनी केलेल्या खोड्या त्यांच्या कार्यालयात वाघाला समोर बसवून ऐकवताहेत. हे डोळ्यासमोर दिसायला लागले. भनाटच आहे हे.
" ए टम्प्या काय पण बोलू नकोस. वाघ कशाला येईल त्याच्या पिल्लांना शाळेत अ‍ॅडमिशन घ्यायला. " मला हसू आवरण्यापलीकडे जातय.
" हसू नका मी कुठे म्हणतो की वाघ शाळेत आला म्हणून गुन्हेगार आहे. अगोदर हे बघा. गुन्हा कुठे घडलाय? गुन्हेगार कुठे होता हे समजलं की त्याचा उद्देश लक्षात येतो.
वाघ शाळेत होता. अगदी नीट सांगायचे झाले तर वाघ पान्याच्या टाकीजवळ होता. तो तिथे का आला असेल. याचा विचार करुया. आता हे म्हणून नका की पाणी पिण्यासाठी आला होता म्हणून. वाघ नळ सोडून पाणी पिणार नाही. आणि शिवाय त्याला पाणी प्यायचे असते तर तो मागच्या ओढ्यातले पाणी पिऊ शकला असता." एल्प्याचे मुद्दे बीनतोड होते.
" खरेच की. पण मग तो शाळेत कशाला आला असेल?" आता आमची उत्सुकता अधीकच वाढली होती.
" तेच तर कोडे आहे. " न सुटलेल्या गणीताची उत्तरे पुस्तकाच्या मागे पाहुन सोडवता येतात. पण या गणीताचे उत्तर कुठल्याच पुस्तकात लिहीलेले नव्हते.
"तेच म्हणतोय मी.डिक्टेटिव्ह घंटाकर्ण म्हणतो एखादी गोष्ट शोधायची असेल तर त्याच्या मुळाशी जायला हवे. " एल्प्या आता पूर्ण डिक्टेटिव्ह घंटाकर्ण बनला "गुन्हा शोधायचा असेल तर गुन्हेगाराच्या पद्धतीने विचार करायचा. अगदी स्वतः गुन्हेगार असल्यासारखा"
"अरे पण इथे कसला गुन्हा घडलाय" टंप्याला अजूनही एल्प्याचे म्हणणे पटत नव्हते.
" हे बघ आपण वाघ होऊन विचार करायचा." असे म्हणत एल्प्या फरशीवर चक्क रांगू लागला. " डर्राव.... डर्राव......." .
" हे काय ?" टंप्या.
" वाघाची डरकाळी."
" वाघ काय डराव डराव म्हणत डरकाळी फोडत नाही. बेडूक ओरडतात डराव डराव. तू वाघ नाहीत बेडूक वाटशील " म्हणत टंप्याने बेडकासारख्या तीन चार उड्या मारल्या. त्याने एल्प्या पुढे एक सुतळीचा तुकडा टाकला." हे घे शेपटी म्हणून लाव .जरातरी वाघासारखा वाटशील"
एल्प्याचा नाईलाज झाला. नाहीतरी वाघ डराव डराव ओरडला नसता हे नक्की. आणि वाघ चिडल्याशिवाय ओरडत नाही . इथे तर वाघ शाळेत आलेला आहे. मग तो चिडेल कसा. एरव्ही घरात वाघा सारखे ओरडत आपले काहिही ऐकून घेणारे आपले बाबा शाळेत मुख्यध्यापकांसमोर बसले की कसे सगळे शांतपणे ऐकत असतात हे त्याला आठवले. शाळेत ओरडायचे फक्त इनामदार सरांनी.
एल्प्याने सुतळीचे एक टोकचड्डीत मागच्या बाजूने खुपसले आणि दुसरी मोकळे लोंबत ठेवऊन तो पुन्हा इकडे तिकडे रांगू लागला. " आपण वाघासारखा विचार करायचा. "
' काहीही न बोलता असा रांगत फिरलास तर कळणार कसे की तू आता वाघ आहेस म्हणून. अशी शेपटी कुत्र्याची पण असते" टंप्याला काय काय शंका येतील सांगता येत नाही.
" कुत्र्याची शेपटी वाकडी असते. ही आहे वाकडी? आणि आता जरा गप्प बैस. मला विचार करू दे नाहीतर एक टिंबा देईन पाठीत.आता " एल्प्याने टंप्याला दम दिला आणि पेनचे टोपण काढून ओठात धरले."डिक्टेटिव्ह घंटाकर्ण विचार करायला घेतला की चिरूट पेटवतो."
एल्प्या आता अजून काय करणार आहे कळत नाही. मला भिती वाटायला लागली की आता हा तो पेनचे टोपण पेटवणार म्हणून
" मी किल्ल्याच्या बाजूने आलो. मी भुकेलेला आहे. तहानलेला आहे. माझ्या सोबत तीन पिल्ले आहेत. पिल्लांना ट्रीपला जायचंय म्हणून जंगलातून बाहेर पडून इकडे आलोय. मी रस्त्याने येतो. शाळेच्या बाजूच्या ओढ्यात फिरतोय" एल्प्या तो सुतळीचा तुकडा शेपटी म्हणून चड्डीत खुपसून खोलीभर रांगत फिरतोय. अधून मधून मानेच्या आणि तोंडाच्या काही मजेदार हालचाली करतोय. मी आणि टम्प्या हसू दाबायचा प्रयत्न करतोय. एल्प्याचे आमच्याकडे लक्ष्यच नाहिये तो आपल्याच विचारात फिरतोय. अर्थात तेही बरेच आहे नाहीतर त्याने आम्हाला हसू दाबताना पाहून पाठीत दोन दोन टिम्बे ठेवून दिले असते.
" मी ओढ्यात आलो. ओढ्याला पाणी आहे. पाण्यात थोडे मासे आहेत. बदके आहेत. पिल्लांना पाहून बदके पळाली. माशांना पळणे शक्य नाही. पिल्लांनी काही मासे पकडले खाल्ले. मी पाणी प्यालो. एक दोन मासे मीही पकडले. खाल्ली. आमची सर्वांची भूक भागली. तहान भागली." एल्प्या स्वतःशीच बोलतोय. तो आता पूर्ण वाघ बनलाय. " मग मी पाण्याच्या टाकीजवल कशाला गेलो असेन. मला किंवा पिल्लांना नळ सोडून पाणी पिता येणार नाही. शिवाय पाण्याच्या टाकीपर्यंत जायचे तर ओढ्याची भिंत ओलांडून जावे लागेल. पिल्लांना ते शक्य नाही." एल्प्याचा खूप वेगाने विचार करतोय. दातात धरलेले पेनाचे टोपण त्याने पार चावून टाकलेय.
" मग मी शाळेत पाण्याच्या टाकीजवळ कशाला येईन. मला पाणी प्यायचे नहिय्ये. काही खायचे नाहिय्ये. पाण्याच्या टाकीजवळ मला काही खाण्यासारखेही काही नसते. …. मग मी पाण्याच्या टाकीजवळ आलोच कशाला..." विचार करताना एल्प्या रांगतो पण वेगाने. हा रांगताना सरळ जाऊन भिंतीला धडकला तर तो आम्हाला टिंबा ठेवून द्यायचा भिंत का मधे उभी केली म्हणून.
" की मग मी शाळेत आलोच नाही.......... कुणीतरी वाघासारखे काहीतरी पाहिले आणि तो त्याला वाघ समजला " हो बरोबर." एल्प्याने ते वाघाचे कोडे बहुतेक पूर्ण सोडवले होते. तो ते कोण आर्किमीडीज का न्यूटन सारखे अरेच्चा की युरेक्का असे काही ओरडायचाच बाकी आहे.
" वाघ शाळेत आलाच नाही." एल्प्याच्या चेहेर्‍यावर कोडे सुटल्याचा आनंद पाण्याच्या टाकीचा नळ सुटला सारखा वहात होता."
" वाघ शाळेत आलाच नाही? पण मग तो त्या तीन पायाची मांजरवाल्या सुमनताईच्या कोणालातरी दिसला कसा " टंप्याने प्रश्न घाबरत घाबरतच विचारला.
" वाघ पहाणारे कोण होते माहित आहे? ते दुसरे तिसरे कोणी नसून आपण तिघे होतो." एल्प्याच्या या बोलण्यावर टम्प्याने तो विचारणार असलेला पुढचा प्रश्न औषधाची गोळी गिळावी तसा गिळला. काय पण शोध लावलाय एल्प्याने. वाघ पहाणारे आपण तिघे होतो म्हणून.
"कशावरून सांगतोस. इतक्या ठामपणे." माझा आणि टंप्याचा प्रश्न एकाच वेळेस आला.
" हे बघा. वाघ शाळेत आला असता तर त्याला येताना रस्त्यावर ओढ्यात फिरताना आणखीही कुठे फिरताना कोणीना कोणी पाहीले असते. ते तसे पाहिलेले कोणी नाही. शिवाय मुख्य म्हणजे वाघाला पिल्लांना घेवून शाळेत यायला जमणारच नाही. त्यासाठी त्याला ओढ्याची भिंत चढून यावे लागेल. त्याला एकट्याला शक्य आहे. त्याच्या पिल्लांना शक्य नाही. शिवाय वाघाच्या पिल्लांना ओढ्यात प्यायला पाणी उपलब्ध आहे. त्यासाठी शाळेत पाण्याच्या टाकीजावळ यायची गरज नाही." एल्प्या सांगतोय ते बरोबर आहे ह्या अर्थाने टम्प्याने आणि मी दोघांनीही माना डोलावल्या.
