युगांतर - आरंभ अंताचा भाग 20

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
4 Aug 2019 - 3:49 pm

गर्द झाडी आणि हवेतला पहाटेचा आल्हाददायक गारवा मनाला सुखावत होता. पंडू, कुंती आणि पंडूची द्वितीय पत्नी मद्रनरेशकन्या माद्री वनविहाराला आले होते. फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर उडत होती. भुंगे गुंजारव करत होते. तितक्यात एक सुंदर हरिण उंच वाढलेल्या गवतातून पळताना पंडूला दिसले. आहाहा! काय ते रुप! सुवर्ण कांती! पंडूने धनुष्य हातात घेतले आणि हरिणामागे धावत गेला.
कुंती आणि माद्री वनातल्या फुलांना बघत पक्षांची किलबिल ऐकत कितीतरी वेळ पंडूची वाट पाहत होत्या. सुर्यदेवांचे दर्शन घेत सुर्यफुले पिवळ्या धमक रंगात शोभून दिसत होती. वाऱ्यावर झुलत होती. दुपार होत आली आणि पंडू परत आला.
चेहऱ्यावर भिती, त्रास, घुसमट असे भाव.....कपाळावर घामाच्या थेंबांनी नक्षी बनली होती. आल्या आल्या गवतावर तो जवळ जवळ कोसळलाच!
"काय झाले आर्य?"
"ते... ते हरिण नव्हते!"
"म्हणजे आर्य?"
"किंदम ऋषी होते."
"ऋषी?"
"त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नीही होत्या.... हरिण रुप घेऊन! वनविहारा करता आले होते ते...... पण मला कसे कळणार होते ते ? कसे कळणार होते, कुंती.... मी.... " पंडूच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. कुंती आणि माद्री घाबरल्या.
"बोला, आर्य."
"नकळत एका ऋषी जोडप्याची हत्या झाली माझ्या हातून, कुंती.... ब्रह्म हत्या झाली." पंडू थरथरत गुडघ्यांत डोके खुपसून रडू लागला.
काही क्षण तिघे तसेच बसून राहिले. काय करावे हेच कुंती आणि माद्रीला समजेना.
"आर्य..... चला, आपण महालात जाऊ." कुंतीने आणि माद्रीने पंडूला आधार देत महालाकडे प्रस्थान केले.
पंडूची खालावलेली तब्येत भीष्मांना चिंताजनक वाटत होती. राजवैद्यांनी तपासणी केली. पण कारण काही कळेना. नेहमी वैद्यांच्या पहाऱ्यात सुरक्षित ठेवलेल्या पंडुला नक्की काय झाल्याने त्याची तब्ब्येत एवढी बिघडली असावी, याचे कोडे भीष्मांना पडलेले होते.
"तातश्री, परवानगी आहे?"
"या महाराज. कुशल आहात ना?"
"हो तातश्री.... मी एक निर्णय घेतलाय. तुमचा आशिर्वाद हवा आहे."
"तुम्ही अयोग्य निर्णय घेणारच नाही महाराज. माझी सहमती आहे."
"मी वनात रहायला जायचे ठरवलेले आहे, तातश्री."
"काय? कश्यासाठी महाराज पंडू?"
"तातश्री.... आता तरी मला महाराज म्हणू नका. मी या पदाचा आणि राजगादीचा त्याग करतो आहे."
"पण का? काय झाले आहे? हा असा अविचारी निर्णय का घेतोयस तू?"
"न्यायसंमत आहे म्हणून."
"आपल्या वंशजांनी घाम, रक्त आणि गरज पडेल तेव्हा माना अर्पण करत प्राणपणाने जपलेल्या राजगादीला बेवारस करून कोणाला न्याय देतो आहेस तु, पंडु?"
"तुम्ही अजेय आहात, तातश्री. वैचारिक युध्दात तुम्हाला कोण जिंकू शकेल! म्हणून विनंती आहे. कृपा करून मला भावनाविवश करू नका, तातश्री."
