१-जी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
माझ्या नातवाच्या मते मी सेकंड, थर्ड वगैरे जनरेशनची नव्हे तर अगदीच फर्स्ट जनरेशनची आहे. म्हणजे १-G म्हणे. तो काय बोलतो त्याचं बरेचदा मला ज्ञान नसतं. तो माझ्या खोलीत येतो ते बिजनेस {मराठीत व्यापार डाव } खेळण्यासाठी. त्यात तो सरळ सरळ मला गंडवतो. त्याला कंटाळा येवून त्याने डाव सोडायचं ठरवलं की तो मला विचारतो "कोण जिंकलं ?"
मी तत्परतेने म्हणते,"तू जिंकलास."
मग तो विजयी मुद्रेने हसतो आणि खेळातल्या नोटा आणि कार्डे आवरून ठेवायची मला "विनंती" करतो. मी पण खेळण्याच्या कटकटीतून सुटका झाली या आनंदात नोटा आणि कार्ड गोळा करते.
चुकून मी जिंकले तर तो बिनदिक्कत म्हणतो,"आजी तू चीटिंग केलंस." तो हरायला लागला की पलीकडचा खेळाडू ,मग ते त्याचे आई बाबा असोत की आमच्या स्वैपाकीण बाई. सगळे "चीटिंग"च करतात.
तो इंग्रजी माध्यमात शिकतो. माझे इंग्रजी पूर्वीच्या मॅट्रिक लेव्हलचं. त्याकाळीही स्पेलिंग पाठ करायचा कंटाळा केलेला.
त्यामुळे मला त्याच्याबद्दल आदरच वाटतो. आम्ही कारमधून कुठे कधी जातो तेव्हा रस्त्यात धावणाऱ्या प्रत्येक कारचे मॉडेल तो ओळखतो. त्यातली कित्येक नावं मी ऐकलेलीही नसतात. मला आमच्या गाडीचंही मॉडेल माहीत नाही. गाडीचा नंबरही पाठ नाही. {हे चुकीचं आहे हे मला कळतं. पण लक्षात राहत नाही.}
तो गाडीतल्या सोयीसुविधांचं वर्णन करतो. गाडीला पुढे एक स्क्रीन कसा आहे. त्यावरून फोन कसा लावता येतो. गाणीही लागतात. व्हिडीओ लागतो, पण कार थांबलेली असतानाच. कारने वेग घेतला की आपोआप व्हिडीओ बंद होतो. हे फीचर ड्रायव्हरचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून असतं. पण त्यावरही युट्यूबवरचं कोणतंसं "चीट" करुन ते फीचर टाळता येऊ शकतं. ... दगड, धोंडे नि माती..
ऐकताना माझा चेहरा बथ्थड दिसतो. त्याला मोबाइलमधलं नि कम्प्युटरमधलं सर्व कळतं. मोबाइलच्या कितीतरी कंपन्यांची नावं त्याला माहीत आहेत. त्या त्या मोबाइलची खास वैशिष्ट्यं माहीत आहेत. त्याला घरात किंवा शाळेत मोबाईल फोन अलाउड नसतानाही. तो मला सर्व समजावून सांगत असतो. माझ्या चेहर्यावर तोच आदरयुक्त बथ्थडपणा. माझा मोबाइल आणि लॅपटॉप तोच वापरतो. मोबाइल रीचार्ज करणं. माझा डीपी बदलणं. त्याकरिता माझे फोटो काढणं. विडिओ शूटिंग करणं, अशी कामे तोच करतो.
