पाठमोरी

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
3 Aug 2018 - 9:03 pm

"आपलं कसं है लक्ष्या, वुडलॅन्ड म्हनजे वुडलॅन्ड"
"आत्ता पायात सेमच हाय की बॉस, पन जबरीय राव ट्रॅक्टरटायरवानीच दिसतंय बूट"
"मग लका, दोन वर्ष बघायचं नाही आता, आधीचा कंटाळा आला राव. चल काढ गाडी"
चकचकीत सफारीत बसताना काचेत स्वतःलाच बघताना मात्र कंटाळा येईना. काळा शर्ट, फिटींगची जीन, खाली वुडलॅन्ड्,डोळ्यावर रेबॅन. सगळा साज कसा रोजचा फिक्स. रेबॅनमागचे डोळे मात्र फिरायचे कायम. माग काढत, सावज हेरत.
आत्ताही.
दार उघडताना दिसली ती पाठमोरी.
जर्रा कंबरेखाली नेसलेली साधी साडी आणि अर्धउघडा ब्लाउज हे चित्र नेहमीचं असलं तरी आकारातलं अन हेलकाव्यातलं आव्हान त्याला जाणवलं.
"हळू घे बे सेकंडवर फूटपाथपासनं"
पास होताना रेबॅनची आणि गाडीची काच एकदमच आली खाली आणि चार डोळे भिडले.
शरीराच्या आव्हानातले कणभरही डोळ्यात नव्हते, तासभर वाघाला दमिवल्यावर शेवटाला हरण कसं बघतं वाघाकडं तसली नजर ती. त्याला नेहमी लोकाच्या डोळ्यात वाचत येणारा इतिहास दहावीप्रमाणंच हितंही फेल गेला.
"कुठं जायाचं मॅडम तुम्हाला, तुम्ही ते आपलं हितं राहता ना?"
"आयोव, मी कुठली मॅडम, आमचं ह्येनी सर हैत जागृती शाळेला, पुढं तर घर हाय, ह्येंनी बोलावलं म्हनून शाळेकडं चालले."
"जागृतीला म्हनजे आपल्या पाटील सरच्या शाळेत व्हय, बसा बसा मग, सोडतो शाळेकडंच."
होय नको होय नको होत दार उघडले गेले अन चोरुन बसलेल्या तिला आरशात त्याचा चेहरा दिसला. दोन डोळे तिला आक्ख्या आरशाच्या ग्लासातनं पीत होते.
........................
.
"सर आयका माझं, करा अ‍ॅडजस्ट, आपण जिंदगीत केली नाही रिक्वेस्ट कुणाला"
"आओ पण पंचायतीसमोर लग्न करुन आणलीया हिला"
"ते करु की मॅनेज, तुम्हाला नाय न्हवं पाटलानं परमनंट केलं अजुन, ह्या म्हैन्यात काढु ऑर्डर, आपली जबान"
"आवो पण तुमीबी कसं बोलिता असं?"
"सर, लै झालं आता हां, देतो तेवढं घेयाचं, तिलाबी बोललुया मी. दुसरी एखांदी गरीबाघरची आणा हळद लावून. परमनंट नोकरीत सुखानं राव्हा, हे दागिना तुम्हाला झेपणारा न्हाई, आन तुम्ही ह्ये दागिना घेऊन मिरवनं मला झेपणारं न्हाई"
"आवो पण...."
"राहायचं न्हवं हितं? ह्या गावात?" "लक्ष्या ह्येना दे रे कॅश..."
.
.
बिचारं सर वळून वळून बघत गेलं. तिची नजर जोडव्यावरनं हलंना.
..........................
.
ह्याचा रेती कॉन्ट्रॅक्टरचा धंदा. दारात १० हायवा उभ्या स्टीकरं लावून. दोन पोरं दहावी बारावीला, बायको स्वत:चं अस्तित्व माहेरच्या नावाप्रमानं कायमचं विसरलेली. नवर्‍याचा बाहेरख्यालीपणाचा पहिल्या वर्षातच अंदाज आलेला. आता पोरं शिकवून मोठी करणे इतकंच आयुष्य शिल्लक राह्यलेली.
