वसूलीचं काय करायचं?

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
1 Nov 2018 - 10:08 pm
गाभा: 

आमच्या व्हॉटसअॅप समुहात एका महत्वाच्या विषयावर झालेल्या चर्चेवर आधारीत हा धागा आहे.

व्यवसाय म्हटला की त्यात वसूली ही आलीच.नंतर आणून देतो रे,कुठे पळून जातोय का पासून अमुक तारखेला पेमेंट करतो असं सांगून ते वेळेवर न देणारे किंवा चक्क बुडवणारे अनेक 'नग' व्यावसायिकांना भेटतात. याला कोणताही व्यवसाय अपवाद नसावा.अगदी एका वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉक्टरांनीही त्यांचा याबाबतचा कटू अनुभव सांगितला.
अशा व्यवहारांचं डॉक्युमेंटेशन शक्यतो नसतं.केवळ विश्वासावरच असे व्यवहार होतात.याचाच गैरफायदा घेऊन हे पैसे/उधारी देणं लांबवलं जात.टाळलं जातं.काही वेळा आपल्यालाच दमदाटी केली जाते,पोलिसांची भिती दाखवली जाते.मग कधीतरी एखादा अनुचित शब्द वापरला जातो,वाद होतो,नको ती कृती या मनस्तापातून घडते.अगदी तो ग्राहक पुढल्या वेळी 'कायमचा' तुटतोसुद्धा!

छोट्या व्यावसायिकांचे हे अनुभव तर मोठ्या व्यवसायिकांसोबत कामाचे अनुभवही असेच आहेत.विशेषत: मोठ्या कंपनीला सेवा पुरवणार्‍या आणि तुलनेने छोट्या असणार्‍या व्यावसायिकांना या बड्या धेंडांकडून वसुली कशी करावी हा मोठा प्रश्न असतो.यांना 'दुखावलं' तर पुढल्यावेळी काम मिळेलंच याची खात्री देता येत नाही.दरडावून मागण्याइतपत आपण धाडस करु शकत नाही आणि पैसेही वेळेवर मिळत नाहीत.त्यात या मोठ्यांचे कनेक्शन्स 'गुंडापुंडांसोबत' किंवा 'राजकारण्यांसोबत' असले तर ही वसूली अजूनच कठीण होते.वाघाच्या जबड्यात हात घालण्याचा प्रकार असतो हा!

अजून एक प्रकार म्हणजे तुमचा नातेवाईक किंवा जवळचा मित्र हाच तुमचा ग्राहक असणं.हे लोक घेतलेले पैसे परत देणं,कामाचा मोबदला वेळेवर न देणे असे प्रकार करत असतील तर त्यावेळी मनाला होणारे क्लेश हे तो भोगणाराच जाणो!

पैसे तर अडकलेले असतात,आपणही व्यवसायासाठी कुठून तरी कर्ज घेतलेलं असतं.वर हा फुकटचा ताप! कोणाची गुलामी नको,स्वत:चा व्यवसाय करु म्हणून एखादा धडपडून व्यवसाय उभारतो आणि ही बाहेरची गुलामी निष्कारण सोसावी लागते.

यामुळेच पडलेल्या काही प्रश्नांबद्दल मार्गदर्शन मिळावं,अधिक अनुभव शेअर व्हावेत म्हणून हा धागा.

१) तुम्ही छोटे व्यावसायिक असाल तर ही थकलेली वसूली तुम्ही कशी करता?कोणत्या युक्त्या,शक्कल वापरता?

२) छोट्या व्यावसायिकांनी वसुली वेळेत व्हावी,मनस्ताप टळावा यासाठी आधीपासूनच कोणती काळजी घ्यावी?छोट्या कामांचं डॉक्युमेंटेशन करता येतं का?जेणेकरुन काही पुरावा सादर करता येईल?

३) मोठ्या कंपन्यांसाठी काम करणार्‍या छोट्या व्यावसायिकांनी या 'मोठ्यांकडून' वसूली कशी करावी? यांच्याशी केलेले व्यवहार कागदोपत्री चोख असतात.पण प्रत्यक्ष ठरल्यावेळी पैसे मिळतीलंच याची खात्री नसते.अशा वेळी तग कसा धरावा?

४) कोणते/कोणाला दिलेले पैसे हे 'बुडीत' समजून सोडून द्यावेत?

५) नातेवाईक,जवळचा मित्र यांच्याकडून वसूली कशी करावी?

६)पंगुसिंमा(पंजाबी,गुजराथी,सिंधी,मारवाडी)समाजातील लोक व्यवसायासाठी/व्यावसायिकतेसाठी बरेच प्रसिद्ध आहेत.हे लोक वसूलीसाठी काय करतात?त्यांनाही हेच ताप सोसावे लागतात का?की काही वेगळ्या पद्धती वापरतात?

७) हे सगळं पाहता वसुलीचा त्रास नको म्हणूनच तर मराठी माणूस व्यवसायात फारसा दिसत नाही असं असेल का?

वसूलीदरम्यानचे आपले कटू,थरारक,मार्मिक अनुभव असतील तर कृपया जरुर शेअर करा.जेणेकरुन इतरांनाही वापरता येतील.या 'वसुलीच्या जगातल्या फसवणूकीच्या जागा' समजून येतील,सावध राहता येईल.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Nov 2018 - 10:39 pm | मुक्त विहारि

ह्या बुडीत व्यवहाराबाबत, एकदा एका मित्राशी बोललो.

त्याने एक उत्तम सल्ला दिला.कुणालाही पैसे देण्यापुर्वी, हे पैसे आपल्याला परत मिळणार नाहीत, हे ध्यानात घ्यायचे आणि समजा त्याने पैसे परत केलेच नाहीत तर हा खड्डा आपण परत बुजवू शकतो का? ह्याचा विचार करायचा.जर दुसरी गोष्ट साध्य होत असतील तर मगच द्यायचे.

फक्त ५०-१०० रुपयात असे अनेक जण वाटेला लावलेत......त्यामुळे ते कधी रस्त्यात दिसले, तर त्यांना रस्ता बदलायला लागतो, मला रस्ता बदलायची गरज नाही.

माहितगार's picture

2 Nov 2018 - 8:02 am | माहितगार

व्यावसायिक वसुली हा माझा लिहिण्याचा राहीलेला विषय तेव्हा इथे तुर्तास रुमाल टाकून ठेवतो.

