राखी बैल दिवे आरसा निवत

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Aug 2019 - 3:44 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

गावात राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गावातला बामन राख्या बांधायला यायचा. ‘उद्याची राखीपौर्णिमा’ म्हणत घरातल्या लहान मुलांना- पुरुषांना राख्या बांधायचा. या राख्या रंगवलेल्या दोर्‍याच्या आणि लाल- पिवळ्या कापसाच्या छोट्या छोट्या गोंड्यांच्या असत. या बदल्यात त्याच्या झोळीत आई सुपड्यातून बाजरी द्यायची.
एकादशीच्या आदल्या दिवशीही बामन यायचा. आणि दारातूनच ‘उद्याची एकादशी’ म्हणायचा. बर्‍याच लोकांना दुसर्‍या दिवशी एकादशी आहे, हे माहीत नसायचं. त्या काळात सगळ्याच लोकांच्या घरात भिंतीवर कॅलेंडरं नव्हती. (काही लोक पंचांग पाहून तिथ्या सांगायचे.) म्हणून पंत भट गावभर ‘उद्याची एकादशी’ सांगायचा. आणि गावातल्या प्रत्येक घरातून त्याच्या झोळीत धान्य दिलं जायचं.
पोळा दोन चार दिवस पुढे असायचा या दरम्यान गावातली कुंभारीन मावशी डोक्यावर डालकं घेऊन घरोघरी यायची. घरातल्या ओसरीत डोक्यावरचं डालकं हळूच खाली ठेवून बैठक मारायची. तिच्या डालक्यातून मातीचे लहान सहा बैल आणि सातवी घोडी जमिनीवर रांगेने मांडायची. त्या बदल्यात आई तिला धान्य द्यायची. धान्य मिळताच लगेच ती मावशी दुसर्‍या घरी जायची. असे ती गावभर मातीचे बैल वाटायची. सहा बैलांसोबत सातवी घोडीच का? गाय का नाही? हा प्रश्न मनात सतवायचा. ‍मी घरात विचारायचोही. पण उत्तर मिळायचं नाही. अजूनही मला याचं उत्तर माहीत नाही. पोळ्याच्या दिवशी सकाळी या बैलांना (आणि घोडीलाही) गेरूचा रंग देऊन त्यांना पाटावर ठेवावं लागायचं. त्यांच्या समोर थोडा गहू रांगेने टाकावा लागायचा. प्रत्येक पोळ्याला या मातीच्या बैलांना गेरूचा रंग देण्याचं काम माझ्याकडे होतं. मला ते काम आवडायचं.
मातीचे बैल देण्यासाठी पोळ्याच्या सणाला जशी कुंभारीन मावशी घरी यायची, तशी आखाजीची काळी घागर देण्यासाठी मात्र यायची नाही. घागर आणण्यासाठी तिच्या घरी जावं लागायचं. घागरीच्या बदल्यात शक्यतो पैसेच द्यावे लागायचे. मग ती काळी घागर घरी आणून तिच्यात पाणी भरून ठेवायचं. घागरीच्या तोंडावर डांगर ठेवलं जाई. डांगरावर खापराची संपूर्ण पोळी, कुरडई वगैरे नैवद्य ठेवला जायचा व त्या काळ्या घागरीची आई पूजा करायची.
