लक्ष्मी येण्याची वेळ

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Dec 2018 - 5:20 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

संध्याकाळी बाहेर ओट्यावर उभा होतो. घराच्या आजूबाजूला मी खूप झाडी लावून ठेवल्यामुळे संध्याकाळी बाहेर डास असतात. हे डास- मच्‍छर संध्याकाळी जास्त प्रमाणात दिसून येतात. दारं खिडक्या उघड्या दिसल्या की ते घरात प्रवेश करतात आणि रात्रभर आपल्याला डंख मारत राहतात. बाहेर ओट्यावर येताच डास घरात येऊ नयेत म्हणून मी बाहेरून घराचं दार घट्टपणे लावून घेतलं. आत डास जाण्यासाठी थोडीही फट राहू नये अशी काळजी घेत मी बाहेरून दाराची कडी लावली. आणि अचानक मला बालपण आठवलं. गावात लहानपणी संध्याकाळी माझ्याकडून चुकून दार लावलं गेलं तर आई म्हणायची, ‘लक्षमी येवानी येळ जयी, दार कसाले लावस रे भाऊ? उघडं ठेव.’ मला हा उद्‍गार आत्ताच ऐकू आल्यासारखा मी चपापलो. आपण शहरात आल्यापासून लक्ष्‍मी यायची वेळ, दिवाबत्तीची वेळ विसरून गेलो आहोत. बटन दाबलं की विजेचा भसकन पांढराशुभ्र उजेड घरभर पसरतो. घरात डास येऊ नयेत म्हणून दिवसभर दार उघडं असलं तरी संध्याकाळी आपण न चुकता दार व्यवस्थित बंद करतो.
संध्याकाळ झाली आणि कोणी आपल्या घराचं दार लावायला लागलं की लहानपणी वडीलधारी मंडळी पोरासोरांवर खेकचायची, ‘राहू देत नी रे कवाड उघडं. आता लक्षमी येवानी येळ जयी आनि तू कवाड आघे करी र्‍हायना. सांज जई का दार लाऊ नही भाऊ.’
सायंकाळी घरात लक्ष्मी येते. गावातल्या प्रत्येक घरात लक्ष्मी येते. लक्ष्मी म्हणजे धन, दौलत, बरकत वगैरे हे ही वडीलधार्‍यांकडूनच समजलेलं. घरात हे सर्व सुख येण्यासाठी घराची दारं संध्याकाळी उघडी असली पाहिजेत. शेतकाम व अन्य कामासाठी ग्रामीण लोकांना दिवसभर घराबाहेर रहावं लागत असल्यानं घराचं दार दिवसभर बंद ठेवलं तरी चालतं. फक्‍त संध्याकाळी लावू नये. दिवाबत्तीच्या वेळी घराची दारं उघडी ठेवावीत. हो, दिवाबत्तीच्या वेळी. खेडोपाडी आधी विजेचे दिवे नव्हते. कंदील आणि चिमणी नावाचे लहान दिवे असत. त्यांच्या काचा रोज संध्याकाळी चुलीतल्या राखेने घासून एखाद्या फडक्याने स्वच्छ पुसली जात आणि मग चिपडं पडताच, म्हणजे दिवस जाताच घरोघरी हे दिवे लावले जात. अशा संध्याकाळच्या वेळेला ‘दिवाबत्तीची वेळ’ झाली असं म्हणत. या वेळी घराची दारं उघडी असायला हवीत, अशी अलिखित पुर्वपरंपरेने चालत आलेली आचार संहिता होती. गावात ज्या ज्या घरात माणसं वास्तव्याला असायची (काही लोक मळ्यात रहात म्हणून त्यांच्या घराला कायम कुलूप असायचं.) त्या त्या घराची दारं संध्याकाळी उघडी ठेवली जात. कारण ही वेळ लक्ष्‍मी यायची वेळ असायची.
विचार करताना अशा लक्ष्मी येण्याच्या समजूतीमागे काही शास्त्रीय आधार असावा का, मनात शंका आली. आणि विचारांना योग्य दिशा मिळताच लख्खपणे जाणवलं, असलाच पाहिजे. हा शास्त्रीय आधार कोणता असावा हे शोधण्यातही खूप वेळ गेला नाही. लक्ष्मी म्हणजे काय असू शकतं, हे तर्काने ठरवता आलं. म्हणूनच या समजुतीला शास्त्रीय आधार असल्याचं लक्षात आलं.
: माझ्या घराभोवती मी इतकी दाटीवाटीने झाडी लावून ठेवलीत. ही सर्व झाडं आता रात्री प्राणवायू घेणं सुरू करतील आणि कार्बन डॉय ऑक्साइड सोडतील. संध्याकाळ पासून सकाळ होईपर्यंत हे सुरू राहील. म्हणजे झाडं रात्री माणसासारखाच प्राणवायूचा श्वास घेऊन कार्बन बाहेर सोडणार. मग आपण संध्याकाळी दारं- खिडक्या उघडी ठेऊन झाडांकडून मिळणारा संध्याकाळपर्यंतचा प्राणवायू घरात साठवून ठेवायला नको का? हा बाहेरचा प्राणवायू घरात भरून ठेवायला हवा. म्हणजे रात्रभर आपल्याला प्राणवायू पुरेल. कमी पडणार नाही. संध्याकाळी आपण लवकर दारं खिडक्या बंद करून ठेवल्या तर घरातला प्राणवायू सकाळपर्यंत आपल्याला कमी पडू शकतो. घरातल्या हवेत कार्बन डॉय ऑक्साइडचं प्रमाण वाढेल. म्हणून अंधार पडेपर्यंत आपण संध्याकाळी घराची दारं उघडी ठेवलीत तर आपल्याला रात्रभर पुरेल इतका प्राणवायू घरात साठवला जाऊ शकतो. पूर्वी ग्रामीण घरांना खिडक्या क्वचितच दिसायच्या. कुठे एखाद्या घराला खिडक्या दिसल्या तरी त्या शास्त्रशुध्द पध्दतीने समोरासमोर नसायच्या. ग्रामीण घरात पुढच्या दाराला लागूनच थोड्या अंतरावर एक खिडकी असायची. बहुतेक ग्रामीण घरे एक दारी असायची. काहींना मागचं दार आणि पुढचं दार अशी दोन दारं असली तरी आजूबाजूला खिडकी नसायची. कारण घराच्या दोन्ही बाजूंना लागून घरे असत. अशा घरात रात्रीच नव्हे तर दिवसाही हवा खेळती राहत नसे. म्हणून संध्याकाळी बाहेरची हवा घरात घेणं आवश्यक होतं. (कंदील- चिमणी ह्या दिव्यांना ज्वलनासाठीही प्राणवायू लागतो. म्हणजे आतापेक्षा पेटवलेल्या दिव्यांच्या काळात गावातल्या घरात रात्री प्राणवायू जास्त लागायचा.) आपल्याला जिवंत ठेवणारा प्राणवायू, म्हणजेच लक्ष्मी असं तर म्हणायचं नसेल आपल्या पुर्वजांना?
लहानपणी आमच्या गावात भरपूर झाडी होती. प्रत्येक खेड्यात भरपूर झाडी असायची. म्हणून अशा प्राणवायू साठवणुकीसाठीच लोक संध्याकाळी घराची दारं उघडी ठेवत असतील. आणि याचं शास्त्रीय भान आकलनापलीकडे असल्यामुळे प्राणवायू भरण प्रक्रियेला ‘लक्ष्मी’ नाव ठेवलं गेलं असावं का? ही तार्कीक कल्पना असली तरी या कार्यकारण भावात तथ्य दिसून येतं. पुरेशा प्राणवायूमुळे रात्रभर घरात नेगेटीव्ह एनर्जी निर्माण होत नाही. अजून काय हवं. हीच तर लक्ष्मी. (आणि अशी लक्ष्मी घरात खेळती राहण्यासाठी घराच्या आजूबाजूला जितकी झाडं लावणं शक्य असेल तितकी लावली पाहिजेत.) पैसा, अडका, बरकत, दौलत नावाची लक्ष्मी तर आपण कष्ट करून कमवतच असतो रोज.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Dec 2018 - 4:29 pm | डॉ. सुधीर राजार...

448 वाचकांना धन्यवाद

प्रमोद देर्देकर's picture

16 Dec 2018 - 5:07 pm | प्रमोद देर्देकर

साफ चूक उलट गावची घरं ही ऐसपैस 10 ते 11 दारं असणारी 2 ते 3 ओटी , पडवी असणारी असतात तेव्हा दिवसा भरपूर हवा आतबाहेर जाते येते.
फक्त खिडक्या मात्र मोजक्या असतात
पण मूळ पडवी ही पूर्ण उघडी किंवा लाकडी दांड्यांनी (हटकून निळ्या रंग असलेल्या) बंदिस्त असतात .
दुसरी गोष्ट दिवसभर प्राणवायू खेळता राहिल्यावर फक्त संद्याकाळी 1 तासा करिता दारं उघडी ठेवून असा कितीसा फरक पडणार.
तेव्हा दुसरं काहीतरी कारण असावं.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

17 Dec 2018 - 5:18 pm | डॉ. सुधीर राजार...

असू शकतं तुम्हालाही मत. धन्यवाद

त्याचं कारण ज्योतिषशास्त्रात आहे.
बरेचसे सण सकाळी असले तरी लक्ष्मीपूजन संध्याकाळीच असतं.
रवि आणि चंद्र ग्रह लक्ष्मीचे शत्रु आहेत. त्यांचा अस्त/उदय होण्याचा मधला काळ, शिवाय अमावस्येला दोघेही एकदमच गायब होतात तो दिवस विशेष.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

17 Dec 2018 - 5:19 pm | डॉ. सुधीर राजार...

आपलाही अर्थ भावला.धन्यवाद

दुर्गविहारी's picture

17 Dec 2018 - 6:56 am | दुर्गविहारी

आधीच्या काळात या गोष्टींना काही अर्थ असेलही. पण डास घरात आले तर त्या अनुषंगाने त्यांच्या बरोबर येणाऱ्या भयानक आजारांचा विचार केला तर लक्ष्मी येण्यापेक्षा जाण्याची शक्यता जास्त. तेव्हा सध्याच्या काळात संध्याकाळी दार बंद ठेवणे हेच योग्य.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

17 Dec 2018 - 5:19 pm | डॉ. सुधीर राजार...

आवडले ;त्तर. धन्यवाद

सुबोध खरे's picture

17 Dec 2018 - 12:02 pm | सुबोध खरे

प्रत्येक परंपरा किंवा समजूत हि ज्ञानावर आधारित असतेच हा आपला गैरसमज किंवा तसे सिद्ध करण्याचा अट्टाहास आपण सोडून दिला पाहिजे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

17 Dec 2018 - 5:20 pm | डॉ. सुधीर राजार...

हे ही बरोबर

गैरसमजावर आधारित असते परंपरा.
ते काय आहेत हे आपल्याला इतिहास सांगतो. जुने लोक सर्व गोष्टी समजून गप्प बसले असते तर आपल्यासाठी काही पुरावेच उरले नसते. उदा इजिप्तचे पिरामिड,मम्मी.
इकडे लक्ष्मी येण्याची वेळ ठरवायची किंवा लक्ष्मी येण्यासाठी योग्य गोष्टी. तर रवि ग्रह अहंचा कर्ता, चंद्र ग्रह मनमानीचा कर्ता आहे असा गैरसमज ज्योतिषात आहे. हे दोघे नसताना लक्ष्मी येते म्हणून अमावस्येची संध्याकाळ सर्वोत्तम.
हे बरोबर का चूक हा प्रश्न नसून या परंपरेच्या शोधामागचे कारण एवढंच.

अनिरुद्ध प's picture

17 Dec 2018 - 5:50 pm | अनिरुद्ध प

कि सर्व साधरण पणे रोजन्दारी वर लोक काम करत असतात/असावेत, तेव्हा ते सन्ध्याकाळी घरी परत येताना कमवलेली लक्ष्मी घेउन येत असावेत म्हणुन त्या वेळेस दार उघडे ठेवल्यामुळे घरातील उजेड घरी परतणार्या व्यक्तीस लाभ्कारक होत असावा. असो . . .