एक ऐकलेली कार्पोरेट कथा..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
29 Aug 2019 - 5:20 pm

आटपाट कंपनी होती. सगळं कसं छान, सुसज्ज,चकचकीत,स्वच्छ वातावरण. अगदी "परिंदा भी पर ना मार सके" अशी सुरक्षा व्यवस्था. हजारो इंजिनीयर्स, शेकडो मॅनेजर्स, जनरल मॅनेजर्स, व्हाईस प्रेसिडंट असे सगळे हुशार लोकं तिथं काम करायचे. अर्थात काम करताना काही ना काही समस्या रोजच यायच्या. पण सगळेच प्रोफेशनल असल्यामुळे, स्वतःच्या अक्कलहुशारीने समस्या सोडवायचे. मग त्याचं कोडकौतुक,बक्षिस,पगारवाढ,बढती असं चक्र नेहमीच सुरु असायचं.

पण एके दिवशी अघटीत घडले. नेहमीच्या समस्या बाजूलाच राहिल्या अन एक भलतीच समस्या उद्भवली. कंपनीचे सुरक्षाचक्र भेदून एक माकड कंपनीत शिरले. सुरवातीला झाडावर, मग लॉनवर, मग कँटीनमध्ये आणि शेवटी मुख्य इमारतीत ते माकड गोंधळ घालू लागले. कुठे कागदं उचलून फेक तर कोणाच्या लॅपटॉपवर उडी मार असं सुरु झालं. सगळे सिक्योरिटी गार्ड माकडाच्या मागे लागले. कोणाच्याही हाती ते लागेना. शेवटी लाठ्याकाठ्या वगैरे मारून त्याला पकडण्याचा एक प्रस्ताव समोर आला. पण त्याला कंपनीतल्या वन्यजीव प्रेमींनी लगेच विरोध केला. हे सुरु असताना माकडाने एका वन्यजीव प्रेमीचाच मोबाईल हिसकला. त्याने टेबलावर ठेवलेले हेल्मेट उचलून माकडाकडे फेकले. माकडाने त्याच्याकडे मोबाईल फेकला. मोबाईल जमिनीवर पडून फुटला. सगळ्याच वन्यजीव प्रेमींचा विरोध आपसूक मावळला. काहीही करून माकडाला पकडा असा आदेश मिळाला. तरीही माकड कोणाच्या हाती लागेना. माकडाला केळी वगैरेचे आमिष देऊन बाहेर काढायचा प्रयत्न झाला. पण माकड केळी घेऊन झाडावर बसायचं. आणि खाऊन झालं की परत गोंधळ घालायचं.

अगदी माकडाला हिप्नोटाईझ करण्यासाठी एका सायकॉलजिस्टला बोलावले. त्याचाही कडून काही झाले नाही. शेवटी एका मांत्रिकाला बोलावण्यात आले. मांत्रिकाने बऱ्याच वेळ माकडाचे निरीक्षण केले. कंपनीतले सगळे पदाधिकारी मांत्रिकाकडे बघत होते.
तो म्हणाला, " हे तंत्र मंत्राचे काम नव्हे. ह्याचे ह्या कंपनीशी काहीतरी जुने नाते आहे. कदाचित हा इथलाच कर्मचारी असावा मागच्या जन्मी"

"मग आता काय करायचं?", व्हीपी म्हणाले.

"ह्याला तुमच्या कार्पोरेट पद्धतीने हाताळावे लागेल. म्हणजे ह्याला आधी खूप हसवायचे. अन नंतर खूप रडवायचे. ते झाल्यावर हा आपसूकच कंटाळून निघून जाईल."

झालं !! लगेच माकडाला हसवायचे प्रयत्न सुरु झाले. पण शेवटी जुनं-जाणंत कार्पोरेट माकड होतं ते ! ते काय ह्यांना दाद देतंय. सगळे इंजिनियर्स, मॅनेजर्स प्रयत्न करून थकले.

सरतेशेवटी कंपनीचा सगळ्यात जुना कर्मचारी असलेला एक ऑफिसबॉय समोर आला.
"साहेब, मी प्रयत्न करू का?"
सगळे हसायला लागले.

पण व्हीपी म्हणाले," शांत बसा सगळ्यांनी.. कर रे बंडू तू प्रयत्न .."
बंडू माकडाजवळ गेला. आणि माकडाच्या कानात त्याने काहीतरी सांगितले.
ते ऐकताच माकड जोरजोरात हसायला लागले. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं.
व्हीपी बंडूला म्हणाले," काय सांगितलंस तू त्याला?"

"काही नाही हो... मी त्याला म्हटलं. आमचा कंपनीत एक मोठा प्रॉब्लेम झालायं. आणि आता सगळे इंजिनीअर आणि मॅनेजर मिळून तो प्रॉब्लेम सोडवणार आहे. हे ऐकून तो हसायला लागला."
व्हीपीसुद्धा हसायला लागले.

"बरं..मग आता रडवणार कसं?"

बंडूनी परत त्या माकडाच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून माकड रडायला लागला.

"आता काय सांगितलं तू त्याला?" व्हीपी म्हणाले.

"काही नाही हो. मी म्हणालो, की अरे तो जो मोठा प्रॉब्लेम झालं होता ना तो आमच्या इंजिनीयर्स आणि मॅनेजर्सनी सोडवला बघ. हे ऐकून त्याला रडू आलं."

आता सगळ्यांचे चेहरे बघण्यालायक झाले होते. व्हीपीना हसू आवरत नव्हतं. थोड्यावेळात एक मॅनेजर कुत्सितपणे बोलला.
"सर, हसवून झालं, रडवून झालं. पण माकड तर अजून इथेच आहे. त्याचं काय?"

हे ऐकून बंडू विचारात पडला. आणि दोन मिनिट विचार केल्यावर त्याने परत माकडाच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकताच माकड धूम पळाला.

आता सगळ्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. कुजबुज सुरु झाली.

बंडू म्हणाला," चला साहेब. आता नाही येत तो परत.."

"अरे पण सांगितलं काय तू त्याला?"

"ते जाऊ द्या ना साहेब..गेला तो आता."

व्हीपी चिडून म्हणाले," बंड्या..लेका..तू अन मी सोबतच लागलो ह्या कपंनीत. जी समस्या मी नाही सोडवू शकलो ती तू सोडवली. तू त्याला काय सांगितलं ते मला कळायला हवं. नाहीतर तुझी नोकरी खाऊन मी सुद्धा राजीनामा देईल आज... लक्षात ठेव.."

"अहो..जाऊ द्या ना साहेब.."

"सांगावंच लागेल तुला.."

"अहो काही नाही.. मी त्याला एवढंच म्हणालो.. की आत्ता जो मोठा प्रॉब्लेम साहेबलोकांनी सोडवलाय ना त्याचं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तुला दाखवणार आहे. तेवढं बघून जा...हे ऐकून तो पळाला साहेब"

समाप्त

मूळ कथा : अनामिक लेखक
शब्दांकन : चिनार..

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

29 Aug 2019 - 5:54 pm | राजाभाउ

ह्या ह्या ह्या एक नंबर

सुबोध खरे's picture

29 Aug 2019 - 6:43 pm | सुबोध खरे

लै म्हणजे लै म्हणजे लैच झ्याक

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2019 - 6:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

ठ्ठो ! =)) =)) =))

धर्मराजमुटके's picture

29 Aug 2019 - 6:50 pm | धर्मराजमुटके

लै भारी. अजुन येऊद्या कार्पेट कथा........... :)

1 नंबर, शेअर करायची इच्छा आहे..

चिनार's picture

29 Aug 2019 - 8:34 pm | चिनार

करा... नावासकट

हस्तर's picture

8 Nov 2019 - 3:40 pm | हस्तर

माकडाच्या ?

जालिम लोशन's picture

29 Aug 2019 - 8:56 pm | जालिम लोशन

मस्त

जव्हेरगंज's picture

29 Aug 2019 - 11:02 pm | जव्हेरगंज

=))))

सस्नेह's picture

29 Aug 2019 - 11:08 pm | सस्नेह

पुरेपूर कार्पोरेट जोक !
=))

नाखु's picture

30 Aug 2019 - 8:10 am | नाखु

चिनार!!
झणझणीत आणि खणखणीत!!

मिटिंगा मिटिंगा खेळापासून दूर राहिलेल एकल खेळाडू पांढरपेशा नाखु

Original स्टोरी अजुन मजेदार आहे.

ती स्टोरी कुठे मिळेल वाचायला?
लेखकाचे नाव ?

श्वेता२४'s picture

30 Aug 2019 - 12:08 pm | श्वेता२४

खतरनाक लिहीलंय. मजा आली वाचताना.

सुनील's picture

30 Aug 2019 - 2:13 pm | सुनील

सुमारे २० वर्षांपूर्वी, IT जगतात, अशीच एक कथा TCS च्या नावाने प्रसिद्ध होती. किंचित फरक असा -
१) मी टाटांच्या कंपनीत काम करतो (हसणे)
२) माझा पगार xxxx (रडणे)
३) चल, तुला भरती करतो (पळणे)

चौथा कोनाडा's picture

30 Aug 2019 - 5:36 pm | चौथा कोनाडा

ह्या .... ह्या .... ह्या ....
लै हसलो. ही सु-रस गोष्ट वाचून.

ज्योति अळवणी's picture

30 Aug 2019 - 5:52 pm | ज्योति अळवणी

झक्कास

मजा आली वाचताना. >> +११११

सुधीर कांदळकर's picture

31 Aug 2019 - 7:03 am | सुधीर कांदळकर

मीच तो माकड. अजून एक गोष्ट लिहा ना, नाहीतर पुन्हा येईन.

धन्यवाद

शित्रेउमेश's picture

7 Nov 2019 - 9:55 am | शित्रेउमेश

+१११११

किल्लेदार's picture

8 Nov 2019 - 3:15 pm | किल्लेदार

शेवटचं वाक्य जरी सांगितलं असतं तरी लगेच पळाला असता :):):)