मंदीतली पौर्णिमा...।

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
30 Aug 2019 - 11:04 pm

पश्चिमेला पौर्णिमेचा चंद्र शाळेत पाय घासत जाणाऱ्या उत्साही मुलांसारखा रेंगाळत होता. समोरून पूर्वेकडे भास्करजी वेळेआधी हजर राहणाऱ्या , डोळ्यांनी सकाळपासूनच आग ओकणाऱ्या मुख्याध्यापकांसारखे घाईघाईने उगवत होते. चंद्राला अजून आभाळातच ढगांवर लोळायचे होते. एखाद्या समारंभाकरता शाळेत रंगीत कपडे घालून येण्याची परवानगी असते तो दिवस मुलांमुलींकरता फारच संस्मरणीय असतो तशीच काहीशी मनःस्थिती महिन्यात एकदाच संपूर्ण कलांनी झळकणाऱ्या चंद्राची होती. सूर्याला विसरून माझ्याकडेच सर्व सृष्टीने बघत रहावं, ह्या हट्टातही शशीमहाशय मनमोहक हास्य देण्याचा प्रयत्न करत होते.
हे सगळं 'सदा' बागेच्या कमानीतून आत शिरता शिरता बघून झालं होतं. आता त्याची नजर नेहमीच्या रिकाम्या बाकड्याकरता भिरभिरत होती. रस्त्यापासून लांब एका कोपऱ्यातल्या बाकड्यांवर खूप दिवस सावली देऊन दमलेली पानं, संन्यस्त पाचोळा होऊन निजली होती. क्षणभर त्यांना झटकावं कि नाही ह्या संभ्रमात तो पडला. निर्वाणीने त्याने दोनचार संन्यास्यांना इकडेतिकडे अलगद सरकावले आणि खांद्यावरील बॅग उतरवत बसकण मारली. आसपास नैसर्गिक, कृत्रिम, अतिकृत्रिम व तद्दन दिखाऊ प्रकारचे विविध व्यायामप्रकार, सर्व वयोगटातील माणसे जातपात, लिंग व उच्चनीच इत्यादी भेद विसरून करण्यात मश्गूल होती. त्यांतील क्वचितच कोणीतरी सदाची दखल घेतली असावी, याची सदाने सर्व परिसर काळजीपूर्वक न्याहाळून खात्री केली. सावकाश बॅगेतील डबा काढून त्यातील सर्व खण बाजूला मांडले. काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटून त्याने एकेक घास खायला सुरुवात केली.
घरी कामावर जायला घाई झाल्याचे सांगून "फक्त डबा पटकन भरून द्या. खाणेपिणे नंतर बघू." अशी आरोळी ठोकून काही वेळातच दुपारच्या जेवणाचा डबा न्याहारी म्हणून खाणे त्याला काही नवीन नव्हते. आठवडाभर असेच चालू होते. एव्हाना खाद्यपदार्थांचा वास सुटल्याने बाकड्याखाली गाढ झोपलेल्या श्वानेश्वराची झोप मोडली. हातापायाला ताण देत देत जबड्याची उघडझाप करतकरत तो बाहेर आला. शेपटीबिपटी हलवत शरणागती दाखवत डब्यांभोवती घोळू लागला. सदाने तत्परतेने थोडे थोडे एका कागदावर वाढून त्यासमोर ठेवले. अर्थात त्या श्वानालाही हे नवीन नव्हते. तो तर रात्री त्या बाकड्याखाली झोपण्याकरता मारामारी करु लागला होता. सकाळी हमखास गरमागरम अन्न देणाऱ्या बाकड्याखाली रात्री निवाऱ्याची जागा पकडायला तो जीवाचे रान करणे स्वाभाविकच. मनुष्यप्राणी नाही का, जास्त आर्थिक महत्व असलेल्या क्षेत्रांची माहिती काढून, तेच शिकायला पाठवायला, आपापल्या पिल्लांना मनापासून जबरदस्ती करून, काबाडकष्ट झेलून पाठवतात. तो समोर असलेला कुत्रा अश्याच समाजाचे प्रतिनिधित्व करतोय अशा विचारांनी सदा खुदकन हसला. इतर कुत्र्यांना हा कुत्रा जवळ येऊ देत नसे. ते सगळे लांबून नाक व जीभ लांब करून समाधान मानायचे. हे सदाला या क्षणाला तीव्रतेने खटकू लागले.
तो त्या कागदाकडे सरसावला आणि त्या कुत्राच्या समोरून तसाच गोळा करून हातात धरून ठेवून, एका हाताने कुत्र्याला बाजूला सारत त्याच्याशी बोलू लागला, " मित्रा, दोन महिने झाले, नोकरी जाऊन. तोंडाची वाफ आटेपर्यंत बोलतो आणि पायातले रक्त आटेपर्यंत फिरतो. घरी वेगवेगळ्या नात्याने पाच माणसे माझ्यावर अवलंबून आहेत. त्यांत दोन वयोवृद्ध आहेत. त्यांना न सांगता, न जाणवू देता घरखर्च ढकलतोय. एव्हाना दहा वेगवेगळ्या ठिकाणचे कुत्रे माझ्या बायकोच्या हातचे जेवलेत. लेका, माझी नोकरी जाणे तुझ्या पथ्यावर पडले आहे. त्याला माझी तक्रार नाही. दोन पैकी एकंच माणूस निवडायचा होता. माझा मित्र राहिला, मला बाहेर पडायला लागले, मी नाहीतर कदाचित तो आला असता इथे तुला भरवायला. एकूण ऊर्जा तेवढीच राहते. कळलं काय? मित्र खूप रडला, मी हसत राहिलो त्याच्यासाठी. मी इथे निवडायला नाही येत. माझे पोट भरून तुम्हा सगळ्यांना घास घास मिळतील, सगळ्यांना द्यायला येतो. ते तिथे एकेका घासाकरता पाय घासणारे कुत्रे आहेत ना, त्यांच्यात मला स्वतः ला बघतो. त्यांच्यातून मला शोधायला, माझी समजूत काढायला, मला पूर्ण करायला येतो. हा वर आकाशातला पौर्णिमेचा चंद्र बघ. रोज वाट बघत असतो, पूर्णतेला जाण्याची, सूर्यासमोर येण्याचे धैर्य दाखवण्याची. तेव्हा, जमवून घ्यायचं बघा नाहीतर उपाशी रहा."
सदा उठून चालू लागला. एव्हाना कुत्रा गोंधळलेला आणि भुकेलेला, तसाच सदाच्या मागे इतर कुत्र्यांपर्यंत पोचला. सदाने हातातला कागद खाली ठेवताच सगळेच त्यावर तुटून पडले. दादागिरीबहाद्दर पण थोडा गुरगुरुन हळूहळू त्या समूहाचा एक भाग झाला. कागदाभोवती गोलाकार उभे राहिलेले सर्व 'सदा' पाहता पाहता चंद्र मंद हसून नाहीसा झाला. सूर्याची किरणे नव्या दिवसाचे संदेश घेऊन सदाच्या अवतीभोवती घुटमळू लागली.
सदा बागेतून बाहेर पडता पडता वेगळ्याच तेजाने ऊर्जेने तळपत होता व तोंडाने पुटपुटत होता .
"ओम् पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदीच्यते,
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते | "

-अभिजीत श्रीहरी जोगळेकर

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

31 Aug 2019 - 12:05 am | जॉनविक्क

उगा काहितरीच's picture

31 Aug 2019 - 12:26 am | उगा काहितरीच

बापरे ! जरा वेगळंच प्रकरण आहे हे .