झोपा ग्राहक झोपा...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मी महिला मंडळाच्या एका पिकनिकला गेले होते. रस्त्यात मी एक दुकान पाहिलं. त्यात अनेक वस्तू होत्या. वेगवेगळी मशिन्स होती. अननसाची सालं काढायचं मशीन, त्याच मशीनमधे त्याच्या गोल चकत्या सुद्धा होत होत्या.
बटाट्याच्या चकत्या करायचं मशीन होतं. सुईत दोरा ओवायचं मशीन, पुढच्या १०० वर्षांचं कँलेंडर, सफरचंदाच्या कमळासारख्या पाकळ्या करायचं मशीन. काही विचारु नका.
मला इतकी भुरळ पडली की मी हरखून गेले. तो विक्रेता प्रात्यक्षिक करुन दाखवत होता. पिकलेल्या टोमॅटोचे बाहेर रस न सांडता पातळ काप करुन दाखवत होता. त्याचं ते करणं म्हणजे मला अशक्यप्राय चमत्कार वाटत होता. मी ताबडतोब त्यातली बरीच मशिन्स घेतली. अननसाची साल काढणं किती कठीण! विक्रेता माझ्या स्थूल देहयष्टीकडे पाहून म्हणाला ,"मावशी, अननस खाल्ल्यानं बारीक व्हायला होतं. रोज ग्लासभर ज्यूस प्या. महिन्यात पाच किलो वजन कमी होईल."
वजन उतरविण्यासाठी मी इतकी जीवावर उदार झालीय की ,कुणी काहीही उपाय सांगो तो मी करुन बघते. मी ताबडतोब ते मशीन घेतलं, पण सोबत बटाट्याचे वेफर्स करायचं मशीनही घेतलं.
हल्ली मला सुईत दोरा ओवताना जळलं मेलं दिसत नसल्यामुळं सुईत दोरा ओवायचं मशीनही घेतलं. १०० वर्षांच्या तारखा दाखवणारं कँलेंडर माझ्या काय उपयोगाचं आहे? मी जगणार आहे का तितकी वर्षं? शिवाय तेच ते कँलेंडर भिंतीवर बघून कंटाळा नाही का येणार? पण मी तेही घेतलं. म्हटलं, होईल मुलाबाळांना! झालेलं एकूण बिल बघून मी हात आवरता घेतला. शिवाय पिकनिकहून हे सामान घरी वाहून न्यायचं होतं.
थोड्या डेकोरेटिव्ह मेणबत्या घेतल्या आणि हो.. वाटेत एक अननस घेतला.
यथावकाश मी घरी आले. घरातल्यांना त्या वस्तूंचं प्रात्यक्षिक दाखवायला मी इतकी आतुर झाले होते की बस्! सर्व यंत्रसामग्री एकाच वेळी प्रदर्शित करावी असा बेत ठरवलं.
जणू करमणुकीचे प्रयोग. मग रात्रीची जेवणं झाल्यावर घरच्यांना मी म्हटलं,"मी तुम्हांला एक जादू दाखविणार आहे."
त्या सगळ्यांना मी डायनिंग टेबलभोवती गोळा केलं. खुर्च्यांवर बसवलं. डायनिंग टेबल पूर्णतः रिकामं केलं. माझ्याजवळ असलेला मोठ्या गोल गोळ्यागोळ्यांचा गाऊन घातला. केसांचा पोनी बांधून त्यावर शेफ घालतात तशी टोपी घातली. घरातले सगळे दिवे बंद केले. घरच्यांना काय विचित्र वागतेय कळेना.
मग कळलं, मेणबत्ती..
विकत आणलेल्यातली एक गोललठ्ठ मेणबत्ती पेटवून टेबलावर ठेवली. तिचा एक गूढरम्य प्रकाश टेबलावर पसरला. मी सगळ्यांना म्हटलं,"आता जादूचा प्रयोग सुरु होत आहे. आज मी एका अद्भूत मशीनची खरेदी केली आहे. आपल्याला अननसाची सालं काढून काप करायला किती अवघड पडतं! हे बघा हे मशीन. ह्यात एक गोल चक्र आहे. शिवाय एक पोकळ गोल आहे. त्यात अननस ठेवून हे हँडल फिरवलं,की आपोआप अननसाची सालं निघतात.