"निदान या अधर्माचं कारण कळेल?"
"अधर्म?"
"तू या हस्तिनापुरास वाऱ्यावर सोडतो आहेस पंडू. तुला माहिती आहे की धृतराष्ट्राचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. हे ही माहित आहे की राजगादी धारण करण्यायोग्य वर्तमानात तु सोडून दुसरा राजपरिवाराचा सदस्य कुणी नाही. तरीही तू तुझ्यावर असणाऱ्या जवाबदाऱ्या झटकून चालला आहेस. हा अधर्म नाही तर काय आहे पंडू?"
"पापाच्या ओझ्याखाली धसलेला या राज्याचा भार कसा पेलणार तातश्री?"
"पाप? तू पाप केलेस? कोणते पाप पंडु?"
"ब्रह्महत्या!"
"ब्रह्म हत्या? काय बडबडतो आहेस पंडू.... तु केलीस ब्रह्महत्या?" त्यांना विश्वासच बसेना.
"घडली.... नकळत.... चुकून घडली..... माझ्याच हातून घडली. हरणाचे रुप पाहून फसलो. शिकारीचा मोह आवरता आला नाही मला. प्रत्यंच्या बांधली आणि बाण सोडला मी.... ते किंदम ऋषी आणि त्यांच्या पत्नी होत्या. ब्रह्महत्त्या माझ्या बाणाने झाली, तातश्री. माझ्या बाणाने." भीष्मांच्या चेहऱ्यावर निराशेची छटा पसरली. सुन्न होऊन उभे राहिले. 'नियतीला बोल लावावेत की पंडुच्या नशिबाला? की हस्तिनापुर राजगादीचं दैव आहे दोषी?'
"क्षमा असावी पण महाराजांना प्रायश्चित्तच घ्यायचे असेल तर ते त्यांनी महालातच राहून घ्यावे." विदुर राजसभागृहात येत म्हणाला.
"नाही मंत्रीवर विदूर."
"का नाही पंडू?"
"तातश्री, तुम्ही आणि विदुर न्याय आणि धर्म जाणता. विदुर तर धर्मात्मा म्हणून ओळखले जातात. तुम्हीच सांगा ब्रह्म हत्या करणारा एक राजा बनण्यास पात्र असतो? किंवा एखादा राजघराण्याचा सदस्य असल्याने त्याला पाप करायची मुभा मिळते? तो दंडास पात्र राहत नाही?" त्याने दोघांकडे बघितले. दोघेही शांत राहिले. "या मौनानेच उत्तर दिलेत तुम्ही. मला अडवू नका. मी राजपाट सोडत आहे, महाल सोडत आहे, पण हस्तिनापुर आणि तुम्हासर्वांशी असलेले नाते..... ते कधीच तुटणार नाही."
नमस्कार करून तो निघाला. सोबत कुंती आणि माद्रीही निघाल्या. राजमहाल असो, वा वनवास.... पुण्यवाटा असो वा पापात भागीदारी.... सगळ्यात पतीसोबत! पतीच्या ठायी इतकी निष्ठा कुठून आणतात? विदुर, भीष्म बघतच राहिले. 'काळाचे ग्रहण अध:पतनाकडे घेऊन चालले आहे हस्तिनापुराला आणि हस्तिनापुराचा हा दास.... हा भीष्म.... भीष्म काय करु शकतो तुझ्यासाठी हस्तिनापुरा? काय करु शकतो?'
शकुनीला मात्र आशेचा एक किरण दिसत होता. गुडघ्याच्या खोब्यात धारदार सुऱ्याने केलेला खोल घाव! जखमेतून मेंदूकडे जाणारी वेदनेची प्रत्येक लहर त्याच्या मनात प्रतिशोधचा अग्नि पेटवत होता. बदल्याची खूणगाठ! आता मात्र त्या जखमेवर खपली चढू पाहत होती. गांधारीला तिचा अधिकार मिळणार, राणीपद मिळणार, या विचारांनी तो खूष झाला.