अर्धवटराव's picture

2 Nov 2018 - 8:25 am | अर्धवटराव

वसुलीचे उपाय तर अनेक असतील. पण कमालीची चिकाटी, प्रसंगी संबंधात कडवटपणा आला तरी स्पष्टपणे वसुलीचा तगादा लावता येण्याचा चोखपणा, एखाद्या गॉडफादर टाईप व्यक्तीशी आपले संबंध डेमॉन्स्ट्रेट करण्याची खुबी, योग्य ठिकाणी दानपेटीत पैसे टाकुन सर्वंकश वसुलीची सोय...इत्यादी सर्व गोष्टी करतात पंगुसिंमा.

सुबोध खरे's picture

2 Nov 2018 - 11:10 am | सुबोध खरे

१०० % डॉक्टरना असा अनुभव येतो.
पायाला लागलंय म्हणून मलम पट्टी करून घेतात आणि मग सांगतात पैसे नाहीत/ कमी आहेत.

उदा. पुण्याच्या कॅम्पात डोळ्याचा डॉक्टर असलेल्या माझ्या मित्राला असेच अनुभव येतात. सूट बुटात असलेली माणसे डोळे तपासून घेतात आणि ५०० रुपये झाले सान्गीतले कि खिशातुन ३०० रुपये काढून ठेवतात आणि बाकीचे मग देतो सान्गुन परत कधिच येत नाहीत.

२०० रुपये उद्या देतो, ५०० रुपये आणून देतो असे सांगून अहवाल घेऊन गेलेल्या लोकांनी २०१२ साली माझे २०,००० रुपये बुडवले. आता मी कुणालाही पूर्ण
पैसे दिल्याशिवाय रिपोर्ट देत नाही. लोक डॉक्टर तिरसट आहे म्हणाले तरी चालते. पैसे बुडाल्याच्या दुःखापेक्षा हे दुःख बरेच सुसह्य आहे.

एक माणूस वितंड वाद घालू लागला. मी त्याला थंडपणे म्हणालो साहेब माझे बुडालेले २०००० रुपये मिळवून द्या. तुम्हाला त्यातील ५००० रुपये देईन. वाद संपला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2018 - 12:31 pm | ज्ञानोबाचे पैजार

बर्‍याच जणांकडून टोपी घालून घेतली असल्याने आता उसनवारीचे व्यवहार कटाक्षाने टाळतो.

कारण या व्यवहारात पैसे दिले तरी नंतर वसूल करताना वाईट पणा घ्यावा लागतो. ( कधीकधी तर अगदी व्हिलन असल्या सारखी वागणूकही मिळाली आहे)
त्या ऐवजी पैसे न देता वाईट पणा घेणे पसंत करतो.

अर्थात यात माझाही दोश आहे, मला मुविंसारखे पैसे देउन ते विसरुन शांत रहाण्याची कला अवगत नाही. प्रत्येक वेळी पैसे घेतलेला माणूस समोर आला की माझ्या डोक्यात हिशोब सुरु होतो. माझ्या साठी रक्कम कीती दिली हे महत्वाचे नाही.

एकदा सोसायटीत रहाणार्‍या गूहस्थाला पीठाच्या गिरणीत १० रुपये दिले होते, तो म्हणाला आता माझ्या कडे पैसे नाहीयेत म्हणुन तु दे घरी गेलो की परत देतो. त्याने ते जवळपास ५ ते ६ वर्षे परत केले नव्हते. प्रत्येक वेळी तो समोर आला की मला १० रुपये आठवायचे. दोन पाच वेळा मी त्याला ते मागीतले सुध्दा, पण त्याने ते परत द्यायचे टाळले. कदाचित विसरत असेल असे वाटुन त्याच्या बायकोलाही एकदोन वेळा मागितले. म्हणालो वहिनी प्रश्ण १० रुपयांचा नाहीये. पण मला तुम्ही समोर अलात की ते सतत आठवत रहातात. पण पैसे मिळाले नाहीत.

एकदा सोसायटीच्या ए जी एम मधे जेव्हा त्या मनुष्याला सोसायटीचा खजिनदार म्हणून नेमण्याची शिफारस होत होती तेव्हा मी या दहा रुपयांचा किस्सा उघड केला आणि त्याला खजिनदार अजिबात करु नये अशी शिफारस केली. त्या नंतर आमचे तिकडे असे भांडण झाले की ज्याचे नाव ते. पण याचे दोन फायदे झाले एक असा की १० रुपये ताबडतोब वसुल झाले ( घे भिकारड्या असे काहीसे म्हणत त्याने ते पैसे माझ्या अंगावर अक्षरशः फेकले. मी ते ताबडतोब घेउन खिशात ठेवले) आनि दुसरा फायदा म्हणजे त्या माणसानेच खजिनदार होण्यास आपण होउनच नकार दिला.

दुसरा अनुभव म्हणजे माझ्या एका आत्तेभावाने माझ्या कडुन २००० रुपये उसने घेतले होते आणि काही केल्या तो ते परत करत नव्हता. आत्या काका सगळ्यांना सांगितल्यावरही पैसे मिळत नव्हते.

शेवटी मला वसुलीची संधी ऐतीच मिळाली. त्या भावाच्या लग्नाच्या वेळी त्याच्या मागे आहेराची पाकिटे गोळा करायला उभा राहिलो. आलेल्या पाकिटांची यादी करुन व्यवस्थित हिषोब मांडला स्वतःचे दोन हजार रुपये काढुन घेउन उरलेली पाकिटे त्याला परत केली. तर तो लग्नाच्या स्टेजवरच माझ्याशी भांडायला लागला. तेव्हा माझे स्वतःचे आहेराचे पाकिट सुध्दा त्या पाकिटांमधुन काढुन घेतले आणि तडक लग्नाच्या हॉल मधुन बाहेर पडलो. त्यानंतर तो जेव्हा जेव्हा समोर येतो तेव्हा तोंड वाकडे करतो. अर्थात तो त्याचा प्रश्ण आहे.

एकदा ऑफिसच्या कामानिमीत्त मी माझ्या एका सिनियर बरोबर मुंबईला गेलो होतो. बराच खर्च त्यांनी केला (म्हणजे टोल वगेरे) पण जेवणाचे बील रु ४६८ मात्र मी दिले होते. ते त्यांनी मागुन घेतले आणि म्हणाले एकत्रच क्लेम करु मला पैसे मिळाले की मी ते तुला परत करेन. मी म्हणालो ठिक आहे. या सदगॄहस्थाने दोन अडिच वर्षे झाले तरी पैसे काही दिले नाहीत. दोनतीन वेळा आठवण करुन झाली. एक दोन वेळा माझ्या साहेबांना देखिल सांगितले पण पैसे काही मिळत नव्हते. आणि एक दिवस माझ्या कानावर आले की त्यांनी राजिनामा दिला. मी ताबडतोब एक पत्र आमच्या एच आर डिपार्टमेंटला लिहीले आणि त्यांना विनंती केली की माझे पैसे या गृहस्थाच्या फुल आणि फायनल सेटलमेंट मधुन वसुल करुन द्यावे. दुसर्‍याच दिवशी तणतण करत ते माझ्या ऑफिस मधे आले आणि ५०० रुपयांची नोट मला देउ केली. मी आधिच ३२ रुपये सुट्टे काढुन टेबलवरच ठेवलेले होते. त्यांना ते दिले आणि धन्यवाद म्हणालो.

