आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग १

अहम्_लिखामि's picture
अहम्_लिखामि in जनातलं, मनातलं
12 Dec 2019 - 1:14 pm

तितली रानी तितली रानी
मुझको दे दो अपने पर
पर लगाके उड जाऊंगी
अपनी नानी के घर

मुलगी हे म्हणायला लागली आणि मला आईच्या घराच्या ऐवजी माझ्या नानीचं घर आठवायला लागलं.
लहानपणीच्या खूप आठवणी या औरंगाबाद मधल्या घरा भोवती आहेत हे जाणवल.

माझ्या आजीचं नाव विमल आणि आजोंबांचं नाव वासुदेव म्हणून घराचं नाव गोकुळ असा ठेवलेलं आणि नाव पुरक असायला पाहिजे म्हणून कि काय पण वासुदेवांना ८ नातवंड. (या हिशोबानी माझ्या दुसया आजोंबांच्या घराचं नाव हस्तिनापूर असायला पाहिजे होतं कारण तिकडे आम्ही ५ जण. असो.)

तर गोकुळ हे त्या वेळेस च्या पद्धती प्रमाणे मोठ्या जागेवर बांधलेलं ऎसपैस घर. समोर आंगण, अंगणात हौद, गेट वर नेहमी काढलेली रांगोळी आणि विमल नि लावलेली असंख्य झाडे. आम्ही अगदी लहान होतो तेंव्हा आजी कडे गुलाब, जुई, मोगरा, गच्ची पर्यंत असलेली मधुमालती आणि सदैव अंगणात सडा टाकणारी तगरीची फुले नेहमी फुललेली असायची. गुलाबी गावरान गुलाब फुलला कि मला आनंद हा कि आता आजीच्या हाताचे गुलकंद मिळणार. या सगळ्या फुलांचा वास असेल किंवा आता फक्त आठवणीत असेल पण आजीचं घर नेहमी सुगंधित असायचं. आजी रोज आई आणि मामी करता गजरा बनवत असे आणि घर जवळ असल्या मुळे आजोबांसोबत रोज तो घरी येत. मोगऱ्याच्या फुलांचा वास अजूनही आठवते ती लहानपणीची आईची. औरंगाबाद मध्ये असलेल्या नातवंडानमध्ये मीच मुलगी असल्या मुळे, आजी करता फुल वेचून आणायची ड्युटी माझी असायची. आजीच्या जाडजुड पितळेच्या परडीत गजऱ्या करता फुल, देवा करता फुल असे वेचून आणणे म्हणजे माझ्या करता ३ भावांच्या दांडगट पण पासून सुटका असायची.

या समोरच्या अंगणातून वाट काढून मागे गेलो कि फळांची झाडं होती. पेरू आणी सीताफळ तर नक्की आठवतात कारण असंख्य वेळा कच्चे पेरू तोडून आणि आजीचा ओरडा खाऊन झालेला होता. इथे पण एक हौद होता जो घरच्या वापरायच्या पाण्याचा source होता त्या मुळे हा हौद किती भरलेला आहे यावर घरात नेहमी चर्चा असायची. कारण कधीच कळलं नाही पण आजोबांनी इथे एक संडास बांधला होता. लपाछुपी खेळताना सगळी मोठी भावंडं धाकट्यांना याच संडासात कोंबून स्वतः कुठे तरी चांगल्या ठिकाणी लपायला जायचे हे नक्की होते. इथे लपल्या मुळे असेल पण लपाछुपीचा खेळ मला कधीच आवडला नाही. त्यातल्या त्यात राज्य असेल तर चांगल, पण लपायचं असेल, तर सारखी मनात भीती असायची कि आपण लपूनच राहिलो आणि कोणी आपल्याला शोधालच नाही तर? (फार पाप भीरु असल्या मुळे स्वतः बाहेर येऊन जाता येत असा विचारही मनात आला नाही.)

