निरोप

Primary tabs

मकरंद घोडके's picture
मकरंद घोडके in जनातलं, मनातलं
12 Jun 2018 - 6:28 pm

भावनेची आर्तता भरभरून मांडणारा, सुटलेपणाची, तुटलेपणाची बोचणी देणारा- क्षणापूर्वी आपला असणारा आणि पुन्हा कधी अनुभवता येईल की नाही अशा साशंक वळणावरचा हा क्षण! कुणीतरी देण्यापूर्वी तो घेता यायला हवा असा हा अलौकिक क्षण- निरोप
कधी अल्लड वयात घरभर नाचणारी सर्वांना आपलंसं करुन घेणारी लाडकी लेक मायेचा उंबरठा ओलांडून जेव्हा दूरदेशी वेशीपल्याड निघते तेव्हा आई बाबांच्या कापऱ्या हातांना अगदी घट्ट धरून हुंदके देत देत पोरसवदा भावनेने इच्छा नसताना एक निरोप घेते. तिला तो घ्यायचा नसतो आणि मायेच्या माणसांनाही तिला तो द्यायचा नसतो पण हा निरोप ठरलेला असतो.
दूरदेशीचे राजे त्यांच्या खबरी घोडेस्वारांकरवी बंद लखोट्यात कितीतरी महत्वपूर्ण निरोप पाठवत असत. हे निरोप देणारे घोडेस्वार जीव मुठीत घेऊन मैलोनमैल धावत असत. कारण दळणवळणाचा हा एकमेव दुवा जर काही घातपात झाला तर किती दूरगामी परिणाम करू शकतो हे ध्यानात ठेवूनच ते खबरे निरोपाला जीवापेक्षा जास्त जपत असत. नेपाळीराजे तर खास अशा शुभ संदेशांनाच निरोप म्हणत बाकी सगळे ‘संदेश’ किंवा ‘वार्ता’ या प्रकारात पोचवले जात.
काही निरोप हे लिहिलेलेच नसतात पण ज्याला द्यायचे त्याला एका सांकेतिक भाषेत ते पोचवले जातात आणि निरोप घेणार्‍याकडून तशीच दाद वा प्रतिसाद द्यायचीही एक सांकेतिक पद्धत असते.
उदा. गड जिंकल्यावर तोफांच्या सलामीचा निरोप!
जुन्या देवळांमध्ये, चावड्यांवर काही म्हातारी मंडळी जेव्हा एखादा नवखा चेहरा पाहतात तेव्हा झटक्यात अंदाज बांधून कूळ ,वंश,जातभेद ओळखून त्या अनोळख्या व्यक्तीची अगदीच जवळची ओळख करुन घेतात आणि त्यांच्या ओळखीच्या आणखी निराळ्याच माणसाला या माणसाची गाठ मारून ख्याली-खुशालीचा निरोप धाडतात.
असं म्हणतात की ज्याचा निरोप त्यालाच द्यायचा असतो. दुसरयाने तो वाचू ,ऐकू,सांगू नये इतक्या खोल खाजगी अर्थाने निरोपाला महत्व आहे.

काही जागा अशा असतात कि त्यात म्हणे जीव अडकतो. अर्थात ती वास्तु असेल तर जरा जास्तच! कधी ध्यानीमनीही आलं नसेल अगदीच लहान वयात जिथे आपण खेळलो,बागडलो त्या जागा,ते कठडे, ते बाक, बगीचे , मैदानं या सगळ्यांमध्ये एक जिवंतपणा आपल्याच रुपाने वास करत असतो. वाढत्या वयात आपण अगदीच एक सांकेतिक निरोप या जागांना देऊन टाकलेला असतो.
म्हणूनच वर्षानुवर्षे पुन्हा त्या जागांची ओढ जेव्हा खुणावते तेव्हा पुन्हा भूतकाळ जगवण्यासाठी तिथे जाणं होतं तेव्हा त्या जागाही अंग चोरून, आ वासून अनोळख्यासारखे आपल्याकडे पाहू लागतात. खरंतर तसे आपण स्वत:कडे पाहू लागतो कारण त्या वयातलं अगदी कोवळं निरागस मन आता उन्हाने अनुभवाने रापलेलं निगरगट्ट झालेलं असतं! त्या जागांमध्ये आणि आपल्यात एक परकेपणाची निरोपरेषा कायमची उमटून राहिलेली असते.
नोकरी-धंदा यांच्या निमित्ताने आपण काही गावांना आणि माणसांना असाच नमस्कार करुन निरोप दिलेला असतो. खूप संपन्न अनुभव दिलेत तुम्ही, तुमच्या अंगाखांद्यावर बागडताना जो आपलेपणा होता तो चिरकाल स्मरणात राहील! पण दिड वीत पोटाची खळगी भरायला बाहेर पडतोय.. चला निरोप घेतो!
सणासुदीच्या काळात मग पुन्हा अशी गावे आणि माणसे खुणावत राहतात. खरं सांगू का हा निरोप पोचलेलाच नसतो आणि तो पोचवा अशी इच्छाही नसते.
विशिष्ट वयानंतर काही कामांना आणि माणसांनाही निरोप मिळतो. अगदी सक्तीचाच असतो तो!
बालपण हे काही नुसतं खेळायचं वय नसतं कधी! त्या खेळांमागे बुद्दी आकलनाचा एक संस्कार दडलेला असतो. वय वाढतं आणि या बालपणीच्या खेळण्याला न सांगताच सांकेतिक निरोप जातो की- आता पुरे झालं.
काही माणसं तुम्हाला हवी असूनही देहाने तुमचा निरोप घेतात तेव्हा त्यांचा कार्यकाळ संपतो आणि आपला नाईलाज असतो. हाही निरोप चटका देऊन जातोच!
म्हातारवयात शरीर थकतं, बुद्दी कुरकुरु लागते. जगाच्या बाजारहाटीतुन मागे थांबून दीर्घ श्वास घ्यायला, घाई गडबडीत राहून गेलेलं पूर्ण करायला एक जागा मिळते.
पण नेमकी ही निवृत्त वयानंतरची जागा खरंतर भांबावून सोडते. काय करायचं ते ठाऊक असतं पण नेमकं 'कसं' करायचं हे आजमवायला एक तर शरीर नाहीतर बुद्दी आपला निरोप घेऊन टाकते-तेही तुम्ही न सांगता तुमच्या मनाविरूद्ध!
काही माणसांना कुठे थांबायला हवं याचं पक्कं भान असतं मग तो क्रिकेट सारखा लोकप्रिय खेळ असो राजकारणासारखी अस्थिर जीवघेणी स्पर्धेची जागा असो वा आपली आवश्यकता नसण्याची जाणीव असो,ते थांबतात. काहींना सुचवावं लागतं काहींसाठी सक्तीने ते अमलात आणावं लागतं. मर्त्य माणसांच्या या जगात कायम टवटवीत आणि रसरशीत असणार्‍या निसर्गाने दिलेला हाही एक निरोपच आहे- जोपर्यंत आहात तोपर्यंत इथलं सगळं तुमचं आहे. भले ते तुम्ही बुद्धीने, अधिकाराने, चोरून, लुबाडून मिळवलं असेल पण नंतर ते माझंच मला परत आहे तेव्हा अहंभावाचा दर्प न ठेवता सत्याची कास धरा ते स्वीकारा आणि योग्यवेळी निरोप घ्या.
भले तुमच्या मागे तुमचं नाव काढणारं कुणी नसेल, तुम्ही तुमच्या नावासाठी म्हणून ते मुद्दाम बिंबवलेल असेल, भले हे तुम्ही केलं असा स्वार्थी अभिमान बाळगला असेल..
पण शेवटी एक दिवस सारं काही इथेच ठेवून जायचंय ही भावना जेव्हा प्रबळ होते तेव्हा सगळ्या गोष्टी कशा एकदम सर्वसामान्य माणसासारख्या एका सरासरी पातळीवर राहतात.
निरोप घेण्यापूर्वी सर्वश्रेष्ठ सरासरी पातळीवर राहण्यासाठी नेहमी दोन लोकांचा आदर करायचा असतो- आपल्या वयापेक्षा जेष्ठ आणि आपल्यापेक्षा वयाने अगदीच कनिष्ठ! हाही एक सांकेतिक निरोपच आहे एका सुसंस्कृत पिढीने दिलेला ,जपलेला आणि दुसऱ्या नव्याने उभ्या ठाकलेल्या उमलत्या पिढीसाठी-चांगलं संस्कारी जगण्यासाठी! काही निरोप ठरवून द्यायचेत ते असे-
दुजाभावाने गैरसमजाने वा वेळ न मिळाल्याने काही नाती गमावून ताणून टाकतो आपण! नंतरचं वाईट वाटणं नैसर्गिकपणे मनाच्या खोल पाण्यावर तरंग उमटवतं. निवांतक्षणी कधीतरी चूक बरोबर असा सारीपाट आपलाच आपल्याशी मांडला जातो. खरंतर आपण समजतो तेवढी माणसे चांगली नसतात आणि आपल्याला वाटतात तेवढी वाईटही नसतात. हा आपला तात्कालिक परिस्थितीत त्या माणसांकडे पाहण्याचा रोख,दृष्टिकोन तसं ठरवतो. परंतु आपला मेंदू अत्यंत कार्यक्षम असून नेहमी हे सगळं बॅलन्स करू पाहतो. स्वत:हून काही करण्यासारखं उरलंच नसेल आणि ही हुरहूर, तुट भरून काढायची असेल तर निरोप द्या ईर्षेला, अभिमानाला, मीपणाला, मोहाला, रागाला! सोप्पं नाहीये पण हेच त्याचं स्पष्ट उत्तर आहे!
शाळेतले निरोप समारंभ, कॉलेज च्या farewell पार्ट्या आणि म्हातारवयातले रिटायरमेंटचे कार्यक्रम शेवटी काय असतं?
निरोपांचं सेलीब्रेशन !!
त्या घटनांना माणसांना शेवटचं कडकडून भेटणं, एक अतिउच्च असा पुन्हा न येणारा क्षण भरभरून जगणं, सुखी असो व दु:खी त्यातलं चिरंतन लक्षात राहील असं निरोपसत्व जपणं!!

मांडणीविचार

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

12 Jun 2018 - 9:28 pm | पद्मावति

भावपुर्ण. आवडले.

शाली's picture

12 Jun 2018 - 9:54 pm | शाली

छान!

यशोधरा's picture

12 Jun 2018 - 9:58 pm | यशोधरा

निरोप आवडला.

पुणेकर भामटा's picture

13 Jun 2018 - 7:44 am | पुणेकर भामटा

सुरुवात छान केलीत, मध्यंतरी थोडा गंडल्या सारखा वाटत आहे. पण एकंदरीत छान!

पुणेकर भामटा's picture

13 Jun 2018 - 7:44 am | पुणेकर भामटा

सुरुवात छान केलीत, मध्यंतरी थोडा गंडल्या सारखा वाटत आहे. पण एकंदरीत छान!

श्वेता२४'s picture

13 Jun 2018 - 5:19 pm | श्वेता२४

आवडल