✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इंद्रायणी काठी

म
मेघमल्हार यांनी
Tue, 02/19/2019 - 12:27  ·  लेख
लेख
सूर्यनारायण काही अंतर वर सरकलाय. पण ते तेज अजून तितकसं प्रखर झालं नाहीये. दूरवर नदीपात्रात काहीसं धुकं आहे. हवेत प्रचंड गारठा आहे. या अशा बोचऱ्या थंडीतही लोक नदीत स्नान करत आहेत. पैलतीरावर कोणी एक सूर्याला अर्घ्य देत आहे. ऐलतीर तसा रिकामाच आहे. भल्या सकाळी मी आळंदीत इंद्रायणीच्या काठावर उभा आहे. हातापायांवर पाणी घ्यावं म्हणून घाट उतरून थोडं खाली गेलो. कधी एके काळी, समृद्ध रूपात इंद्रायणी इथून खळाळली असेल, काठावर हिरवीगार झाडी असेल, संत महात्मे इथे रोज स्नानार्थ येत असतील. आता गतकाळाच्या सुखद स्मृती तिच्या डोहात खोलवर कुठेतरी जपून, संथपणे, केवळ ती वाहते आहे. थोडं पाणी पायावर घेतलं नि घाटाच्या वरच्या दिशेने निघालो. काही स्वयंसेवक परिसर झाडताना दिसले. हे दृश्य मनाला दिलासा देणारं होतं. पुन्हा एकदा नदीकडे पाहिलं, गार वारं पाण्याला स्पर्शून अंगाला भिडत होतं. तिचं मूळ चैतन्याचं स्वरूप तिला पुन्हा पहायला मिळेल नि तिच्या वाटेतल्या गावांचे काठ फुलवत हि जीवनदायिनी सतत प्रवाही राहील अशी आशा मनी धरून मी समाधी मंदिराकडे वळलो. मंदिरा बाहेरचा परिसर अजून भाविकांनी फुलायचा होता. काही दुकानं उघडली होती. उदबत्तीचा मंद सुगंध दरवळत होता. "दादा या इकडं, चप्पल ठेवा..." अशी साद दुकानदार घालत होते. मी घरातूनच फुलं, तुळशी घेऊन आलो होतो, पण चप्पल ठेवायच्या निमित्ताने एका दुकानातून फुलं विकत घेतली. थोड्या अंतरावर गंध लावणारे एक-दोघे उभे असलेले दिसले. त्यांना चुकवून मी देऊळवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी गेलो. समोरच खाली पितळेचं छोटं रेखीव कासव आहे. त्याला लागूनच वर गुरू हैबतबाबांची पायरी आहे. महाद्वारातुन आत जाताच मंत्रपठणाचा आवाज कानावर आला. आतलं सगळं वातावरणच प्रसन्न होतं. मनाला शांती देणारं. आवारातल्या श्री एकनाथ पाराला मनोमन नमस्कार केला नि दर्शनरांगेकडे आलो. आज गर्दी कमी होती. वीणामंडपही रिकामा होता. एरवी तिथे बऱ्याचदा हरिपाठ, रंगात आलेलं कीर्तन, तल्लीनतेने ऐकणारे श्रोते असं सुंदर चित्र पहायला मिळतं. टाळ मृदंगाच्या नादात चाललेलं भजन ऐकणं हा एक तिथला अनोखा सोहळा असतो. एवढ्या सकळीक मी पहिल्यांदाच आलो होतो, त्यामुळे कदाचित सगळीकडे काहीसा निवांतपणा अनुभवायला मिळत होता. दर्शनरांग हळूहळू पुढे सरकत होती. कितीतरी वयस्कर मंडळी मागे-पुढे रांगेत दिसत होती. बहुधा ते आळंदीत मुक्कामी आले असतील. कधीही पहा ह्या वृद्ध वारकरी जनांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच असतो. मधेच कोणीतरी "बोला पुंडलिक वरदे...पंढरीनाथ महाराज कि जय" मोठ्ठयाने म्हणत होतं. माझ्यासकट इतरही त्यांना नकळत साथ देत होते. मी समाधी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या जवळ आलो. मंदिराचं जुनं दगडी बांधकाम भक्कम आहे. आत एक मोठा पाषाणातला, शेंदूर लावलेला गणपती आहे. त्याची पूजा संपन्न होऊन तो काचेच्या दारामागे सुरक्षित बसला होता. एक दालन ओलांडून मी मधल्या गाभाऱ्यात आलो. आपल्या तुकोबांनी हा गाभारा बांधलाय. जगद्गुरू तुकोबांच्या "ज्ञानियांचा राजा गुरू महाराव..." या अभंगात माउलींप्रती असलेला त्यांचा आदर, प्रेम पाहिलं कि