मराठी दिन २०१८: सरप धसला कुपात (वर्‍हाडी)

Primary tabs

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
4 Mar 2018 - 9:06 am

खारी म्हणजे गावाले लागून रायते ते वावर, या खारीत ढोरायच्या बरोबरीन माणसायचा बी लय तरास रायते. सकारपासून ते रातरीवरी टमेरल घेउन, जाउन जाउन गाववाले खारीची पार हागणदारी करुन टाकते. रामाच्या खारीच बी तेच झालत. कोणतरी वरडत येउन सांगाव ‘ये रामा खारीत गाय धसली पाय’, रामा हातचा चहाचा कप तसाच ठेवून, धोतराचा काष्टा हातात धरुन ढोर हाकलाले खारीक़ड धावला रे धावला का त्याचा पाय बदकन पोवट्यावर पडे. आता धावता ढोरामांग, समोर ढोर पिक खात हाय अस दिसत असूनबी रामाले घराकड पळा लागे. रामान लय उपाव करुन पायले पण काही उपेग झाला नाही. तारा लावल्या, धुऱ्यान गवत वाढवल, बाभळीचा कुप केला तरी गावावले साऱ्याले पुरुन उरत होते. सकार झाली का रामाच्या खारीत हाजेरी लावून येत होते. जवा गावात सरकारी संडासं आले तवा रामा लय खूष होता. ‘आता तरी माया मांगची पिडा जाइन’ असाच इचार तो करीत होता. पण कायच जी. सरकारी संडासं बांधले पण गाववाले रामाच्या खारीत जाच काही सोडत नव्हते. रामान सरपंचाले सांगून पायल काहीतरी करा म्हणून, सरपंचाले बी रामाच म्हणन पटल. ग्रामपंचीयतीन येवढे पैसे खर्च करुन संडासं बांधले ते सोडून गाववाले रामाच्या खारीकडच पळते म्हणजे ग्रामपंचायतीचे पैसे वायाच गेले म्हणाचे.

सरपंचान पंचायतीच्या सदस्यायले सांगून कायदाच केला, जो बी कोणी रामाच्या खारीत टमेरल घेउन बसलेला सापडन त्याले येक हजार रुपये दंड. सरपंचान अस केल्यावर इरोधी पार्टीवाले का चूप रायते का जी, त्यायनबी बोंब केली ‘आजकाल हजार रुपायले कोण इचारते? आम्हाले जर का असा कोणी सापडला तर आम्ही त्याच तोंड काळ करुन त्याले गध्यावर बसवून त्याले गावात फिरवून आणू.’ आता आली का नाही पंचाइत, हजार रुपये दंड बी भरा आणि वरुन गध्यावरुन धिंड बी काढून घ्या कोण सांगतल जी. अशी महागाची परसाकड कोणाले पायजे होती? आन गाववाल्यायन रामाच्या खारीत बसन बंद केल.

तरी गावात दोनचार इब्लिस पोट्टे होतेच. ते काही आयकत नव्हते. इब्लिसच पोट्टे ते, त्यायले कोणती गोष्ट नको करु म्हटल का तेच करुन पायते. मारत्या बी अशाच इब्लिस पोट्ट्यायतला येक, सांजच्या टायमाले समदे घरी आले का हा खारीत धसे. कधी धुऱ्यावर, तर कधी तुरीत तर कधी पऱ्हाटीत. पऱ्हाटी चांगली माणूस माणूस उंच झालती. तूर बी तशीच वाढली होती. येथ उभा माणूस दिसत नव्हता तेथ बसलेला माणूस का दिसन जी. सांजच्याले मारत्या घरी आला आन मायले म्हणला

“माय व, चाय मांड मायासाठी, म्या आलोच.”
“तू आता कोठ चालला?”
“तू चाय मांड, म्या आलोच.” मारत्यान टमरेलात पाणी भरता भरता आवाज वाढवून आपल्या मायले सांगतल.
“कायले जात रामाच्या खारीत, पकडल्या गेला तर नसती आफत येइन. हजार रुपये दंड तर भराच लागन आन वरुन तोड बी काळ करुन घ्या लागन.”
“तू काहून बोंबा मारत फिरते माया नावान. बाहेरचे रायले घरचेच बोंबलते फुकट.”