" पण मग तो वाघ आपण पाहिलाय हे कशावरून म्हणतोस." जो वाघ शाळेत आलाच नाही तो आपण कसा काय पाहिलाय हे टंप्यालाच काय पण मलाही पटत नव्हते.
" हे बघ परवा नाहीका आपण पाण्याच्या टाकीजवळ उभे राहून बोलत होतो की पाण्याच्या टाकीच्या आठ नळांना तोंड लावून मुले पाणी पिताना बनी मांजरीची पिल्ले दूध पिताना दिसतात तसे दिसते म्हणून.
"हो त्यावर हा टंप्या म्हणाला सुद्धा होता की ही टाकी मोठी मांजर वाटायला लागलीये म्हणून."
" आणि त्यावर कोणतरी म्हणाले की मांजर कशाला वाघीण वाटतेय म्हण म्हणून."
"बरोबर" एल्प्याचा तर्क पटतोय. बघुया पुढे काय म्हणतोय ते. म्हणत टम्प्या आणि मी, दोघेही सहमत झालो.
" ही गोष्ट गम्मत म्हणून मी घरी जाताना शेजारच्या विसूला सांगितली. त्यावेळेस जाताना बरोबर धन्या, तो सातवी क मधला चंदू आणि आणखी दोघेतीघे होते. खूप हसलो सगळे. त्यांच्या पैकी कोणीतरी म्हणालाही काय धमाल आहे. मी हे घरी सांगणार म्हणून" एल्प्या; बरोबर बोलतोय.
" त्या कोणीतरी ती ती गम्मत आणखी कोणालातरी सांगीतली असेल त्या कोणीतरीने आणखी कोणालातरी असे करत हे गावभर झाले.आणि शाळेत मुख्याध्यपकांपर्यंत आले . म्हणजे आहे की नाही तो नसलेला वाघ आणि आणि त्याची नसलेली पिल्ले आपण पाहिली होती" एल्प्याने गणीत सोडवले नाही पण वाघाचे कोडे सोडवले होते. हे अस्सेच असू दे पण ते वाघ पहाणारे आपण होतो हे आपल्यातच ठेवायचे कोण्णाला सांगायचे नाही.म्हणत एल्प्या आणि टम्प्या त्यांची दप्तरे घेवून घरी गेले.
संध्याकाळी आईआली . शाळा आज झालीच नव्हती त्यामुळे गृहपाठ नव्हता. इतर राहीलेला अभ्यास झालेलाच होता. त्यामुळे तो प्रश्न नव्हता. जेवण करताना हे आईला सांगायचे खूप वाटत होते पण त्यातून आणखी वेगळेच व्हायचे. मुख्याध्यपकांपर्यत कळायचे म्हणून गप्प बसलो. शिवाय हे आपल्यातच ठेवायचे म्हणून आमचे ठरले होते.
वाघाचे कोडे सुटले होते पण उद्या शाळेत काय याच विचारात झोपी गेलो.
सकाळी शाळेत जाताना तो योग्याचा घोळका दिसला. त्यांच्या त्या कालच्या वाघाच्या गप्पा चालू होत्या.
शाळेच्या जवळ सावजीच्या दुकानासमोर कोणीही थांबलेले नव्हते म्हणजे शाळा सुरू होती. शाळेच्या मुख्य गेटमधून आत जाताना सर्वांना दिसेल असा मोठा फलक लिहीलेला होता.
" वनखात्याला शाळेत वाघ आल्याच्या कोणत्याही खुणा , वाघाच्या पायांचे ठसे वगैरे आढळले नाहीत. वनखात्याने शाळेतच काय पण आसपासच्या तसेच ओढ्याच्या परीसरात कुठेही वाघ आला नव्हता याची खात्री दिली आहे. शाळेत वाघ आला होता ही अफवा आहे या अफवे वर कोणीही विश्वास ठेवू नये. अफवेला कोणीही घाबरू नये. अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. शाळा नेहमीच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार सुरू राहील. "
बोर्ड वाचत असताना एल्प्या आणि टम्प्या कधी माझ्या बाजूला येवून उभे राहीले हे समजलेच नाही. एल्प्याने आम्हा दोघांच्या खांद्यावर हात टाकले. डिटेक्टीव्ह घंटाकर्ण बरोबर होता. आम्ही तीघांनीही एकमेकांकडे पाहिले हसलो. हाताची घडी घातली तोंडावर बोट ठेवले. आळी मीळी गुप चिळी करत वर्गाकडे चालू लागलो.

क्रमश :

कथाविरंगुळा