आपल्या बेगडी प्रेमाची कल्पना येते. आपण निःशब्द होतो. गाभाऱ्याच्या मध्यभागी वर काचेचं झुंबर लखलखत होतं. बाहेर काही वारकरी लोक ज्ञानेश्वरी वाचताना दिसत होते. मगाशी जो मंत्रपठणाचा आवाज भासला तो यांचा होता तर. ते काय म्हणतायेत हे जरी स्पष्ट ऐकू येत नव्हतं तरी ती लय, तो आवाज कानाला सुखावणारा होता. आता एका छोट्या दारातून गेलं कि गर्भगृहात माऊलींची संजीवन समाधी आहे. दाराच्या वरती दगडात कोरलेला गणपती आहे. बिचार्याच्या सर्वांगाला पेढा चिकटवलेला दिसत होता. खरंतर हे दृश्य प्रत्येक देवळात पहायला मिळतं. भक्तांच्या श्रद्धेपुढे देवाचं काय चालत नाही. दाराच्या दोन्हीबाजूला बंदिस्त चौकटीत सोन्याच्या पत्र्यावर लिहिलेलं पसायदान आहे. माउलींनी अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी भगवंताजवळ हे अलौकिक मागणं मागितलं. कोणीतरी म्हटलंय कि, "सगळ्या विश्वाचे मिळून जर एकच राष्ट्रगीत ठरवावे अशी कल्पना पुढे आली, तर संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाकडे पहावं लागेल". किती सार्थ आहे हे! उंबरठ्याला नमस्कार केला नि आत गेलो. आत समाधीवर अभिषेक सुरु होता. समाधीच्या वरच्या बाजूला देवळीत काळ्या पाषाणातल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. विठूमाऊलीच्या मुखकमलावरचं प्रसन्न स्मितहास्य पाहून मन समाधान पावलं. घरातून नेलेली फुलं पुजाऱ्यांनी विठोबा-रखुमाईच्या मस्तकावर वाहिली. त्या फुलांच्या आयुष्याचं सार्थक झालं. पुजारी लोक समाधीला हात लावून नमस्कार करायला सांगत होते. माउलींच्या भेटीने त्या क्षणाला प्रत्येकाची "आनंदाचे डोही आनंद..." अशीच काहीशी अवस्था झाली असेल. नकळत हात जोडले गेले. मी माउलींपुढे नतमस्तक झालो. "धन्य आजि दिन, झाले संतांचे दर्शन" ह्या आनंदातच बाहेर आलो. अजानवृक्षाच्या सावलीत काही भाविकांचं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं. अगदी समाधीला लागून त्याचं अस्तित्व आहे. त्याच्या तळी अनुष्ठान केलं कि ज्ञानप्राप्ती होते असं म्हणतात. गंमत पहा तरीही तो स्वतःला अजान म्हणवून घेतो. सुवर्णपिंपळाला प्रदक्षिणा घालून एका पायरीवर जरा विसावलो. गेली कित्येक वर्षे, शतके हा प्राचीन अश्वत्थ माउलींच्या आठवणी हृदयात जतन करून अलकापुरीत लीनतेने उभा आहे. कितीतरी बऱ्या-वाईट घटनांचा तो मूक साक्षीदार आहे. सांप्रतकाळीही संतपदीचे सुखसोहळे उपभोगत समाधानाचे अभंग गात आहे. त्याच्या अंगाखांद्यावर आता पाखरांची किलबिल वाढलीये. समाधी मंदिरही आता गजबजु लागलंय. "तनु मन शरण तुझ्या, विनटलो पायी.." असाच भाव इथे जमलेल्या प्रत्येकाच्या ठायी असेल. सूर्याच्या कोवळ्या रेशमी किरणांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे, अगदी तसाच माझा मन:गाभाराही ह्या ध्यानस्थ ज्ञानसूर्याच्या कृपार्शीवादाने उजळून निघाला आहे. - मेघमल्हार
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
10966 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/19/2019 - 12:33 नवीन
सुरेख. पहिल्यांदा मी जेव्हा आळंदीला गेलो तेव्हा असंच काहीसं वाटलं. सुरेख लिहिलंय. आवडलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मेघमल्हार
Tue, 02/19/2019 - 12:55 नवीन
धन्यवाद सर. आपला आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख अतिशय सुरेख..

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 02/19/2019 - 12:36 नवीन
छोटासा वृतांत आवडला. माझी अत्यंत आवडती जागा. कितीही वेळा गेलो तरी समाधान होतच नाही दर वेळी माउली नव्यानेच भेटतात आणि एक नवी उर्जा देउन जातात. आजकाल गर्दी जरा जास्तच असते, त्यामुळे नीटसे दर्शन होत नाही. मग बराच वेळ वीणामंडपात बसतो किंवा मागच्या नंदी समोर. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मेघमल्हार
Tue, 02/19/2019 - 13:04 नवीन
खरंय आळंदीला गेलं कि समाधान मिळतं. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

किति सुरेख लिहिलंय. अगदी

पद्मावति
Tue, 02/19/2019 - 12:59 नवीन
किति सुरेख लिहिलंय. अगदी चित्रदर्शी.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. आभारी आहे.

मेघमल्हार
Tue, 02/19/2019 - 19:22 नवीन
धन्यवाद. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

छान लिहिलं आहे.

पलाश
Tue, 02/19/2019 - 13:34 नवीन
छान लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

मेघमल्हार
Tue, 02/19/2019 - 19:23 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

प्रेम श्रद्धा आणि तीर्थस्थानी

अनिंद्य
Tue, 02/19/2019 - 14:45 नवीन
प्रेम श्रद्धा आणि तीर्थस्थानी अवचित लाभलेला निवांतपणा शब्दाशब्दात झिरपला आहे. प्रसन्न वाटले वाचून.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. आभारी आहे.

मेघमल्हार
Tue, 02/19/2019 - 19:25 नवीन
धन्यवाद. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

आवडलं.

यशोधरा
Tue, 02/19/2019 - 14:52 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. आभारी आहे.

मेघमल्हार
Tue, 02/19/2019 - 19:26 नवीन
धन्यवाद. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सुंदर!

लई भारी
Tue, 02/19/2019 - 15:15 नवीन
प्रसन्न वाटलं, वाचूनच! आता तुम्ही केलंय तस एकदा लवकर सकाळी जायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. नक्की जाऊन या.

मेघमल्हार
Tue, 02/19/2019 - 19:27 नवीन
धन्यवाद. नक्की जाऊन या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लई भारी

छान आहे. आवडलं!

नावातकायआहे
Tue, 02/19/2019 - 17:23 नवीन
छान आहे. आवडलं!
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

मेघमल्हार
Tue, 02/19/2019 - 19:27 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

धन्यवाद

तुषार काळभोर
Tue, 02/19/2019 - 21:52 नवीन
लेख आवडला, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मला वाटलं होतं की कृष्णाकाठचे

आनन्दा
Wed, 02/20/2019 - 10:14 नवीन
मला वाटलं होतं की कृष्णाकाठचे बापलेक इंद्रायणीला आलेत की काय. अंमळ निराशाच झाली. पण तुमचा लेख छानच आहे. परवाच आळंदीला जाऊन आलो त्यामुळे ते सगळं परत आठवलं
  • Log in or register to post comments

धन्यवाद. आभारी आहे.

मेघमल्हार
गुरुवार, 02/21/2019 - 10:10 नवीन
धन्यवाद. आभारी आहे. पण हे समजलं नाही "मला वाटलं होतं की कृष्णाकाठचे बापलेक इंद्रायणीला आलेत की काय."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

https://misalpav.com/node

आनन्दा
Sat, 02/23/2019 - 10:06 नवीन
https://misalpav.com/node/44143
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघमल्हार

वाचलं. पण काय संदर्भ लागला

मेघमल्हार
Tue, 02/26/2019 - 13:25 नवीन
वाचलं. पण काय संदर्भ लागला नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

मन टवटवीत झाले

श्वेता२४
Wed, 02/20/2019 - 13:26 नवीन
खूप छान लिहीलंय
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मेघमल्हार
गुरुवार, 02/21/2019 - 10:06 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

छान लिहलंय..!!

विशुमित
गुरुवार, 02/21/2019 - 13:00 नवीन
मला आळंदीतील संध्याकाळचा हरिपाठ खूप आवडतो..!! "रामकृष्ण हरी" ची सुरवात करताना मृदंगावर सुरवातीची थाप पडली ना तर माझ्या अंगातच येते. खरंच! लहान-थोर वारकरी मनसोक्त नाचतात. === सुफी, राजस्थानी, पंजाबी लोकगीतांच्या धर्तीवर, "पारंपरिक वारकरी चाली" चे महत्व देखील जागतिक पातळीवर पोहचावे अशी मनीषा आहे. कोणाला या संदर्भात काही अधिक माहिती आहे का ?
  • Log in or register to post comments

आवडलं.

चौथा कोनाडा
Sun, 03/03/2019 - 12:50 नवीन
सुरेख लिहिलंय. प्रसन्न वाटलं, आवडलं. संतांचा जिथे वास असतो तिथल्या अनुभुती अत्यच्च असतात.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. आभारी आहे.

मेघमल्हार
Fri, 03/08/2019 - 15:44 नवीन
धन्यवाद. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा