एक ऐकलेली कार्पोरेट कथा..
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आटपाट कंपनी होती. सगळं कसं छान, सुसज्ज,चकचकीत,स्वच्छ वातावरण. अगदी "परिंदा भी पर ना मार सके" अशी सुरक्षा व्यवस्था. हजारो इंजिनीयर्स, शेकडो मॅनेजर्स, जनरल मॅनेजर्स, व्हाईस प्रेसिडंट असे सगळे हुशार लोकं तिथं काम करायचे. अर्थात काम करताना काही ना काही समस्या रोजच यायच्या. पण सगळेच प्रोफेशनल असल्यामुळे, स्वतःच्या अक्कलहुशारीने समस्या सोडवायचे. मग त्याचं कोडकौतुक,बक्षिस,पगारवाढ,बढती असं चक्र नेहमीच सुरु असायचं.
पण एके दिवशी अघटीत घडले. नेहमीच्या समस्या बाजूलाच राहिल्या अन एक भलतीच समस्या उद्भवली. कंपनीचे सुरक्षाचक्र भेदून एक माकड कंपनीत शिरले. सुरवातीला झाडावर, मग लॉनवर, मग कँटीनमध्ये आणि शेवटी मुख्य इमारतीत ते माकड गोंधळ घालू लागले. कुठे कागदं उचलून फेक तर कोणाच्या लॅपटॉपवर उडी मार असं सुरु झालं. सगळे सिक्योरिटी गार्ड माकडाच्या मागे लागले. कोणाच्याही हाती ते लागेना. शेवटी लाठ्याकाठ्या वगैरे मारून त्याला पकडण्याचा एक प्रस्ताव समोर आला. पण त्याला कंपनीतल्या वन्यजीव प्रेमींनी लगेच विरोध केला. हे सुरु असताना माकडाने एका वन्यजीव प्रेमीचाच मोबाईल हिसकला. त्याने टेबलावर ठेवलेले हेल्मेट उचलून माकडाकडे फेकले. माकडाने त्याच्याकडे मोबाईल फेकला. मोबाईल जमिनीवर पडून फुटला. सगळ्याच वन्यजीव प्रेमींचा विरोध आपसूक मावळला. काहीही करून माकडाला पकडा असा आदेश मिळाला. तरीही माकड कोणाच्या हाती लागेना. माकडाला केळी वगैरेचे आमिष देऊन बाहेर काढायचा प्रयत्न झाला. पण माकड केळी घेऊन झाडावर बसायचं. आणि खाऊन झालं की परत गोंधळ घालायचं.
अगदी माकडाला हिप्नोटाईझ करण्यासाठी एका सायकॉलजिस्टला बोलावले. त्याचाही कडून काही झाले नाही. शेवटी एका मांत्रिकाला बोलावण्यात आले. मांत्रिकाने बऱ्याच वेळ माकडाचे निरीक्षण केले. कंपनीतले सगळे पदाधिकारी मांत्रिकाकडे बघत होते.
तो म्हणाला, " हे तंत्र मंत्राचे काम नव्हे. ह्याचे ह्या कंपनीशी काहीतरी जुने नाते आहे. कदाचित हा इथलाच कर्मचारी असावा मागच्या जन्मी"
"मग आता काय करायचं?", व्हीपी म्हणाले.
"ह्याला तुमच्या कार्पोरेट पद्धतीने हाताळावे लागेल. म्हणजे ह्याला आधी खूप हसवायचे. अन नंतर खूप रडवायचे. ते झाल्यावर हा आपसूकच कंटाळून निघून जाईल."
झालं !! लगेच माकडाला हसवायचे प्रयत्न सुरु झाले. पण शेवटी जुनं-जाणंत कार्पोरेट माकड होतं ते ! ते काय ह्यांना दाद देतंय. सगळे इंजिनियर्स, मॅनेजर्स प्रयत्न करून थकले.
सरतेशेवटी कंपनीचा सगळ्यात जुना कर्मचारी असलेला एक ऑफिसबॉय समोर आला.
"साहेब, मी प्रयत्न करू का?"
सगळे हसायला लागले.
पण व्हीपी म्हणाले," शांत बसा सगळ्यांनी.. कर रे बंडू तू प्रयत्न .."
बंडू माकडाजवळ गेला. आणि माकडाच्या कानात त्याने काहीतरी सांगितले.
ते ऐकताच माकड जोरजोरात हसायला लागले. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं.
व्हीपी बंडूला म्हणाले," काय सांगितलंस तू त्याला?"
"काही नाही हो... मी त्याला म्हटलं. आमचा कंपनीत एक मोठा प्रॉब्लेम झालायं. आणि आता सगळे इंजिनीअर आणि मॅनेजर मिळून तो प्रॉब्लेम सोडवणार आहे. हे ऐकून तो हसायला लागला."
व्हीपीसुद्धा हसायला लागले.
"बरं..मग आता रडवणार कसं?"
बंडूनी परत त्या माकडाच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून माकड रडायला लागला.
"आता काय सांगितलं तू त्याला?" व्हीपी म्हणाले.
"काही नाही हो. मी म्हणालो, की अरे तो जो मोठा प्रॉब्लेम झालं होता ना तो आमच्या इंजिनीयर्स आणि मॅनेजर्सनी सोडवला बघ. हे ऐकून त्याला रडू आलं."
आता सगळ्यांचे चेहरे बघण्यालायक झाले होते. व्हीपीना हसू आवरत नव्हतं. थोड्यावेळात एक मॅनेजर कुत्सितपणे बोलला.
"सर, हसवून झालं, रडवून झालं. पण माकड तर अजून इथेच आहे. त्याचं काय?"
हे ऐकून बंडू विचारात पडला. आणि दोन मिनिट विचार केल्यावर त्याने परत माकडाच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकताच माकड धूम पळाला.
आता सगळ्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. कुजबुज सुरु झाली.
बंडू म्हणाला," चला साहेब. आता नाही येत तो परत.."
"अरे पण सांगितलं काय तू त्याला?"
"ते जाऊ द्या ना साहेब..गेला तो आता."
व्हीपी चिडून म्हणाले," बंड्या..लेका..तू अन मी सोबतच लागलो ह्या कपंनीत. जी समस्या मी नाही सोडवू शकलो ती तू सोडवली. तू त्याला काय सांगितलं ते मला कळायला हवं. नाहीतर तुझी नोकरी खाऊन मी सुद्धा राजीनामा देईल आज... लक्षात ठेव.."
"अहो..जाऊ द्या ना साहेब.."
"सांगावंच लागेल तुला.."
"अहो काही नाही.. मी त्याला एवढंच म्हणालो.. की आत्ता जो मोठा प्रॉब्लेम साहेबलोकांनी सोडवलाय ना त्याचं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तुला दाखवणार आहे. तेवढं बघून जा...हे ऐकून तो पळाला साहेब"समाप्त मूळ कथा : अनामिक लेखक शब्दांकन : चिनार..
प्रतिक्रिया
ह्या ह्या ह्या एक नंबर
लै म्हणजे लै म्हणजे लैच झ्याक
ठ्ठो ! =)) =)) =))
लै भारी
1 नंबर, शेअर करायची इच्छा आहे
करा... नावासकट
माकडाच्या ?
lol
=))))
पुरेपूर
व्हॅट्स जोकला कथा बनवायचे कौशल्य अफलातून आहे
व्हॅट्सअप्पा जोकला कथा बनवायचे कौशल्य अफलातून आहे
मस्त रे
ही BARC मधली ४० वर्षे जुनी स्टोरी आहे.
ती स्टोरी कुठे मिळेल वाचायला?
हाहाहा
जुनी कथा
ह्या .... ह्या .... ह्या ....
झक्कास
मजा आली वाचताना. >> +११११
हा हा हा हा मजा आली.
+१११११
हा हा हा !!!