InShort 3 – ज्यूस/Juice (शॉर्ट-फिल्म)

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
24 Sep 2019 - 12:03 pm

Juice (हिंदी/२०१७) ही शॉर्ट-फिल्म बघितल्यानंतर हे वाचले तर जास्त मजा येईल, हवी तर वाचल्यानंतर पुन्हा एकदा पहा. आवर्जून दोनदा पहावी अशी ती नक्कीच आहे.

घरातील पार्टीचा एक छोटासा प्रसंग, त्यात काहिही अतिरंजित न दाखवता, रोजच्या जगण्यातली विषमता, लिंगभेद (gender roles) एखादा कसबी दिग्दर्शक थोड्याशाच वेळात किती प्रभावीपणे दाखवू शकतो ह्याचा एक उत्कृष्ट नमूना म्हणून 'ज्यूस' अवश्य बघावी. किंवा एखादी कथा अगदी थोडक्यात, पण अंगावर काटा येईल इतकी भेदकपणे कशी पडद्यावर दाखवता येते ते अनुभवण्यासाठी 'ज्यूस' नक्की बघावी. किंवा नुसतीच एक चांगली कथा पडद्यावर पहायची असेल तरीही 'ज्यूस' नक्की बघावी.

नीरज घायवान हा आतिशय संवेदनशील दिग्दर्शक आहे, त्याच्या 'मसान' (२०१५) ह्या गाजलेल्या चित्रपटाने त्याला कित्येक सन्मान मिळवून दिलेत. सध्या नावजलेल्या सॅक्रेड-गेम्सचेही काही भाग त्याने दिग्दर्शित केले आहेत. तरीही शॉर्ट-फिल्म ह्या माध्यमाची आवड त्याला आहे - त्याने 'ज्यूस' ही शॉर्ट-फिल्म मसाननंतर, म्हणजे २०१७ मध्ये दिग्दर्शित केली आहे. जेमतेम १५ मिनिटांपेक्षाही छोटी ही फिल्म एखाद्या पूर्ण लांबीच्या चित्रपटापेक्षाही जास्त प्रभावित करते.

'ज्यूस' ही कथा आहे मंजू सिंग (शेफाली शहा) आणि ब्रिजेश सिंग (मनिष चौधरी) ह्यांच्या घरातील. अशाच एका संध्याकाळी काही जवळचे मित्र त्यांच्या परिवारासह पार्टीला आले आहेत. पुरुषांच्या दिवाणखाण्यात ड्रींक्सबरोबर गप्पा चालल्यात, आणि स्त्रीया किचनमधे स्पयंपाक बनवत आहेत, मुलं दुसर्‍या रुममध्ये खेळतायत. पुरूषांच्या गप्पा नवीन स्त्री बॉसवर घसरतात (मंजूला 'डोन्ट माईंड' सांगून), त्यात थोडी बंगाली, सन्याल बाबूंच्या उच्चारांची थट्टा होते आणि मग अमेरिकन राजकारणावर, ट्रंपवर घसरतात. स्त्रियांच्या गप्पा गरोदर असणार्‍या रजनीच्या 'ग्लो' विषयी आणि मुलांविषयी. स्वयंपाकाची लगबग चालू आहे, कबाब, घुगनी बनतात आहे, बाहेर पुरुषांची सरबराई करण्यासाठी. मुलं व्हिडिओ गेममध्ये मग्न आहेत. मंजू कुलरमध्ये पाणी भरून दिवाणखाण्यात ठेवते, उकाडा फार वाढलाय. किचनमध्ये तर उकाडा खूपच जाणवतोय, पण तिथे पंखा नाही. मंजू स्टुलावर चढून एक जूना टेबलफॅन काढते (तिची धडपड टिपणारा कॅमेराचा टॉप अँगल, आणि त्यातला सूचक अर्थ कुठेतरी नेणीवेत जाणवतो) पण तो थोडा चालू होऊन बंद पडतो. मंजू नवर्‍याला, ब्रिजेशला पंख्याकडे बघायला सांगते, तो 'आ रहे है' म्हणतो, पण गप्पांमध्येच रंगून जातो. आता पुरुषांच्या गप्पा आता 'पेचीस', अकबरावर घसरल्यात. सरबराई सुरूच आहे.

नीरज घायवान एक वेगळ्या वाटेचा लेखक आणि प्रभावी दिग्दर्शक आहे - त्याच्या कथेत, पटकथेत हे जाणवत रहाते. सहजच रोजचे प्रसंग आणि त्या संदर्भाने संवाद आहेत, पण ते नेमके टोचतात. एखाद्या चांगल्या कथेत जसे 'reading between the lines' जाणवते, तसेच ह्या कथेतही अनेक पदर जाणवतात. सामाजिक उतरंडीचे छोटे प्रसंग, मुलांवर नकळत होणारे बरे-वाईट संस्कार, गतानुगतिकाची साखळी, वेगवेगळ्या प्रदेशातील मित्रांची वेगवेगळी भाषा आणि बोलायची ढब, हे सगळे असे सुरेखपणे विणले आहे की प्रत्येक पदर हा भरजरी होऊन जातो. प्रत्येक फ्रेम सूचक तपशीलाने समृद्ध आहे, ते सगळे तपशील समजून घ्यायलाही दोनदा-तीनदा फिल्म बघावी लागते. ह्या फिल्ममधील सगळ्याच subtext विषयी अजून खूप लिहिता येईल, पण प्रत्येक पाहण्यात असे नवीन काही सापडण्यात जास्त मजा आहे. त्याला सगळ्याच खंद्या कलाकारांची सुरेख साथ मिळाली आहे. अर्थातच सर्वात प्रभावित करते ती नायिका - शेफाली शहाने साकारलेली मंजू. इतक्या प्रतिभावान कलाकाराला चित्रपटात अजूनही फारशी सशक्त भूमिका मिळाली नाही याची खंत वाटते.

Large Short Films आणि रॉयल स्टॅग ह्यांनी ही फिल्म व्यावसायिकपणे बनवली असल्यामुळे निर्मितीमूल्य चांगली आहेत. कॅमेरा, क्रू, संगीतात पैसे सढळहस्ते वापरल्याचे जाणवते. खाण्याचे पदार्थ, त्यांची तयारी (कणिक मळणे, कापाकापी, गॅसवरचा कुकर, सूचकपणे कढईला चिकटलेले चिकन लेग्ज्) हे तुकड्या-तुकड्याने चित्रित केलेल्या प्रसंगात, कित्येक टेकमध्ये केल्या जाणार्‍या शुटींगमधे सांभाळणे हे एक मोठे दिव्य असते; तो भाग त्यांनी लीलया हाताळलाय. अशा खात्या-पित्या घरातील किचनही अगदी पर्फेक्ट. त्यामुळे पदार्थांची रेलचेल, बाहेर पार्टीतला आस्वाद आणि आत किचनमधली धावपळ, हे अगदी नेमकेपणे, किमान फ्रेममध्ये आपल्यापर्यंत पोहोचते. त्या घरातले वातावरण, मंजू-ब्रिजेशचे नाते, त्यांच्या मित्र-मैत्रिणींचे स्वभाव, त्यांची एक संस्कृती, ह्या सगळ्याचे वर्णन करायचे तर पुस्तकाची पानेच्या पाने खर्च पडतील; पण हे सर्व तपशील सुरुवातीच्या थोड्याच प्रसंगात घायवान अचूकपणे रेखाटतो, तेही चित्रभाषेत - फार शाब्दिक फुलोरा न पसरवता. नीरज घायवानसारखा चित्रभाषा जाणणारा दिग्दर्शक चित्रपटाचा अनावश्यक 'बोलपट' होऊ देत नाही - चित्रपट माध्यमाची ताकद १५ मिनिटांच्या छोट्या शॉर्ट-फिल्ममध्येही दाखवतो.

किचनमध्ये स्वयंपाक चालूच आहे. उकाड्याने बायका हैराण झाल्यात, चहा घेतायत. मंजू गरोदर रजनीला कामवाल्या पर्बतियासाठी एक कप द्यायला सांगते, धड कप दिसत असतांनाही रजनी एक तुटका स्टीलचा छोटा ग्लास सरकवते. "उशीर झालाय, जाते आता" असे सांगून दुखावलेली पर्बतिया चहा टाळते. किचनमधे मंजूची धावपळ चालू आहे. भाजलेले वांगे सोलतांना हात पोळतोय, त्यांच्या गप्पा आता मुलांना सांभाळतांना करीअर राहून जाते इकडे वळल्यात. मंजू विचारतेय, मुलं झाली म्हणजे काम सोडलेच पाहिजे का? उकाडा, घामाने ती वैतागलीय, पण बाहेरून ज्युसची फर्माईश झालीयं. मुलं आता बाहेर दिवाणखाण्यात दंगा करतायत, मंजू त्यांना रागावून आत आणते आणि छोट्या डॉलीची आई, सरला तिला सगळ्या भैयांसाठी खाणे घेऊन जायला सांगते. शेफाली शहा एका अविर्भावात 'अग, ह्या वयापासूनच हिला पण?' हे निमिषार्धात दाखवते, शब्दांची गरजच नाही. बाहेर दिवाणखाण्यात वायफळ गप्पा चांगल्याच रंगात आल्यात. आता त्यात येणारा ट्रंप-हिलरीचा संदर्भही चपखल आहे.

सर्वसाधारणपणे शॉर्ट-फिल्मच्या शेवटी एक धक्का किंवा ट्विस्ट असतो, तसा धक्का ज्यूसमधेही येतो. शेवटी मंजू काहीतरी वेगळेच करते, म्हटले तर साधे पण अगदीच अनपेक्षित. सगळेच पुरूष अवघडून, अवाक होऊन बघत राहतात, आणि तिचा नवरा रागाने धुसफुसत राहतो आणि नंतर शरमिंदा होतो. मनिष चौधरीने ह्या प्रसंगात जान भरली आहे, आणि घायवानने त्या प्रसंगात परिसीमा गाठणार्‍या विरोधाभासाची ठसठस अचूक पकडलीयं. अर्थात, ह्या सगळ्यांवर कळस केलाय शेफाली शहाने - विध्द आणि कृध्द देहबोली आणि चेहर्‍यावरचे भाव असे पकडलेत की काय सांगावे? शेवटच्या अर्ध्या मिनिटात ती तिच्या अभिनयाने अक्षरशः नजरबंदी करते. तिच्या पाणी तरारलेल्या डोळ्यांतून जाणवणारी भेदक, जळजळीत नजर फिल्मचा पडदा भेदून कितीतरी वेळ जाळत रहाते.

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

ही फिल्म पाहिली आहे. शेफालीचं काम खूप आवडलं होतं.
सनातन विषय.

प्रतिसादासाठी धन्यवाद यशोधरा.
बाकीचे बघून स्पीचलेस झालेत असा (गोड) गैरसमज मी करून घेतो. :-)

यशोधरा's picture

27 Sep 2019 - 1:31 pm | यशोधरा

पाहतात रे बरेच जण, बघून झाल्यावर नि:शब्द होत असतील, म्हणून :)

नि३सोलपुरकर's picture

27 Sep 2019 - 1:38 pm | नि३सोलपुरकर

स्पीचलेस होण्यासारखीच शॉर्ट-फिल्म आहे .

_/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Sep 2019 - 1:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लघुचित्रपट.

अर्थातच सर्वात प्रभावित करते ती नायिका - शेफाली शहाने साकारलेली मंजू. इतक्या प्रतिभावान कलाकाराला चित्रपटात अजूनही फारशी सशक्त भूमिका मिळाली नाही याची खंत वाटते.
आणि
शेवटच्या अर्ध्या मिनिटात ती तिच्या अभिनयाने अक्षरशः नजरबंदी करते. तिच्या पाणी तरारलेल्या डोळ्यांतून जाणवणारी भेदक, जळजळीत नजर फिल्मचा पडदा भेदून कितीतरी वेळ जाळत रहाते.
+१००

पद्मावति's picture

27 Sep 2019 - 2:10 pm | पद्मावति

फिल्म खुप सुंदर आहे. छान लिहिलंय. आवडलं.

नंदन's picture

27 Sep 2019 - 2:29 pm | नंदन

सुचवणीबद्दल अनेक आभार. शॉर्ट फिल्म अतिशय आवडली.
शब्दबंबाळ न होता, भेदकपणा नेमका कसा साधावा याचं उत्तम उदाहरण!

(अवांतरः >>> नीरज घायवानसारखा चित्रभाषा जाणणारा दिग्दर्शक चित्रपटाचा अनावश्यक 'बोलपट' होऊ देत नाही
--- तंतोतंत! मात्र ह्या मोजक्या मिनिटांतही त्याने टिपलेला हिंदीच्या निरनिराळ्या बोलींचा लहेजा लक्षणीय आहे. विशेषतः हैदराबादेतल्या मराठीभाषक कुटुंबातल्या जन्माची पार्श्वभूमी असताना.)

मनिष's picture

27 Sep 2019 - 10:15 pm | मनिष

खास तुमची प्रतिक्रिया? ग्रह उच्चीचे आहे आज. __/\__
धन्यवाद रे. :-)

सगळ्याच नवीन प्रतिसादकर्त्यांचे आभार.

धर्मराजमुटके's picture

27 Sep 2019 - 10:43 pm | धर्मराजमुटके

छान आहे. आवडली. "शाही काळविट" या संगीत तबकडीच्या बॅनरखाली न बनता दुसर्‍या कोणत्यातरी नावाने बनली असती तर कळकळ अधिक पोहोचली असती. असो.

मनिष's picture

29 Sep 2019 - 4:32 pm | मनिष

ते स्पॉन्सर करतात, त्याशिवाय ह्या बजेटची शॉर्ट-फिल्म नाही होऊ शकत. :-)