घरात आत आलो कि पहिले एक छोटी खोली होती. ह्या खोलीनी धाकट्या सक्ख्या भावाच्या झोळी पासून (जिच्यात आम्ही मोठे तिघच जास्त बसत असू ), आता धाकट्या मामे भावाच्या ऑफिस पर्यंत दिवस पहिले.डाव्या बाजूला सीटिंग हॉल आणि तिथेच आजोबांचा दिवाण. त्या दिवाणावर आजोबा आणि दिवाणाखाली सोनू कुत्रा हे चित्र मी कधीच विसरू शकत नाही. ह्या सोनूला आजोबांनी हॉल पर्यंत यायची मुभा दिली होती पण दिवाणावर नाही. त्याकरता एक मोठी काठी नेहमी दिवाणावर असायची. आजोबांच्या आणी सोनूच्या भीतीमुळे आमच्याकरता हा दिवाण no-go zone होता. या हॉल मध्ये आजोबा नेहमी एक कमी voltage दिवा लावायचे ( इथे पूर्ण प्रकाश आजोबा गेल्या नंतरच दिसला) आणि याच प्रकाशात मोठा भाऊ सगळ्यांना "ZEE Horror show" बघायला लावायचा. धाकटा मामे भाऊ आजीच्या मागे बसून आणि उरलेले आम्ही तिघं चादरीच्या मागे बसून हा शो बघत असू . स्वतः ची घाबरगुंडी उडवून घ्यायला त्याला का आवडत असेल हे अजूनही मला कळलेले नाही. त्यात आजोबांनी पाणी मागितले तर उठून भूत खेतांनां लढून, रक्त रणजित टाईल्स वरून जाऊन रक्तचाच नळ उघडून ते आणावा लागणार या भीतीने फाटलेली असायची (काय ते विचारू नये). त्या चादरीच्या मागे बसून आई कधी येते हा एकमेव विचार मनात असायचा. आजोबांच्या खोलीतून आत गेल कि मामा मामी ची खोली. ह्या खोलीचा Dark रूम (अंधारातली लपाछुपी) खेळण्याकरता भरपूर उपयोग व्हायचा कारण याला डायरेक्ट सूर्यप्रकाश मिळत नसे. मग आत मध्ये स्वयंपाकघर. हे स्वयंपाकघराची मांडणी मला आठवते तेंव्हा पासून तशीच आहे. ते मोठाले पितळेचे डबे, नीट रचून ठेवलेले छोटे पेले, मोठ्या भावाची कुरूप लोटी, देवघर, dining table .. सगळे पहिले कि एका comfort zone मधे जाते मी. पहिले मामी नि आणि आता भावजयीनी हे जसच्यातस ठेवल आहे मी म्हणून त्यांना धन्यवाद म्हणते.

याच स्वयंपाक घरात टेबलच्या खाली एक चोर खोली होती. तिचं काम जर गोष्टी चोरांपासून लपवून ठेवणं होत तर तिला चोर खोली का म्हणत हा मला कधीही न उलगडलेला प्रश्न. असो. या खोलीत नक्की साप आणि विंचू असणार या मताची मी असल्यामुळे,टेबल वर बसतांना नेहमी पाय वर घेऊन बसायची सवय मी स्वतःला लावून घेतली होती.

तर या स्वयंपाक घरात आम्ही खाली बसून आणि आजोबा टेबल वर बसून जेवायचे. (आजी कधी जेवायची हे कधीच पाहिल नाही). आमच्याकडून ताटात उरणे (टाकणे), जेवतांना बोलणे, नाक मुरडणे या अगणित गुन्ह्या पैकी कोणता तरी गुन्हा व्हायचाच, मग त्या वेळेस च्या पद्धती प्रमाणे table वरून ओरडा मिळायचा. आजोबा हातात काठी घेऊन बसत नव्हते हेच मुळी कौतुक. या स्वयंपाक घरातील असंख्य चवींपैकी तोंडात अजूनही जाणवते ती आजीनी केलेली गरमगरम पुरण पोळीची. आजीसारखी पुरणपोळी आईला आणि मावशीलाही जमत नाही (शिव्या पडणार आता).

क्रमश:

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

महामाया's picture

12 Dec 2019 - 6:22 pm | महामाया

आजीनी केलेली गरमगरम पुरण पोळीची. आजीसारखी पुरणपोळी आईला आणि मावशीलाही जमत नाही (शिव्या पडणार आता)....

सही...

आठवणी आवडल्या...

अहम्_लिखामि's picture

13 Dec 2019 - 3:15 pm | अहम्_लिखामि

धन्यवाद