✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी

म
मार्गी यांनी
Wed, 09/04/2019 - 15:29  ·  लेख
लेख
४: रामपूर बुशहर ते टापरी सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर २९ जुलैची संध्याकाळ रामपूर बुशहरमध्ये गेली. दोन दिवस शिमला आणि नार्कंडा असं आल्यामुळे इथे फार गरम होत आहे. संध्याकाळी काही वेळ तर ताप आल्यासारखं वाटलं. चांगला आराम होऊ शकला नाही. रात्री पाऊस पडला. ३० जुलैला सकाळी जाग आली तेव्हा मनात नकारात्मक विचार आहेत. कदाचित शरीराचा पुरेसा आराम न झाल्यामुळे मनालाही ताजंतवानं वाटत नाही आहे. दोन दिवसांच्या थंडीनंतर हे गरम वातावरण जरा जड जातंय. तापासारखं वाटत असताना पुढे चालवायला जमेल का? पाऊसही पडण्याची लक्षणं आहेत. थोडक्यात अशा सायककल मोहीमेच्या पहिल्या दिवशी मनात जी अस्वस्थता असते; ज्या शंकाकुशंका असतात; त्या तिस-या दिवशी मनात आहेत! काही वेळेसाठी वाटलं की, आज कदाचित टापरीलाही जाता येणार नाही आणि त्या आधीच झाकड़ीमध्ये हॉल्ट करावा लागेल. पण हळु हळु हिंमत वाढवली. सायकलवर सामान नीट लावलं. पहिले दोन दिवस स्पेअर टायर सीटच्या खाली ठेवत होतो, पण पेडलिंग करताना ते पायांना घासत होतं. आता त्याला समोरच्या हँडलवर एडजस्ट केलं. बाकी शंकाकुशंकाही अशाच एडजस्ट केल्या. गेस्ट हाऊसमध्ये पराठा खाऊन निघायला सज्ज झालो. बाहेर पडल्यावर लगेचच सतलुजची मोठी गर्जना परत सुरू झाली. भुरभुर पाऊसही आहे. मनाच्या एका भागाला वाटतंय पाऊस यायला हवा. नाही तर इतक्या गरम हवेमध्ये सायकल चालवणं कठीण जाईल. त्यापेक्षा पाऊस आलेला चांगला.    पेडलिंग सुरू करेपर्यंत मनात शंकाकुशंका होत्या. पण जेव्हा हळु हळु पेडलिंग सुरू केलं, काही‌ किलोमीटर गेले, तेव्हा शंका दूर झाल्या! तेव्हा मात्र मुसळधार पाऊस सुरू झाला. आजूबाजूच्या पर्वतांवरही पावसाचंच वातावरण आहे. त्यामुळे थांबलो नाही. आणि किती वेळ थांबावं लागेल हे सांगता येत नव्हतं. त्यामुळे सायकल चालवत राहिलो. रामपूरनंतर जेवरी, झाकड़ी अशी गावं लागून गेली. आणि एक तासानंतर पाऊस थांबला. पण आता काही अडचण नाही. सगळीकडे अतिशय रमणीय नजारे फुलले आहेत! हिमालयाच्या अगदी अंतरंगातलं वैभव दिसतंय! मध्ये मध्ये पर्वतांवरून कोसळणारे झरे! हा हिरवागार हिमालय डोळे तृप्त होईपर्यंत बघून घेतला. कारण आता हळु हळु हिरवा रंग कमी होत जाणार! हिरवा हिमालय मागे पडत जाईल! आता रस्ताही आणखी थरारक होतो आहे. रामपूरच्या पुढे काही अंतरानंतर रस्ता अरुंद झाला. मध्ये मध्ये थोडा तुटलेलाही आहे. आता खरा दुर्गम प्रवास सुरू होत आहे!   रस्ता हलक्या चढाने वर चढत जातोय. जवळपास दोन तास सायकल चालवल्यानंतर जेव्हा बाजूला देवदार वृक्ष दिसले, तेव्ह छान वाटलं. कारण त्याचा अर्थ मी परत एकद १४००- १५०० मीटर उंचीवर आलो आहे आणि आता इथून पुढे तीव्र चढ असा लागणार नही. पाऊस पडल्यानंतर व आता इतक्या उंचीवर आल्यानंतर हवामान परत एकदा थंड झालं आहे. आता उष्णतेचा त्रास नाही. आणि देखावे तर अतिशय रमणीय! एकामागोमाग एक रमणीय नजारे समोर येत आहेत! ढग तर अजूनही आहेतच. पण एका जागी ढगांना चुकवत एका बर्फ शिखराने दर्शन दिलं! वा! सतलुजला लागून जाणारा हा रस्ता किती मोठं आश्चर्य आहे! हिमालयाला अगदी आतून कापत जाणा-या सतलजच्या बाजूला असलेली ही एक भेगच म्हणावी लागेल! आता किन्नौरमधल्या नैसर्गिक बोगद्याची प्रतीक्षा आहे- किन्नौरचं नैसर्गिक द्वार- जिथे रस्ता नैसर्गिक बोगद्यातून जातो! रस्त्यावर आता 'भितीदायक' वळणं येत आहेत. अनेकदा रस्ता बरोबर नदीच्या वरून जातोय. मध्ये मध्ये कच्चा रस्ता सुरू झाला आहे....   