टोमॅटो सूप .. जरा वेगळ्या पद्धतीने ..

प्रिया१'s picture
प्रिया१ in पाककृती
23 Apr 2018 - 3:22 pm

आपण नेहमी जे टोमॅटो सूप किंवा सार करतो त्यापेक्षा हे जरा वेगळ्या पद्धतीचे आहे ... छान लागते... शिवाय फार वेळही लागत नाही ...

साहित्य:
--------
३ ते ४ मोठे लालबूंद टोमॅटो
२ मोठे कांदे
१ टीस्पून जिरे
२-३ मिरच्या
१.५ इंच आल्याचा तुकडा
किंचित हळद (जास्ती घालू नये नाहीतर टोमॅटोचा लाल रंग लपून जाईल)
मीठ चवीपुरते
साखर चवीपुरती
थोडेसे पाणी
१.५ चमचा अमूल बटर किंवा तूप (दोन्हीही छान लागते)
फ्रेश क्रीम आवडीप्रमाणे - साधारण २-३ चमचे (अमूल चा टेट्रा पॅक मिळतो ते क्रीम त्याच्या even texture मुळे सुपात छान मिसळून जाते)
आवडत असल्यास कोथिंबीर

कृती:
-------
कांदे सोलून घ्यावेत. टोमॅटो धुवून घ्यावेत आणि दोन्हीही कुकर च्या डब्यामध्ये बुडतील एवढेच पाणी घालून उकडून घ्यावेत. थंड झाल्यावर मिक्सर मधून फिरवून घ्यावेत. (एकत्र फिरवले तरी चालतात). ह्यानंतर जिरे, मिरच्या आणि आले ह्यांची पेस्ट करून घ्यावी.

पॅनमध्ये बटर किंवा तूप गरम करून घ्यावे. त्यात जिरे-मिरच्या-आले पेस्ट,चिमूटभर हळद घालावी आणि परतून घ्यावे. त्यावर टोमॅटो - कांद्याची केलेली पेस्ट घालावी आणि सगळे मिक्स करून थोडेसे परतून घ्यावे. टोमॅटो-कांदे उकडून घेतले असल्याने जास्ती परतण्याची गरज नसते. आता ह्यात फ्रेश क्रीम घालावे आणि ढवळून घ्यावे. ग्रेव्ही मध्ये क्रीम पूर्ण मिक्स झाले कि मग आवश्यकतेनुसार (थोडेसेच) पाणी घालावे. पातळ करू नये. सूप म्हटल्यावर जेवढा घट्टपणा आवश्यक असतो तेवढा maintain करावा नाहीतर ते पाणचट होईल. ह्यात नंतर चवीनुसार मीठ आणि साखर घालावी. उकळी फुटायला सुरवात झाल्यावर गॅस बंद करावा, उकळू नये.
वरून आवडत असल्यास कोथिंबीर बारीक चिरून घालावी.

हे सूप जिरा राईस बरोबर घेऊन शकता किंवा नुसते भूरके मारत प्यायला सुद्धा छान लागते.

प्रतिक्रिया

एस's picture

23 Apr 2018 - 3:30 pm | एस

गुड. पण मिपाच्या पद्धतीप्रमाणे 'फोटो नाय तर पाकृ नाय'! :-)

प्रिया१'s picture

23 Apr 2018 - 3:39 pm | प्रिया१

२ दिवसात हे सूप घरी करणार आहे ... तेव्हा फोटो टाकेन :-) ... already पब्लिश केलेल्या लेखाला edit करायची सोय आहे का मिपावर...? असल्यास माहिती द्यावी...

तुम्ही स्व-संपादन करू शकणार नाही, परंतु साहित्य-संपादक करू शकतील. फोटो इथे प्रतिसादात दिल्यास लेखात टाकून देऊ.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Apr 2018 - 10:05 pm | अत्रुप्त आत्मा

फोटुऊऊऊउऊ....!