माझ्याजवळ लॅपटॉप कसा असा तुम्हाला प्रश्न पडेल. तर त्याचं उत्तर असं, मी अगदीच फर्स्ट जनरेशनची नसून निदान सेकंड जनरेशनची आहे. किंवा तसं मानायला मला आवडतं. मी थोडी techo savvy आहे असं दाखवण्यासाठी मी तो घेतला. त्यात नोटपॅड मध्ये मी माझ्या कथा, इतर ललितलेखन एका बोटाने कीज दाबत टाईप करत असते. मुलाकडून गुगलचं काहीतरी उतरवून घेतलं आहे, ज्यामुळे थेट मराठीत शब्द उमटतात. ते नंतर पुन्हा एकदा नीट वाचून दुरुस्त करावे लागतात, पण तो माझा प्रॉब्लेम. तरीपण हा लॅपटॉपही बहुदा तोच वापरतो. त्याआधी "मी घेऊ न?" असे तो अदबीने विचारतो. तोपर्यंत स्टार्ट बटण दाबून झालेलं असतं. मीही उदारपणे त्याला "घे" म्हणते. मग तो त्यावर अभ्यास करतो, म्हणजे शाळेत शिकवतात त्यापैकी पॉवर पॉईंट वगैरे. किंवा खेळत बसतो. त्याबद्दल तो मला माहितीही देतो. मी हूं हूं करते. तो माझ्यापेक्षा नक्कीच ज्ञानी आहे. पण एक दोन बाबतीत मी त्याच्यापेक्षा हुशार आहे. तो इंग्रजी
मीडियमला आहे आणि त्याने थर्ड लँग्वेज मराठी आणि नव्व्याण्णवावी लँग्वेज संस्कृत घेतलीय. ह्या दोन भाषांचा त्याचा अभ्यास मी घेते. त्यात संस्कृतमध्ये त्याला बऱ्याचदा पैकीच्यापैकी आणि मराठीमध्ये "फॉरटी आउट ऑफ फिफ्टी"च्या पुढे मार्क्स पडतात. ह्यासाठी तो माझ्याशी गहिरी दोस्ती टिकवून आहे. आणखी एका गोष्टीसाठी
तो माझ्याकडे हमखास येतो. त्याच्या कपड्यांच्या दुरुस्तीसाठी.
कुठे बटन तुटलंय, टी शर्ट उसवलाय. अशा वेळी ते दुरुस्त करायला तो माझ्याकडे येतो.
ते मी शिवून देते. ते शिवणकाम तो निरखून पाहतो. त्याच्या चेहर्यावर प्रसन्न कृतज्ञता पसरते. तो माझ्याकडे पाहतो. त्याच्या त्या नजरेसाठी मी त्याच्या कितीही शर्टपॅंटी दुरूस्त करेन.
त्याच्या मालकीच्या निम्म्या वस्तू आणि कागद माझ्याच खोलीत असतात. माझं रायटींग टेबल, कपाट, ड्रावर त्याच्याच
वस्तूंनी भरलेले असतात. माझे पेपरवेट, पेन, पंचिंग मशीन, स्टेप्लर, त्याच्याच मालकीचे असल्याप्रमाणे तो वापरतो. त्याच्या काही गुप्त गोष्टी तो माझ्याबरोबर शेअर करतो. त्या मी कुठेही बोलायच्या नसतात. त्याची अनेक गुप्त कृत्ये, उदा: बाबांसाठी ग्रीटिंग बनवणे, त्यांचे सर्प्राइज गिफ्ट पॅक करणे
-- तो माझ्या खोलीत येऊन करतो. झालेला कचरा उचलायचा कंटाळा करतो म्हणून माझी बोलणी खातो. आमची मैत्री आहे. जनरेशन गॅप आड न येता झालेली. तो माझा खूप लाडका आहे.
दुनियामे सबसे प्यारा.
प्रतिक्रिया
कित्ती गोड लिहिलं आहे हे!
मस्तं लिहिलं आहे. नातवाला
त्याच्या त्या नजरेसाठी मी त्याच्या कितीही शर्टपॅंटी दुरूस्त करेन.हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. :)चुकून मी जिंकले तर तो बिनदिक्कत म्हणतो,"आजी तू चीटिंग केलंस." तो हरायला लागला की पलीकडचा खेळाडू ,मग ते त्याचे आई बाबा असोत की आमच्या स्वैपाकीण बाई. सगळे "चीटिंग"च करतात.यावरून, सद्य राजकारणात त्याला भरपूर वाव आहे. ;) :)खुपच सुंदर लिहीले आहे :)
फार सुंदर आणि निरागस वर्णन.
फार गोड लिहिलंय. मस्तंच.
+1
खुपच छान लिहिलय
@ आज्जी खूपच मस्त लिहिले आहे,
क्यूटनेस ओव्हरलोड !
क्यूट कथा.
क्युट लेख..
छान
मस्त लिहिले आहे
छान.
ओढाळ, वेल्हाळ मस्त लेखन.
छान
छान
धन्यवाद
खूपच छान लिहिलं आहे, अगदी
आजीच्या प्रेमाची तुलनाच होत नाही.
दीपा माने - प्रत्युत्तराला
दुर्गविहारी - धन्यवाद