Skip to main content

आंतरजाल ( अप्लिकेशनस ) विरुद्ध कुटुंब

आंतरजाल ( अप्लिकेशनस ) विरुद्ध कुटुंब

Published on 04/06/2018 - 13:37 प्रकाशित
मित्रानो आज आपण स्वतःहून कुटुंबासाठी किती वेळ देतो ? आपण जरी द्यायचा ठरवलं तरी आपल्या कुटुंबीयांपैकी कुणीतरी एक सदस्य हातात मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसलेला असतो , अगदी नाही म्हंटल तर दूरदर्शनासमोर बसलेला आढळतो . हे सर्व बघून मला तर आपण पुढारलेले नसून मागासलेलं वाटू लागलोय . आज माझी मुलं लहान आहेत म्हणून मी त्यांना या सर्व गोष्टींचे नकारात्मक परिणाम पटवून देत आहे . पुढे ते त्यांचे निर्णय घेतीलच . पण एक मात्र नक्की कि ते मी आल्यावर माझ्यासोबत घरात धिंगाणा घालतात . कुणीही दुर्दर्शनसमोर बसत नाही . वरील सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन मी स्वतः काही गोष्टी तंतोतंत पाळत आहे . सुरुवातीला थोडं चुकल्यासारखं वाटलं पण आता अगदी नाही म्हटलं तरी आमच्या "सौ " ला मी कुटुंबासाठी वेळ देणारा नवरा म्हणून वाटू लागलोय . त्या गोष्टी खाली देत आहे १) मागची दीड एक वर्ष मी स्वतः साधा फोन वापरत आहे . अर्थात सुरुवातीला फार चुकल्यासारखं वाटलं पण आता स्वतःला आणि कुटुंबाला खूप वेळ मिळतो . याचा आनंदच आहे . २) माझा लॅपटॉप मी माझ्या लॅबमध्येच ठेवतो . घरात कम्प्युटर मुद्दाम घेतला नाही आहे . असं नाही कि मी घेऊ शकत नाही . मुद्दाम या सर्व गोष्टी टाळलेल्या आहेत . अर्थात या गोष्टींचा मला सध्यातरी फायदाच होतोय . मोठ्या मुलाने बऱ्याचदा हट्ट केला , लॅपटॉप आणा म्हणून . मी त्याला सांगितलं कि मी तुला पॉकेटमनी देत जाईन ते साठवत जा . लॅपटॉपएव्हढे पैसे जमले कि तू स्वतःच घे . तोही खुश आणि मीही वेळ मारून नेली . मागील चार महिने तो मनापासून साठवतोय आणि जपतोयसुद्धा . हा एक अवांतर फायदा . मी आवर्जून हा धागा काढतोय कारण मला माहित आहे , मला तरी वाटतं कि हि सर्व आप्लिकेशन्स भलेही आपल्याला ज्ञान देत असतील पण आपला बहुमूल्य वेळही खातात . आणि मला वाटतं आपण आपला वेळ जर कुटुंबासाठी गुंतवला तर पुढे म्हातारपणी तो कामाला येऊ शकतो .. आपलं मत अनिवार्य नसलं तरी या विषयांवर बहुमूल्यं आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर

याद्या 5342
प्रतिक्रिया 22

१) मागची दीड एक वर्ष मी स्वतः साधा फोन वापरत आहे . अर्थात सुरुवातीला फार चुकल्यासारखं वाटलं पण आता स्वतःला आणि कुटुंबाला खूप वेळ मिळतो . मिपावर आपण अंदाजे सरासरी आपल्या खात्यावर नजर टाकली तर असे दिसते की, फेब्रुवारी २२ ते आज ५ जून पर्यंत आपण तीस वेळा दळण सॉरी लेखन दळलं आहे. प्रत्येक महिन्यात आपण साधारणतः १० लेख पाडलेत. लेखन करायचं म्हटलं की जरा विचार करावा लागतो, तो वेळ. लेखन केल्यावर आपल्या लेखनावर किती प्रतिसाद आले किती वाचनं झाली हे बघायला येणे. आणि मिपावर चक्कर मारणे यातला आपल्या वेळाचा हिशेब लावला तर आपण कुटुंबाला वेळ देता असे काही वाटत नाही, आणि पटलेलं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, मिपाच्या नादी लागू नका. कुटुंबाला वेळ द्या. मिपा बेक्कार व्यसन आहे. नाव सुटता सुटत नाही. अनेक जण मिपा सोडून गेले, जातात, मिपाबद्दल बाहेर सोशीयल साईटवर कुंथत असतात पण, मिपाचं तोंड पाहिल्याशिवाय अजूनही त्या लोकांचा दिवस सुरु होत नाही. तेव्हा, सांभाळा इतकाच सल्ला देतो. (हलकेच घ्या ) :) -दिलीप बिरुटे (मिपाचा व्यसनी ) ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) =)) =)) (यांना शालजोडीतले म्हणावे का ?)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यांना गुरुदक्षिणा म्हणतात . आणि ती प्रेमाने आणि सकारात्मकरित्या स्वीकारावी म्हणजे पुढे भले होते . सिद्धेश्वर विलास पाटणकर ( हलके घ्या बरे )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योग्य वेळी जागे केलाव बघा प्राडॉसर. अजुनही वेळ गेलेली नाही. ह्या व्यसनानं काम करुन जोडे खायची वेळ आणली. है हे बेक्कार व्यसन पण आता बाहेर पडल्याशिवाय भागत नाही. हातात असलेले पण जायाची वेळ आली. बाहेर जाउन कुंथायचे धंदे मात्र आम्हाला जमणार नाहीत पण परत तोंड बघणार नाही येवढं निश्चित समजा. गरीबाला आजवर दोस्तीचे चार शब्द बोल्लाव, लै उपकार झाले, बाकी दोस्तांनो पण येळेवर धावून आलाव आता रामराम घ्या आमचा. लावू कडंला कसंतरी. ______________/\_________________

माझ्या मनात पण हाच विचार आला होता पण कस लिहावं ते कळत नव्हतं

सर मिपावर मी बहुधा दुपारनंतर येतो . कामाचा ताण हलका करायला. शक्यतो रात्री किंवा संध्याकाळी मी नसतोच मिपावर . मी जेव्हा जेव्हा कामावर हजर असतो तेव्हाच मिपावर असतो . याचा अर्थ असा पण होऊ शकतो कि मी माझ्या कामाशी प्रतारणा करतो . हे खरंही आहे पण कुटुंबाला मात्र मी घरी असताना १०० % वेळ देत आहे सध्या. बाकी मला आपले प्रतिसाद खूप भावतात . मार्गदर्शनाची गरज आहे . संध्याकाळपर्यंत मिपावर असेन नंतर कुटुंबासोबत . सिद्धेश्वर विलास पाटणकर ( हलके घ्या बरे )

नवीन साधन/विकास हे दुधारी शस्त्र असतात. त्यांचा सकारात्मक उपयोग केला जाईल की नकारात्मक, हे वापर करणार्‍या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेवर, मानसिकतेवर व कुवतीवर अवलंबून असते. त्यांचा कोणत्याही टोकाचा अतिरेकी उपयोग वाईटच परिणाम देतो. उदाहरणार्थ, (दुचाकी/चारचाकी) गाडी घेतल्यावर ती कामासाठी सकारात्मकरित्या वापरावी की ती उडवत दिवसभर भटकत रहावे, यासंबधीचा निर्णय (पक्षी : शहाणपणा/गाढवपणा) मालकाचा असतो... गाडीचा नाही ! :)

घरी असताना , नवीन तंत्रज्ञानाचा फायदा काय असतो . मला वाटतं जश्या कामाच्या वेळा नेमून दिलेल्या आहेत तश्या त्या घरासाठीही असाव्यात . आपण जर ते काटेकोरपणे पळत असू तर ठीक अन्यथा त्याचे दुष्परिणामच जास्त असतात . उदा . मी जर हॉटेलात खाण्यासाठी कुटुंबासोबत गेलो आणि ऑर्डर देऊन जर मी मोबाईलमध्ये तोंड खुपसून राहिलो तर दोन गोष्टी होऊ शकतात १ कुटुंबियदेखील मला अनुकरण करतील २ ते मला अडवतील यामध्ये जर दुसरा भाग प्रकर्षाने येत राहिला तर आपण कुठेतरी चुकतोय असे समजावे . एखाद्याला कर्करोगाची गाठ असेल तर ती कापूनच बाहेर काढली पाहिजे , औषध करून नाही . म्हणून मी हि जी दोन तत्वे पाळतो आहे त्याच होणार या मला फायदा मी वर सांगितलेला आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर

तुमची उदाहरणे चुकीची आणि एकांगी आहेत. संगणक घरी असणे आणि त्याचा मुलांना, ठराविक वेळासाठी, (अ) नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, (आ) अभ्यासाला/ज्ञानार्जनाला उपयोगी सामग्री गोळा करण्याचे उपयोग शिकवणे, इत्यादी उपयोग करू देण्याचे सकारात्मक उपयोग तुमच्या मनात आले नाही, तर केवळ सोशल मिडिया अथवा खेळांअध्ये वेळ फुकट घालवण्याचे नकारात्मक उपयोग मनात आले... यात चूक तंत्रज्ञानाची आहे की इतर कोणाची आहे, ते सांगायलाच हवे का ? हॉटेलात खाण्यासाठी कुटुंबासोबत गेलो आणि ऑर्डर देऊन जर मी मोबाईलमध्ये तोंड खुपसून राहिलो तर यात चूक मोबाईलची की तुमची ? तोच मोबाईल तुम्हाला महत्वाचा आणि / किंवा तातडीचा संदेश २४ X ७ देऊ शकतो, आणि ते मोबाईलशिवाय शक्य नसते... हा फायदा की तोटा ? मी वर दिलेले गाडीचे उदाहरण नीट वाचले असतेत तर मोबाईलचे उदाहरण तुमच्या मनात आले नसते. तंत्रज्ञान (तसे पाहिले तर कोणतेही ज्ञान/साधन) दुधारी शस्त्र असते. शस्त्र वापरण्याची बुद्धी असलेल्याच्या हातात ते फायदेशीर संरक्षणाची व बलवर्धक गोष्ट होते... ती बुद्धी नसलेला ते शस्त्र स्वतःच्या पायावर मारून जायबंदी करून घेतो. शस्त्र तेच असते... वापरकर्त्याच्या बुद्धीत फरक असल्यामुळे परिणाम वेगळा होतो. एखाद्याला कर्करोगाची गाठ असेल तर ती कापूनच बाहेर काढली पाहिजे , औषध करून नाही . तुमच्या उदाहरणात कर्करोगाची गाठ म्हणजे, तुम्ही मोबाईलचा केलेला अवेळी व अविचारी उपयोग, आहे... मोबाईल नाही ! 'माझ्यात सतत तोंड खूपसून बसा' असा हट्ट तुमचा मोबाईल करत नसावा असा माझा अंदाज आहे ! या उदाहरणात मोबाईलला दोष देणे म्हणजे भिंतीवर डोके आपटून मग भिंतीला दोष देण्यासारखे आहे ! :) शिवाय, जर मोबाईल कर्करोग असेल तर, तुमच्याच म्हणण्याप्रमाणे, (हे वाचत असतानाच) त्याचा आत्ताच्या आत्ता हतोडीने चुराडा करून, ती कर्करोगाची गाठ पूर्णपणे नष्ट करणेच योग्य होईल, नाही का ?!! =)) बघा बुवा, तुमचाच निर्णय, तुम्हीच अमलात आणा ! मानवाने तंत्रज्ञानाला फुकाचा दोष देत बसण्यापेक्षा, तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करण्याच्या स्वतःच्या बुद्धीचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले तर तंत्रज्ञान वरदान शाबीत होईल... मग अर्थातच, तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केला जाऊन जीवन जास्त सुकर होईल. हे जमत नाही त्यांनी, सर्व तंत्रज्ञानाच्या कर्करोगाला आपल्या जीवनातून हद्दपार करून, जंगलात जाऊन (सद्या पृथ्वीवरचा तिथलाच काही भाग तंत्रज्ञानापासून मुक्त असेल) हंटर-गॅदरर बनून सुखाने कालक्रमणा करावी... काय म्हणता ?!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

म्हात्रे सर , कितीही म्हंटले तरी तंत्रज्ञान आणि त्याला देण्यात येणारा वेळ हा खर्च होतंच असतो आणि तो जर कुटुंबाला देता आला तर बरे , या मताचा मी आहे . माझी मते कदाचित भविष्यात जाऊन खरी ठरतील आता नाही . कारण तंत्रज्ञान आता कुठे बाळसे धरू लागले आहे अजून पुढे खूप मोठे व्हायचे आहे . हि वाचनखूण साठवून ठेवावी हि नम्र विनन्ती . इथे मंचावर येऊनही आपल्याला त्वरित प्रतिसाद देता आला नाही त्याबद्दल क्षमस्व . कारण मी इथल्या लोकांसोबत कामात व्यस्त होतो . सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@डॉ सुहास म्हात्रे १०० % सहमत मी दवाखान्यात असताना व्हाट्स अँप पाहतच नाही. दवाखान्यात संगणक आहे. रुग्ण नसेल तर मी मिपा उघडतो शेअर बाजारही "मागे" चालू असतो. परंतु समोर असलेल्या रुग्णाला यासाठी एक मिनिट सुद्धा बसवून ठेवत नाही. संगणकात असलेल्या प्रतिमांचा उपयोग करून रुग्णाला हर्निया म्हणजे काय आपल्या मूत्रमार्गात मूत्राष्म (दगड) कुठे अडकला आहे आणि तो कसा काढता येईल या सारख्या गोष्टी समजावून सांगणे अतिशय सोपे जाते. शिवाय वैद्यकशास्त्रातील एखादी गोष्ट पटकन तपासून पाहणे हेही सोपे जाते. आणि दिसामाजी काहीतरी (लिहीत च्या ऐवजी) वाचीत जावे या उक्तीप्रमाणे रोज वैद्यकशास्त्रातील काही तरी नवीन वाचून पाहता येते. घरात मुलांना एक दंडक घालून दिलेला आहे तो म्हणजे जेवताना भ्रमणध्वनी दूरच ठेवला पाहिजे. कोणतीही गोष्ट इतकी तातडीची नसते. सुरी रोजच्या भाजी कंपन्यांच्या कामालाही येते आणि एखाद्याची हत्या करण्याच्याही. यात दोष सुरीचा नाहीच.

पण.. पण.. पण.. तुमचा आदर्श ठेवून तुमची मुले पण कामाच्या वेळात काम ना करता मिपासारख्या सायटी वर पडीक राहू लागली तर? तुमचे तत्वज्ञान मग लोसांब्रआकोपा टाईप तर होणार नाई ना?

मी इथवर ज्या मार्गाने आलो आहे आणि आज ज्या पदावर आहे त्याचा मला नसला तरी माझ्या घरातल्याना फार अभिमान आहे . इथवर मी एकदम आरामात मज्जाच मज्जा करत पोहोचलो आहे आणि पुढेपण मज्जाच मज्जा करायची आहे . तेव्हा तंत्रज्ञानाला टाटा बाय बाय , आपण बोलू त्येच खरं , दुसरं काय नाय ... ह्ही ह्ही ह्ही

तेव्हा तंत्रज्ञानाला टाटा बाय बाय , आपण बोलू त्येच खरं , दुसरं काय नाय ... ह्ही ह्ही ह्ही सर्व तंत्रज्ञानाच्या कर्करोगाला आपल्या जीवनातून हद्दपार करून, कोणत्या जंगलात जाऊन (सद्या पृथ्वीवरचा तिथलाच काही भाग तंत्रज्ञानापासून मुक्त असला तर असेल) हंटर-गॅदरर बनून सुखाने कालक्रमणा करावी म्हणताय ते पण सांगा, तुमच्या मताच्या इतरांना पण त्याचा फायदा होईल आणि तुमचे एकटेपणही दूर होईल... ख्या ख्या ख्या ! बादवे, तुमचे मिपावरचे प्रतिसाद तंत्रज्ञान वापरून देत आहात की ते करण्यासाठी अजून काही तंत्रज्ञानमुक्त प्रणाली आहे तुमच्याकडे ?! =)) =))

अहो म्हात्रे सर , कदाचित मी माझा प्रश्न व्यवस्थित मांडू शकलो नाही आहे . मी अगदीच नाही म्हणत कि तंत्रज्ञान नको म्हणून , पण घरात असताना मी मात्र त्याला आवर्जून टाटा बाय बाय करतो . फोन वापरतो पण तो साधा . आलं कि बोललं आणि ठेवलं . काम झालं . बस्स .

आंतरजाल व संगणक हे माझे सर्वात आवडते नातलग आहेत . विकी पेडिया, गुगल अर्थ व यु ट्यूब या विषयी काय बोलावे ? समान शीले व्यसनेषु सख्यं या न्यायाने काही मित्र मिळाले ते आंतरजालाच्या शोधामुळेच . २००३ साली स्वत: होवून सेवा निवृत्ती पत्करली पण आन्तरजालाने कधी एकटेपणा जाणवू दिला नाही . केवळ प्रमोशन , प्रतिष्ठा नि पैसा यांच्या शोधात गुंतून राहिलो असतो तर छन्द पुरे करण्याची श्रीमंती मिळाली नसती. रिकामटेकडे जेष्ठ नागरीक गावगप्पा करीत कोपर्या कोपर्यावर बसत्तात त्यांच्या पासून मी दोन हात लांबच राहातो. पण मी काही पथ्य पाळतो . मी मला मोबाईलचा गुलाम होऊ दिलेले नाही. मला मिस काल आला तर मी त्याला अपवाद करूनच उलट कॉल करतो.वाटस अ‍ॅप वर मी मला उसने विसडम फोर्वर्ड करू नका असी तंबी सर्व सम्बन्धित याना दिली आहे.डेस्क Top वर बसल्यावर तासाने उठतो व अर्थ्या तासाची विश्रांती डोळ्याना देतो . काही चांगले आढळले तर कुटुंबातील इतरानाही दाखवतो . उत्तमोत्तम डोक्यू . सिनेमे पाहायला मिळतात . मी एका उत्तम काळात जन्माला आलो व जगात जास्त काही बिघाडी व्हायच्या अगोदर निरोप घेणार याचा आनंद आहे !!

नमस्कार माझं नांव पिवळा डांबिस.. मी कट्टर मिपाव्यसनी आहे.. हे व्यसन दहा वर्षांपूर्वी लागलं आणि नंतर ते सुटलंच नाही.... अगदी मिपावर पडीक नसलो तरी दिवसातून एकदा तरी मिपाचे दोन पेग मारल्याशिवाय चैन पडत नाही.... मिपा बंद असलं की चिडचिड होते, अगदी मिपा-कलालाला (नीलकांत, दुसरं कोण!) खरड धाडण्यापर्यंत मजल जाते.... घरचे लोक माझ्या ह्या व्यसनाला फाट्यावर मारतात तरी मी निर्लज्जपणे मिपावर जातोच... हे व्यसन सुटावं म्हणून आता काही खास प्रयत्न करत नाही, आता हे आमच्याबरोबरच जाणार... आमेन. :)

In reply to by पिवळा डांबिस

>>>>मिपा व्यसन सुटावं म्हणून आता काही खास प्रयत्न करत नाही, आता हे आमच्याबरोबरच जाणार... आमेन. १०० %खरंय....! -दिलीप बिरुटे

काही गोष्टी पटल्या. पण संगणक, मोबाईल यांना अगदीच हद्दपार करायची गरज नाही तरी स्वताची सदसद्विवेकबुध्दी वापरून त्यांचा वापर नियंत्रित करायची गरज नक्कीच आहे. अगदी बागेत फिरायला आलेले लोकसुध्दा मोबाईलमधे डोके खुपसून बसताना दिसतात्,तेव्हा त्यांची कीव येते. तीच गोष्ट सेल्फीछाप मंडळी. नुसता एक फोटो काढण्यासाठी यांचा किती आट्टापिट्टा. बरे तो फोटो ईतरांनी का सहन करायचा ? त्याचे आयुष्य किती ? आणि यासाठी कोण ती धडपड ? तीच गोष्ट व्हॉटस अ‍ॅपच्या वापराची. कुठेतरी स्वतावर नियंत्रण आणण्याची गरज आहे हे नक्की.

दुर्गविहारी साहेब , आपल्याकडून जो प्रतिसाद आलेला आहे तोच मी अमलात आणत आहे आणि मला इतरांकडून अपेक्षित होता . माझेही हेच म्हणणे आहे कि त्याच्या वापराचा अतिरेक होणे योग्य नाही . काय्यप्पा आणि इतर ऍप्लिकेशन्स चांगली असतील पण कुटुंबियांना देण्यात येणार वेळ त्याही पेक्षा महत्वाचा असतो . त्याकडे कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष होता कामा नये .