अमावस्येच्या संध्याकाळी मारुतीला संपूर्ण गाव दिवे घालायला जायचं. आमच्या घरातले दिवे घेऊन जायचं काम माझ्याकडे होतं. एका ताटलीत गव्हाच्या पिठाचे दोन दिवे. दिव्यात तेल व वाता. वाता पेटवायच्या. दिव्यांच्या शेजारी थोडं मिठ, पिठ आणि मिरच्या घेऊन पारावर जायचं. एका हातात दिव्यांची ताटली आणि दिवे विझू नयेत म्हणून दुसरा हाताचा आडोसा करत हे पेटते दिवे घेऊन गल्लीने पारापर्यंत जावं लागायचं. मारूतीच्या मंदिरात सुंदरा गुरीन आपली वाटच पहात असल्यासारखी बसलेली असायची. खूप घाईत असल्यासारखी पटकन आमच्या हातातून ती ताटली घ्यायची. पेटत्या वाता बोटांनी दगडी दिव्यात टाकायची. दिव्यातलं तेल तिच्या बरणीत ओतायची. दिव्यांचा दोन्ही हाताने गोळा करून तिच्या कढईत टाकायची. एका टोपलीत वेगवेगळ्या कापडांचे खाते केल्यासारखे मिरच्या मिरच्यांच्या खात्यात, मिठ मिठाच्या खात्यात ओतून ज्याची ताटली त्याला रिकामी परत करायची.
दिवाळीच्या दिवशी गावातल्या काही बाया घरी ओवाळायला यायच्या. या बाया रोज मजूरी करणार्‍या असायच्या. त्यांनी ओवाळल्यावर त्यांच्या ताटात पैसे टाकावे लागायचे.
दिवाळीच्याच दिवशी गावातला न्हावी हातात आरसा घेऊन घरोघरी फिरायचा. कुटुंब प्रमुखाला आरसा दाखवून त्यांच्याकडून पैसे मागायचा. लहानपणी माझी उत्सुकता म्हणून त्याच्या हातातला आरसा हिसकावून मी पण त्यात तोंड पाहिलं. पण घरातल्या आरश्यासारखाच मी त्यात दिसलो.
गावात कोणाचं लग्न असलं की गावातला न्हावी गावात निवत द्यायला फिरायचा. प्रत्येक घराला निमंत्रण नसायचं. ज्याचं जसं गोत तसं निमंत्रणं असायची. न्हावी घराच्या दाराजवळ येऊन सांगायचा, ‘अमूकना आठलं लगनना जेवननं निवत शे.’ हे निमंत्रण जर घरातल्या सगळ्या माणसांना असलं तर त्याला ‘चुल्याला निवत’ म्हणायचे. न्हावी निवत सांगायला आला आणि त्या घराला कुलुप असलं तर न्हावी गल्लीतून शेण शोधून ते कुलपाला लावून जायचा. म्हणजे घर मालक बाहेरून वा शेतातून घरी आला की कुलपाला लावलेलं शेण पाहून, गावात अमूक यांच्याकडे लग्न आहे; म्हणजे आपल्याला तिथलं जेवणाचं निमंत्रण आहे, असं समजायचा.
आता या लोकपरंपरा नामशेष झाल्या. या परंपरा योग्य होत्या का अयोग्य हे ठरवण्याआधी, अशा काही परंपरांमुळे काही अलुत्या- बलुत्यांची पोटं भरत होती हे नक्की. असं करणारे हे लोक भिक्षुक होते, असंही म्हणता येणार नाही. त्यांचा तो हक्क होता. आणि हक्क असल्यासारखेच ते या लोकपरंपरा पाळायचे. अशा लोकपरंपरा नामशेष झाल्याने सगळ्यांनाच आता चरितार्थासाठी नवे रोजगार शोधावे लागताहेत.
(लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

1 Aug 2019 - 4:03 pm | विनिता००२

छान लिहीलेत :)

जुन्या परंपरा खरंच अस्तंगत होत आहेत. आमुशावाली आवस मागायला यायची, आता दिसत नाही :(

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Aug 2019 - 10:46 am | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

यशोधरा's picture

1 Aug 2019 - 4:14 pm | यशोधरा

आवडले हे लिखाण.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Aug 2019 - 10:46 am | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

वकील साहेब's picture

1 Aug 2019 - 5:15 pm | वकील साहेब

आमच्या कडे अजूनही एक बाई आणि तिची सून अमावस्येच्या दिवशी सक्काळी सक्काळी डोक्यावर पाटी घेऊन आवस घ्यायला येते. मोठ्याने आवाज देते "आवस वाढ आवस" तिच्या आवाजाने माझी झोपमोड होत असे म्हणून मला तिचा फार राग येत असे. आता मी लवकर उठतो म्हणून तिच्या आवाजाने झोपमोड होत नाही. म्हणून रागही येत नाही.
दिवाळीच्या १० -१५ दिवस अगोदर शेतमजुरांची मुळे हातात लाकडाच्या तलवारी घेऊन त्याला लाल सफेद रंग देऊन ८-१० च्या घोळक्याने प्रत्येक घरा घरात जातात. आणि एकसुरात आवाज देतात. "येउंद्या रे येउंद्या वाघ्याची गोर वाघ्याच." मग प्रत्येक घरातून त्यांना तेल, मीठ, मिरची, तांदूळ, कोरडे पीठ किवा पैसे असे काहीतरी देतात. ते घेऊन ते रानातल्या "वाघ्या" देवा पुढे वसुबारसेच्या दिवशी शिजवून त्याचा नैवेद्य दाखवतात. आणि स्वतःही खातात. ही प्रथा अजूनही सुरु आहे. ते फक्त दिवाळीच्याच अगोदर येतात. त्यांचा हक्क घ्यायला. इतर दिवशी नाही येत.
दुसरा एक प्रकार म्हणजे त्यांच्या पेक्षा थोडी मोठी मुले जी दुसऱ्यांच्या गायी राखतात. ते दिवाळीच्या दिवसातील गवत जे पूर्ण वाढलेले असते, हिरवे गार असते त्याची बारीक विण करून नागाच्या फणी सारखी आकृती तयार करतात. त्यात पेटती पणती ठेवतात. नागाची फणी ही नागमण्यावर सर्पाने सावली धरावी तशी असते. ते घेऊन ८-१० च्या घोळक्याने ते मुलं ज्या ज्या घरात गायी म्हशी असतील त्या घरात जाऊन प्रातिनिधिक म्हणून एका गाईला ओवाळतात. तेव्हा गायीवर रचलेली अत्यंत श्रवणीय गाणी म्हणतात. गाणी संपल्यावर घरातील माऊली त्यांना तेल, मीठ, मिरची, तांदूळ, कोरडे पीठ किवा पैसे असे काहीतरी देते.
या प्रथा अजूनही सुरु आहेत.

यशोधरा's picture

1 Aug 2019 - 5:24 pm | यशोधरा

मस्त माहिती.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Aug 2019 - 10:48 am | डॉ. सुधीर राजार...

छान वाटले आपली प्रतिक्रिया वाचून

कधी कधी वाटतं कालाय तस्मै नमः हे योग्यच आहे.
आता चारितार्थचे मार्ग बदलत आहेत म्हणून संस्कृती बदलत आहे, संस्कृतीवर चरितार्थ अवलंबून होता ऐसे मानणे स्वतःचीच फसवणूक होय.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Aug 2019 - 10:49 am | डॉ. सुधीर राजार...

बरोबर
धन्यवाद

जालिम लोशन's picture

1 Aug 2019 - 5:19 pm | जालिम लोशन

खानदेशातील पंरपरा आहेत वाटत, नक्की माहीत नाही.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Aug 2019 - 10:49 am | डॉ. सुधीर राजार...

बरोबर
धन्यवाद

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 5:57 pm | मुक्त विहारि

ह्या काही गोष्टी मस्तच होत्या. ..

आमच्या कोकणात शंकासुर असतो.

आता ह्या श्रावणात पण काही प्रथा असतीलच. माहिती मिळाली की लिहीन.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Aug 2019 - 10:50 am | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Aug 2019 - 7:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

मला बर्‍याच गोष्टीत हा फरक जाणवतो. कल्याणला असताना दहीहंडीच्या दिवशी मुले गटा गटाने घरोघरी जायची आणि "गोविन्दा गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा" असे ओरडत पाणी मागत फिरायची. मग त्यांच्या डोक्यावर बादलीने पाणी घालायचे आणि दहीपोहे द्यायचे.
गणपतीला मिरवत झांजा वाजवत घरी आणायचे. पुण्यात मात्र गणपतीच्या मुसक्या बांधुन आणि त्याचे तोंड आपल्याकडे करुन घरी आणतात, म्हणे दृष्ट लागु नये म्हणुन. एकेक नवीनच.