असे काहिसे विचित्र अनुभव येत असल्याने आजकाल कोणी पैसे मागितले तर ते द्यायला स्पष्ट नकार देतो.

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

2 Nov 2018 - 1:32 pm | चांदणे संदीप

तुमच्या क्लासेसच्या नेक्स्ट बॅचेस कधीपासून सुरू आहेत?

Sandy

चिगो's picture

2 Nov 2018 - 2:49 pm | चिगो

हे म्हणजे भारीच हां, पैजारबुवा.. खंग्री किस्से.

स्नेहांकिता's picture

2 Nov 2018 - 3:13 pm | स्नेहांकिता

धन्य हो पैजारबुवा !

वैयक्तिक अनुभव....

सुरुवातीला मला पण कुणी माझे पैसे बुडवले की, मानसीक त्रास व्हायचा.

शेकडा ९०-९५% लोक ५०-१०० रुपये परत करतात.पण काही लोकांना, पैसे परत करायची सवय नसते...किंवा इतके कमी पैसे कशाला परत करायचे? हा पण त्यांच्या दृष्टीने एक विचार असतो.शिवाय घरचे संस्कार पण असतात.आई-वडील जर पैसे बुडवत असतील तर त्यांच्या मुलांना पण ही शिकवण घरातून मिळतेच.

पण शेकडा ५-१०% लोकांसाठी, इतर ९०-९५% लोकांवर कशाला अन्याय करायचा?

आणि चुकुन-माकून कुणी १००रु. पेक्षा जास्त पैसे मागीतले की, सरळ सांगतो, सध्या माझे सगळे आर्थिक व्यवहार माझी बायको बघते, त्यामुळे तिला विचारतो.मित्रा समोरच चहा पिता-पिता बायकोला फोन लावतो.ती नकार देते.मी चहाचे पैसे देतो.मनुष्य समोर नसेल तर, असे नकार देणे सोपे जाते.

मित्र पण टिकला(?) आणि पैसे पण वाचले शिवाय, चहा प्यायला कंपनी मिळाली, हा बोनस.पेयपानाला कंपनी हवीच.

सुबोध खरे's picture

2 Nov 2018 - 8:42 pm | सुबोध खरे

पैजारबुवा
आपण म्हणता तशीच तितकी नसेल पण थोडीशी सर्वांचीच वृत्ती असते.
यात पैसे गेल्याचे फार दुःख नसते पण अशा माणसाकडून फसवले गेल्याचे दुःख जास्त तीव्र असते.
उदा. रिक्षावाल्याने २० रुपयापैकी (मुंबईतील किमान भाडे २० रुपये आहे आणि बहुसंख्य रिक्षावाले २ रुपये परत करतात) २ रुपये परत दिले नाहीत तर जे वाटते ते दुःख आहे.
किंमत २ रुपयांची नसते तर फसवले गेल्याच्या भावनेची असते.

ती पण मनांत ठेवू नका.

आपल्या २-३ रुपयांनी तो काही बंगला बांधत नाही.पण काही लोकांना हा मानसिक रोग असतो.त्यामुळे त्यांना माफ करणेच इष्ट.तर काही रिक्षावाल्यांकडे खरोखरच सुट्टे पैसे नसतात.त्यामुळे उगाच त्यांच्या बरोबर वाद घालण्यात पण अर्थ नसतो.

बादवे...तुमच्या ह्या वाक्यात थोडी टायपिंग मिस्टेक झाली आहे का?

उदा. रिक्षावाल्याने २० रुपयापैकी (मुंबईतील किमान भाडे २० रुपये आहे आणि बहुसंख्य रिक्षावाले २ रुपये परत करतात) २ रुपये परत दिले नाहीत तर जे वाटते ते दुःख आहे.

(मुंबईतील किमान भाडे २० रुपये आहे आणि बहुसंख्य रिक्षावाले २ रुपये परत करतात)====> इथे २० च्या जागी १८ रुपये आहे का?

उपयोजक's picture

2 Nov 2018 - 11:34 pm | उपयोजक

शिरसाष्टांग नमस्कार स्विकारा गरीबाचा! _/\_

यशोधरा's picture

8 Nov 2018 - 12:15 pm | यशोधरा

कसले भारी किस्से!!

सिरुसेरि's picture

2 Nov 2018 - 12:44 pm | सिरुसेरि

मस्त आठवणी .