हिव पडाया लागल होत. दिवस लहान झालता तवा लवकरच चांगला अंधार पडला होता. रस्त्यावरचे लाइटं लागले होते. लोकायच्या घरातून टीव्हीचे आवाजबी येत होते. मारत्या वस्तीच्या भायेर आला. वस्ती संपली का मंग साळंचा आवार होता. तिकड लायटं गियटं काही नव्हते पण गावातल्या लायटाचा उजीड तेथच काय पार रामाच्या खारीवरी पडत होता म्हणून तर ह्या पोट्ट्यायची रात्री बेरात्री रामाच्या खारीत जाची हिंमत होत होती. साळच्या आवाराले लागूनच रामाची खारी होती. सरपंचान तेथच गोठा बांधला होता. कुणी म्हणे का सरपंचान सारची जमीन दाबली म्हणून, खरखोट सरपंचालेच ठाउक. ढोर बांधाच कारण होत पण सरपंच येथ बसून रोज ढोसत होता. सरपंचाले ढोसाची भिती होती का पण त्याची बायको लय कडक. ढोसताना दिसला तर लाथ मारुन हाकलून देइल अशीच धमकी दिलती तिन. जमीन तर तिच्याच बापाची तवा तिच्याच नावान होती. तो तिच्यापासून वचकूनच राय. म्हणून त्यान हे अशी जागा शोधली होती. सरपंच बी लपून छपूनच ढोसाले बसे. त्यान इरोधी पार्टीच्या वसंतालेच आपला सोबती केला होता. या कानाची खबर त्या कानाले लागू देल्ली नव्हती. तरी त्याच्या बायकोले शंका होतीच का हा बुवा राहून राहून गोठ्याकडं कायले जाते बा. तस गोठ्यात काही नव्हत, आजूबाजून तुराटीचे कडे लावले होते आन त्याच्यावर टीनाच शेड टाकल होत. गोठ्याच्या सामोर रामाच्या खारीले लागूनच आंगन होत. काही ढोर आंगनात तर काही अंदर गोठ्यामंदी बांधली होती. दुभती गाय आऩ म्हैस सोडली तर रायलेली सारी ढोर सरपंच त्याच गोठ्यात बांधत होता. आंगनातच कुटाराची ढोली होती, त्याच्यावर कडब्याच्या पेंड्या ठेवल्या होत्या. ढोर कडबा कुटार खायले धसते म्हणून त्यान ढोलीच्या भवताल बाभळीच्या काट्याचा कुप केलता. ढोलीच्या मांग एखाद फुटाची जाग सोडली तर रामाच्या खारीचा बी कुप होता. सरपंचान त्या मधल्या जागेत बी कडब्याच्या पेंड्या भरल्या होत्या ढोरापासून वाचावायले त्यान त्याच्यावर तुराट्याचे कडे टाकून ठेवले होते.

नेहमी परमाण मारत्या सरपंचाच्या गोठ्यापासून रामाच्या खारीकड चालला होता. तो सरपंचाच्या गोठ्यापावतर आला होता न नव्हता तोच लाइन गेली. कुट्ट अंधार झाला. तसा मारत्या घाबरला. त्यान माग पायल, गावातबी कुट्ट अंधार होता. माणसाले माणूस दिसत नव्हता. अमावस जवळ आल्यान चंद्राचा बी काही उजीड नव्हता. थोडा येळ थांबून मारत्यान इचार केला आता येथवर आलोच आहो तर कायले वापस जाच. मेहनत कायले फुकट जाउ द्याची. येथच कुठतरी बसू. त्याले मालूम होत का सरपंचाच्या ढोली मांग एखाद फुट जागा हाय, बस कड दूर केल, एक दोन कडब्याच्या पेंड्या वर सारल्या का झाल. बर मधीच लाइट आले तरीबी काही फिकीर नाही. य़ेका बाजून ढोली, वरुन कडे, आन तिन्ही बाजून बाभळीच्या काट्याचा कुप, अंदर कोण हाय कोणाले का पता लागते जी. अशी शेफ जागा आजवर काहून लक्षात आली नाही म्हणून मारत्या सोतालेच शिव्या देत होता. असा सारा बराबर इचार करुन मारत्या कुपात जाउन बसला.

“आता तुमी कोठ चालले अंधाराच?” सरपंचाची बायको घरातूनच वरडत होती.
“गोठ्यावर जाउन पाहून येतो”
“आताच कोणत येवढ खेटर अडल हाय अंधाराच, जा आरामान.”
“माया जीव अडकलाय बैलात. मांग आंजीच्या पाटलाच बैल नाही अशीच लाइन गेलती तवा पान लागून खुट्यालेच मेला न व. तुल तर मालूम हाय सारं, तरीबी इचारते. आपल्या गावात बी जनावर फिरुन रायल म्हणते. चांगला डोम्या हाय म्हणते कारे वसंता?”
“भुऱ्याचे पोट्टे सांगत होते त्यायले शिवेकड दिसला म्हणे.”
“म्या तेथ कंदील ठेवून देतो.”
“आस, कंदीलाच्या उजेडात बैलाले सरप दिसला म्हणून ते तुमाले फोन लावून सांगनार हाय? मले समजत नाही म्हणता काजी. ताकाले जाच आन भांड कायले लपवाच म्हणते.”
“तुले तर तेच दिसते व. जवातवा किटकिट करत रायते.”

बायकोले अस सुनवुन सरपंच आणि वसंता अंधारातच गोठ्याकड निंगाले. आज तर लाइनच गेलती तवा दुधात साखरच पडली होती. सरपंचाची बायको तशीच रागात तेथच छपरीत उभी होती.

“दूध” गणप्यान आवाज देला. गणप्या म्हशी दव्हून दूधाचा गंज घेउन आलता. बाइ अजूनबी गुश्शातच व्हती.
“बाई, मालक कोठ गेल जी अंधाराच?”
“तुले मालूम नाही. तेथ सरप धसला म्हणते ना."
"सरप आन कोठ?"
"गोठ्यात." गणप्यान आय़कल तसा तो निंगाला. बाई बोलतच होती. "बाजीतल ढेकूण मारता येत नाही चालले सरप माराले. आता तू कोठ चालला, म्हशीले ढेप लाव ना”

तिच बोलन आयकाले गणप्या थांबलाच नाही, त्यान हातात काठी घेउन गोठ्याकड धूम ठोकली. रस्त्यात खोडावर पोट्टे बसले होते. लाइन नाही तर टीव्हीगिव्ही बंद तवा घरात बसून का कराच म्हणून खोडावर झिलप्या झोडत बसले होते. त्यायले गणप्या पळताना दिसला. येकान आवाज देला.

“बे गणप्या कुत्र मांग लागल्यावाणी कोठ पळून रायला बे?”
“गोठ्यात सरप धसला. तिकडच चाललो, मालकबी तेथच गेला.”
"सरप? बे पोट्टेहो सरपंचाच्या गोठ्यात सरप धसला. चाला पाहून येउ”

पोट्ट्यायले काहीतरी निमित्तच पायजे व्हत. सारे पोट्टे हातात काठ्या घेउन सरपंचाच्या गोठ्याकड निंगाले. रामा खारीतून घराकड चालला व्हता त्याले बी सरप धसल्याची बातमी समजली आन तो बी पोट्टयासंग निंगाला. वसंता आन सरपंच गोठ्यात पोहचलेच होते. वसंता तयारी करत होता सरपंच असाच चकरा मारत होता. वसंतान बाज टाकली, दोन गिलास काढले, भज्याची पुडी सोडली. गिलासात दारु ओतनार तर सरपंचान आवाज देला.

“हे पोट्टे कायले इकड येउन रायले बे वसंता?”
“कोणते पोट्टे?”
“हे खोडावरचे पोट्टे.”
“का जी न का”
“पयल तू ते गिलासं लपव, बाटली फेक तिकड कुपात. आमच्या भानामतीले समजल तर जिन हराम करुन टाकन ते. प्याची जाउ दे खाची बी सोय राहनार नाही.”
गणप्या पोट्टयायले घेउन पोहचला. आल्या आल्या त्यान इचारल
"कोठ हाय जी मालक?" गणप्यान इचारताच सरपंच घाबरला, आपल्या बायकोन आपल्या मांगावर माणसच धाडले अस त्याले वाटल. त्यान येक नजर वसंतावर टाकली. वसंतान खुणेनच सार बराबर लपवल अस सांगतल.
"का पायजेन बे तुले?"
"सरप, सरप धसला म्हणतेना" सरपंचान लय मोठा श्वास घेतला. पुन्हा वसंताकडे पायल आन बारीकमंधी हसला.
"अस अस सरप, तुले कोन सांगतल बे सरपाच?"
"मालकीनन सांगतल, कुपात सरप धसला म्हणे."

अंदर बसलेल्या मारत्यालेबी आता पोट्टयायचा आवाज याले लागला. आवाजावरुन तरी धाबारा पोट्टे असन असा त्यान अंदाज बांधला. त्याले समजत नव्हत इतके सारे पोट्टे इकड कायले आले ते. तो आता कान देउन आयकाले लागला.

"तो तेथच हाय अजून कुपात. बैल उडला म्हणेन गा म्हणून आलो आम्ही. आमी बी मंगानपासून त्याचीच भायेर निंगाची वाट पाहून रायलो. नुसतच कुंथत हाय अंदर भायेर निंगाच काही नाव घेत नाही."
"तो असा भायेर याचा नाही कोणातरी टार्च मारा रे अंदर" येक पोट्ट चिल्लावल.
"पोट्टेहो सांभाळून, जनावर हाय ते बहकल गिहकल भलतच होइन. जरा दुरुनच."
पोरायन थोडे दुरुनच टार्च मारले, त्यायले काही दिसल नाही. टार्चचा उजेड पायताच अंदर बसलेला मारत्या घाबरला. पोट्टे टार्च काहून मारत हाय त्याले काही समजत नव्हत. या टॉर्चच्या उजेडात आपण आता पकडल्या गेलो तर का होइन म्हणूनशान तो अजून लपाले पाहात होता.
"का करत असन अंदर येवढा येळ?"
"कात टाकत असन, लय जोर लावा लागते राजा तशी सुटका नाही होत."

टॉर्च घेउन पोट्टे कुपापावतर आले. मारत्याची आणखीन घाबरली टार्चपासून दूर राहाच म्हणून तो हलला आन आडप गेला.

"हालचाल हाय, अजूनबी अंदरच हाय म्हणजे."
"या टायमाले सोडाचच नाही." रामाले तर लइच जोर चढला. त्यान आपल सुरु केल.
"म्या तर त्याच्या मागावरच हाय. मले पयलांदी पऱ्हाटीत दिसला तवाच पकडून मारनार व्हतो पण कसा तवा माया हातून निसटला. त्याच्यानंतर पोट्टयायले धुऱ्यावर दिसला म्हणे. आज बरा सापडला कुपात. आज त्याले सोडतच नाही."

मारत्या कान देउन सार आयकत व्हता. आता त्याले घाम फुटाले लागला होता. आपण पऱ्हाटीत, धुऱ्यावर होतो तवाच रामान आपल्याले पायल. आज रामा काही आपल्याले सोडत नाही पार बदडून काढते अशी त्याले पक्की खातरी झाली. वरुन गाववाले गध्यावर बसून धिंड काढन ते येगळी. कोठ पराचीबी सोय नाही, मारत्या कुपात फसला होता. कायले कुपात बसलो असाच इचार करत होता. मारत्याले देव आठवत होता. तेवढ्यात कोणीतरी दूर मांग उभा असलेल्या हरुच बोलला

"आबे आजकाल अस सरपाले मारता येत नाही, जेलात जा लागनं. त्याले फक्त हुसकवुन लावा."

इतका वेळ टार्च मारुनही आत काही हालचाल नाही हे पाहून पोट्यायची हिम्मत आणखीन वाढली. पोट्टे दबकत पावल टाकत कुपाजवळ आले. कुपाजवळ येउन कुपात काठ्या खुपसु लागले. इकडून तिकडून काठी आपटू लागले. वरवर काठी खुपसुन काही होत नाही पाहून मंग जोर जोरात काठी अंदर खुपसु लागले. मारत्याच्या आजूबाजून काठ्या येउ लागल्या. काठीच्या जोरान कुपातले काटे रुतु लागले. येक काठी मारत्याच्या पाठीत बसली तसा मारत्या उडाला. कुपातून मोठी हालचाल दिसली तसे सारे पोट्टे येका दमात मांग सरकले.

"बे सांभाळून रायजा"
ते पाहून सरपंच बी घाबरला, तो वसंताजवळ सरकला आन त्यान वसंताले हळू आवाजात इचारल.
"का बे खरच सरप हाय का कुपात?"
"साल काही समजून नाही रायल यार."
"पाय बर जरा"
"बाजूले व्हा बे पोट्टेहो. नसती आफत करुन बसान. म्याच मोर होउन पायतो सार." अस म्हणत वसंता पुढ सरकला त्यान पोट्टयायले जोरात आवाज देला.
"पोट्टेहो जनावर बिथरुन हाय, जास्त जवळ जाउ नका. आरामान घ्या. पाहून नाही रायले केवढा उडला पाय, चांगला माणूसभर तरी असन. पयले त्याले तेथून बाहेर काढून मैदानात आणला पायजे. येकदा का मैदानात आला का मंग त्याले देउ हुसकवुन."
"त्याले बाहेर कसा काढाचा?"
"हात घालून वढून काढा च्याभीन"
"लगीत हुसार हायेस. तू घालतो का कुपात हात?"
"काही नाही बुडाखाली आग लावा त्याच्याबिगर तो भायेर नाही येत."
"हा उपाव बराबर हाय"
"सरपंच राकेल हाय का कुप पेटवून देउ. बुडाखाली झोंबल का कसा बाहेर येते पायजा."

बुडाखाली आग लावाच्या गोष्टी आय़कल्याबराबर मारत्याची चांगलीच घाबरली. आता का कराव काही सुचत नव्हत. मारत्या अंदरच्या अंदरच थरथरत होता. भायेर याव तर हे पोट्टे आपल्याले सोडनार नाही, रामाच्या पऱ्हाटीत धसाव म्हणाव तर बाभळीच्य काट्यायचा कुप. काटे कोठ घुसन काही सांगता येत नाही. आग लावली तर चांगलच भाजून निंगनार. मारत्या कात्रीत सापडला होता.

"आबे डोस्क हाय का खोक बे कुपाले आग लावान तर माये तुरीचे कडे बी जळून खाक होइन ना. वसंता पायते बराबर का कराच ते."
वसंता कुपाच्या जवळ गेला, काही दिसत का म्हणून इकड तिकड पाहाले लागला. काही दिसत नव्हत. तो वाकून का हाय ते पाहाले गेला. वाकाले म्हणून तो फुड सरकला तसा त्याचा तोल गेला. सावराले त्यान येक हात कड्यावर टेकवला, मंगानी त्यानच फेकलेली बाटली त्याच्या हाताले लागली. हाताले अस चोपड, चोपड थंडगार काहीतरी लागल्याबराबर तो घाबरला आन झटक्यात मांग आला.

"का गा काय झाल"
"हाताले काहीतरी चोपडं चोपडं लागल."
"टार्च द्या बे इकड" त्यान टार्च घेतला आन पयले मंगाच्या जागेवर टार्च मारला. त्याले बाटली दिसताच का झाल ते समजून आल. त्यान मंग टार्च दुसरीकड फिरवला.
"ते मंगानी कात टाकली म्हणे तेच व्हय. तो आता तिकड नसनार येकदा कात टाकल्यावर त्या जागेवर ठैरतच नाही ना तो. तिकड पायल पायजे."
"मी का म्हणतो वसंता आता कायले टाइमपास पायजे, आता हाय तेथच ठोका शिद्या काठ्या, तुताऱ्या घ्या आन लागा हाणाले. येक दोन दंडे बसले का तसा भायेर येते पाय." रामा बोलला.

रामाचा आवाज आयकला का मारत्याले धस्स होत होत. तो निसता माराच्या, ठोकाच्याच गोष्टी करत होता. रामाचा बदडून काढाचा इचार आय़कताच मारत्या लइ घाबरला. त्यान ठरवल जे होइन ते होइन, गध्यावरुन धिंड काढली तर काढू दे पण अस काट्याकुट्यात काठ्या खाउन मरण्यापेक्षा भायेर येउन शिद्द सांगाच भाउ गलती झाली माफ करा, आता नाही करनार अस, पायजेन तर तो दंड घ्या, गध्यावरुन धिंड काढा पण असे येले करुन मारु नको. मारत्याचा इचार आता पक्का झालता. भायेर निंगाच म्हणून मारत्या जोरात हलला, कुप अशा जोरात हालला का पोट्टे बंदे उठून पराले वापस खोडाकड. का चालल हाय त्यायन मांग वरुनबी नाही पायल. जशी वाट भेटन तसे परत सुटले. वसंताची तर लय घाबरली तो बी उलट्या दिशेन गोठ्याकड पराला. सरपंचबी मंग वसंताच्या मांग गोठ्यात धसला. वसंता घाबरुन बोलला.

