किलबील किलबील पक्षी बोलती(२)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
26 Jul 2019 - 7:11 am

मागील दुवा http://misalpav.com/node/44903

चित्र पाहून झाल्यावर त्यानी आपल्या पाठीवर थाप मारली , घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. फार काही बोलले नाहीत पण म्हणाले आज मी चित्र कानांनी ऐकली. सनै चौघड्याचे आवाज, राज्याभिषेकाचे मंत्रघोष , गर्दीतली दबकी कुजबूज, सगळं ऐकू आलं रे, बोलकी चित्रे काढतोस.म्हणत खूप वेळ आपला हात हातात घेवून काही न बोलता त्यावर नुसते थोपटत राहीले.

आर्ट्स स्कूल ला असताना चित्र कसे पहावे याचे गायतोंडे सर खूप सुंदर प्रात्यक्षीक द्यायचे. त्यांनीच तर शिकवलं होतं हे.
आपली चित्रं बोलकी असतात. त्यातुन शब्द ऐकायला येतात , गंध स्पर्ष अनुभवायला मिळतो हा अनुभव अगदीच नवा नव्हता पण तसा फार जुना ही नव्हता. चित्र पहायला आलेले लोक तसं म्हणायचे पण आपण स्वतःही हा अनुभव घेतला होत. राज्याभिषेकाच्या चित्रात दरबारी मानकर्‍यांचे चेहेरे आपल्याकडे माना वळवून पहातात , त्यांच्या कपड्यांची सळसळ ऐकु येते हा अनुभव आपण स्वतः घेतला होता.
चित्राकडे एकटक पहात रहायचे, कुठल्यातरी एका जादूच्या क्षणी ते चित्र जिवंत होते.अगदी जणू आपण त्या चित्रातलाच एक घटक आहोत इतका खट्ट अनुभव येतो. चित्रातले झरे खळखळ वहात असतात, मुलांचे पतंग फर्र फर्र आवाज करत डोक्यावर गिरक्या मारतात , पिंपळाचे पान न पान सळसळतं. आकाशातल्या टिटव्यांचा टिवटिवाट कानाना दुरूनही ऐकता येतो. माळावरचा भणाणणारा वारा कानात शिट्टी वाजवतो...जणु चित्र काढताना मनात असलेल्या सगळ्या गोष्टी समोर पुन्हा पुन्हा जिवंत होऊन येतात.
आतासुद्धा डोंगरे सर फळ्यावरच्या चित्राकडे टक लावून पहात होते. फळ्यावरची ती चांदण्यासारखी दिसणारी अक्षरे मनात साठवून ठेवत होते " सुंदर अक्षर " मधील "क्ष" त्याना कृत्तीकेच्या नक्षत्रासारखं दिसायला लागलं. काल्या अथांग अवकाशात झगमगणारं.

अवकाशात कुथेतरी या सगळ्याचा नियंता आहे अशी जाणीव झाली. डोंगरे सरांचे डोळे आपोआप मिटले. हात जोडले गेले दोन क्षण तीन चार सात दहा पंधरा … किती वेळ गेला क्प्ण जाणे डोंगरे सरांच्या हाताला एक धक्का जाणवला. कोणीतरी हातावर थापट्या मारत होते. सरांनी डोळे उघडले , समोर काल्या अवकाशाशिवाय काहीच दिसत नव्हते.
सर सर काय झाले सर.... महादेव शिपाई हातावर थापट्या मारत होता. " सर काय झालं सर? चक्कर आली का? पाणी आणू का? बसा जरा सर म्हणत महादेव ने हात देत सरांना जवळच्या स्टुलावर बसवले . त्यांना तसे बसवून महादेव पाणी आणायला गेला.
डोंगरे सर स्वतःशीच हसतात. चित्र पहाताना तंद्री लागली होती. ते चित्रातली नजर काढुन इतरत्र फिरवतात चित्रकला वर्गातल्या डिस्प्ले बोर्डवर लावलेल्या मुलांच्या चित्रांवरुन त्यांची नजर फिरत रहाते. लाल काळे हिरवे पिवळे वेडेवाकडे आकार मांडलेले मॉडर्न आर्ट , फळे बादली ,फुले असलेले स्टील लाईफ , बी २ च्या जाड पेन्सीलीने शेडवर्क केलेली पोर्ट्रेट्स , सूर्योदयाचा देखावा, गुलमोहोराच्या छायेतले कौलारू घर . कितीतरी वर्षे मुले हीच चित्रे काढताहेत. चित्राखालची नावे बदलतात पण चित्रं तेच असतं.
हे म्हणजे रस्त्यावरची माणसं बदलत जातात , रस्ता तोच रहातो. असं झालं. पण हे म्हणणे चुकीचे आहे. पूर्वी पाऊलवाटा होत्या. अंगावर धूळ वागवत कडेला वडा पिंपळाची झाडे सोबतीला देत त्या लोकाम्ना इकडून तिकडे घेवून जायच्या. धुळीत आपली पहिलीच पावले उमटवत एखादे पोर आईचा हात धरुन गेलेले असायचे, आईच्या मोठ्या पावलासोबत मुलाची इवलाली पावले त्या धुळीत उमटलेली स्पष्ट दिसायची. पावसाळ्यात ती पाऊलवाट गवतासोबत रमतगमत तर कधी दुडक्या चालीने वळणांवरून मनसोक्त बागडत एखाद्या कौलांरू घराकडे घेऊन जाई. विटकरी लाल मातीच्या वाटेवरून सारवलेल्या अंगणापर्यंत मऊ लुसलुशीत हिरव्या कच्च गवतासोबत मनसोक्त खेळत लालचुटूक कौलांवर निळ्या हिरव्या ची नक्षी साम्डणार्‍या आवळीच्या झाडापर्यंत नजर सहज जायची. सोबत खांड्यावर वाकळ घेतलेला एखादा धनगर मेंढरं चारत असायचा. चित्रं कोणतं आणि वास्तव कोणतं हेच कळायचं नाही. रस्ते साधे होते. माणसे साधी होती. आता रस्ते डांबरी झाले. माणसांची सोबत साम्गणार्‍या पाऊलखुणा सम्पल्या. कोण आल एकोण गेले हे सांगणारा संवाद सम्पला. रस्ते डांबरी झाले तशी माणसेही डांबरट झाली.
सर चहा घ्या. चहाचा कप पुढे करत महादेव म्हणाला." काय झाले सर" चक्कर आली का? बरे नाहीये का सर ?
काही नाही. असंच जरा चित्र काढत होतो. काय काढावं तो विचार करत होतो.
काय म्हणजे? चित्र काढायला विचार कसला करायचा? घ्यायचे दोनचार खडू आणि काढायची . पानं फुलं पण एक आहे सर ते तुम्हीच करावं. आपलं काम नाही. आम्ही काय फार तर फळा स्वच्छ पुसून देणार. एकदम चकाचक करून देणार. ...काय. हॅ हॅ हॅ.... महादेव ओशाळवाणं हसला. फळा स्वच्च। चकाचक करून देणे यात हसण्यासारखं काय होतं कोण जाणे.
पण सर एक सांगू तुमची चित्रं फळ्यावरून पुसावीशी वाटत नाहीत. परवा काढलेला तो मुंडासेवाला म्हातारा ! काय अक्कडबाज मिशा होत्या त्यांच्या सांगू ! ते चित्र पाहीलं मला माझ्या आज्ज्याची आठवण झाली अगदी तस्साच दिसायचा तो. शक्य असतं ना तर तर तो आख्खा फळाच घरी घेवून गेलो असतो. पण काय करणार गणीताच्या माने सरांना पाहिजे होता एक जास्तीचा फळा. पुसावं लागलं ते चित्र...... सर तुम्ही हसाल. पण खरं साम्गू फळ्यावरचं ते चित्र पुसताना मला माझ्या आज्ज्याला पुसून टाकतोय असे वाटलं …. सर मला द्याल का कागदावर काढून ते चित्र?