अभ्या..'s picture

2 Nov 2018 - 1:10 pm | अभ्या..

नॉर्मल देण्याघेन्याच्या व्यवहार असेल तर मी दिले तु वापस दिले नाहीस इतकाच प्रश्न असतो पण धंद्यात ह्या व्यवहाराला इतके कंगोरे असतात की डोके आऊट होते. त्यात मित्र, नातेवाईक असले की बातच न्यारी. धंदा असा असतो की मित्रांमुळे कामे येतात पण त्यातील व्यवहार पार्ट आला संबध बदलतात. चार स्पर्धकांपेक्षा कमी पैसे घ्यावेत हि मित्रांची अपेक्षा असते पण किती आणि का कमी घ्यायचे हे गणित मात्र नसते. शिवाय तू मित्र म्हणून तुला काम दिले हा अँगल असतोच. ते एक असो. खूप म्हनजे खूप अनुभव आहेत. माझ्याही गहाळपणचे आणि काही चुकींचे पण. इव्हन माझ्याकडून भरपूर चुका झाल्यात व्यवहारात. एकेक सांगेन सवडीसवडीने. हा एक..
१)
नानू माझा फोटोग्राफर मित्राकडे नोकरीला असलेला त्याचाच नातेवाईक. चांगला कष्टाळू मुलगा. माझी खूप कामे शिकण्यासाठी करायचा. चांगला स्नेह होता, कालांतराने नोकरी सोडून स्वतःचा धंदा दुसरे गावात चालू केला. सुरुवातीचे डीजिटल बोर्ड, व्हिजिटिंग कार्ड माझ्याकडूनच डिझाईन करुन घेतले.
एक दिवस त्याचा फोन आला. सोलापुरात एकाकडे पत्रिका प्रिटिंगला दिलिय ती आजच न्यायची आहे, उद्या सुट्टी असलेने मिळणार नाही. एका मुलाला पाठवलेय पण त्याला ५ हजार कमी पडताहेत. प्रेसवाला सगळे रोख दिल्याशिवाय देत नाही. ८ ला बंद होईल प्रेस, तोपर्यंत तू दे, मी इकडून निघतो आहे पैसे घेउन. मी विचार केला धंद्यातलाच आहे, द्यावेत मदतीला. तरी त्याला बजावले कामातले देतोय पैसे, मला तीन चार तासात दे. तेथे जाऊन पैसे दिले, तो मुलगा काम घेऊन माझ्याशी बोलताना ह्या नानूचा स्क्रीनशॉट सहित मेसेज आला की तुझ्या दुकानासमोर थांबलोय. मी गेलो तर तो नव्हता. फोन उचलेना. स्विचऑफ झाला थोड्या वेळाने. रात्र गेली. मी मेसेज टाकून ठेवले. काहिहि रिप्लाय नाही. नंतर फोन आला की मला अडचणींमुळे परत लगेच जावे लागले, सॉरी मी पैसे पाठवतो कुणाकडूनतरी. (ह्यातली मेख अशी की तो त्याच दिवशी त्याच मुलासोबत जॉब घेऊन बाईकवरुन त्याच्या गावी गेला, हे मला एका दुसर्‍या मित्राने सांगितले) नंतर रोज फोन, मेसेज करुन करुन वैतागलो. दरवेळी नवीन कारणे, नवीन अडचणी. त्याच्या गावी जायचे म्हणले तरी एक दिवस जायचा सगळ्या गोंधळात. तरीही एक दिवस गुपचूप गेलो. दुकानात निवांत कामे चालू होती. मला लगेच ५००० चा चेक दिला. घेऊन आलो. जाण्यायेण्यात ५०० रुपये गेले त्याचे काही वाटले नाही पण ३ दिवसात चे बाऊंस झाला. परत स्टोरी रिपिट. परत फोन / मेसेज. ८ दिवसांनी परत गेलो तर दुकान बंद. घर हुडकून काढले तर वडीलांनी सरळ सांगितले. तसलाच आहे आमचा मुलगा, तुम्ही व्यवहार करु नकात. तो इथे राहात नाही. कुठे राहतो तेही सांगेनात. थोडेसे लांब जाऊन थांबलो दुपारपर्यंत तर थाटात स्वारी गाडीवर घरात घुसली. मागोमाग जाऊन सरळ गच्चि पकडली. तरी बहाद्दर दुसरा चेक द्यायला लागला.भरपूर वादावाद्या, मध्यस्थ्या होऊन शेवटी तो चेक त्याच्या समोरच्या दुकानादाराकडे देऊन त्याच्याकडून ५००० रुपये रोख मिळवले. तीनवेळा जाण्यायेण्याच्या खर्च आणि मनस्ताप झाला ती गोष्ट वेगळीच.

मराठी_माणूस's picture

2 Nov 2018 - 1:50 pm | मराठी_माणूस

काही जण खर्चाच्या बाबतीत कन्जुष असतात. बाहेर सर्वा बरोबर पार्टी , चित्रपट पहाणे , टॅक्सी, रिक्षा वगैरे मधे त्यांचा हात आखडता असतो . ज्याची त्या ग्रुप मधल्या सगळ्यांना सवय झालेली असते. ह्या मधे संबध बिघडत नाहीत. आहे तसे चालु रहाते. लोक कंजुष पणा वरुन त्याची खेचत असतात .
पण व्यवहार जेंव्हा रोकड पैशाशी संबधीत होतो तेंव्हा दृष्टीकोण लगेच बदलतो. म्हणजे एखाद्याने त्याच्या मित्राला ५० रु. परत करायच्या बोलीवर दिले असतील आणि तो ते परत करत नसेल. तेंव्हा ते संबध तुटायच्या पातळी पर्यंत जातात. उसने दिलेल्या मित्रांने कदाचीत ५० पेक्षा ज्यास्त त्या बुडवणार्‍या मित्रासाठी वेगळ्या कारणा साठी (एकत्र लंच वगैरे) खर्च केलेले असु शकतात. ते तो विसरुन सुध्दा गेलेला असु शकतो पण हे ५० तो विसरु शकत नाही .
असे का असावे ?

अनिंद्य's picture

2 Nov 2018 - 2:05 pm | अनिंद्य

दरोडेखोर परवडले पण उसने मागणारे (आणि कोणाला ग्यारेंटर राहणे) नको ह्या निष्कर्षापर्यंत आलो आहे.

ह्या चर्चेतून यशस्वी वसुली करण्याच्या काही टिप्स मिळाल्या तर हव्याच आहेत.

अभ्या..'s picture

2 Nov 2018 - 2:13 pm | अभ्या..

ह्या चर्चेतून यशस्वी वसुली करण्याच्या काही टिप्स मिळाल्या तर हव्याच आहेत.

पर्त्येक आईबापाचे लेकरु कसे युनिक, अगदी त्याच आईअबापाच्या दुसर्‍या संतानासारखे नाही तशी प्रत्येक वसूली कथा युनिक असते.

अनिंद्य's picture

2 Nov 2018 - 2:16 pm | अनिंद्य

बरुबर हाय :-)

इथून पुढे काहीतरी तारण असल्याशिवाय कोणाला देखील एक रुपया ही उदार देऊ नका. सख्या मेव्हण्याला ही नाही.

राहुल०८'s picture

2 Nov 2018 - 7:05 pm | राहुल०८

आपण  साधेपणाने  मदत  करायला  गेलो तर  त्याचे  आभार मानणे तर दूरच, आपल्यालाच प्रखर  मनस्ताप  सहन  करावा  लागतो . चूक एवढीच की दुसऱ्यावर  विश्वास  टाकला . काही किस्से देत  आहे , ज्या  मध्ये  गनिमी  कावा यशस्वी  झाला (अगदी  नाईलाजाने  वापरावा  लागला.) 

१. माझा  जवळचा  मित्र , एका  प्रथितयश  IT  कंपनी  मध्ये  इंजिनिअर, चांगल्या  हुद्द्यावर . त्याला  घर  बांधकामात  निकड  होती , २-३  वेळा विचारलं म्हणुन २०,०००  दिले . एक  वर्ष  झालं , महाशय  काही  शब्द  काढेना. आपण पण कसे विचारणार  जवळचा  मित्र . दोन  वर्ष  झाली  तरी  साहेब  कधी साधी आठवण पण  काढेना. दरम्यान साहेब परदेशवारी (onsite) पण  करून  आले. ही तर  हद्दच झाली. मग  मात्र  ठरवलं, आता  काहीही  झालं  तरी  पैश्या  बद्दल  विचारायचं आणि  विचारलं सुद्धा . तर  आता  देतो , मग  देतो  अशी  टाळाटाळ . असे  सहा  महिने  घालवले . मग  म्हणे की आता  कॅश  बॅलन्स  नाही , जेव्हा  जमेल  तेव्हा  देईल . आता  मात्र "संयम" संपला , वाटलं  आता  "उंगली  तेढी  करणी  पडेगी" .

