Skip to main content

भ्रम

लेखक nishapari यांनी सोमवार, 25/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
पंधराच दिवसांपूर्वी मला अशोक ह्याच शहरात असल्याचं समजलं होतं . तेव्हापासून आज भेटेन उद्या भेटेन अशी चालढकल चालली होती , नक्की दिवस ठरत नव्हता . तोही बेटा बिझी . त्यामुळे भेट पुढे पुढे जात होती . अशोक माझा लहानपणीचा मित्र . माझ्याहून 2 वर्षांनी मोठा होता . काही वर्षं आम्ही शेजारी राहत होतो , त्यानंतर त्याच्या वडिलांची बदली झाली आणि तो बंगलोरला गेला , मी माझ्या कॉलेजच्या नवलाईत हरवून गेलो , तो त्याच्या शिक्षणात . फारसा संपर्क असा ठेवला गेला नाही , कधीमधी फोनवर बोलणं व्हायचं तेवढंच . पुढे त्याने सायकॉलॉजी विषय निवडला , मी कॉमर्स मधल्या डिग्र्यांच्या मागे लागलो . काही दिवसांपूर्वी त्याचा फोन आला , त्याने आपण इथे या शहरात सायकीऍट्रिस्ट म्हणून सरकारी मनोरुग्णालयात रुजू झाल्याचं सांगितलं . लवकरच भेटावं असंही आमचं ठरलं . आईला सांगताच तिला आनंद झाला . ती वीणाला माझ्या बायकोला म्हणाली , " ऐकलंस का वीणे , हा अशोक मोठा गुणी पोरगा बघ .. ह्याला नेहमी अभ्यासात मदत करायचा , खरंतर त्याच्या संगतीने हा अभ्यास करायला लागला . चंदू दहावीला होता तेव्हा तो बारावीला होता , पण हा काही गणित इंग्रजीतली अडचण घेऊन गेला आणि त्याने सोडवली नाही असं कधी झालं नाही , मला माझा अभ्यास आहे , माझं महत्वाचं वर्षं आहे , तू जा असं कधी त्याने म्हटलं नाही .तो होता म्हणून तुझा नवरा 85 टक्क्यापर्यंत पोचला नाहीतर साठाच्या वर तरी गेला असता का नाही शंका आहे . " नवऱ्याच्या अलौकिक बुद्धीचं गुणगान ऐकून वीणा गालातल्या गालात हसत होती .. आई पण ना ...काहीतरीच अतिशयोक्ती करते . अशोकला आमच्या घरचं म्हणजे आईच्या हातचं जेवण आवडायचं , त्याची तो तोंडभरून स्तुती करायचा म्हणून आईचा तो आणखीच लाडका . " आता भेटायला जाईन तेव्हा त्याला जेवायचं आमंत्रण देऊन येईन ... खुश होईल बेटा , तुझ्या हातचं जेवायला मिळणार म्हणून " मी हसत म्हणालो . उद्या मी अशोकला भेटायला जाणार आहे . शनिवारी संध्याकाळीच मी जाहीर करून टाकलं . म्हणजे रविवारी शॉपिंग बिपिंग चे प्लॅन्स व्हायला नकोत . बायकोने एक आठी घातली पण काही बोलली नाही . चला हुश्श ! रविवारची सकाळ खास रविवारसाठी ठेवलेल्या कामात गेली . अशोकही सकाळी हॉस्पिटल मध्ये नसणार होता , त्याला होम व्हिजिट साठी शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या ठिकाणी जायचं होतं . तेव्हा संध्याकाळी चार वाजता मी त्याला हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटायचं असा प्लॅन फोनवर ठरला . मेंटल हॉस्पिटल म्हणजे नक्की कसं असतं हे पाहण्याचं थोडंसं कुतूहलही मनात होतं . साडेचारच्या सुमारास तिथे पोचलो . अशोकची चौकशी केल्यावर कळलं डॉक्टर एका स्पेशल वार्डात आहेत . नर्सला वार्ड नंबर , मजला वगैरे विचारून घेऊन मी तिकडे निघालो . वार्डाचा दरवाजा काचेचा होता . आत अशोक एका रडणाऱ्या व्यक्तीला समजावत होता . मी दार किंचित उघडून आत डोकावून पाहिलं . वार्ड अगदी सधन व्यक्तीलाच परवडेल असा होता , अगदी पंचतारांकित हॉटेल मधली खोलीच शोभेल अशा सुविधा तिथे दिसत होत्या . पेशन्ट श्रीमंत असणार हे उघड होतं . पेशन्ट म्हणजे सुमारे 65 वर्षांचे गृहस्थ होते . अक्षरशः धाय मोकलून रडत होते , छाती बडवून घेत होते . त्या दोघांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं . कुतूहलाने शिष्टाचारावर मात केली , मी हळूहळू चार पावलं पुढे येऊन त्यांचं बोलणं ऐकू लागलो . ते म्हणत होते - असे कसे गेलात रे सगळे मला टाकून ... अरे तुला तळहाताच्या फोडासारखा जपला , तुला कधी काही कमी पडू दिलं नाही .. तुही लाखात एक निघालास , कधी माझा शब्द खाली पडू दिला नाहीस .. सगळं सोन्यासारखं चाललं होतं , सुनबाई आली , नातू झाला आणि कोणाची दृष्ट लागली रे ... तिघे मला टाकून गेलात .. अरे तुमच्या ऐवजी मी का नाही गेलो रे .. मला म्हातारड्याला मागे का ठेवलं देवाने ? त्यांची केविलवाणी अवस्था पाहून मी गहिवरलो.. हे उघड दिसत होतं की मुलगा , सून , नातू यांच्या अचानक निधनामुळे या गृहस्थांना तीव्र डिप्रेशनचा अटॅक आला होता . त्यासाठी त्यांना इथे ठेवण्यात आलं होतं . इतक्यात अशोकने मला पाहिलं आणि खुणावून मी येतो तू बाहेर थांब असं सांगितलं . मी बाहेर आलो . दहा मिनिटात पेशंटशी बोलणं संपवून तो बाहेर आला . आम्ही त्याच्या केबिन मध्ये आलो . मी हळहळत म्हणालो , फार वाईट झालं रे त्यांच्या बाबतीत , माणूस श्रीमंत दिसतो .. पण श्रीमंत असो वा गरीब दैवाच्या इच्छेपुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरं .. अपघातात गेले का त्यांचे मुलगा आणि सून ? यावर तो गालातल्या गालात हसू लागला.. मला कळेना , एवढा गंभीर विषय आणि हा असा हसतोय का ? रोज वेड्यांसोबत काम करून ह्याचं मन मेलं तर नाही ? ह्याला काही काळीज आहे का नाही ! तो काही बोलणार तेवढ्यात केबिनच्या दारावर टकटक झाली , तिशीच्या सुमाराचा एक देखणा तरुण आत आला . अंगावरचे कपडे , घड्याळ श्रीमंतीची साक्ष देणारं होतं . अशोक म्हणाला , या बसा . मग माझ्याकडे वळून म्हणाला.. हे आत्ता तू पाहिलेल्या पेशंटचे एकुलते एक चिरंजीव . मला धक्काच बसला . मग अशोक आणि त्या तरुणाने त्या पेशंटची केस हिस्ट्री थोडक्यात सांगितली .. केशव जहागीरदार हे यशस्वी उद्योगपती .. त्यांची पत्नी , मुलगा , सून , 2 नातवंडं असं कुटुंब आहे . बिझनेसच्या ताणाचा जहागिरदारांच्या मनावर अगदी हळूहळू परिणाम होत होता , त्यांची चिडचिड वाढली होती .. खरंतर मुलगा उत्तम कार्यक्षमपणे बिझनेस सांभाळत होता , हे निवृत्त झाले असते तरी काही बिघडत नव्हतं . पण आयुष्यभर मेहनत करून वाढवलेला बिझनेस एकाएकी मुलाच्या ताब्यात देऊन त्यातून पूर्ण लक्ष काढून घ्यायला यांचं मन मानत नव्हतं . डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घ्या काही दिवस कुठेतरी फिरून या असं सुचवलं होतं , त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं होतं . बीपी वाढ , चिडचिड हे अगदी वरवरचे बदल होते , ते कुणी फारसे गंभीरपणे घेतले नाहीत . पण त्यांच्या मनात खोलवर वेगळ्याच घडामोडी चालल्या होत्या . एके दिवशी त्यांनी वर्तमानपत्रात जॉन फर्नांडिस या माणसाचा मुलगा सून नातू मोटार अपघातात मृत्युमुखी पडल्याची बातमी वाचली आणि त्यांना वेडाचा झटका आला , ते आपल्या कुटुंबियांपैकी कोणाला ओळखेनासे झाले . आपण स्वतः जॉन फर्नांडीस असून आपला मुलगा , सून आणि नातू अपघातात गेले हा समज त्यांच्या मनात पक्का जाऊन बसला . दिवसभर खिन्न असतात , मधून मधून खूप रडतात , देवाला दोष देतात , शिव्याही देतात . " पण असं कसं होऊ शकतं ? कितीतरी लोकांना ताण चिडचिड बीपी हे प्रॉब्लेम्स असतात , सगळ्यांना कुठे असा भ्रम होतो ?" मी विचारलं . " अरे ताण चिडचिड हे सगळं वरवरचं होतं . ती कारणं नव्हेत आणि लक्षणंही नव्हेत . माणसाला भ्रम का होतो याची नेमकी कारणं अद्याप वैद्यकशास्त्राला सापडली नाहीत . कदाचित त्यांच्या मनात हे भ्रमवेडाचं बीज फार पूर्वीपासून असेल आणि त्या परिस्थितीत काही कारणाने त्याला धुमारे फुटले असतील . मनात होणारे बदल डोळ्यांना दिसत नाहीत . हि बातमी हि ट्रिगर ठरली . ती बातमी नाही तर दुसरं काहीतरी निमित्त झालं असतं , त्यांची या दिशेने वाटचाल आधीपासूनच चालली होती . " " पण यावर काही उपाय आहे की नाही ? ते बरे होणार की नाही ? " " ते त्यांच्यावर आहे . आपल्या हातात प्रयत्न करणं आहे . ते स्वतःची ओळख पूर्णपणे विसरले आहेत , ती नष्ट झालेली नाही , मनात फार खोलवर पुरली गेली आहे . सगळ्यात आधी ते जॉन फर्नांडीस आहेत हा विश्वास त्यांच्या मनावरुन 100 % पुसला पाहिजे . मी जॉन फर्नांडीस नाही हे त्यांना जेव्हा 100 % पटेल तेव्हा ते मी कोण आहे हा प्रश्न स्वतःला आणि आपल्याला विचारतील . मग त्यांची पुरली गेलेली स्मृती परत आणणं शक्य होईल . अर्थात ते अगदी सोपं असणार नाही . कारण आपण जॉन आहोत की काय अशी शंका वारंवार त्यांच्या मनात उपजत राहील . शिवाय स्वतःची स्मृती परत मिळवण्यासाठी त्यांना मानसिक श्रमही बरेच पडतील , अर्थात आम्ही डॉक्टर आहोतच त्यांच्या मदतीला . " " आणि जर ते जॉन फर्नांडीस आहेत हा त्यांचा भ्रम नष्ट झालाच नाही तर ? " "तर दुर्दैवाने जॉन फर्नांडीसच्या दुःखासोबत त्यांना आयुष्य काढावं लागेल . स्वतःच्या खऱ्या , त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कुटुंबाकडे ते परत जाऊ शकणार नाहीत , आयुष्यभर मेहनत करून मिळवलेल्या वैभवाचा उतारवयात उपभोग घेण्याचं भाग्य त्यांना लाभणार नाही . त्या कल्पित दुःखातच ते मग्न राहतील . " " डॉक्टर त्यांच्यात काही सुधारणा ? " जहागिरदारांच्या मुलाने विचारलं . " अनेक सेशन्स नंतर आता ते 24 तासातली काही मिनिटं स्वतःला प्रश्न विचारतात कि मी खरंच जॉन आहे का ? हि सुधारणेच्या दिशेने पहिली पायरी म्हणायला हरकत नाही . आता ते किती जलद हे सत्य स्वीकारतात त्यावर ते बरे कधी होतील हे अवलंबून आहे . " अशोक आणि जहागिरदारांच्या मुलगा त्यांच्या पुढील ट्रीटमेंट बद्दल चर्चा करू लागले . मी माझ्या विचारात बुडालो . तो कधी गेला मला समजलंही नाही . " ए बाबा चंद्या , एवढा विचार नको करू ! " अशोकच्या बोलण्याने मी भानावर आलो . " तू किती शांतपणे घेतोस रे हे सगळं .. " " अरे हे मेंटल हॉस्पिटल आहे . इथे अशा केसेस रोज बघतो आम्ही . तेच काम आहे आमचं . काय काय गुंते झालेले असतात लोकांच्या मनात ... आधी ते शोधायचे मग अलगदपणे सोडवायचे .. आणि त्याला माणसात परत आणायचा . हे काम करायचं तर तुझ्याइतकं सेन्सेटिव्ह राहून कसं चालेल बाबा ? " " खरं आहे तू म्हणतोस ते ! " माझा आवाज खिन्न होता . " अरे ह्या जहागिरदारांच्या केसने एवढा अपसेट होऊ नको . ह्या केसमध्ये सुधारणेचे खूप चान्सेस आहेत . सुदैवाने डॉक्टरांचं म्हणणं ऐकून घेण्याइतकं आणि त्यावर थोडा तरी विचार करण्याइतपत मनाचं संतुलन अजून त्यांच्यात शिल्लक आहे . अरे इथल्या एकेक केसेस ऐकशील तर कपाळाला हात लावशील . एकाला भ्रम झाला होता की तो पोस्टमन आहे , आपणच कागद खरडून सगळ्या पेशंटना वाटायचा . डॉक्टर बोलायला गेले कि ड्युटीत अडथळा आणू नका म्हणून आमच्यावरच डाफरायचा ... एक स्वतःला जेलर समजायला लागला होता , सगळ्यांना कैदी समजून मारायला धावायचा , त्याला सेपरेट वार्ड मध्ये ठेवावा लागला . एक स्वतःला पंतप्रधान समजू लागला , कुठे कुठे जाऊन गरीब लोकांना भेटला आणि तुमचे सगळे प्रश्न सोडवतो अशी आश्वासनं देऊन आला , घरच्यांना वेड लागायची पाळी आली . एक शुद्ध ब्राह्मण कुटुंबातला पन्नाशीचा गृहस्थ आपण मुश्ताक कासीम नावाचे मुसलमान आहोत असं समजून रोज कुराण घेऊन बसू लागला , नमाज पढू लागला .. " " काय सांगतोस काय ! " " अरे पुढे ऐक . त्याच्या सात पिढ्यात कुणी अंडं सुद्धा खाल्लेलं नाही आणि हा जेवणाची थाळी फेकून देऊन मटण लाओ अशी ऑर्डर सोडू लागला .. घरचे भेदरले तर नवल नाही . इथे आणल्यावरही तेच ! " " मग मटण दिलंत कि काय त्याला जेवणात ? " मी स्वतः शुद्ध शाकाहारी असल्याने मला त्या विचाराने कससंच झालं .. एका शुद्ध शाकाहारी ब्राह्मणाचा नेम अशा वेडाच्या झटक्यामुळे मोडावा ... अरेरे ! " नाही रे ... " अशोक हसत म्हणाला .. " मटण मसाले घालून सोयाबीन शिजवलं आणि दिलं हे घे बाबा ... ह्याने कधी मटण खाल्लंच नव्हतं तेव्हा ती चव ठाऊक असायचा प्रश्नच नव्हता . अरे कधीतरी कुठल्यातरी मित्राला वगैरे खाताना पाहिलं असेल , मनात मोह निर्माण झाला असेल पण दुसरीकडे त्याचं मनच त्याला ते खाऊ देणार नाही .. संस्कार धर्म शिकवण वगैरे वगैरे .. अरे तो बरा झाल्यावर त्याला विचारलं आपण नॉनव्हेज खावं अशी इच्छा कधी तुमच्या मनात कुठेतरी होती का ? तर तो छातीठोकपणे नाही म्हणेल . कारण अशी इच्छा येणं हे सुद्धा पाप असं त्याचं काँशन्स मन मानत असल्याने हि इच्छा निर्माण झालेली त्याच्या मेमरीतून पूर्ण पुसलं गेलेलं असेल . फक्त ती इच्छा नष्ट न होता सबकॉन्शस मनात खोलवर दबली गेली . आणि बाह्य मन कमकुवत होताच अशी बाहेर आली . अर्थात हि इच्छा हेच त्याला भ्रमवेडाचा झटका येण्याचं कारण होतं असं मुळीच नाही ... इतर अनेक वेगळी कारणं असू शकतात . " " फार गुंतागुंतीचं आहे रे हे सगळं ! " मी म्हणालो . " चंद्या , माणसाच्या मनापेक्षा गुंतागुंतीची वस्तू तुला या जगात दुसरी सापडणार नाही . ते असू दे . तू बोल , घरी सगळे कसे आहेत ? काकूंना सांग मी येत्या रविवारी जेवायला येतो आहे , पुरणाच्या पोळ्यांचा बेत हवा . " अशोकशी गप्पा रंगल्या . अर्ध्या तासाने मी तिथून निघालो . मनात भ्रमाच्या केसेसचेच विचार घोळत होते . घरी पोचलो तेव्हा सात वाजत आले होते . अशोक रविवारी जेवायला येणार हि बातमी आईला दिली . ती खुश झाली . जेवणानंतर रोजच्या सारखा 10 च्या बातम्या लावून बसलो , पण आज त्या बातम्यांत लक्ष लागेना . डोक्यात विचारांचं काहूर माजल्यासारखं झालं होतं .. काहीतरी क्लिक होऊ पाहत होतं .. एखाद्या पझलचा मिसिंग पार्ट अचानक सापडावा तसं काहीतरी ... जणू काहीतरी महत्वाची गोष्ट जी इतके दिवस विसरलो होतो ती आठवू पाहत होती ...भ्रमवेड ... भ्रम ... आपण जे नाही ते आपण आहोत असं समजून त्याप्रमाणे वागू लागणं .... आपल्याशी याचा काही संबंध आहे का ... टीव्ही बंद करून मी बेडरूममध्ये गेलो . माझ्यामागे वीणाही आली . " काय झालं ? बातम्या पूर्ण झाल्याशिवाय कधी उठत नाही तुम्ही . तिथे त्या हॉस्पिटल मध्ये काही बघून अपसेट झाला आहात का ? तरी मी सांगत होते , अशोक भावजींना घरीच बोलवा ... तुम्ही त्या तसल्या ठिकाणी जाऊ नका .... मागे नीरज लहान असताना कुत्र्याचं पिल्लू पाळलं होतं , ते गेलं तर त्याला समजावायचं सोडून तुम्हीच 2 दिवस जेवला नाहीत ... त्याची समजूत काढता काढता माझ्या नाकी नऊ आले ... भिकाऱ्यांना पैसे देता ... भीक मागणं हा धंदा झाला आहे पण तुम्हाला राहवत नाही , देता ते देता पण त्यांची परिस्थिती बघून अपसेट होता , रोज बातम्या बघून हळहळता जगात किती दुःख आहे माणसं अशी का वागतात .... ह्याला काय अर्थ आहे ? अहो जगात दुःख हे असायचंच ! आपल्या परीने होईल तेवढं करायचं आपण ... ते करताच की तुम्ही ! उपाशी प्राण्यांना पक्ष्यांना अन्नपाणी घालता , समाजसेवी संस्थांना जमेल तेवढी आर्थिक मदत करता ... याहून अधिक आपण काय करणार .... मग जे आपल्या शक्तीपलीकडचं आहे त्याबद्दल दुःखी होण्यात काही अर्थ आहे का मला सांगा ...... तो तुमचा लेकही तुमच्यावरच गेलाय अगदी .... तिकडे हॉस्टेल मधल्या 4 गरीब विद्यार्थ्यांच्या फिज आपल्या पॉकेटमनीतून , आपण काटकसर करून भरतो . आपल्याकडून होईल तेवढं आपण करतो यात समाधान मानायचं कि जगातली सगळी दुःख आपण दूर करू शकत नाही म्हणून मूड ऑफ करून घ्यायचा ? कधीकधी तर मला नवल वाटतं , तुमच्यासारखा हळवा माणूस इतकी वर्षं ह्या जगात तगलाच कसा याचं ! " मी हसलो . " नाही गं , काही मूड ऑफ करून नाही घेत ! मी ठीक आहे , तू काळजी नको करू . झोपतो आता . उद्या ऑफिसला लवकर जायचं आहे . " वीणाने माझ्या कपाळाचा मुका घेतला , गालावर जरासं थोपटलं आणि किचनमध्ये आवराआवरी करायला गेली . खरंच वीणासारखी प्रेमळ आणि समजूतदार सहचारिणी मिळावी म्हणजे मागच्या जन्मी मी काहीतरी मोठं पुण्य केलं असणार . वीणा गेली आणि मी बिछान्यावर पडलो . विचित्र वाटत होतं . एखादा शब्द - एखादी गोष्ट अगदी तोंडावर असावा पण नेमकी आठवूच नये तसं काहीतरी महत्वाचं आपण विसरलो आहोत अशी भावना होत होती . त्याच विचारात कधीतरी झोप लागली . मला कुठेतरी जाग आली ... हे स्वप्न होतं हे नक्की ... याआधीही क्वचित , अवेळी झोपल्यावर अशी स्वप्न पडली होती की ज्यात ते स्वप्न असल्याची जाणीव असायची ... कधी अर्धवट तर कधी स्पष्ट ... काय बरं म्हणतात त्यांना .. हां - ल्युसिड ड्रीम्स .. पण आता इतकी स्पष्ट जाणीव याआधी कधीच नव्हती ... मी तरंगत होतो .. शरीर नव्हतंच पण ज्ञानेंद्रियं मात्र काम करत होती ... दिसत होतं , ऐकू येत होतं , वास नव्हता , स्पर्श नव्हता , चवही नव्हती ... पण आनंद आणि शांतीचा अनुभव मात्र कोणत्याही शंकेपलीकडचा होता . एवढा आनंद ? एवढा ? एवढी शांती ? माझं 47 वर्षांचं आयुष्य मी आठवून पाहिलं ... त्यात कधीही .. कधीही मला एवढा आनंदाचा आणि शांतीचा अनुभव आला नव्हता ... स्वतःच्या कमाईतून आईला सोन्याचा हाराचा सेट घेतला तेव्हा तिच्या चेहरा पाहून झालेला आनंद , प्रमोशनचा आनंद , वीणाचा आणि माझा प्रेमविवाह होता , लग्नाआधी आणि लग्नानंतरचे काही महिने तिच्या सहवासात मला अवर्णनीय आनंद वाटायचा पुढे प्रेम आटलं असं नाही उलट वाढतच गेलं पण तो सहवासाचा आनंद फिका होत गेला ... नीरजचा जन्म झाला तेव्हा .. मी बाप झाल्याचा आनंद , नीरज पहिल्यांदा आधाराशिवाय चालू लागला तो आनंद ... नीरजने पहिला शब्द बाबा उच्चारला तेव्हा झालेला आनंद ... आईबाबांना युरोप टूरवर पाठवलं तेव्हा झालेला आनंद , मी प्राण्यांना खाऊ घालायचो तेव्हाही मला फार समाधान वाटायचं .... हे सगळे माझ्या आयुष्यातले आनंदाचे अभिमानाचे ठेवे होते ... पण हे सगळे अनुभव आता जो अनुभव मी घेत होतो त्यापुढे अगदी निस्तेज होते ... सूर्यापुढे बल्बचा प्रकाश जसा निस्तेज वाटेल तितके ते नीरस वाटत होते ... शुद्ध आनंद म्हणतात तो हाच असावा . आणि शांती ! मेडिटेशन मधल्या शांतीचा मला अनुभव होता , हिलस्टेशन्स वर ट्रिप साठी गेलं असताना निसर्गाच्या सानिध्यात मनाला अभूतपूर्व शांती वाटली होती ... आईच्या हट्टाखातर शिर्डी , अष्टविनायक , काशी , पंढरपूर , तिरुपती अशा प्रसिद्ध देवस्थानांही आम्ही सहकुटुंब गेलो होतो ... वैयक्तिकरीत्या देव भेटी साठी अशा ठिकाणीच जायला हवं असं मला वाटत नाही ... देव माणसात शोधावा , जिवंत प्राणी पक्ष्यांत पाहावा असं माझं मत आहे .. पण आईच्या इच्छेसाठी आम्ही या ठिकाणी गेलो होतो .. तिथल्या देवळांमध्ये देवासमोर हात जोडताना माझ्या मनाला शांतीचा अनुभव आला होता ... पण हे सगळे अनुभव सुद्धा आत्ता मला जो शांतीचा अनुभव येई होता त्यापुढे फिके पडत होते ... आणि समोर भवताली नजर जाईल तिथवर एक सोनेरी लख्ख प्रकाश पसरला होता ... त्याची सुरुवात दिसत नव्हती की शेवट दिसत नव्हता ... माझी नजर त्या प्रकाशातल्या एका लहानशा बुडबुड्यावर पडली ,... तो चमकत होता .... कशी कोण जाणे मला स्पष्ट जाणीव झाली हा बुडबुडा म्हणजे आपलं विश्व आहे .... माझं शरीर याक्षणी त्या बुडबुड्यातल्या एका आकाशगंगेतल्या लहानशा ग्रहावर निद्रावस्थेत पडलं आहे .... अब्जावधी आकाशगंगा असलेलं अनंत मानलं जाणारं आपलं प्रचंड विश्व हे ह्या सोनेरी प्रकाशात निर्माण झालेला लहानसा बुडबुडा आहे ... ओ गॉड ! ओ गॉड ! नजर आजूबाजूला फिरवली तिथे असे अनेक लहान लहान बुडबुडे दिसत होते .... खरंतर बुडबुडा हा शब्द माझ्या अल्पमतीला सुचला ... ती जी काही रचना होती ती माझ्या त्या शरीरहीन अवस्थेत जशी दिसत होती त्याला मला तरी बुडबुडा हाच शब्द सुचत होता . आणि हा सोनेरी प्रकाश निर्जीव नव्हता ... त्यात एक चेतन अस्तित्व होतं ... कोणताही आकार नाही पण ते तिथे होतं हे नक्की . फक्त माझ्या समोरच नाही तर हा प्रकाश जिथवर पसरलेला होता तिथवर ते होतं ... ते जे कोणी होतं त्याचं शरीर म्हणजे हा प्रकाश होता ... नाही नाही शरीर नाही ... ते म्हणजे प्रकाशच होतं ... च् .. नको शब्दबद्ध करायची घाई नको ... हे जे कोणी होतं ते माझ्या मानवी बुद्धीच्या पलीकडचं होतं . जे कोणी ....... कोण ? कोणी परकं ? अशा प्रचंड अस्तित्वाची मला भीती वाटायला हवी होती ... पण भीती नव्हती ... परकेपणाचा तर लवलेशही नव्हता ... उलट आपलेपणाच वाटत होता ... किती ? सख्खी आई सुद्धा इतकी जवळची कधी वाटली नाही , वीणा आणि मी तनामनाने एकत्र आलेले 2 जीव पण वीणासुद्धा कधीच इतकी प्रिय इतकी जवळची .. इतकी माझी वाटली नाही ... नीरज माझा लाडका मुलगा ... तोसुद्धा नाही ... हि तीन माझी जिवाभावाची माणसं , ह्यांच्यासाठी मी जीवसुद्धा दिला असता पण ह्या अनोळखी अस्तित्वाशी तुलना करता ती सगळी फार दूरची वाटत होती .... अनोळखी ? कोण होतं हे ? उत्तर माझ्या मनात साकार होत होतं आणि काळजात कळ उठत होती ... ह्याला कसे विसरलो आपण ? ह्याच्यापासून लांब कसे गेलो ? का गेलो ? आपण स्वतःहून गेलो की याने पाठवलं ? आणि इतकी वर्षं कसे राहिलो याच्याशिवाय ? कसे ? किती वर्षं कि किती जन्म ? किती जन्म झाले ? याने कसं लांब राहू दिलं आपल्याला ? एकाच वेळी अपार शांती , अपार सुख आणि अपार वेदना ... या तिन्ही भावना अनुभवणं शक्य आहे असं मला याआधी कोणी सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं .. पण आता मी प्रत्यक्षच तो अनुभव घेत होतो . त्या अस्तित्वाने माझ्या आगमनाची काही दखल घेतली नाही ... मलाही काही करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं ... जे होत आहे ते पाहण्याखेरीज मी काही करू शकत नव्हतो . त्या सुवर्णप्रकाशात काहीतरी हालचाल होत होती ... त्यातून एक आकृती साकार झाली .... एका स्त्रीची आकृती .... सुंदर वस्त्रं आणि सौंदर्य ..... माधुरी , मधुबाला आणि नूतन माझ्या आवडत्या अभिनेत्री ... पण समोर जी स्त्री होती तिच्या बाजूला उभ्या राहिल्या असत्या तर त्या सिनेमातल्या एक्स्ट्रा डान्सर्ससारख्या दिसल्या असत्या .. छे ! वेड्यासारखी तुलना ..... दगडाची तुलना तेजस्वी ताऱ्याशी करण्यासारखं झालं हे ..... तिच्याएवढी सुंदर स्त्री संपूर्ण पृथ्वीवर सापडली नसती . कोण होती ती ? त्या प्रकाशाहुन भिन्न अस्तित्व ? कि त्याचंच एक रूप ? रूपं घेण्यात तो मोठा तरबेज आहे ... तिने स्वतःच्या शरीराकडे पाहिलं आणि मान किंचित हलवत गालातल्या गालात हसली ... ती बोलू लागली ... मधुर आवाज होता ... कर्णेंद्रियं अतिशय सुखावली ... भाषा कोणती होती समजत नव्हती ... ध्वनी तरी खरोखर होता की माझ्या मनःपटलावर शब्द उमटत होते काही समजत नव्हतं... जे काही होतं ते सुखावह होतं एवढं मात्र समजत होतं ... भावार्थ मनापर्यंत पोचत होता ... ती काय बोलत होती त्याचा अर्थ कळत होता ... " योगेश्वर , यावेळी मला सदेह साकार केलंत ... तेही मानवी स्त्रीच्या रुपात .... अन्य वेळी तर संभाषणाकरता आपण मला आणि माझ्या सहकाऱ्यांना आमच्या खऱ्या प्रकाशमय निराकार स्वरूपातच साकार करता ... मग या रुपाचं प्रयोजन ? " या प्रश्नाला काही उत्तर आलं नाही . प्रकाशातलं अस्तित्व मिश्किल हसत असावं असा मला भास झाला . ती दोन्ही हात जोडून किंचित झुकली ... " योगेश्वर , मी आपल्या सेवेत उपस्थित आहे ... कोणते कार्य संपन्न करावयाचे आहे ? आपण आज्ञा करावी ... " आणि त्या प्रकाशातून शब्द आले ... हा कसला आवाज होता ? आवाज खरंच होता का? माझ्या निराकार रुपात आनंदाच्या झिणझिण्या उठल्या ... हा आवाज माझ्या मानवी शरीराच्या कानांवर पडला असता तर मी आनंदाने नाचलो असतो ... पण इथे शरीर नव्हतं आणि जे निराकार रूप होतं त्यात काही हालचाल करता येत नव्हती . असा अद्वितीय, अनुपम आवाज ... कालांतापर्यंत ऐकत राहावा ... पहिल्यांदाच ऐकत होतो पण कुठल्यातरी स्मृती चाळवल्या जात होत्या अगदी अंधुक ... खरंच का हि पहिली वेळ हा आवाज ऐकण्याची ? मग असं का वाटतंय कि हा आवाज ऐकण्यासाठी कान व्याकुळले होते , या आवाजाची जीवघेणी तहान होती .... इतका काळ ह्या आवाजाशिवाय कसे राहिलो आपण ? पुन्हा तोच प्रश्न ह्याच्यापासून वेगळे कसे झालो आपण ? तो आवाज म्हणत होता - " मंदाकिनीमधलं तुझं कार्य कसं चाललं आहे योगमाये ? " " योगेश्वर , आपण जाणताच मंदाकिनीमधल्या जीवसृष्टी असलेल्या ग्रहांपैकी केवळ एक कोटी ग्रहांचे प्रभारत्व माझ्याकडे आहे .... त्यातल्या फक्त 30 लक्ष ग्रहांवर विचारी जीवसृष्टी आहे . अन्य 70 लक्ष ग्रहांवरच्या जीवसृष्टीतील जीव आहार-निद्रा-भय-मैथुन यापुढे प्रगत झालेले नाहीत , त्यामुळे तिथे कर्म - कर्मफलाचे नियमही नाहीत ... त्या ग्रहांचा कारभार पाहताना माझ्या सेवक सख्यांना काही अडचण येत नाही ... 30 लक्ष ग्रहांपैकी 13 लक्ष ग्रहांवर केवळ एक विचारी प्राणीजात आहे ... ज्या जातीने त्या त्या ग्रहांवरील अन्य प्राणिजातींना आपल्या आधीन करून घेतले आहे . 17 लक्ष ग्रहांवर एकाहून अधिक विचारक्षम प्राणिजाती आहेत ... त्यापैकी काही ग्रहांवरील विचारक्षम प्राणिजाती आपापसात सलोख्याने राहतात तर काही जातींमध्ये शत्रुत्व आहे .... या सर्व जीवांना कर्मफलाचे नियम लागू पडत असल्याने यांचे आयुष्य - त्यातील घटना - स्वभाव घडण , मृत्यूचे कारण , मृत्यूपश्चात शिक्षा अथवा बक्षीस , पुन्हा पुढील जन्मात पूर्वी संबंध आलेल्या आत्म्यांशी त्यांचा संबंध होईल अशा ठिकाणी त्यांचा जन्म करणे आदी अनेक बाबी एकसमयावच्छेदे करून ध्यानात घेऊन या ग्रहांचा कारभार पाहावा लागतो . माझ्या सख्यांच्या साह्याने मी माझे कर्तव्य चोख बजावण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे , योगेश्वर . " मी आज तुझ्या कार्यक्षेत्रातील पृथ्वी नामक ग्रहावरची स्थिती जाणू इच्छितो . " " आपण त्रिकालज्ञानी आहात .. कुठे काय घडत आहे याचं संपूर्ण ज्ञान आपणास असताना आपण हा प्रश्न मला विचारत आहात ? " " मी तुझा दृष्टिकोन ऐकू इच्छितो माये . " " पृथ्वीवर मानव प्राण्याने अन्य प्राणीजातींवर वर्चस्व स्थापन केले आहे . काही जातीच्या प्राण्यांचे पालन करून तो त्यांची हत्या करून मांस आपले अन्न म्हणून ग्रहण करतो . काहींचा अन्य कामांत वापर करतो . पृथ्वीवर अनेक धर्मांची निर्मिती होऊन तो अन्य धर्मांच्या मानवांना आपला शत्रू समजतो , ग्रहाच्या वेगवेगळ्या भूभागांत राहणाऱ्या लोकांच्या भाषा , जीवनपद्धतीमध्ये भिन्नत्व निर्माण झाले आहे , आपल्या जीवनपद्धतीहून भिन्न जीवनपद्धती असणाऱ्या लोकांना तो स्वतःहून हीन समजतो किंवा त्यांचा सूक्ष्म द्वेष करतो . विज्ञानाच्या काही शाखांमध्ये त्याने मर्यादित प्रगती केली आहे . स्वतःच्या सूर्यमालेत ठराविक अंतरापर्यंत जाण्याइतपतच ही प्रगती आहे . मी निर्मिलेल्या द्वेष , राग , लोभ , असंतुष्टता , मत्सर आदींच्या पाशातून संपूर्ण सुटका करून घेतलेले अगदी कमी मानव या घडीस पृथ्वीवर आहेत . तो अन्य प्राणिजातींच्या प्राण्यांशी अतिशय क्रूर वर्तन करतोच पण इतर मानवांनाही अत्यंत पीडा - क्लेश होईल असे वर्तन करण्यास मागे पुढे पाहत नाही ... आपल्या आज्ञेनुसार मी जे मोहाचे अडथळे त्याच्या वाटेत पसरले आहेत त्यात तो पुरता अडकला आहे . भौतिक सुखांच्या आहारी जाऊन तो अधिकाधिक भौतिक सुखे प्राप्त करण्यासाठी धडपडत आहे . भौतिक गोष्टी तसेच अनेक नात्यांमध्ये स्वतःचे मन गुंतवून तो त्यात रमतो ... माता पिता , पती , पत्नी , अपत्ये ह्यांच्या रुपात असलेल्या अन्य आत्म्यांना तो आपले सारसर्वस्व मानतो , त्यांना पीडा झाली तर त्याला दुःख होते . त्यांच्या मृत्यूने त्याला सर्वस्व हरपल्याचा आभास होतो . मी निर्मिलेल्या जालातून सुटका करून घेण्याइतपत शक्ती त्याच्यात अद्याप नाही योगेश्वर . शिवाय जाणता अजाणता केलेल्या क्रूरत्वपूर्ण कर्मांनी त्याच्या कर्मफलांत दिवसागणिक भर पडत आहे ... परिणामी आपण निर्मिलेल्या नियमांनुसार जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याची मुक्तता होणे असंभव आहे योगेश्वर . " या उत्तरावर त्या प्रकाशमय अस्तित्वाकडून काहीच प्रतिसाद आला नाही . " योगेश्वर , बऱ्याच कालावधी पासून माझ्या मनात एक प्रश्न आहे . आज आपली अनुज्ञा असेल तर .... " " विचार योगमाये , हा संकोच कशासाठी ? " " सर्व जीव आपले अंश आहेत ... आपण त्यांना स्वतःपासून वेगळे करून ह्या पिडामयी संसारात का ढकलता ? कर्माच्या नियमामूळे ते अनंत काळ आपल्या पासून पृथक राहून क्लेश भोगतात . वरवर पाहता एक जन्म सुखी गेला तरी एक जन्म हा अतिशय थोडा काल आहे याची जाणीव त्यांना होत नाही , त्यांची जाणीव एकाच जन्मापूरती मर्यादित असते , ते तेवढ्याच जन्माचा विचार करतात ... जाणता अजाणता अन्य जीवांना दिल्या जाणाऱ्या वेदनांचा हिशेब चुकवण्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावेच लागतात ... कर्म आणि कर्मफलांचे हे चक्र सुरूच राहते आणि जीव क्षणिक सुखदुःखे भोगत राहतो . हा सारा अगणित विश्वांचा पसारा कशासाठी योगेश्वर ? आपण तर प्रेममय आहात , दयेने करुणेने परिपूर्ण आहात मग आपल्याच प्रिय अंशांना या पीडापूर्ण विश्वात का पाठवता ? माझ्या प्रश्नात काही औद्धत्य भासल्यास क्षमा असावी योगेश्वर . " " नाही माये , तू माझ्या आज्ञेचे पालन करत आत्म्यांपुढे अनेक प्रलोभने निर्माण करतेस , त्यांना आत्मसाक्षात्कार होऊ देत नाहीस ... पण हे करताना तुला काही संतोष होत नाही हे मी जाणतो , तरीही माझ्या आज्ञेचे पालन म्हणून तू हे कठोर कर्तव्य पार पाडतेस ... तुला हा प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार आहे माये . नीट ऐक - तुझा पहिला प्रश्न मी माझ्या प्रिय अंशांना माझ्यापासून पृथक का करतो ? माये माझ्यापासून काहीही पृथक होणं कसं शक्य आहे ? सर्वत्र मीच आहे आणि फक्त मीच आहे .... हि अगणित विश्वे माझ्यातच आहेत .. माझ्याहून वेगळं काही नाही किंवा माझ्याबाहेर अधिक काही नाही तेव्हा पृथक होऊन ते कुठे जाणार ? मी अनंत शक्तींनी परिपूर्ण आहे . परिणामी माझ्या अंशांतही माझ्या काही शक्ती येणं अपरिहार्यच होतं . ते या शक्तींचा वापर करण्यास उत्सुक होते ... या शक्तींचा उपयोग करून त्यांना काहीतरी अलौकिक घडवायची - निर्मिती करायची इच्छा निर्माण झाली . माझ्या प्रेममयी सहवासात त्यांना आनंद वाटत होता पण ते पूर्ण समाधानी मात्र नव्हते . स्वतःतील सुप्त शक्तींचा विकास करण्याची त्यांची मनीषा होती ... तसं करून माझ्या अधिक समीप येता येईल , मला अधिक चांगल्या रीतीने समजून घेता येईल असं त्यांना वाटत होतं . त्या शक्तींच्या विकासासाठी त्यांनी शरीर धारण करणं अनिवार्य होतं . पण शरीर धारण करतात हातून कर्मे घडणे न टाळण्याजोगे असते . आणि कर्मफल निर्माण होणेदेखील . मी त्यांना शरीर धारण करू दिलं . सुरुवातीच्या काळात त्यांना आपण कोण आहोत व शरीर धारण करण्यामागे आपला काय उद्देश होता याची पूर्ण स्मृती होती . ते चांगली प्रगतीही करत होते ... पण त्यांच्या शक्तींचा उत्कृष्ट विकास व्हायचा तर त्यांना तावून सुलाखून निघणं भाग होतं . जराशा मोहाने , जराशा लोभाने ते डळमळीत होत असतील तर माझ्या अगणित शक्तींचा वापर ते अलौकिक निर्मितीसाठी नाही तर विध्वंस आणि शोषणासाठी करतील ... कमकुवत मनाच्या प्राण्यांच्या हातात अशा शक्ती संहारक शस्त्रं ठरतील . त्याकरता माझी आणि सर्व सुप्त शक्तींची स्मृती मी या आत्म्यांच्या मनात खोलवर पुरली जाईल अशी व्यवस्था केली . त्यासाठी अनेक विश्वांसाठी तुझ्यासारख्या अनेक योगमाया निर्मिल्या ... तुम्ही शुद्ध शक्ती आहात , तू आणि त्या भिन्न नाहीत ... कार्य संपन्न करण्यासाठी एकाच शक्तीचे अगणित भाग केले आहेत एवढंच ... ज्याप्रमाणे तू मंदाकिनीचा कारभार सांभाळण्याकरता स्वतःला अनेक सेवक सख्यांमध्ये विभाजित करतेस तसंच ... या अनेक योगमायांनी विचारक्षम प्राण्यांसमोर भौतिक सुख आणि दुःखांचे अडथळे उभे केले ... कधी सुख तर कधी दुःखाचा उपयोग करून जीवाला खरी स्मृती प्राप्त करण्यापासून रोखणं हे तुमचं कार्य आहे . तुम्ही निर्माण केलेल्या हरेक अडथळ्यावर , भ्रमावर मात करून जो जीव स्वतःची स्मृती परत मिळवेल तो माझ्या परीक्षेत उत्तीर्ण होईल . त्यानंतर माझ्यापाशी माझ्या निराकार स्वरूपात निराकार रूप घेऊन परतायचं कि विश्वात आपल्या सुप्त शक्तींचा विकास करायचा हा निर्णय सर्वस्वी त्याचा असेल . " " आपण सर्वश्रेष्ठ आहात योगेश्वर .. पण या अनेक जीवांना व्यथित पाहून आपले हृदय द्रवत नाही का ? आम्ही योगमायांनी निर्मिलेल्या वासनांच्या जालातून विचारी प्राण्यांची मुक्तता होणे असंभव झाले आहे .. आपण आपल्या अंशांना या परीक्षेत उत्तीर्ण होण्यास काहीच मदत करणार नाही का ? " " मी मदत करतो माये . माझ्याकडून सत्य ज्ञानाचा प्रकाश सतत त्यांच्यावर पडत असतो ... पण तुमच्या जालात ते असे अडकले आहेत की हे ज्ञान ग्रहण करण्याची त्यांची क्षमताच उरलेली नाही . नात्यांना ते सर्वोच्च महत्व देतात ... ते हे समजून घेत नाहीत की गेल्या अनेक जन्मांतील अनेक नाती तो जन्म संपताच कवडीमोलाची ठरली आहेत ... पूर्व जन्मात ज्याची हत्या केली तो या जन्मी पुत्ररूपाने जन्म घेऊन वृद्धत्वात अतिवाईट वागणूक देतो .... तो केवळ कर्मफलाचा हिशेब चुकता करण्याकरता त्या जीवाच्या पोटी जन्म घेत असतो .... कर्मफलांचे हिशेब नीट चुकते होतील अशीच नाती तू निर्माण करतेस . नात्यांसारखं निरर्थक काही नाही . चंद्राचं प्रतिबिंब शांत सरोवरात पडतं ... पण विचारी प्राण्यांचे मन म्हणजे विचारांच्या , वासनांच्या, इच्छांच्या उसळत्या लाटांचा महासागर आहे , त्यात ज्ञानाच्या चंद्राचे प्रतिबिंब कसं पडेल ? मी देत असलेले ज्ञान ते ग्रहणच करीत नाहीत . मी अनेक ग्रहांवर अनेक अवतार देऊन त्यांना सरळ हे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला ... मंदाकिनीतल्या पृथ्वीवर महाभारताचे नाटक रचून त्यात कृष्णावतार घेतला आणि सगळे ज्ञान अतिशय सोप्या भाषेत देण्याचा यत्न केला . पुढे संस्कृत भाषा मानवप्राण्यांना समजेनाशी झाली तेव्हा ज्ञानेश्वर रुपात जन्म घेऊन गीतेचा आणखी सोप्या भाषेत अनुवाद केला ... बुद्ध , महावीर यांच्यामार्फत हे ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न केला . पण आज पृथ्वीवरचा मानव प्राणी हे ज्ञान समोर असूनही त्याकडे साफ दुर्लक्ष करतो ... तुझ्या मोहजाळात तो असा काही अडकला आहे की मी प्रत्यक्ष जाऊन त्याला हे ज्ञान देऊ केले तरी तो माझ्याकडे पाठ फिरवील . आणि मी प्रत्यक्ष जाऊ शकत नाही कारण मग या परिक्षेतला अर्थच निघून जाईल . या कठीण परिस्थितीत त्याने धीराने स्वतःची खरी ओळख करून घ्यावी , स्वतःची स्मृती परत मिळवावी हीच तर माझी अपेक्षा आहे . " " भगवन् , आपण धन्य आहात .. अनेक मनुष्यप्राणी जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करावी म्हणून तुमच्या अनेक रुपांपैकी काही रूपांची करुणा भाकतात . परंतु त्यातल्या अतिशय कमी जीवांना तुम्ही मुक्ती देता ... असं का प्रभू ?" " माये , विचारी जीवांकरताच कर्मफलाचा नियम आहे हे तू जाणतेसच .... कर्मफल म्हणजे काय ? पाप आणि पुण्य हे मानवनिर्मित शब्द आहेत ... वेगवेगळ्या भूभागांत , वेगवेगळ्या जीवनपद्धती जगणाऱ्या लोकांच्या पुण्य आणि पापाच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत .... ह्यातल्या अनेक संकल्पना निरर्थक आहेत . कर्मफल म्हणजे अतिशय साधी गोष्ट आहे ... जेव्हा विचारी प्राणी हे जाणतो कि ह्या कृतीने अन्य जीवास वेदना पोहोचणार आहेत , मग त्या शारीरिक असो वा मानसिक ...आणि हे जाणूनही तो ती कृती करतो . तेव्हा त्या जीवास होणाऱ्या वेदना ह्या प्राण्याच्या खात्यात जमा होतात .जेव्हा तो अन्य जीवास सुख प्राप्त होईल अशी कृती करतो तेव्हा त्या जीवाला प्राप्त होणारं सुख ह्या प्राण्याच्या खात्यात जमा होतं . ह्या वेदना आणि हे सुख हे त्याला योग्य वेळी पुनः प्राप्त होतं .जर प्राण्याच्या खात्यात वेदना जास्त असतील तर अशा प्राण्याने माझी करुणा भाकली म्हणून मी त्याला जन्ममरणाच्या चक्रातून कसा सोडवू ? मीच अत्यंत विचारपूर्वक निर्माण केलेल्या नियमांचं उल्लंघन होईल ते . मात्र जर एखाद्या जीवाच्या खात्यात वेदना नगण्य असतील म्हणजेच त्याने त्या व गतजन्मांत अन्य जीवांना वेदना होतील असं वर्तन केलेलं नसेल आणि अशा आत्म्याने जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी माझी करुणा भाकली तर मी त्याला मुक्ती देतो , अर्थात त्याआधी त्याची तू निर्मिलेल्या मोह आणि षड्रिपूंपासून सुटका झालेली असणे आवश्यक आहे ... अशा जीवाला फक्त जन्म मरणाच्या चक्रातून सुटका हवी असते , त्रिभुवनातील सारी सुखं त्याच्या पायाशी हात जोडून उभी राहिली तरी त्याचं मन निरासक्त झालेलं असतं ... स्वतःच्या खऱ्या रूपाचा बोध त्याला झालेला नसला तरी तू निर्मिलेले मोह त्याला आकर्षित करू शकत नाहीत , तू निर्मिलेली सर्व सुखं हि क्षणिक मिथ्या आहेत या सत्याचा बोध त्याला झालेला असतो .. आणि ह्या ज्ञानावर दृढ विश्वास ठेवून तो जन्म मरणाच्या चक्रातून सोडव अशी माझी करूणा भाकतो ... अशाच आत्म्याला मी त्याच्या सत्य स्वरूपाचा बोध झालेला नसतानाही मुक्ती देऊ शकतो . असा आत्मा त्याच्या निराकार प्रकाशमयी स्वरूपात माझ्या निराकार रुपाच्या सान्निध्यात परततो . " " भगवन् , मंदाकिनीतल्या पृथ्वीवरील मानवप्राण्यांकरता स्वतःचे सत्य स्वरूप ओळखण्याचा एखादा सोपा मार्ग नाही का ? मनुष्यप्राण्याच्या अल्पमतीला आपण अत्यंत सोप्या रीतीने विशद करून सांगितलेले ज्ञानही झेपेनासे झाले आहे . त्याहूनही सोपा असा एखादा मार्ग आहे का ? आपण यापूर्वी सूचक पद्धतीने ज्ञान देण्याचा प्रयत्न केलात , त्यातून मनुष्यप्राणी योग्य तो बोध घेऊन पुढे जाईल अशी तुमची अपेक्षा होती . बुद्धाच्या मार्फत तुम्ही सत्य , अस्तेय , अहिंसा आदीची शिकवण दिलीत ... गीतेतुन परमेश्वरच सर्वश्रेष्ठ सत्य आहे व जीवांचे अंतिम ध्येय परमात्म्याशी मिलन हेच असले पाहिजे हे सांगितलेत , त्यासाठी उपयुक्त असे कर्मयोग , भक्तियोग , सांख्ययोग आदी मार्गही सांगितलेत . पण भगवन् मनुष्यप्राणी माझ्या जालात अडकून अशा काही हीन अवस्थेला पोहोचला आहे की या मार्गांवर चालून आत्मज्ञान प्राप्ती त्याच्या शक्ती पलीकडची आहे . त्याच्या अल्पशक्तीला साध्य होईल असा एखादा अतिसुलभ मार्ग आहे का ? " " होय माये , असा एक मार्ग निर्मिला जाणार आहे . अष्टांग योग हा स्वतःच्या सत्य स्वरूपाची ओळख करून घेण्याचा एक मार्ग आहे . पण तोदेखील आजच्या मनुष्यप्राण्याच्या शक्ती बाहेरचा आहे . तेव्हा या मार्गात काही फेरबदल घडवून हा