गरम चहा प्याल्याने की कसे पण डोंगरे सरांचा मूड जरा प्रसन्न झाला. "अरे का नाही नक्की देईन. तुझ्या आजोबांचा एखादा फोटो असेल तर दे त्यावरून पोर्ट्रेट करू.
हॅ... आज्ज्याचा कुठला आलाय फोटो ! तो तर मी लहान होतो तेंव्हाच खपला. रानात साप चावला आन तिथंच कोसळला. मस्त डोंगरासारखा माणूस होता. मला खाम्ड्यावर घेवून जायचा. गुळ शेम्गा द्यायचा. हाताला धरून माळावर फिरवायचा. आज्जा गेला तसा गावही सुटला. आज्जा मनातच राहीला मुक्कामाला. तो तुमच्या चित्रात दिसला.
कसे होते रे तुझे आजोबा?
लई भारी माणूस . एक नम्बर.! एकदम गप्पीष्ट , गोष्टी तर काय भारी भारी सांगायचा… जबरेश्वराची, गोराडेश्वाराची , काळवीत आन कोळसुंद्यांच्या लढाईची. कधी कधी गाणी पण म्हणून दाखवायचा. मला आठवतं एक गाणं ….. इंग्रजी सायबानं कळ काहे केली.... बीन बैलाची गाडी चालवीली… हाय का नाय भारी गाणं. मी तर माझ्या मुलाला लहानपणी हेच गाणं म्हणून झोपवायचो.
महादेव शिपायाच्या येण्यानं विचारात खंड पडला. जरा बरं वाटलं . डोंगरे सरांनी पुन्हा एकदा त्या फळ्यावरच्या अक्षरांकडे पाहिले. काय वाटले कोणास ठाऊक त्यानी त्या अक्षरांखाली एका कोपर्‍यात खडूने मघाशी काढलेल्या गोलाशेजारी आणखी एक गोल काड्।अला. माक डोळे साठीचे ठिपके दिले. एक उभी रेघ त्याला हात आणि पाय म्हनून तिरप्या रेघा. त्या शेजारी तशीच आणखी एक गोल आणि तिरप्या रेघाची आकृती . या आकृतीत गोलाला दोन छोट्या रेषा जोडून त्या खाली दोन फुल्या मारल्या. मुलाचे आणि मुलीचे अगदी कमीत कमी रेषांमधे. मग जवळंच आणखी काही रेषा जोडून एक कौलारू बैठी इमारत काढली, शाळेच्या इमारती सारखी.
खडूच्या आणखी दोनचार जुजबी फरकाट्यात शाळेची इमारत जिवंत व्हायला लागली . दोनचार ठिपके इकडे तिकडे दिले . मैदानात खेळणारी मुले दिसायला लागली.....

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

26 Jul 2019 - 7:50 am | आनन्दा

__/\__

यशोधरा's picture

26 Jul 2019 - 9:38 am | यशोधरा

वाचतेय..

सुबोध खरे's picture

26 Jul 2019 - 9:58 am | सुबोध खरे

अप्रतिम __/\__

कंजूस's picture

26 Jul 2019 - 10:47 am | कंजूस

हम्म!

टर्मीनेटर's picture

26 Jul 2019 - 11:56 am | टर्मीनेटर

सुंदर लेखनशैली! भावदर्शी वाक्यरचना!
स्वतःच्या कलेच्या प्रेमात बुडालेले डोंगरे सर छान रेखाटले आहेत.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.