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 8:01 pm | मुक्त विहारि

श्रीखंडाचे पाणी पण पियुष म्हणून पितात आणि गटारगंगेला नदी म्हणतात.

काही मिपाकर आहेत म्हणून पुणे जिवंत आहे. साधं गणपतीचे विसर्जन पण वेळेत करता येत नाही, ह्या पुणेकरांना...

यशोधरा's picture

2 Aug 2019 - 10:59 am | यशोधरा

मुविकाका, जाऊद्या. तुम्ही रोपे लावा, रोपे जगवा आणि काय ते.. हां, बीयर प्या बरं.

पुणेकरांना गणपतीला निरोप द्यायला जीवावर येतं, म्हणून रेंगाळतात ते जितकं शक्य होईल तितके. लोड नका घेऊ बरं तुम्ही.

वकील साहेब's picture

1 Aug 2019 - 10:11 pm | वकील साहेब

आमच्याकडे होळीच्या दिवशी मुले पोत्याची किंवा गोणीची झोळी करून घरा घरात गोवऱ्या मागत फिरायचे. होळी होळीच्या दहा दहा गवऱ्या पाच पाच लाकडं दिलेच पाहिजे असं ओरडायचे. आणि त्याप्रमाणे वसुलही करायचे. पण आता कोणाच्या घरात ना गोवऱ्या ना लाकडं. आता होळीच्या दिवशी गोवऱ्या लाकडं विकत आणून होळी साजरी करतात.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Aug 2019 - 10:51 am | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

खूप विचित्रही प्रथा आहेत

नि३सोलपुरकर's picture

2 Aug 2019 - 3:23 pm | नि३सोलपुरकर

" दे दान सुटे गिराण "
अशी हाळी देत काही बायका यायच्या विशेषतः ग्रहण संपल्यावर आणि कोरडे पीठ किवा पैसे घेत .

अवांतर : " आमच्याकडे होळीच्या दिवशी मुले पोत्याची किंवा गोणीची झोळी करून घरा घरात गोवऱ्या मागत फिरायचे. होळी होळीच्या दहा दहा गवऱ्या पाच पाच लाकडं दिलेच पाहिजे असं ओरडायचे. आणि त्याप्रमाणे वसुलही करायचे. - जुन्या आठवणी ताज्या झाल्या .. वकील साहेब धन्यवाद _/\_.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Aug 2019 - 4:34 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

प्रमोद देर्देकर's picture

2 Aug 2019 - 7:34 pm | प्रमोद देर्देकर

मस्त माहिती यावे दे अजून.
अलूतेदार आणि बलुतेदार एकमेकांना सांभाळून सवरून गुण्यागोविंदाने रहात होते पूर्वी.
प्रत्येकानं आपापल्या गावच्या प्रथा इथं किंवा वेगळा धागा काढून लिहा बरं.
म्हणजे एक नवीन माहिती संग्रहित होईल.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Aug 2019 - 4:34 pm | डॉ. सुधीर राजार...

खरं आहे सहमत
धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

2 Aug 2019 - 7:57 pm | सुधीर कांदळकर

जागवणारा मस्त लेख आवडला.

ग्रहण सुटल्यानंतर दे दान सुटे गिरान
ही घोषणा मी मुंबईत बरीच वर्षे ऐकलेली आहे.

मुंबईत होळीच्या दिवशी खेळे फिरत आणि नाच करून पैसे मागत. यात बहुतेक कलाकार पूर्वीचे रामागडी आणि हौशी गिरणी कामगार असत. मुख्य म्हणजे नाचात स्त्रीभूमिका पुरुषच करीत आणि त्या स्त्री पार्टी नटाला `गोमू' म्हणत.

होळीच्या नाचातल्या काळ्या वेषातल्या शंखासुराची मला लहानपणी खूप भीती वाटे. हा शंखासूर असल्यामुळे याची काळी टोपी टोक वर असलेल्या शंखाच्या आकृतीची असे. टोकाला काळा गोंडा देखील असे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Aug 2019 - 4:35 pm | डॉ. सुधीर राजार...

बरोबर