तव नयनांचे दल

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in जे न देखे रवी...
13 Dec 2018 - 11:01 pm

माणूस असण्याचे तापत्रय भोग-उपभोगल्यावर,
दुनियादारीचा तिरका खेकडा सर्वांगावर नाचवल्यावर,
प्रवासाची मोठीच मजल मारून,
थकून येतो तुझ्या घरी.

तुझ्या मंद हालचाली डोळे भरून पाहीन,
तुझ्या खांद्यावर शांत झोपून जाईन.

बोल बोल बोलण्याचे खापर फुटून गेलेलं असेल.

तुझ्या ओठांवरचं लालभडक हसू आणि खोल काही शोधत जाणारी नजर, दोन्हीत हरवून जायचंय.

डोळ्यात समाधान असेल तू जवळ असल्याचे,
असेल स्पर्शात निरामय ओलावा,
तेव्हा सैल झालेलं अंग आवडता कंटाळा मागेल.
तुझ्या उबेची आस लागेल कसलीच घाई नसलेली.

भटकून रानात खालेल्या मटण-भाताचे,
सुसाट गाडी पळवून कुठेतरी चहा पिल्याचे,
बसच्या उशिराच्या वैतागाचे,
थेटरातल्या काळोखांचे,
कुठे कुठे पेरलेले आपण सगळे तुझ्या सहजतेचे खांड,
मला वेचुन पुन्हा घ्यायचेत.

खूप मारायच्यात गप्पा,
खिदळत झोपी जायचंय एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून आडवं तिडवं.

कुणी संवादांचे विस्तव फेकत असतो असंबद्ध बोलताना,
कुणी खेचाखेची करतो हलकट शब्दावाक्यांची,
तेव्हा आपण न बोललेल्या कितीतरी गोष्टी आठवतात.

मूकपण पेरत कुठेच न बिनसलेल्या अपार वाक्यांचे धनी,
मनाच्या पोटरीत माया साचवून तुझ्या हसण्याचं सोनसळी केसर उमलून येतं भारीच.

उत्तरं हवी असतात, प्रश्न हवे असतात,
ते अजिबात नसण्याचे हट्टी सौंदर्य तुझं भारीच.

कुणाला अपेक्षांचा ढीग उपसायचा असतो तेव्हा
तुझं हक्काचं मागणं आठवत राहते कसलाच आव नसलेलं.

कुणी गुणदोषांचा चरका फिरवत असताना,
तुझ्या कौतुकाचा कटाक्ष आणि सगळं समजून घेतल्याचे बुद्धिहीन प्रेमळ हसू,
असतंच सोहनीच्या मध्य आलापीसारखं कुठेतरी
अर्धवट ग्लानीत तुझं पहाटे उठून अंगावर पांघरूण टाकणं.

किंवा अस्थैर्याचे वारं लागलं की तुझा खंबीर चेहराही
दिसतो एका निशचल वृक्षासारखा.

हे सारं जपून ठेवलय,
माझ्या अर्ध्या मनात.
तुला भेटायची ओढ लागलीय, तीव्र.

miss you!कवितामुक्तक

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

15 Dec 2018 - 10:31 pm | श्वेता२४

शब्दांची मांडणी वेगळीच. आवडली कविता