हळु हळु असे अनेक बोगदे मिळाले! पण त्यांची भिती नाही वाटली. जिथे रस्ता अगदी दरीजवळून जातोय, जिथे कच्चा व स्लिपरी रस्ता आहे, तिथे थोडं भय वाटत आहे. पण हळु हळु रस्त्यावर वाटणारी भिती कमी होत गेली. आणि लवकरच डोळ्यांना आणि मनाला चक्क सवयच झाली! देवभूमि किन्नौर! किन्नौर कैलासाची सोबत! किन्नौर जिल्हा सुरू झाला. इथून रस्त्याचं नियंत्रण बीआरओ कडे आहे, असं दिसलं. बीआरओने जागोजागी रस्त्यावरील स्थितीविषयी फलक लावले आहेत. त्याशिवाय अतिशय अर्थपूर्ण सुविचारसुद्धा लावले आहेत! आता प्रवासातला खरा रोमांच सुरू झाला आहे. परत एकदा एका ठिकाणी स्पॅनिश सायकलिस्टस भेटले. एका चढावावर ते हळु हळु जाताना त्यांना हाय- हॅलो म्हणून पुढे निघालो.    मध्ये मध्ये ब्रेक घेत जात राहिलो. इथे आलू- पराठा आणि चहा- बिस्किट जवळजवळ सगळीकडे मिळतं. त्यामुळे फ्युएलचा त्रास नाही झाला. नंतर तर हवामान सुखद असल्यामुळे इतकं थकायलाही झालं नाही. सतलुजच्या किना-यावर असलेली अनेक गावं पार होत गेली. टापरी जवळ आलं, तेव्हा रस्त्यावर आणखी भितीदायक वळणं सुरू झाली! अनेकद रस्ता सतलुजच्या अगदी जवळून जातोय. सतलुज समोरून वाहात येत असल्यामुळे वारा सायकलला थोडा अडवतोय. काही ठिकाणी त्याउलट सतलुज अगदी खाली दरीत वाहात असल्यामुळे काही वेळ तिची गर्जनाही डोंगराने अडवल्यामुळे ऐकू येत नाही! आणि रस्ता जेव्हा बरोबर दरीच्या तोंडाला येतो, तेव्हाच अचानक गर्जना सुरू होते! अशा दरीची मात्र भिती वाटतेच. त्यातच जागोजागी रस्त्याचं काम आणि अनेक डायव्हर्जन्सही आहेत.   अनेकदा रस्ता वळत वळत जातो आणि दोन डोंगरांच्या मधून कोसळणा-या झ-याला क्रॉस करून पुढे जातो. एका टेंपलेटसारखं हे दृश्य परत परत दिसतंय! टापरीच्या थोडं अलीकडे रस्त्याने सतलुज ओलांडली. मला असं होईल, ह्याची कल्पना नव्हती. जेव्हा ह्या बाजूच्या डोंगरावर रस्ता करण्यासारखी जागा उरली नाही, तेव्हा रस्ता पलीकडे नेला गेल. इथे काही अंतरापर्यंत फार मस्त उताराचा रस्ता मिळाला. त्याचा पुरेपूर लाभ घेतला. न जाणो, चांगला रस्ता परत कधी मिळेल, न मिळेल! मध्ये एका जागी शूटिंग स्टोन्सचा बोर्ड लागला आणि पुढे छोटे दगड पडतानाही दिसले! अशा रस्त्यावर अनेक अपूर्व निसर्गचित्रांचा आनंद घेत दुपारी टापरीला पोहचलो. इथल्या गेस्ट हाऊसचीही माहिती काढली होती. ते नदीच्या बाजूलाच आहे. तिथे पोहचलो तेव्हा सरकारी अनाउंसमेंट एका जीपमध्ये सुरू होती- धरणातून पाणी सोडलं जात आहे, त्यामुळे कोणीही नदीजवळ जाऊ नये. संध्याकाळी आराम केला आणि टापरीच्या मेन रोडवर जाऊन राजमा चावल- जेवण केलं. आज तिसरा दिवस सर्वांत थरारक राहिला! आता खरा दुर्गम प्रवास सुरू झाला आहे. आज जवळजवळ ६९ किलोमीटर झाले आणि सात तास सायकल चालवली. चढ होतेच, पण इतके तीव्र वाटले नाहीत. आजची सुरुवात तर फार बिकट झाली होती, मन विरोध करत होतं. पण टापरीमध्ये आराम करताना अगदी हलकं व फ्रेश वाटतंय. शरीर आणि मन ह्या प्रवासाच्या फ्लोमध्ये आले आहेत.  आजचा रूट मॅप. ढगांमध्ये जीपीएस बंद झाल्यामुळे स्ट्राव्हा app सुद्धा उपयोगी पडलं नाही.  चढ होतेच, पण इथे दिसतात तितके तीव्र नव्हते. चढ स्थिर व सलग होते. पुढील भाग- सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ५: टापरी ते स्पिलो अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
4662 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

नितांतसुंदर ......

सुधीर कांदळकर
Wed, 09/04/2019 - 18:17 नवीन
पहिले चित्र पाहून रारंगढांगची (पुस्तकातल्या चित्राची. मी गेलो नाही तिथं.) आठवण आली. नैसर्गिक बोगदा रौद्रसुंदर. टेमप्लेट तर वेड लावणारे दृश्य. बाकी दृश्ये देखील आत्ता तिथे जाऊन उभे राहावे असे वाटणारी. लेखनाची मध्यलय पण मस्त आस्वाद घेत सगळी दृश्ये दाखवत अजिबात घाई न करता वाचकाच्या गतीने फिरवते. लेखन प्रत्ययकारी असल्यामुळे माझी मनस्थिती पण तुमच्या तेव्हाच्या आशानिराशा, भिती वगैरेसारखी हेलकावे खाते. अचानक नदीगर्जना ऐकू आल्यावर सॉलीड दचकायला होत असेल. छान. धन्यवाद. पुभाप्र
  • Log in or register to post comments

मस्तं. चित्रे तर एकदम

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/04/2019 - 19:44 नवीन
मस्तं. चित्रे तर एकदम हिमालयात घेऊन गेली !
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मार्गी
गुरुवार, 09/05/2019 - 12:29 नवीन
सुधीर कांदळकर जी आणि डॉक्टर सर, दोघांनाही धन्यवाद! होय, मलाही रारंग ढांगची सातत्याने आठवण होत होती. किंबहुना तिथे रारंग सारख्या अनेक ढांगा होत्याच! आणि रारंग व मुरंग अशी गावंही जवळच होती! :) रस्ता वर असताना दरीतली नदी गर्जना आल्यावर एक भितीची झुळूक येऊन जाते!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा...

पाटीलभाऊ
Fri, 09/06/2019 - 11:22 नवीन
सुन्दर प्रवास आणि फोटो... तुमच्या पुढील प्रवासास खुप खुप शुभेच्छा
  • Log in or register to post comments

जबरा

जॉनविक्क
Fri, 09/06/2019 - 11:33 नवीन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा