केळीचे सुकले बाग ....

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
18 Apr 2018 - 1:45 pm

मानवी आयुष्य हे अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. सुख-दुःख, आनंद-वेदना, उन्हाळा पावसाळ्याची अविरत आन्दोलने अनुभवत याची सतत वाटचाल चालू असते. म्हणूनच इथे संतुलनाचे मोल अतिशय महत्वाचे आहे. येणारा प्रत्येक सूर्य हा आनंदच घेवून येईल असे नाही, त्याला वेदनेची, दुःखाची किनारसुद्धा असु शकते. एखादी संध्याकाळ अतिशय मन प्रसन्न करुन टाकणारी असते. पण खुपदा एखादी शांत, निःशब्द संध्याकाळ काही वेगळाच् मुड घेवून येते. उगाचच खिन्नतेचा, उदासीचा परिवेष परिधान करुन येते. मग नाहकच मन जुन्या, भूतकालीन आठवणीत रेंगाळायला लागते. अशावेळी जर मित्र, सगे सोयरे किंवा आयुष्याचा जोडीदार जर बरोबर नसेल तर तो एकटेपणा अक्षरशः खायला उठतो. एकटेपणाची ही जाणीव विलक्षण छळवाद मांडते. अतिशय क्लेशकारक, जीवघेणी असते. स्वजनांच्या विरहाची क्लेशकारक जाणीव करुन देणारी असते. अशा वेळी मला आवर्जून आठवण येते ती म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल यांच्या “केळीचे सुकले बाग….” या विख्यात विरहगीताची.

श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी या गाण्याचे संगीत दिलेले आहे. उषाताई मंगेशकरांनी ग़ायलेलं हे गीत यशवंत देवांच्या सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक म्हणून गणले जाते. या गाण्याच्या संदर्भात बोलताना एका मुलाखतीत देवसाहेब म्हणाले होते…

“समकालीन असलेले कवी अनिल आणि कवी वा. रा. कान्त हे दोन कवी रुढार्थाने गीतकार नव्हते, परंतु त्यांची भावकविता जोरकस होती. त्यांची भावकविता वाचत असतानाच डोळ्यांसमोर भावचित्रं उभी राहतात. शब्दांतून चित्र उभं करायची, कवीची हा ताकद मला खूप महत्त्वाची वाटत आलीय. संगीत देण्यासाठी मी ज्या कविता किंवा गाणी निवडली, त्याची माझी पूर्वअट हीच असायची, की ती कविता-गाणं वाचताना माझ्या डोळ्यांसमोर दृश्य उभं राहिलं पाहिजे. कारण कवीच्या भावना गीतामध्ये उतरलेल्या असतात, त्या ओळखून त्यांना योग्य प्रकारे शब्दबद्ध केलं, तरच ते गीत श्रोते आपल्या हृदयात आणि स्मरणात साठवून ठेवतात.”

केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी

यशवंत देवांच्या मते हे “विरहाचे सर्जनशील गीत” आहे.लौकिकार्थाने रोपाची व्यवस्थीत वाढ होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व काही गोष्टी मिळून सुद्धा ही केळीचं बाग मात्र सुकत चालली आहे. त्याला पाणी, सावली देऊन सुद्धा त्याची भरभराट होत नाहीये. अनिलांच्या बहुतेक कवितांप्रमाणे हि कविता सुद्धा मानवी आयुष्याचे एक रुपक आहे. सगळं काही आहे. धन, संपत्ती, आरोग्य पण तरीही समाधान नाही. कारण ज्याच्या / जिच्यासाठी हे सगळे हवे आहे ती प्रेमाची व्यक्तीच जवळ नाहीये. ती कुठेतरी दूर निघून गेलेली आहे।

अशि कुठे लागली आग, जळति जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे

हि अवस्था मोठी नाजुक असते, अगदी केळीच्या रोपासारखी. केळीचे रोप इतके नाजूक असते की आजुबाजुच्या आसमंतात दुरवर जरी कुठे आग लागली, वणवा भडकला तरी त्याचा केळीच्या रोपावर परिणाम जाणवतो. तसेच मानवी मनाचेही आहे. तुम्ही कितीही सुखात असाल, संपत्ती आणि आरोग्याने युक्त असाल तरी दुर गेलेल्या व्यक्तीची साधी आठवणसुद्धा सगळ्या आनंदावर पाणी फिरवायला पुरेशी ठरते. क्षणात सगळा आनंद नाहीसा होवून जातो, मनोवृत्ती बदलून जातात. हि कविता अनिलांनी नक्की कधी लिहीली असावी तो कालखंड माहीत नाहीये. पण बहुदा कुसुमावतीबाई गेल्यानंतरची असावी. १७ नोव्हेंबर १९६१ साली त्यांच्या पत्नी आणि जेष्ठ साहित्यिक सौ. कुसुमावती देशपांडे यांची प्राणज्योत मालवली आणि त्यानंतरच कधीतरी बहुदा कवि अनिलांनी ही कविता लिहीली असावी.

विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर या अगदी छोट्याशा शहरातुन आलेले अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे नावाचं हे अतिशय हळव्या मनाचं व्यक्तिमत्व. पुढील शिक्षणासाठी म्हणून ते पुण्यात आले. इथे फर्गुसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. स्वभाव कमालीचा मितभाषी आणि त्यात अगदी लहानश्या खेड्यातून आलेले त्यामुळे सुरुवातीला त्यांना पुण्यातला रहिवास तसेच फर्गुसनच्या वातावरणाशी जुळवून घेणे जडच गेले. कुसुमावतीबाईंशी त्यांची ओळख बहुदा याच कालखंडात झाली असावी. समान स्वभाव आणि हळवे कविमन हा कॉमन पोइंट असल्याने बहुदा ते एकमेकाच्या प्रेमात पडले आणि या नात्याची सुरूवात झाली. १९२९ साली कुसुमावतीबाई लंडन विद्यापिठाची इंग्रजी साहित्यातील पदवी मिळवून परत आल्या आणि त्या दोघांनी लग्न केले. मधला काळ ते एकमेकापासून दूरच होते. कुसुमावती बाई नागपुर, मग लंडन अश्या ठिकाणी शिक्षणानिमित्त लांब होत्या आणि अनिलजी पुण्यात. पण प्रेम वाढतच राहिले. अनिल वृत्तीने कवि होते तर कुसुमावती लेखिका. दोघेही साहित्यावर जिवापाड प्रेम करत राहिले. १९६१ मध्ये कुसुमावतीबाई अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. सगळे काही व्यवस्थीत चालू असताना अचानक १७ नोव्हेंबर १९६१ ला बाप्पाला त्यांची आठवण झाली आणि तो त्यांना घेवून गेला. त्यानंतर अनिल त्या धक्क्यातच जगत राहिले.

अनिल आणि कुसुमावती यांच्यातले नाते अतिशय विलक्षण होते. लग्नाआधी त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांचा संग्रह “कुसुमानिल’ या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांची पहिली भेट २ जुलै १९२१ रोजी झाली आणि अनिल यांनी आपल्या प्रियेला लिहिलेल्या पहिल्या पत्राची तारीख होती- २ जुलै १९२२. आजच्या मोबाईल आणि चॅटिंगच्या जमान्यात प्रेमपत्रे किंवा चिठ्ठी याचे महत्व आजच्या पिढीला कळणार नाही. पण प्रेम भावना किती हळुवारपणे आणि नितळ शैलीत व्यक्त करता येतात याचे हे एक आदर्श उदाहरण आहे.

किती दूरचि लागे झळ, आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा

किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली

कुसुमावतींचं निधन झालं. परंतु त्यांच्यावर आत्यंतिक जिवापाड प्रेम करणाऱ्या कवी अनिलांच्या मनानं ते स्वीकारलं नव्हतं. कुसुमावतींच्या पार्थिव देहाकडे पाहतानाही त्यांना त्या डोळे मिटून शांत झोपल्या आहेत असंच वाटत होतं. घरातली माणसं कवी अनिलांना कसं समजवावं या पेचात होती. आपली पत्नी आहे, शांत झोपली आहे, ती बोलत नाहीये, रुसली असावी आपल्यावर, अशी कल्पना करून त्यांना सुचलेली कविता म्हणजे –‘अजुनी रुसुनि आहे, खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना…’ हा प्रसंग फारच हृद्य आणि काळजात कालवाकालव करणारा!

एकदा का जगण्यातील स्वारस्य संपुन गेले की मग सगळ्यात गोष्टीतला रस हळुहळु कमी होत जातो. जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. तेव्हा कधी कधी प्रचंड वैफल्य येतं. नैराश्यामध्ये सोडलेला एक उसासा हजार शब्दात सांगता न करता येणारी भावना व्यक्त करतो. ”हिरो” या हिंदी चित्रपटातील लंबी जुदाई हे गाणे ऐकलेय का?

मौत ना आई तेरी याद क्यो आई… हाय…. लंबी जुदाई…

या ओळीमधला “हाय” एखादाच सेकंद रेंगाळतो पण त्यात तो आपलं काम अगदी चोख बजावतो. सारंगीच्या ताणलेल्या तारांवरती गज फिरवून आर्त आवाज निघावा तशी रेश्मा गातच असते. “बाग उजड गये……” लगेचच सूर बदलून हेच शब्द हताशपणे आळवले जातात…

बाग उजड गये खिलने से पहले….पंछी बिछड गये मिलने से पहले…

तसेच काहीसे या गाण्याचेही आहे. फक्त इथे कधीकाळी प्रेमाने, प्रियाने मिलनाने बहरून आलेला केळीचा बाग आता सुकत चालला आहे. आता फक्त विरहवेदना. आपल्यापासून दूर असलेल्या-गेलेल्या माणसाच्या आठवणीत आळवलेली. ही गाणी ऐकताना खूप आत खोल खोल दडपलेलं दुःख पुन्हा मनाच्या पृष्ठभागावर येतं. परंतु ते दुःख नसतंच, कारण दुःख कुरवाळण्यातही एक सुख असतंच. आपण त्यानिमित्ताने ते क्षण पुन्हा पुन्हा जगत असतो. अजुनी रुसून आहे,… खुलता कळी खुले ना…, ‘बैस जवळि ये, बघ ही पश्चिमकोमल रंगी फुलली अनुपम’, ‘केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी’, ‘ कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ? रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा…सांगाल का त्या कोकिळा अशी अनेक एकाहुन एक उत्तर गीते कवि अनिलांनी दिलेली आहेत.

हे गाणे यशवंत देवांनी उषा मंगेशकर यांच्याकडून गावून घेतले आहे. सुविख्यात गायिका उषा मंगेशकर यांचा सुमधुर, सुरेल आवाज या गीतातील आशयाला पूर्ण न्याय देणारा आहे. हा आवाज आपल्याला गीताच्या भावनेत सहज नेतो. त्यामुळे ती भावना हे गीत ऐकणाऱ्या प्रत्येकाची होते. हेच तर भावगीताचे शक्तिस्थान आहे. उषाताईंच्या आवाजात एक सुरेल अशी धार आहे. या आवाजाची क्षमता व ताकद यशवंत देवांनी नेमकी हेरली आणि एक अप्रतिम गीत जन्माला आले. या गीतात उषाताईंनी केलेला प्रत्येक शब्दाचा उच्चार इतका भावपूर्ण आहे, की त्यासाठी हे गीत पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. प्रत्येक शब्दातील भावना स्वरामध्ये उत्तम उतरली आहे आणि हे भान पूर्ण गायनभर सांभाळले आहे. या गीतातील चालीतले बारकावे व उच्चार याचे श्रेय त्या यशवंत देवांना देतात.

या लेखाच्या निमित्ताने त्या गाण्याची आठवण जागवत त्या महान कविश्रेष्ठाला माझा मानाचा मुजरा.

माहिती संदर्भ : आंतरजालावर उपलब्ध साहित्य, तसेच श्री. समीर गायकवाड, सोलापूर यांचा फेसबुकवरील एक लेख यातून साभार.

धन्यवाद.

विशाल विजय कुलकर्णी

संगीतलेखअनुभवसंदर्भ

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

18 Apr 2018 - 2:14 pm | अत्रन्गि पाउस

हे कुसुमावती बाई जिवंत असतानाच लिहिलेली कविता आहे. मृत्युनंतर लिहिली हि कथा विनाकारण प्रचलित झाली आहे.

अरविंद गजेंद्रगडकर ह्यांनी प्रत्यक्ष अनिलांनाच विचारून ह्याची खातरजमा केलेली आहे. स्वत: अनिल म्हणाले होते कि

अहो हि कविता मी माझ्या रुसलेल्या प्रतिभेला उद्देशून केलेली आहे

गजेंद्रगडकर ह्यांच्या अशी सूर अशी माणसे ह्या पुस्तकात हा संदर्भ आहे

विशाल कुलकर्णी's picture

18 Apr 2018 - 2:46 pm | विशाल कुलकर्णी

माहितीबद्दल धन्यवाद !

नाखु's picture

18 Apr 2018 - 7:05 pm | नाखु

पण हृदय स्पर्शी स्फुट लेखन

गर्दीतला एकटा नाखु

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2018 - 7:33 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर !

अतिषय सुंदर लेखन दादाश्री !
कवितेचे आतिषय सुंदर रसग्रहण आवडले ! गाण्याची लिन्क असेल तर जरुर द्यावी ! शिवाय ह्याच लेखाचे अभिवाचन करुन एखदा सुंदर विडिओ बनव्ता आला तर पहा , नक्की शेयर करण्यात येईल ! !

आणि हो, आत एखाद्या नितांत आनंदी गीताचे रसग्रहण लिहावे अशी प्रेमळ विनंती !
:)

दुर्गविहारी's picture

19 Apr 2018 - 7:33 am | दुर्गविहारी

अत्यंत सुंदर धागा आणि तितकाच उत्तम परिचय. आणखी असेच धागे आपण लिहावेत हि विनंती.
शेवटी या भावगीताची यु-ट्यूब लिंक दिली असती तर बरं झालं असतं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Apr 2018 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही घ्या तूनळी. हाकानाका ! :)

पैसा's picture

19 Apr 2018 - 8:58 am | पैसा

खूप छान लिहिले आहेस

तेजस आठवले's picture

19 Apr 2018 - 4:08 pm | तेजस आठवले

हे गाणं माझं फार आवडतं आहे. युट्युब वर उपलब्ध आहे. उषा मंगेशकरांच्या आवाजात ह्या गाण्याच्या भावना व्यवस्थितपणे व्यक्त झाल्या आहेत.

कंजूस's picture

20 Apr 2018 - 8:53 am | कंजूस

छान लेखन.
याची आणि। अशाच दुसय्रा आठवणींची ओडिओ फाइल कराच.

विशाल कुलकर्णी's picture

23 Apr 2018 - 9:05 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी !