थंडी गॉन… घाम ऑन!!!

Primary tabs

आदिजोशी's picture
आदिजोशी in जनातलं, मनातलं
23 Jan 2018 - 2:15 pm

चातक जितक्या आतुरतेने पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघतो त्यापेक्षा आतुरतेने आम्ही त्या घामाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत होतो. मागचे काही दिवस मुंबईचं हवामान पार म्हणजे पारच बिघडलं होतं. थंडीच्या मोसमात मुंबईत चक्क थंडी? हा काय आचरटपणा आहे? मुंबईकरांना थंडी हवी असती तर आम्ही सिमल्याला नसतो गेलो?

लोकल ट्रेन, टॅक्सी, बेस्टची बस, सी लिंक, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, धारावी, बॉलिवूड, वडा पाव ह्यांच्याप्रमाणेच 'घाम' ही मुंबईची ओळख आहे. घामट्टपणा ही मुंबईकरांची आवडती अवस्था आहे. मुंबईची हवा म्हणजे तर बोलायलाच नको. जाज्वल्य अभिमान एटसेट्रा नाही पण मुंबईत येतो तसा घाम जगात कुठेही येत नाही. पण आजकाल कसलाच भरवसा राहिला नाही हेच खरं.

काही गोष्टींसाठी मुंबईकर एकदम अनप्रिपेअर्ड असतात. उदा.: पहिल्याच रिक्षा/टॅक्सी चालकाने आपल्यालं हवं तिथे यायला हो म्हणणे, कुठल्याही दिवशी कुठल्याही वेळी ट्रेन रिकामी दिसणे, फुटपाथवर चक्क चालायला जागा असणे... ह्यातच थंडी अनुभवणे ह्या गोष्टीचा समावेश आहे. मुंबईकरांनी थंडीची अजिबात म्हणजे अजिबातच सवय नाही. नाही म्हणजे इतकी नाही की मुंबईकरांचे एसी सुद्धा कधी २०-२२ डिग्रीच्या खाली चालत नाहीत.

जगबुडी होत असताना मुंबईकर अगोचरपणा करून पाण्यातून चालत घरी जातील, रॅकवर ठेवलेल्या बॅगेत बाँब असू शकतो ही सूचना ऐकत उभ्या उभ्या झोप काढतील, इतकंच नव्हे तर ग्लोबल वॉर्मींगलाही मुंबईकर घाबरत नाही कारण 'वॉर्मींग झालंच तर फार फार तर अजून थोडा घाम येईल, त्यात काय...'.

पण... पण... पण... थंडीत करायचं काय हे मात्र त्यांना कळत नाही. पंखा लावायचा नाही तर झोप कशी येणार? गरम हवा खोलीभर फिरवण्यासोबत मुंबईतल्या पंख्याचे मुख्य काम म्हणजे एका लईत आवाज करून माणसांना गाढ झोपवणे. ही अंगाई बंद झाल्यापासून झोपही उडाली.

असे एकंदरीत कठीण दिवस सुरू होते. खिशातले रुमाल कोरडे राहत होते. पंख्यावर जळमटं साठत होती. 'फिलींग कूल इन मुंबई' असे अपमानास्पद हॅशटॅग फिरवले जात होते. 'मुंबईत ॠतू दोनच' हे ब्रह्मवाक्य बदलावं लागतं की काय अशी वेळ आली होती. स्वतःच्याच घरात 'बबन चड्डी आणि बनियान' ह्या जागतीक युनिफॉर्मवर वावरायची सोय राहिली नव्हती. स्वेटर, शाली, दुलया ह्या शोभेच्या वस्तूंची घडी मोडावी लागते की काय अशी भीती वाटत होती. पण देवाच्या कॄपेने शेवटी आज तो आलाच.

ऑफिसला जात असताना कानामागून ओघळणारा, आपण मुंबईतच असल्याची खात्री पटवणारा, माझा नवसाचा घामाचा थेंब.

-

अट्टल मुंबईकर,

आदि जोशी

मायक्रोवेव्हआस्वाद

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

23 Jan 2018 - 3:45 pm | पगला गजोधर

चला जरा वेगळं वाचायला मिळालं !

सतिश पाटील's picture

23 Jan 2018 - 5:50 pm | सतिश पाटील

आपण हा लेख लिहिलात आणि इथे मुम्बैत भर दुपारीच पुन्हा गार हवा सुटली. थंडी परत सुरु झाली
सध्याचे ५ वाजताचे तापमान २६ डिग्री. बहुतेक आज बसावे लागेल...

प्राची अश्विनी's picture

23 Jan 2018 - 6:00 pm | प्राची अश्विनी

खुसखुशीत (की चिकचिकीत?):)

ज्योति अळवणी's picture

23 Jan 2018 - 6:27 pm | ज्योति अळवणी

मस्त.... थंडीतही पंखा लावून चक्क शाल पांघरून झोपण्याची मजा अनुभवली खुद्द मुंबईमध्ये. आता परत मागील पाढे पंचावन्न!

आवडला लेख

मित्रहो's picture

23 Jan 2018 - 9:21 pm | मित्रहो

काय सांगता मुंबईत थंडी
थंडी तेही मुंबईत, थंडी

थंडीवरुन दवणीय अंडी आठवली , नंतर आले नाही दवणीय अंडे

एस's picture

23 Jan 2018 - 11:48 pm | एस

मुंबईत थंडीबिंडी पडू शकते यावर आपला विश्वास नाही. कधीकाळी नाईलाजाने मुंबईला जावं लागलंच, तर परत गाडी खंडाळ्याचा घाट चढून येईतोवर आणि पुन्हा गार हवा अंगाला झोंबेतोवर जीवाला चैन म्हणून नसते. कसं काय राहतात लोक त्या मुंबैत!

नाखु's picture

24 Jan 2018 - 7:34 am | नाखु

धाग्याना गप"गार" करणारा लेख

पुण्यात नक्की कुठला ऋतु आहे या पेचातला नाखु

सकाळी बोचरी थंडी, दुपारी कडक ऊन

अनुप ढेरे's picture

24 Jan 2018 - 10:08 am | अनुप ढेरे

मस्तं लिहिलय :)

रंगीला रतन's picture

24 Jan 2018 - 10:29 am | रंगीला रतन

झकास...

दुर्गविहारी's picture

24 Jan 2018 - 10:58 am | दुर्गविहारी

मस्तच लिहीलयं. बाकी एकदा फिल्मस्टारच्या घरांना भेट दिल्याचे अनुभव येउ द्यात. ;-)

सतिश पाटील's picture

24 Jan 2018 - 11:36 am | सतिश पाटील

मागच्या महिन्यात तर खुप वेळा आमच्या घरातील प्याराशुटच्या बाटलीतले तेल चक्क गोठले होते.

जागु's picture

24 Jan 2018 - 11:45 am | जागु

आजही खुप थंडी होती.

कानडाऊ योगेशु's picture

26 Jan 2018 - 11:43 am | कानडाऊ योगेशु

ग्लोबल वॉर्मींगलाही मुंबईकर घाबरत नाही कारण 'वॉर्मींग झालंच तर फार फार तर अजून थोडा घाम येईल, त्यात काय...'.

ठ्ठो!!!!

माहितगार's picture

26 Jan 2018 - 12:07 pm | माहितगार

मस्त, आवडले.

सध्या थंडीचा लपाछपी डाव चालु आहे... ;)
खोकल्याचा व्हायरस सगळीकडे पसरलाय !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Havana (Vertical Video) ft. Young Thug :- Camila Cabello

पैसा's picture

28 Jan 2018 - 4:52 pm | पैसा

:)