"साला सरप व्हय का रानडुक्कर लय उसळत हाय."
"नाही सरपच व्हय रानडुक्कर कायले कुपाकाटीत धसाले जाते. आतावरी उठून पराल असत. सरप असा उसळताना नाही पायला गा कधी”
आता सरपंच आणखीनच घाबरला. तो घाबरुनच बोलला.
"मंग कोणच जनावर म्हणाच बे हे?"
"का मालूम अस डगर जनावर नाही पायल गा आजवरी."

तिकड मारत्यान जोशात कडब्याची पेंडी दूर सारली आन त्याले कुपात फट दिसली तसे त्यान डोये बंद केले आन तो फटीत धसला. काटे रुतले पण मारत्यान पर्वा केली नाही आन तो जोर लावून त्या फटीतून शिद्दा रामाच्या वावरात आला आन त्यान अशी धूम ठोकली का त्यालेच समजत नव्हत को तो कोठ परुन रायला ते. त्यादिवशी त्यान कानाले खडा लावला पुन्हा आता अख्या जिंदगीत कोणच्याच वावरात धसनार नाही. कुपातली हालचाल बंद झाली तसा सरपंच बोलला.

"उदयापासून बसन बंद साले कणचे कणचे जनावर गावात हिंडत रायते काही समजत यार." ज्याच त्याच गुपित त्याच्याजवळच रायल आन आजवरी गावात कोणालेच पता लागला नाही का कुपात कोणत जनावर धसल होत ते.

---मित्रहो
http://mitraho.wordpress.com/

.
.
1

वाङ्मयकथाविनोदप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

4 Mar 2018 - 10:00 am | जेम्स वांड

बेक्कार हसलोय! एक गाव बारा भानगडी अन वर्धा हिंगणघाट बोली! जबरदस्त.

पैसा's picture

4 Mar 2018 - 10:12 am | पैसा

=)) =)) =))
मिरासदारांच्या जातकुळीचे लिहिता तुम्ही!

अभिजीत अवलिया's picture

4 Mar 2018 - 10:54 am | अभिजीत अवलिया

मजा आली वाचताना .

मित्रहो's picture

4 Mar 2018 - 12:48 pm | मित्रहो

धन्यवाद जेम्स बाँड, पैसा आणि आभिजित अवलिया.
पैसा ताई आणि हा उपक्रम राबविणाऱ्यांचे मनापासून आभार.

नूतन's picture

4 Mar 2018 - 3:02 pm | नूतन

मिरासदारांच्या जातकुळीचे लिहिता तुम्ही!
पैसाताईशी सहमत

मलाही शंकर पाटील, मिरासदाराची आठवण आली.मजा आली वाचताना

मुक्त विहारि's picture

4 Mar 2018 - 4:33 pm | मुक्त विहारि

कथा आवडली...

नाखु's picture

4 Mar 2018 - 5:17 pm | नाखु

राजे हो
आवडली आहे

प्रमोद देर्देकर's picture

4 Mar 2018 - 5:32 pm | प्रमोद देर्देकर

मस्त कथा. आवडली.

पद्मावति's picture

4 Mar 2018 - 6:37 pm | पद्मावति

हा हा...मस्तच.

तेजस आठवले's picture

4 Mar 2018 - 6:45 pm | तेजस आठवले

चांगली आहे. छान.

मित्रहो's picture

4 Mar 2018 - 8:43 pm | मित्रहो

धन्यवाद नूतन, मुवि सर, नाखु, प्रमोद देर्देकर, पद्मावती, तेजस आठवले.

नूतन, पैसा ताई मिरासदार, शंकर पाटील यांची जातकुळी वेगळीच. त्यांच्या आसपास सुद्धा पोहचू शकत नाही.

स्नेहांकिता's picture

4 Mar 2018 - 9:40 pm | स्नेहांकिता

=)) =))
धम्माल कथा ! बोली पण साजरी आहे अगदी.

सुधीर कांदळकर's picture

6 Mar 2018 - 9:50 am | सुधीर कांदळकर

आवाज चा दिवाळी अंक वाचतोय असे वाटले. कथेचा प्लॉट मस्त देखणा आहे. या कथेवर स्कीट छान होईल. भाषेचा बाज आवडला.

मित्रहो's picture

6 Mar 2018 - 8:32 pm | मित्रहो

धन्यवाद स्नेहांकिता आणि सुधीर काका कांदळकर