पंडूने वनात प्रवेश केला. तिचं वेळ, तेच ठिकाण, तिच वनराई.... घडलेल्या प्रसंगाची आठवण होऊन तो दु:खी झाला.
"ठिक आहात ना आर्य?"
"हे वन बघ कुंती. माझ्या अपराधाची ग्वाही देतय.... किंदम ऋषी.... हरणाचे रुप.....माझे धनुष्य.....भात्यातले बाण...."
"आर्य, शांत व्हा. जे झाले आहे ते चुकून झालेले आहे तुमच्या कडून."
"पण किंदम ऋषी...."
"आर्य, आत्मक्लेश केल्याने भुतकाळ बदलेल का? आपण प्रायश्चित्त घ्यायला आलो आहे. मग असं निराशेने ते पूर्णत्वाला कसे जाईल?" माद्रीचे म्हणणे खरे होते. कितीही प्रलाप केला, तरी ना किंदम ऋषींचा प्राण परत मिळणार होता, ना त्यांनी दिलेला भयंकर शाप!
वनात लहानशी कुटी बांधून तिथली जमीन नांगरायला पंडुने सुरवात केली. दिवसभर कृषीसंदर्भातली कामे करून त्याने मनाला दु:खद आठवणींपासून दूर ठेवत होता. कुंती आणि माद्रीला पहिल्या सारखा वेळही तो देत नसे. सोबत हसणे बोलणे ही अगदी जेव्हड्यास तेव्हडे. नेहमी प्रमाणे पंडु कुटीत रात्री उशीरा परत आला. कुंती त्याची वाट बघत जागी होती. जेवण करून पंडु हात धुऊन येउन बसला. कुंती त्याच्या कडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होत.
"काय झाले कुंती?"
"काही नाही आर्य."
"मग हे अश्रू?"
"तुम्ही आजकाल आमच्यासोबत नीट बोलत ही नाही, आर्य. आमचे काही चुकले आहे का?"
"नाही, कुंती. असे काही नाही."
"मग काय झाले आहे? अश्या तुटक वागण्याचे काय कारण आहे? का वागता आहात असे?"
"कुंती.... मनात प्रेमाअतिरिक्त अजून काहीही येऊ नये म्हणून!"
"म्हणजे काय आर्य?" कुंती काळजीने पंडुजवळ येणार तितक्यात पंडु म्हणाला, "थांब कुंती. जवळ येऊ नकोस. मनावर संयम ठेवणे कठीण होते मग...."
"संयम? काय आहे जे दडवत आहात, आर्य? कसले दु:ख आहे तुम्हाला जे तुमच्या या जीवनसंगिनीला माहितच नाही?"
पंडुला डोळ्यांसमोर किंदम ऋषी दिसू लागले.... त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या शरीरातून आरपार घुसलेल्या बाणाच्या टोकावरून जमिनीवर ओघळणारे रक्ताचे थेंब पंडुच्या मनावर अग्निकणांच्या दाहकतेने त्याला आतून जाळू लागले.
"एक विषारी सत्य! मरण्यापूर्वी.... किंदम ऋषींनी शाप दिला होता मला ."
"काय सांगता आहात आर्य? शाप?"
"हो, कुंती. मी जर कोणत्याही स्त्री जवळ शरीरसुखाच्या अपेक्षेने गेलो, तर..."
"तर ?"
"तर.... तुम्हा दोघींना वैधव्य येईल, कुंती" अपराधी भावनेने त्याने सांगितले. कुंती कोसळली.
'श्रावणबाळाच्या आई वडिलांनी दिलेला शाप...."दशरथा... तुझाही आमच्यासारखा पुत्रविरहाच्या दु:खाने मृत्यू होईल." भयंकर! प्राण त्यागताना दिलेला शाप...... तोही आणि हाही! असे शाप खरे सिद्ध होतात, आर्य! काय झालं हे!' मनातल्या मनात कुंती भीषण सत्याला सामोरी जात होती.

©मधुरा

धर्मलेख