Skip to main content

इझी, पिझी! नारळाची बर्फी!

लेखक पद्मावति यांनी मंगळवार, 06/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
H
इझी, पिझी! नारळाची बर्फी!
चिवडा, चकली, करंज्या, अनरसे, लाडू ... फराळातली ही मातबर मंडळी खमंग भाजून, सारणाने भरून आणि तेलातुपात तळून आता सज्ज झाली असतील, हो ना? घरोघरी खरेदीची धांदल, पै-पाहुण्यांची गडबड सुरू झाली असेल. उटण्याचा सुगंध, रांगोळीचे रंग, पणत्यांची आरास आणि भरगच्च भरलेले फराळाचे ताट! या फराळात भर म्हणून एक अतिशय सोपी आणि पटकन होणारी पाककृती आज आपण पाहणार आहोत. आपली नेहमीचीच नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी! साहित्य - २ वाट्या खोवलेला नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट १ वाटी साखर १ चमचा तूप वेलची पूड किंवा जायफळाची पूड . कढईत तूप गरम करून खोबरे थोडे भाजून घ्या. मी डेसिकेटेड कोकोनट वापरला होता. वडीचा ज्यांना रंग पांढरा शुभ्र आवडतो, त्यांनी खोबरे भाजताना रंग बदलणार नाही याची काळजी घ्यावी. मला जरा सोनेरी रंग आवडतो, त्यामुळे मी जरा जास्त भाजते. . त्यात साखर आणि किंचित पाणी टाकून शिजवत ठेवा. साधारण पाव वाटीच्याही कमीच पाणी टाकावे सुरुवातीला. मग वाटले तर थोडे टाकता येईल आणखी. साधारणपणे १० ते १५ मिनिटातच मिश्रण कोरडे व्हायला लागेल. . मिश्रणात आता जायफळ पूड किंवा वेलची पूड टाका. केशरही टाकू शकता. एका थाळीला आता तुपाचा हात लावून घ्या. नारळ आणि साखरेच्या मिश्रणाचा गोळा त्या थाळीत चांगला थापून घ्या. हे करताना हाताला तूप लावावे आणि गरम असतानाच थापावे. . एखाद तासात सुरीने वड्या कापून घ्या. कमीत कमी वेळात आणि कमीत कमी गोष्टींमध्ये बनणाऱ्या या वड्या आहेत. येता-जाता अगदी सहज पटकन करण्यासारखा हा प्रकार आहे. . सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा __/\__ . H
दिवाळी अंक वर्ष

वाचने 22197
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

प्रचंड आवडणारा पदार्थ. कधीही, कुठेही खाउ शकते

किसलेल्या नारळाची नेहमीच असते, एकदा खोवलेल्या नारळाची करायला सांगून बघतो.

वडी उचलून तोंडात टाकावीशी वाटते आहे. ही एकदम आवडती वडी.. स्वाती

आवडता पदार्थ. माझी मावशी त्यात बीट पण किसून घालते. रंग मस्त येतो पण टिकाऊ नसल्याने लगेच संपवावी लागते

खूप सुंदर व सोपी रेसिपी व त्याचे फोटो पण. नाहीतरी प्रत्येक घरात या ना त्या कारणाने अनेक नारळ फोडले जातात व फोडलेल्या नारळाची रवानगी मात्र शेंडी सहित फ्रिज मध्ये केली जाते आणि अडचणीत आणखीन भर....., असेना का, या रेसीपी मुळे ही बर्फी मात्र वारंवार करायला व खायला आवडेल.

एकदम सुरेख, फोटोला 100 पैकी 220 मार्क

झटपट होणार्‍या वड्या आवडल्या. करून बघायच्या यादीत आणखीन एक भर. फोटो खूप छान आलेत!

मला नारळाची बर्फी आवडते नेहमी विकतच घ्यावी लागते.

आवडेश...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chogada... :- Loveyatri