ही आली घरात तसं पहिली बायको तोंड फिरवून निघून गेली, पोरं बावचळली, मायेनं जवळ घेतलं तरी बुजली. हिनं स्वतःचं ठिकाण हुडकून काढलं आणि ठिय्या मारला. दोघाच्या वयातलं अंतर चांगलं मोठं. वीस बावीसाचं पण त्याचा रंगेलपणा त्याहून मोठा. ही आली आणि पहिल्या संसारातलं तेल दररोज संपत गेलं होता ते पार विझलंच. हिला काय करु अन काय नको असं व्ह्यायलं. सकाळच्याला चार चार तास लक्ष्या गाडीत वाट बघत बसायचा पण ह्याचं घरातून पाउल निघायचं नाही. जोडीनं कधी निघालं बाहिर तर आठाठ दिवस घराकडं फिरकायचं नाहीत. नुसतं माथेरान न महाबळेश्वराच्याच तीस चाळीस ट्रीपा झाल्या. हिकडं सुरुवातीचं हिचं खेडवळ बुजणं कमी झालं. हा बाहेर पडला की डीमार्ट आन पार्लरला जायाला लक्ष्याला फोन केला की तो येऊ लागला. एकदा डीमार्टातनं बाहेर पडताना सर दिसला. बायको दोन पोरासह खच्चुन भरलेली ट्रॉली खेचत चालला होता. शहराची हवा सगळीकडंच फिरलेली दिसत होती. हिनं तोर्‍यात मान फिरवली, हा मात्र कधी गावात फिरला नाही हिच्यासोबत. जे काय फिराफिरी ते बाहेर गावात. पहिल्या बायकोनं हुशारीनं अटच टाकलेली ती.
हिला लाख वाटलं तरी आता तेच्यासोबत फिरण्यासारखं काय राह्यलंही नव्हतं म्हणा. पाठीचा कणा त्याला साथ देईना. आयुष्यभर केलेली व्यसनं आता पोखरलेल्या शरीरासोबत राहत होती इतकंच. इकडं पोरं मोठी होउन कामाधंद्याला लागली. त्यातल्या मोठ्या रविने बापाचाच धंदा शिस्तीत डेव्हलपर्स आणि प्रमोटर्सच्या नावाखाली लिगली करायला सुरुवात केली. पहिल्या बायकोनं शिस्तीत सगळ्या एफड्या, सोनं, घर नावावर लावून घेत पोरं मार्गी लावली.
.
....................................................
.
दुपारच्याला त्याला उठवंना, घशातनं आवाजच फुटंना, चार्जिंगला लावलेला फोन पण उठून घेणं होईना. हिचा काय पत्ता दिसंना. शेवटी रात्री अंथरुणातनं खुरडत खाली पडला की आवाज झाला. पोरगा पळत आला. फोनाफोनी झाली. हिला आणि कारला घेऊन थोड्या पैशानिशी लक्ष्या गायब होता.
"पप्पा केस करु गाडीचोरीची, कुणाच्या नावावर आहे?"
"........................"
"सायबरच्या कदमाला सांगतो ट्रॅक करायला, पैसे कीती नेलेत भैन्चोदने?"
ह्याची नुसती आडवी मान हलत होती.
पोरानं दिला हात आणि निघाला त्याला घेऊन आईच्या बेडरुमकडे.
.
ह्याची नुसती आडवी मान हलत होती.
......................................................
.
.
.
.
(खूप आधी वाचलेल्या एका कथेवरुन रचलेली:- अभ्या..)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

3 Aug 2018 - 9:59 pm | जव्हेरगंज

दोनदा वाचल्यावर समजली ;)

मुळ कथा कुठली म्हणायची?

छान लिहिली आहे. मूळ कथा सुहास शिरवळकरांची आहे का? नाव नाही आठवत कादंबरीचं, पण असंच काहीसं कथानक होतं.

ज्योति अळवणी's picture

4 Aug 2018 - 1:18 am | ज्योति अळवणी

आवडली कथा... छान फुलवली आहात

टवाळ कार्टा's picture

4 Aug 2018 - 5:16 am | टवाळ कार्टा

:)

महासंग्राम's picture

4 Aug 2018 - 2:11 pm | महासंग्राम

जहबरी अभ्या भौ

चिनार's picture

4 Aug 2018 - 4:23 pm | चिनार

जबराट कथा...
काही वाक्यांसाठी तर साष्टांग दंडवत घ्या अभ्या भाऊ !!

वानगीदाखल..

जर्रा कंबरेखाली नेसलेली साधी साडी आणि अर्धउघडा ब्लाउज हे चित्र नेहमीचं असलं तरी आकारातलं अन हेलकाव्यातलं आव्हान त्याला जाणवलं.

संजय पाटिल's picture

5 Aug 2018 - 9:52 am | संजय पाटिल

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2018 - 7:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कथा. लिहित राहा भावा.

-दिलीप बिरुटे

जेम्स वांड's picture

4 Aug 2018 - 10:27 pm | जेम्स वांड

नजरेत जालीम टेलिस्कोप हाय लगा तुझ्या . माणसाची देहबोली, स्वभावबोली, भावबोली अन नेत्रबोली वाचायची अफलातून कला तुला अवगत हाय, ग्रामीण मातीत घोळसून घेत बहुतकरून जमान्याला घोळसत जगला हायस, बेस्ट हाय, मागं ती जेसीबीवाल्याची गुष्ट अन आता ही कथा, लैच लगा जबरा वातावरण निर्मिती करतूस, असंच चालू दे , जियो!

सिरुसेरि's picture

6 Aug 2018 - 7:45 am | सिरुसेरि

+१ . सहमत .

कंजूस's picture

5 Aug 2018 - 12:24 pm | कंजूस

एकाच वेळी तीनचार समांतर कथानकं पुढं सरकवतो मस्त.

जानु's picture

5 Aug 2018 - 7:00 pm | जानु

असंच असतंय....

प्रचेतस's picture

6 Aug 2018 - 8:44 am | प्रचेतस

जबरी कथा. सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले.

कोंबडा's picture

6 Aug 2018 - 12:29 pm | कोंबडा

हिच गोष्ट निमिष सोनार यांनी यापेक्षा चांगली लिहिली असती.

अभ्या..'s picture

7 Aug 2018 - 1:47 pm | अभ्या..

हो, त्यांचा हातखंडा असेल मूळ लेखकापेक्षा तीच गोष्ट भारी लिहिण्यात.

सस्नेह's picture

6 Aug 2018 - 5:09 pm | सस्नेह

गावोगावची कथा..

सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.

जेम्स वांड's picture

7 Aug 2018 - 1:39 pm | जेम्स वांड

फॉर्मेलिटीचा किडा चावलाय का भावड्या तुला? =))

अभ्या..'s picture

7 Aug 2018 - 1:45 pm | अभ्या..

भावड्यातला 'व' जसा आला ना तसाच तो पण आला. ;)

जेम्स वांड's picture

7 Aug 2018 - 2:02 pm | जेम्स वांड

भा(व)ड्या विथ अ व ! =))

चौथा कोनाडा's picture

7 Aug 2018 - 1:32 pm | चौथा कोनाडा

कसलं खतरनाक लिव्हलंय लगा, शिनिमाच बगतोय असं वाटतंय जनू !
येक आन येक डोल्याफुडं हुबा र्‍हायलान !
____ दंडवत, अभ्या, दंडवत, ____
______ _/\_ _______

डिटेलिंग आवडलेच, तरीही अजून थोडी फुलवायला हवी होतीस, असे वाटले.

तुषार काळभोर's picture

9 Aug 2018 - 5:17 pm | तुषार काळभोर

जिकलायस लगा!!

चिगो's picture

13 Aug 2018 - 4:48 pm | चिगो

भारीच.. जियो, अभ्याशेठ.