सून म्हणाली, "अहो आई,अननस विकणाराच त्याच्याकडच्या धारदार चाकूने सालं काढून चकत्या करुन देतो. त्यासाठी मशीन कशाला?"
ती सून असल्याने तिच्या ह्या वक्तव्याचा ताबडतोब समाचार घेणं गरजेचं होतं. मी म्हटलं,"मी रोज अननसाचा ज्यूस पिणार आहे. जरा स्लीम होण्यासाठी. रोज फळवाल्याकडं जाऊ? शिवाय स्वावलंबन हवंच."
ती मला काही उत्तर देणार तेवढ्यात मुलगा म्हणाला, "आई, सालं तर काढून दाखव! मला जाम इंटरेस्ट आहे बघण्यात.
"मी उत्साहाने मशीनकडे वळले. पोकळ गोलात अननस ठेवला आणि हँडल फिरवून ते गोल चक्र फिरवायला लागले.
खूप जोर लावला पण चक्र काही फिरेना. हात दुखायला लागला. दात ओठ चावून, फडक्याने दांडा पकडून पुन्हा जोरात फिरवला. पण छे!चक्र काही फिरेना. प्रदर्शनातला तो विक्रेता कसं सरसर हँडल फिरवत होता ते कळेना. मग मी मुलाला म्हटलं,"एवढा जिमला जाऊन वेटस् करतोस ना?हा दांडा फिरव." मुलगा नाईलाजाने उठला. मशीनजवळ आला.
खच्चून जोर लावून त्यानं हँडल फिरवलं. त्याचे हाताचे स्नायू तट्ट फुगले. आणि काय ! चक्क हँडलचा दांडा खाडकन तुटला. त्याच्या हातात आला. मला रडू कोसळायचं बाकी राहिलं होतं.
माझा जादूचा प्रयोग संपल्याचं माझ्या लक्षात आले. उसन्या अवसानानं मी म्हटलं,"हरकत नाही,आता आपण बटाट्याचे वेफर्स करु. म्हणजे मी बारीक काप करते आणि तू तळ." सूनबाई गप्प बसली.
एका टोकावर मी सोललेला बटाटा खोचला. त्याला जोडलेलं पातं मी गोलगोल फिरवलं. पातळ काप होऊ लागले. हे करताना मी यशस्वी मुद्रेनं सुनेकडे बघत असतानाच माझं बटाट्याकडे दुर्लक्ष झालं. 'नजर हटी दुर्घटना घटी'. माझ्या बोटात पातं घुसलं. बोट चांगलंच कापलं. रक्ताची धार लागली.
आता मात्र माझ्या डोळ्यांत आसवं जमा झाली. मुलानं,सुनेनं प्रथमोपचार केले. आणि त्या निमित्ताने दिवे लावून मेणबत्ती फुंकली.
मी रात्रभर निराशेमुळे जागीच होते. राहता राहिलं सुईत दोरा ओवायचं मशीन! सकाळी जखमी बोटांत सुई धरुन तिच्या नेढ्यात मशीनच्या पुढची गोलाकार तार घालायचा प्रयत्न केला.
तर नेढं लहान आणि तार जाड. ती काही आत जाईना. मग मोठ्या नेढ्याची सुई घेतली. त्यात तारेचं वेटोळं गेलं. आणि त्या वेटोळ्यात मला दोराही ओवता आला. पण सांगायची गोष्ट म्हणजे सुईचं नेढं इतकं मोठं होतं की त्यात मी साध्या डोळ्यांनीही दोरा ओवू शकत होते.
पण अशा प्रकारच्या वस्तू विकत घेण्याची ही माझी पहिली वेळ नव्हती. सध्या ह्या आणि पूर्वीच्या अशा अनेक वस्तू एका कपाटात पडल्यात. माझ्याकडे घेतलेल्या सामानाची साधी पावतीही नाही.. आणि मी दुकानदाराला शोधतेय जो दुसऱ्या गावाला आहे. ह्याला म्हणतात अंधारात काळं मांजर शोधणं!
प्रतिक्रिया
मस्त. मस्त. मस्त.
खी खी खी.. अगदी अगदी..
लसणाची साल
गोष्ट तशी सगळ्यांबरोबर एकदा
ह्म्म्म्म
संपादित
:):);)
lol
छान छान!! अजून लिहीत राहा!!
खुसखशीत लिहिले आहे, मजा आली
==)) ==)) ==))
पोळी ( जाड रोडगे)करणारं
भारीच!!