त्याच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका शोधली आणि पाहीलं  त्याची  बायको  कोणत्या  गावाची  आहे. देवाच्या  कृपेने , ती  जवळच्या  गावातली  निघाली . साहेबांना  सरळ  मेसेज  केला "तुला निकड असेल तर टेन्शन घेऊ नको. वहिनीचे  माहेर  माझ्या  नातलगाच्या घरा जवळच आहे. मी वहिनीच्या माहेर कडून manage करतो. " मात्रा एकदम उपयोगी पडली. दोन दिवसात १५००० दिले, ३००० हजार नंतर दिले. त्या नंतर मित्र गायब !...

२ . आमच्या ग्रुप मधील जवळचे परिचित, हॉटेल चा व्यवसाय, घर, चारचाकी सगळं काही. हात उसने म्हणुन पैसे घेतले. मागच्या अनुभवातून शहाणे होत, या वेळेस लवकर विचारलं तरी सहा महिने टाळाटाळ. काय करणार तो बिग शॉट, आम्ही बापूडे.

त्यांना फक्त एवढे सांगितले "मला रेंट भरण्यासाठी फार निकड आहे, नाही मिळाली तर आपल्या ग्रुप मध्ये वर्गणी करावी लागेल आणि नाईलाजाने तुमचे नाव घ्यावे लागेल." ग्रुप मध्ये पत कमी होण्याच्या भितीनी दोन इंस्टॉलमेंट मध्ये रक्कम दिली. लक्ष्मी आली पण परिचित अपरिचित झाले !...

३. जागा खरेदी करताना प्रॉपर्टी एजन्ट नी रेजिस्ट्री मध्ये ५०००० गबन केले. आमच्या तीर्थरुपांनी त्याच्या कडे बऱ्याच खेटा घातल्या पण तेच आज देतो, उद्या देतो. परत आमच्या कडे काही लिखित पुरावा नाही, पोलीस किंवा कोर्ट मध्ये जाण्यासाठी. शेवटी आमच्या मातोश्री सोबत झालेल्या कडाक्याच्या भांडणात त्याने रागाने बँक cheque दिला आणि उंदिर खटक्यात अडकला.

अपेक्षेप्रमाणे cheque बाउन्स झाला. तीर्थरुपांनी साधा वकील करून case न्यायालयामध्ये  दाखल केली. न्यायाधीशांना संपूर्ण इतिहास सांगितला. या एजन्ट मुळे सिनियर सिटीझन ला जो त्रास झाला त्याचा "आखो देखा हाल". तो पहा मुजोर "एजन्ट" आणि हा पहा तळपता "बाउन्स cheque". न्यायाधीशांनी त्याला एकच विचारलं "आत्ता पैसे देतो की जातो जेल मध्ये (choice is yours)". त्याने पुढच्या date ला पैसे दिले. आम्ही तर कश्याला पोलीस, वकील, कोर्ट नसत्या कटकटी म्हणून त्या पैश्यावर तुळशी पत्र ठेवले होते. पण श्री गजाननाच्या कृपेने, आमच्या तीर्थरुपांनी आम्हा कोणालाही न सांगता, एकट्याने किल्ला लढविला व जिंकला.

स्वधर्म's picture

2 Nov 2018 - 7:57 pm | स्वधर्म

मला काही अनुभव लक्षात नाही, पण धंदा करत असताना पुढंचं काम असल्यावरच पहिले बील क्लिअर होते असे अनेक ग्राहक भेटले अाहेत. दुसरा नमुना म्हणजे मोठी रक्कम द्यायची, पण थोडीशी बाकी जरूर ठेवायची, ज्याचा फॉलो अप करणे अापल्याला अवघड वाटावे. पण बहुसंख्य चांगलेच लोक भेटले. सध्या एक अनुभव येऊ घातलाय. माझी व मित्राची अॉफिसची जागा भागीदारीत अाहे. ती एका छोट्या बिल्डरला भाड्याने दिली अाहे गेल्या चार वर्षांपासून. नुकताच त्यांनी माझी पहिली स्कीम लॉंच होत अाहे, खर्च खूप अाहे, त्यामुळे पुढचे तीन महिने भाडे देऊ शकणार नाही असे सांगितले. अात्तापर्यंत असे एकदाच भाडे थकले होते, पण ते नंतर क्लिअर केले. अाता, ते पुन्हा तशीच मुदत मागत अाहेत, ज्यात भाडे दिलेल्या डिपॉझीटपेक्षा जास्त थकणार अाहे. बिल्डरांच्या व्यवसायात सध्या मंदी असल्याने, त्यांची अडचण समजू शकतो, पण ही रिस्क घ्यावी, का असा प्रश्न अाहे.

टीप: अॉफिस अगदी झकपक केले अाहे, ड्रायव्हर वगैरे ठेवला अाहे, जे अांम्हाला परवडणार नाही, अावडतही नाही. ही धंद्याची गरज अाहे पण परिस्थिती खूप अडचणीची अाहे, असे सांगत अाहेत. जर त्यांच्या स्किमला चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही व भाडे देणे जमले नाही, तर नोकरी सोडून त्यांच्या मागे वसुलीसाठी लागणे अांम्हाला सर्वथा अशक्य अाहे.

सिंधी लोकांकडून शिकण्यासारखी गोष्ट --
डॉ एल एच हिरानंदानी यांच्या रुग्णालयात काम करीत असताना प्रत्यक्ष डॉ एल एच हिरानंदानी यांच्या स्वतः च्या सोनोग्राफी आणि सी टी स्कॅनचे बिल त्यांच्या सुनेने रोख रक्कमेत भरले होते.
यांनतर आलेल्या त्यांच्या कोणत्याही नातेवाईकाने/ मित्राने जेंव्हा आम्हाला सांगितले कि मी श्री निरंजन हिरानंदानी याना व्यक्तिगतरित्या ओळखतो तेंव्हा त्यांना हे डॉ एल एच हिरानंदानी यांचे बिल दाखवत असे. बहुसंख्य लोक गपचूप बिल भरत.
एखादा माणूस शहाणपणा करत असे तेंव्हा त्यांना मी नम्रपणे सांगत असे कि सर श्री निरंजन हिरानंदानी सांगतील तर आम्ही बिल घेणार नाही. यावर सर्व लोकांनी बिल भरले.
एक अतिशय बेरकी माणूस निघाला त्याने श्री निरंजन हिरानंदानी याना फोनही केला पण श्री निरंजन हिरानंदानी त्यांचे बारसे जेवलेले होते. त्यांनी त्यावर सांगितले कि कितीशी रक्कम आहे? तेवढी भरून टाका आणि बिल माझ्या ऑफिस मध्ये पाठवून द्या.
आता अशा तर्हेचा कागद श्री निरंजन हिरानंदानी याना पाठवणे हे एकतर कमी प्रतिष्ठेचे होते आणि त्यातून श्री निरंजन हिरानंदानी पुढे हे कुठे काढतील ते सांगता येणार नाही. त्यामुळे त्याने अगदी शहाजोगपणे सगळे बिल भरून टाकले.

विशुमित's picture

2 Nov 2018 - 8:54 pm | विशुमित

भारी आहे.

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2018 - 9:13 pm | चौथा कोनाडा

मोठ्ठा विषय आहे, एकएकाचे अनुभव वाचून शहाणं व्हायला होतंय.
मी आता पर्यंत ज्या ज्या जणांना पैसे उसने दिलेत, त्यातले ८०-८५ % परत मिळालेत (माझ्याच सारखे तेही सज्जन :-), काही वेळेत, काही उशीराने.

माझा बरंचसं वर मुवि म्हणाले तस आहे. एकतर खूपच जवळच्या लोकांना पैसे द्यायला लागलेत त्यामुळे देतानाच मनात धरते कि परत मिळणार नाहीयेत, त्यामुळे मिळाले तर बोनस असतो. आणि ऑफिस मध्ये कधी माझी पर्स विसरली म्हणून तू दे असं मी आणि माझ्या मैत्रिणीचं चालू असतं, आणि दोघीही थोड्या विसराळू पाहतो, त्यामुळे विसरून जातो आणि थोड्या दिवसांनी एकमेकींना विचारतो कि काही राहिले आहेत का. आजकाल तर व्हाटसप वर मेसेज पाठवून ठेवतो, त्यामुळे विसरायला होत नाही.

माझ्या ऑफिस मध्ये एक नमुना आहे, दर वेळेला लंच ला गेलं कि टीप द्यायला १-२ रुपये कमी पडतायत तू दे असं नेहमी करतो. वर डॉ खरे म्हणल्याप्रमाणे प्रश्न पैशाचा नसतो, फसवले गेल्याची भावना वाईट असते. मी भिडस्त वागल्यामुळे माझे आधीचे पैसे गेले (मीच हिशोब ठेवला नाही), त्यानंतर प्रत्येक लंच नंतर त्याला ई-मेल पाठवते अबक दिवस अबक हॉटेल अबक पैसे, बाकी काहीच लिहीत नाही. हे १-२ वेळा झाल्यावर माझ्याकडे मागायचा बंद झाला.

नशिबाने जवळच्या ज्या लोकांनी पैसे घेतलेत ते खरंच अडचणीत आहेत ते नीट माहितीये त्यामुळे पैसे नाही देत त्याचं काही वाटत नाही. तेच बिचारे बोलून दाखवत होते कि द्यायला जमत नाहीये, आणि मला उलट सांगायची वेळ अली कि पैशाचा आटा विचार करू नका तुमच्या अडचणी सोडवा.

झेन's picture

3 Nov 2018 - 8:54 am | झेन

बुडवणा-याला पैसे मागणे आणि बुडवणे एवढी सवय झालेली असते उलट स्वतः चे पैसे परत मागणाराच संकोच करत बसतो. अभ्या जसं म्हणाले तसे धंद्यात तर प्रत्येक किस्सा वेगळा. यातून कुणी सुटत नाही. हॉस्पिटलमध्ये सुध्दा सिरीयस पेशंट वर उपचारासाठी सर्व प्रयत्न करण्यासाठी सगळे नातेवाईक आग्रही असतात पण बिल भरायच्या वेळी सगळे गायब होतात.

सुबोध खरे's picture

3 Nov 2018 - 9:20 am | सुबोध खरे

मी मागे सूचना केली होती कि रुग्णाला भेटायला जाता तेंव्हा पुष्पगुच्छ किंवा फळं सारखं तत्सम काही घेऊन जाण्यापेक्षा रोख रक्कम द्या आणि लग्नाला आहेर करता त्याऐवजी एखाद्या रुग्णाला भेटायला जाता तेंव्हा यथाशक्ती आहेर करा ज्यामुळे रुग्णाला किंवा नातेवाईकाला थोडासाआर्थिक (आणि मानसिक) आधार मिळेल. परंतु लोकांनी तो विचार उडवून लावला आणि मी गप्प बसलो.

शहाणे करण्यात अर्थ नाही.

गाडगे बाबा आणि तुकडोजींना पण हे जमले नाही, मग आपल्या सारख्या अतिसामान्य माणसांचे कोण ऐकणार?

मार्मिक गोडसे's picture

3 Nov 2018 - 10:16 am | मार्मिक गोडसे

माझ्या आत्याचा व्हॉटसअप ग्रुप अशाच प्रकारची मदत करतो.

जेडी's picture

3 Nov 2018 - 1:29 pm | जेडी

मी वापीला होते तेव्हा मैत्रिणीने घराचे गॅरेंटर आणि पैशासाठी विचारले. मी लगेच हो म्हणाले आणि पासपोर्ट झेराॅक्स साठी वर काढुन ठेवला. नवरोबांनी तो पाहीला आणि कशाला वर काढलाय अशी विचारणा केली. मी सर्व सांगितले. मी अण्णांना सांगिन, गॅरेंटर झालीस तर ! एवढ्या धमकीने मी गॅरेंटर न होता तिला त्यावेळी १० हजार दिले. पुन्हा रजिस्टार समोर कमी पडले म्हणुन पण २-४ हजार दिले, हि रक्कम मी विसरले. २००५ मध्ये दिलेल्, पण द्यायचे नाव नाही. २०११ मध्ये मी धाडस करुन मागितले तेव्हाही काही कारणे सांगुन दिले नाही. नंतर ती, तिची बहिण आॅस्ट्रेलियात नवर्याबरोबर आहेत. छान छान फोटो, पार्ट्या... मी पुन्हा विचारले तर आईला द्यायला सांगते असा मेसेज आला. पुढे काहीच नाही म्हणुन मी सरळ अकांउट डिटेल्स मेसेज केले . मला मुलीची होस्टेल फी भरायची आहे तु १ लाख भर असे सांगितले. तिने मेसेज वाचली होता तरीही तिने काहीच रिप्लाय दिला नाही. ही मागच्या महिन्यातली गोष्ट. मी परत विचारले तर एक दिवशी माझ्या अकाउंटला १० हजार जमा करतीय असा तिच्या आईची मेसेज आला. १० हजार जमा झाले.
मी तिला मी तुला दिलेले पैसे पण तु मात्र मला दिले नाहीस ह्याची आठवण करुन दिले.तिचा रिप्लाय, मी ॲब्राडला राहते म्हणजे मी श्रीमंत नाही वैगेरे, कशावरुन मला जज केले . माझे उत्तर, “मी १३ वर्षापुर्वी पैसे दिले आणि तु १३ वर्षानेही सर्व परत केले नाहीस, त्यावेळी मीही श्रीमंत नव्हतेच. “

चुकुनही कुणासाठीही गॅरेंटर म्हणून राहू नका.

आपल्या पैशांनी दुसराच कुणी फ्लॅट किंवा गाडी वापरतो.

------

लोन संबंधात एक गोष्ट....

आमच्या शेजारी श्री.पांचाळ, नावाचा अशिक्षित मनुष्य रहायचा.सही म्हणून अंगठा वापरायचा.त्याचा स्वतःचा धंदा होता.त्यांचाच एक मित्र होता, "परमार" नावाचा.

परमार आणि पांचाळांचे संबंध खूपच घरोब्याचे.

एकदा ह्या परमारांनी, पांचाळांना ५०००/- रुपये मागीतले.१९७५ मध्ये ही तशी मोठीच रक्कम.पांचाळ म्हणाले, आत्ता माझ्याकडे नाहीत.उद्या परवा पर्यंत सोय करतो.

दुसर्‍या दिवशी पांचाळ, माझ्या वडीलांकडे ५०००/- रु. घेऊन आले आणि म्हणाले, "हे पैसे तुम्ही आज संध्याकाळी परमारांना द्या.मी परमारांना सांगीतले की, माझ्या कडे पैसे नाहीत, कारण मी जर पैसे दिले तर ते हमखास बुडणार.पण तुम्ही दिलेत तर तो तुम्हाला पैसे नक्कीच देईल.ते पैसे तुम्ही मला नंतर द्या."

संध्याकाळी, आमच्या वडीलांनी, पांचाळांच्या समक्ष, परमारांना पैसे दिले आणि तसा कागद पण करून घेतला.(कागद करायचे डोके पण पांचाळांचेच)

६ महिन्यांचा वादा होता.अपेक्षे प्रमाणे परमार काही पैसे देईनात.मग पांचाळ आणि वडील, परमारांकडे गेले.परमारांना बाबांनी सांगीतले की, येत्या ६ दिवसात जर पैसे मिळाले नाहीत तर, मला पोलीस कंप्लेंट करावी लागेल.

तिसर्‍याच दिवशी परमार पैसे घेऊन हजर.

--------

ह्या पांचाळांच्या व्यवहार ज्ञानाचे बरेच किस्से आहेत. त्याबद्दल परत कधी तरी......

स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको....||

माझ्या कंपनीतल्या एका सहकाऱ्याने एकदा मला घर कर्जासाठी गॅरेंटर राहतोस का म्हणून विचारले होते.

तेव्हा मी माझ्या साहेबांचा सल्ला घेतला होता. त्यांनी मला सांगितले कि केवळ एकाच कंपनी मध्ये तुम्ही दोघे काम करता म्हणून तुमची ओळख आहे. तू त्याला व्यक्तिगत रित्या ओळखतॊस का? उद्या तू किंवा तो कंपनीसोडून दुसरीकडे गेला तर काय? तुम्ही दोघे जर मित्र असाल तरच या बाबतीत विचार कर असा त्यांनी मला सल्ला दिला होता.

नंतर विचारांती मी त्या सहकाऱ्याला नकार दिला तेव्हा तो नाराज झाला आणि त्याने माझ्या बरोबर बोलणे देखील कमी केले. पुढे हि गोष्ट मी माझ्या साहेबांना सांगितली तेव्हा त्यांनी फक्त हासून मान डोलावली होती. असा साहेब मिळणे विरळाच !

पैसे बुडवणाऱयांना बुडवायची सवयच असते. शहाणपणाचा मार्ग म्हणजे दिलेले पैसे अक्कलखाती गेले म्हणायचे आणि पुन्हा पैसे न देणे. आपण अडी नडीला माणुसकी म्हणून मदत करतो पण घेणार्याला त्याची जाणीव नसते.
व्यावसायिक वसुली हा वेगळाच विषय आहे आणि तिथे खमक्याच लागतो हे खरे.

नातेवाईकांना पैसे देऊच नयेत इथपर्यंत मी आलेलो आहे. अगदी तारण ठेवले तरी.
मला लाखाचा गंडा घातलाय. इथे थोडे ज्ञान मिळाले तर बरे होईल.

वाचतो आहे.

नातेवाईकांना पैसे उधार दीले तर नातेही जाते आणी पैसे ही. त्यापेक्षा नाही सांगीतले तर जास्तीत जास्त नातेवाइक थोडेफार दुरावतील.नाते जास्त महत्वाचे असेल तर पैसे बुडाले तरी चालतील ईतकेच द्यावेत. मित्रांच्या बाबतही तसेच.

नाखु's picture

5 Nov 2018 - 11:40 pm | नाखु

हा विषय दोन बाजू असलेला आहे.
पहिल्या बाजूला ज्याने मदत केली पैसे देऊन वेळ निभावून नेली तो (जो नंतर भिकारी, अगतिक, मनस्वास्थ्य बिघडलेला आणि कधीकधी खलनायक समजला जातो)
दुसरा आयुष्यभर आनंद फक्त पैसे बुडवण्यासाठीच घ्यायचे त्याची शेखी मिरवायची,चार समव्यसनी मित्र मंडळातर्फे वाहवा मिळवून नायक बनायचे, जोडीदार नवीन पापभिरू माणसाला बकरा शोधतात.

पैसे कामाचे,वस्तू खरेदी चे वास्तव सेवेचे ते बुडविणे एक विकृत स्वरूप वृत्ती आहे
त्यात गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत सगळेच असतात
मी २५ वर्षांपूर्वी फटाका व्यवसाय करताना बंगलेवाल्याने सुद्धा २० रूपये बुडविले आहेत
दिवंगत पत्नी घरगुती व्यवसाय (साडी व इतर कपडे) किमानपक्षी १५ स्त्रियांकडे उधारी २० हजार होती.
स्थानिक बंगलेवाल्यांपासून ते चाळकरी)
एक दिवस अचानक एक बाई कपडे बदलून घेण्यासाठी आली आणि ही बातमी कळताच त्यानंतर आजतागायत पुन्हा कधीच संपर्क केला नाही उधारी ३००० रूपये बुडविले
संपूर्णपणे १५ महिलांमध्ये एकच महिला जी स्वतच्या गावी कायमस्वरूपी निघून गेली तीनेच हस्तेपरहस्ते संपूर्ण पैसे पाठवले.
बाकी सर्व स्थानिकांनी बुडविले.मीही मागण्यासाठी तगादा करण्याच्या मनस्थितीत नव्हतोच.
वडिलांच्या मृत्यूनंतर (ते खेड शिवापूर येथे डाॅक्टर होते साल १९७६) ८ ते १० हजार रुपये बुडाले,एका खेडूताने मात्र जसे जमेल तसे महिन्यातून काही पैसे प्रसंगी धान्य, दूधाचा रतीब देऊन फेडले.

या धाग्याने ह्या जुन्या खपल्या निघाल्या
आधिक उणे क्षमा

उपयोजक's picture

8 Nov 2018 - 9:01 am | उपयोजक

खुप छान,उपयोगी अनुभव वाचायला मिळताहेत.असेचअनुभव लघुउद्योजकांचेही यावेत.त्यातूनही बरंच शिकायला मिळेल.

विजुभाऊ's picture

8 Nov 2018 - 2:17 pm | विजुभाऊ

माझे एक सिनीयर मित्र त्यांच्या मित्राला कॅन्सर झाला आहे त्यामुळे काही पैसे उसने दे. इन्शुरन्स चे पैसे आले की तुझे पैसे देईन. मी सध्या सवड नाही म्हणालो. दुसर्‍या दिवशी त्यांचा पुन्हा फोन की तुला इतर कोठून शक्य असेल तर तेथून पैसे घेवून दे. तीन महिन्यात पैसे परत करतो. मी त्यानी साम्गितलेल्या खात्यात पैसे भरले.
बरे ते गृहस्थ तसे चांगले परिचीत आहेत. फसवणूक करणार नाहीत हे माहीत आहे.
एकदा त्यांचा मेसेज आला की पुढच्या आठवड्यात पसे भरतो. तुझे बँक डिटेलस पाठव. तसे पाठवूनही पैसे जमा झाले नाहीत.
इतर काही कामासाठी एकदा मी त्यांच्या पत्नीला फोन केला माझा फोन आल्यावर त्या बाईनी मला सांगितले की साहेबांनी पैसे मागिले तर स्पष्ट नाही देणार असे सांगा. पण
त्या ग्रुहस्थांचा फोन बंद आहे. म्हनून त्यंच्या घरी फोन केला. तेंव्हाही ते पैसे देतो म्हणाले. पाच महिने होत आले. ते अजूनही पैसे देत नाहीत. ते पैसे त्यानी स्वतः वापरले नाहीत हे माहीत आहे. त्यांना मी कठोर बोलू शकतो. पण ते मलाच अवघड वाटते.

तुमचे पैसे बुडवण्यापेक्षा परत करणं कितीतरी जास्त सोयीस्कर आहे....असं देणेकर्याला वाटायला हवं.

शंकासुर's picture

8 Dec 2018 - 10:25 am | शंकासुर

पण जर आपण उधारीवर व्यवहारच केले नाहीत तर ??(काही ठिकाणी रोखीने व्यवहार होतच नाहीत ह्याची कल्पना आहे पण ते वगळता)
म्हणजे जे काही संबंध पैसे गेल्यानंतर बिघडणार आहेत ते काहीच तोट्यात न जाता बिघडले तर आपलाच फायदा आहे. आणि अशी लोक परत येतात जेव्हा त्यांना खरंच तुमची गरज असते त्यामुळे संबंध फक्त काही काळासाठी वाईट होतील.

ह्या पॉलिसीमुळे सुरवातीला नक्कीच त्रास होईल पण भविष्यात तुम्हाला कोणीच परत उधारी मागणार नाही.

गामा पैलवान's picture

8 Dec 2018 - 1:57 pm | गामा पैलवान

शंकासुर,

एक अडचण येऊ शकते. ती म्हणजे तुम्हाला जर उधारी मागणाऱ्याचं सहाय्य भविष्यात लागलं तर? उधारी मागणारे सगळे काही अप्रामाणिक नसतात. हा नीरक्षीरभाव ठेवायला पाहिजे. माझ्या माहितीतला एकजण होता. तो अगदी दोन रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत कितीही रक्कम उसनी मागायचा (सन १९९० च्या आसपास). त्याकाळी २००० रुपये बऱ्यापैकी मोठी रक्कम होती. तरीपण दुसऱ्या दिवशी सकाळी रक्कम परत करायचा. असेही लोकं असतात. माणूस ओळखणं महत्त्वाचं.

आ.न.,
-गा.पै.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Dec 2018 - 3:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

आमच्या कंपनीत काम करणारा एक कामगार कंपनीतल्याच दुसर्‍या एका कामगाराला एक लाख रुपये कर्जासाठी जामिन राहिला. दोघेही एकमेकांचे घनिष्ट मित्र, सात आठ वर्ष एकत्र काम केलेले. कर्ज घेतलेल्या मित्राने काही दिवसांनी नोकरी सोडली व स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यात काही अडचणी आल्या आणि कर्जाचे हप्ते थकले.

बँकेने (सहकारी बँक) आमच्या कंपनीला जामिनदाराच्या पगारातून कर्जाचे हप्ते वसूल करण्याची नोटीस पाठवली आणि महिना ५ हजार रुपये हप्ता बांधुन दिला.

हे कमी झाले म्हणुन अजून काही दिवसांनी त्याच मित्रा करता अजून एका सहकारी बँकेची नोटीस आली आणि त्यांनी महिना १० हजार रुपये हप्ता कंपनी कडे मागितला. शेवटी आमचे एच आर मॅनेजर मधे पडले आणि त्यांनी ५००० चा हप्ता चार हजार आणि १० हजारचा हप्ता ६००० वर सेटल केला. अन्यतः या मित्राच्या हातात फारसा पगार पडला नसता.

कर्ज न फेडणारे दोघेही सुस्थितीत असुनही काहीतरी कारणे देउन हप्ते भरायचे टाळत आहेत.

त्यावरची कडी म्हणजे मी नुकतेच कंपनीतल्या लग्नात तिघांना एकाच पंक्तीत एकमेकांशेजारी बसुन एकमेकांना आग्रह करत जेवताना पाहिले.

पैजारबुवा,