धो धो धो की भं भं भं (भाग २)

राजे १०७'s picture
राजे १०७ in जनातलं, मनातलं
1 Oct 2019 - 4:27 pm

राजपुत्र आणि प्रधानपुत्र तळ्यातील पायऱ्या उतरून खाली गेले. सावधपणे सोनेरी महालात प्रवेश केला. महाल अतिशय सुंदर होता. पुढे पुढे जात एका दालनात ती सौंदर्यवती त्यांना दिसली. त्यांना पाहून ती घाबरून म्हणाली तुम्ही दोघे इथे कशाला आला? तो येईल आणि तुम्हाला मारुन टाकील. लवकर लवकर येथून जा. राजपुत्र म्हणाला तो कोण? ती म्हणाली तो म्हणजे राक्षस. दिवसा राक्षस आणि रात्री नाग बनून बाहेर जातो. राजपुत्रानं तिला सांगितले की काळजीचे कारण नाही, माझ्या या शूर मित्रानं त्याला खलास केले आहे. हे ऐकून ती तरूणी आश्वस्त झाली.
मग तीने तिला राक्षसाने पळवून आणले असं सांगितलं. ती सुद्धा एक राजकन्या होती. राक्षस तिच्याशी चांगला वागत होता. पण जर ती पळून गेली तर तिच्या माता पिता, भावाला मारुन टाकीन अशी धमकी दिली होती. महालात सगळीकडे सोने चांदी, जवाहिरे भरपूर होते. खाण्या पिण्याच्या सामानाची काही कमी नव्हती. राजपुत्राने राजकन्येला मनातील भावना सांगितल्या. राजकन्येला देखील राजपुत्र आवडला होता. तीनं लग्नाला संमती दिली.
प्रधानपुत्र परत जाऊन घोडे आणि सैन्य , पालखी घेऊन येतो म्हणाला. राजपुत्र असेच जाऊ म्हणत होता पण प्रधानपुत्र राजकन्येला पायी नेण्यास तयार नव्हता. तो म्हणाला मी जातो आणि लगेच येतो. राजपुत्र म्हणाला फक्त घोडेच आण. नगरातील लोकांना राणीच्या स्वागताची तयारी करायला सांग.
प्रधानपुत्र परत गेला. इकडे राजपुत्र आणि राजकन्या रोज तळ्याकाठी बसून गप्पा मारत. जंगलात एक म्हातारी रहात होती.‌ तिने या दोघांना पाहिले. व विचारपूस केली. भोळ्या राजकन्येने तिला सगळं खरं सांगितलं. म्हातारीची हकिकत विचारली असता म्हातारीचा एक मुलगा आहे. आणि तो वेडा आहे. जोरजोराने धो धो धो की भं भं भं असं ओरडत कुठेही फिरत असतो. राजपुत्र आणि राजकन्या तळ्यात गेली. राजकन्या शेजारच्या राजाची राजकन्या होती.
म्हातारी राजकन्येच्या राज्यात गेली आणि राजवाड्यात जाऊन मला राजाला भेटायचं आहे असे पहारेकऱ्यांना बोलली. मला राजकन्या कोठे आहे हे माहीत आहे हे राजाला सांगा. राजा, राणी हे ऐकून धावतच बाहेर आले. म्हातारीने राजाला सांगितले की मी राजकन्या आणून देते पण तू तिचं लग्न माझ्या मुलाबरोबर लावून दे. राजा नाईलाजाने हो म्हणाला.
म्हातारी सैनिकांना घेऊन जंगलात तळ्याकाठी आली. राजकन्या आणि राजकुमार यांना सैनिकांनी बरोबर नेले. म्हातारीने लाल हळूच राजकन्येकडून ताब्यात घेतला. व सगळे नगरात गेले. राजपुत्राने सगळी हकीकत राजाला सांगितली. पण म्हातारीला शब्द दिला म्हणताना तो गप्प राहिला. इकडं प्रधानपुत्र घोडे घेऊन परत आला. पण वाट पाहून राजपुत्र आणि राजकन्या तळ्याबाहेर आले नाहीत. शेवटी तिथं घोड्यांच्या टापा व माणसांची पावलांनी झालेली वाट त्याला दिसली. तो त्या वाटेने पुढे गेल्यावर नगरात पोहोचला. तिकडे त्याला सगळी माहिती कळली. राजवाड्यावर जाऊन राजपुत्राला भेटला. दोघे बाहेर पडले. म्हातारीच्या मुलाची गोष्ट राजपुत्राने प्रधानपुत्राला सांगितली व त्याचा शोध चालू आहे हेही सांगितले. त्यांनी म्हातारी कुठे राहते हे पाहून घेतले. दुसऱ्या दिवशी प्रधानपुत्रानं वेशांतर केले व वेड्याचं रुप घेतले . मोठ मोठ्यानं धो धो धो की भं भं भं ओरडत म्हातारीच्या झोपडीकडे गेला. म्हातारी आनंदाने उड्या मारायला लागली. माझा लेक आला, माझा लेक आला. खूप वर्ष तिनं मुलाला पाहिलं नव्हतं म्हणून ती प्रधानपुत्राला फसली. प्रधानपुत्राला तिनं तो लाल दाखवला व आता तुझं लग्न राजकन्येशी होणार आहे हे सांगितले. प्रधानपुत्र म्हणाला, धोधोधोकीभंभंभं आई मला लग्न करायचं नाही, मला दररोज लाडूचं जेवण आणि नवे कपडे, एक महाल राजाकडून मागून घे. धोधोधोकीभंभंभं.
म्हातारीनं विचार केला ठिक आहे लग्न केले आणि परत हा निघून गेला तर? त्यापेक्षा तो इथंच डोळ्यासमोर राहील. म्हातारी राजाकडे गेली. व राजाला म्हणाली मी तुला शब्दातून मोकळं करते पण मला एक मोठा महाल बांधून दे आणि खर्चासाठी महिन्याला हजार सुवर्ण मुद्रा दे. राजा तयार झाला. इकडं प्रधानपुत्र लाल घेऊन जंगलात गेला व वेड्याचं रुप टाकून प्रधानपुत्र बनून राजपुत्राला भेटला. दोघं घोड्यावर स्वार होऊन राजवाड्यात आले. राजा आता राजकन्येचं लग्न राजपुत्राशी लावून द्यायला तयार होता.
पण राजपुत्र म्हणाला लग्न माझ्या राज्यात होईल. राजा म्हणाला ठिक आहे. प्रधानपुत्र, राजपुत्र आणि राजकन्या यांच्याबरोबर काही सैन्य देऊन त्यांची पाठवणी केली.
परतत असताना जंगलात रात्र झाली म्हणून तिकडे मुक्काम केला. राजपुत्र आणि राजकन्या झोपी गेले. सैन्य लांबून संरक्षणाला गोलाकार करून थांबले. प्रधानपुत्र जागा राहून पहारा देत होता. मध्यरात्र झाली.
भयानक शांतता पसरली होती. राजपुत्र आणि राजकन्या ज्या झाडाखाली झोपले होते त्या झाडावर राघुमैना मनुष्य वाणीत एकमेकांशी बोलू लागले. प्रधानपुत्र अत्यंत सावधपणे त्यांचं बोलणं ऐकू लागला.
राघू - काही उपयोग नाही. हे दोघे सुखी होणार नाहीत. मैना- का? काय होणार आहे?
राघू- हे दोघे वेशीत पोहोचले की वेस ढासळून राजपुत्र मरेल.
मैना- यावर उपाय काय मग?
राघू- जर अगोदरच कुणी ती वेस पाडली तर राजपुत्र वाचेल पण..
मैना- पण काय?
राघू- पण यांचं लग्न लागलं की, राजकन्या जो घास राजपुत्राला भरवेल त्यात विष असेल. ते खाऊन राजपुत्र मरेल.
मैना- यावर उपाय काय?
राघू- जर कोणी ते जेवणाचं ताट ऐनवेळी उचलून लांबवर फेकून दिले तर वाचेल. पण
मैना- पण काय?
राघू- लग्नाच्या रात्री राजपुत्र आणि राजकन्या पलंगावर झोपले की एक मोठा काळा साप येऊन राजपुत्राला चावेल.
मैना - यावर उपाय काय आहे?
राघू- जर कुणी पलंगाखाली लपून साप येताच त्याला मारलं तर राजपुत्र वाचेल. मग पुढे सुखाचा संसार करतील.
हे राघू मैनेचं बोलणं ऐकून प्रधानपुत्र म्हणाला, बरं झालं , तुम्हाला धन्यवाद.
राघू प्रधानपुत्राला म्हणाला तू चोरून ऐकलं आमचं बोलणं. तू जर हे राजपुत्राला सांगितले तर शिळा होऊन पडशील.
मैना म्हणाली- असं का बोललास. मित्रासाठी हा काहीही करायला तयार आहे. उपाय सांगा.
राघू- जर हा शिळा झाला तर राजपुत्र आणि राजकन्या दोघांनी आपला अंगठा कापून शिळेवर रक्त वहायचं. मग हा जिवंत होईल.
दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रधानपुत्र घोड्यावर पुढे जातो. राजपुत्र आणि राजकन्या मिरवणुकीने वेशीजवळ यायच्या आधी प्रधानपुत्र वेस ढासळून देतो. हे पाहून सर्व आश्र्चर्यचकित होतात. तर राजपुत्राला प्रधानपुत्राचे वागणं आवडत नाही. पण काही बोलला नाही. पुढे लग्न लागल्यानंतर राजकन्या राजपुत्राला घास भरवणार तोच प्रधानपुत्र ताट हिसकावून घेतो नि लांब मातीत फेकून देतो. हे पाहून राजपुत्राला राग येतो पण मित्राला काही बोलत नाही.
रात्री महालात राजपुत्र आणि राजकन्या पलंगावर बसतात तोच एक मोठा काळा सर्प फुत्कार टाकत खिडकीवाटे आत येतो. राजपुत्राला डसणार तोच प्रधानपुत्र पलंगाखालून बाहेर येतो व तलवारीने सापाची खांडोळी करतो. हे पाहून राजपुत्र प्रधानपुत्राला हे सगळं काय आहे हे रागावून विचारतो. प्रधानपुत्र सांगत नाही. तेव्हा राजपुत्र शपथ घालतो.
प्रधानपुत्र म्हणतो मी तूला खरं सांगितले तर मी शिळा होऊन पडेन. राजपुत्र विचारात पडतो. मित्रानं माझे प्राण वेळीच वाचवले आहेत. तो म्हणतो मग उपाय. तेव्हा प्रधानपुत्र म्हणतो तुला व राणीला उजव्या हाताचा अंगठा कापून रक्त शिळेवर वहावं लागेल. राजपुत्र आणि राणी लगेच हो म्हणतात. मग प्रधानपुत्र राघु मैनेचं संभाषण सांगतो. ते पूर्ण होताच प्रधानपुत्र शिळा होऊन पडतो. मग राजाराणी रक्ताचा अभिषेक शिळेवर करतात. प्रधानपुत्र जिवंत होतो.
तो लाल घेऊन जंगलातील तळ्यातील सर्व संपत्ती राजवाड्यात आणतात. मग राजपुत्र प्रधानपुत्राला अर्ध राज्य देतो. राणीच्या लहान बहीणीचं लग्न प्रधानपुत्राशी लावून देतात. दोघे मित्र व दोन्ही राण्या सुखानं राज्य करतात.
समाप्त.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

राजे ह्ये काय लिवलंय .. भाग दोन वाचूनच गाळपाटलो आणि थ्येत तुमच्या भेटीला आलो .. धो धो धो धुताई तुम्ही .. असं झालं कि तसं. तसं झालं कि असं करा . नुसती कोडी पाडलीयत तुम्ही ..

राजे १०७'s picture

1 Oct 2019 - 6:52 pm | राजे १०७

मी नाय वो कोडी पाडली. गोष्ट रचणारानं तशी सांगली आणि मी लिवली.

palambar's picture

1 Oct 2019 - 6:47 pm | palambar

मला वाटत लहानपणी
जादूच्या गोष्टींची पुस्तके असायची
त्यातील गोष्ट आहे.

ठाऊक नाही. पण आजीकडून लहानपणी ही गोष्ट अनेक वेळा ऐकली होती.

पद्मावति's picture

1 Oct 2019 - 7:45 pm | पद्मावति

आवडली कथा. अगदी चांदोबा स्टाईल. मस्तंच.

आजीकडून लहानपणी ही गोष्ट अनेक वेळा ऐकली होती.

आजी लोकांकडे जादुची पोतडी असते. काय काय गोष्टी निघत असतात त्यामधून :)

पद्मावती जी ही गोष्ट मला नीट आठवत नव्हती, सत्तर टक्के बरोबर असावी. दुरुस्ती असेल तर सांगा ना प्लीज. धन्यवाद. शेवट सुध्दा बदललेला आहे मी.

जॉनविक्क's picture

1 Oct 2019 - 9:28 pm | जॉनविक्क

पण थोडक्यात चुकलं..!

सध्या लाल कुठे ठेवलाय ?