मार्गही अत्यंत सोपा केला जाणार आहे . या मार्गाने केवळ तीन वर्षांच्या कालावधीत कमी मानसिक परिश्रमांत मानवप्राणी स्वतःची स्मृती पुनः प्राप्त करू शकेल . या मार्गाची दुसरी पायरी असेल तो आत्मा आहे हे सत्य बाह्यतः पूर्ण स्वीकारणं ... याचा अर्थ जन्माने त्याला दिलेलं नाव , ओळख , नाती , आवडीनिवडी , शिक्षण आदी सर्व हे म्हणजे तो नाही तर तो म्हणजे ज्याचा कधी जन्म नाही आणि मृत्यूही नाही असा आत्मा आहे हे सत्य स्वीकारणं .... राग , लोभ , काम वासना , द्वेष , अहंकार हे आत्म्याचे गुणधर्म नव्हेत .. ह्यांचा संपूर्ण त्याग करावा लागेल . त्याचं फक्त एकच नातं आहे आणि ते म्हणजे माझ्याशी , बाकी सारी नाती निरर्थक आहेत हे सत्य त्याला पूर्णपणे स्वीकारावं लागेल " " दुसरी पायरी योगेश्वर ? , मग पहिली पायरी कोणती ? " " पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे मन नियंत्रणाखाली आणणं . हे जेवढ्या लवकर साध्य होईल तेवढ्या लवकर पुढचा मार्ग पार करणं सोपं होईल ." " पण भगवन् , मन संपूर्ण नियंत्रणाखाली आणणं हे तर भल्या भल्या ऋषींना जमलं नाही तर ते ह्या अधःपात झालेल्या मनुष्यास जमणं कसं शक्य आहे ? हे तर सर्वात कठीण कार्य आहे " " नाही माये ...मनुष्याला मन नियंत्रणाखाली आणता येईल आणि त्यानंतर स्वतःच्या सत्य स्वरूपाचा बोध करून घेता येईल असा अत्यंत सोपा मार्ग मी निर्मिणार आहे . पृथ्वीवर हा मार्ग यशस्वी झाला की मी अन्य विश्वांतील अन्य ग्रहांवरही हा मार्ग पोहोचण्याची व्यवस्था करेन . माझ्या अंशांची या कल्पित पीडेतून मुक्तता व्हावी अशी माझीही इच्छा आहे " " प्रभू आपण करुणासागर आहात . हा मार्ग आपण कधी व कोणामार्फत निर्मिणार आहात याचे ज्ञान सेविकेला द्यावे . " " योग्यवेळी तुला ते ज्ञान होईलच माये . हि ती वेळ नाही . तू आता तुझ्या कार्यास प्रस्थान कर " " जशी आपली आज्ञा योगेश्वर .... " अतिशय नम्रपणे हात जोडून वंदन करून योगमाया त्या प्रकाशात विलीन झाली . आता मला सत्याचा बराचसा उलगडा झाला होता . पण मी इथे कसा आलो ? मी तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडव अशी काही प्रार्थना केली नव्हती . असो .. आलो हे भाग्य म्हणायचं .. आता परत जाणं नको , विचारसुद्धा नको पृथ्वीचा .... ती वीणा नको कि नीरज नको ... सारी नाती नाहीतरी खोटीच ! आता पुन्हा याच्यापासून लांब नाही जायचं मला .... याचा विरह सहन नाही होणार मला ... नको नको ... ,परत नाही जायचं मला .... सारं धुसर होत होतं .... आनंदाची शांतीची जाणीव फिकी फिकी होत होती ... हे काय होतंय ? मला जाग येणार होती हे मला समजलं ... जाग येण्यापूर्वीचे काही क्षण मी सर्वशक्तिनिशी त्या अस्तित्वाकडे माझे विचार फेकण्याचा प्रयत्न केला .... नाही ! नाही ! नाही ! मला तुला सोडून कुठेही नाही जायचं ..... असं नको करुस ... प्लीज नको .. नको ... " अहो , साडेसहा झाले ... उठताय ना ? आज लवकर जायचंय ऑफिसला म्हणाला होतात . मी जागा झालो .... विलक्षण दुःखाची जाणीव होत होती , काहीतरी खूप अमूल्य ... खूप महत्त्वाचं हातून निसटून गेल्यासारखं वाटत होतं ... जीवाला कसा चटका लागला होता .. काय ते समजत नव्हतं .... काहीतरी स्वप्न पडलं असावं .... पण असं काय पाहिलं स्वप्नात कि एवढी हुरहूर वाटावी .... ? काय होतं ? काही आठवेना ...... माझा भकास सुन्न चेहरा पाहून वीणा चमकली .... " अहो , काय होतंय ? बरं वाटत नाहीये का ? " तिने माझ्या कपाळाला हात लावून टेम्परेचर आहे का नाही पाहिलं . " नाही , ठीक आहे मी . " मलाच समजत नव्हतं असं वाटायचं कारण काय ... हिला काय सांगू ! "आंघोळीचं पाणी काढ ... ऑफिसला उशीर व्हायला नको आहे ... " मी कसाबसा म्हणालो . सुटी घेऊन घरी राहिलं तर ही उगाच काळजी करणार ... त्यापेक्षा ऑफिसात गेलेलं बरं . सगळं आटपून ऑफिसला जायची तयारी केली . दिवाणखान्यात आलो तर टेबलावर एक जाड पार्सल पडलं होतं ... " हे काय आहे ? " " अहो नीरूने पुस्तक पाठवलंय तुमच्यासाठी ... काल फोन आलेला त्याचा , तुम्हाला सांगायचं राहून गेलं . म्हणत होता फार सुंदर आहे , त्याला खूप आवडलं ... बाबांना आवडेल म्हणून तीच कॉपी पार्सलने पाठवली आहे , म्हणाला . " नीरजने याआधी असं काही पुस्तक बिस्तक पाठवलं नव्हतं .. काय आहे ते पाहावं म्हणून पार्सल उघडू लागलो .... सकाळचा विचित्र मुड बऱ्यापैकी निवळला होता .... राहून राहून आश्चर्य मात्र वाटत होतं . पुस्तक म्हणजे जवळपास पाचेकशे पानांचे ग्रंथराज होते .... भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातञ्जल योगदर्शन लेखक - कृष्णाजी कोल्हटकर .. नीरजला कधीपासून अशा जटील योग बिग शास्त्राची आवड लागली ? पण एवढं म्हणतो पोरगा तर काय आहे ते बघितलं पाहिजे वाचून . " वीणा , मी निघतो ऑफिसला . हे पुस्तक आत माझ्या टेबलावर ठेवशील का ? "
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3168
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by सिरुसेरि

प्रतिसादाबद्दल धन्यवाद . कथा पूर्ण झाली आहे .कथानायकास पातंजल योगशास्त्र हा ग्रंथ वाचून योग ह्या विषयात रस उत्पन्न होऊन तो या क्षेत्रात अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा व प्रत्यक्ष योगसाधना करण्याचा प्रयत्न करणार व काही काळाने त्यात यश प्राप्त होताच त्याची या स्वप्नाची स्मृती जागृत होणार व सामान्यजनांसाठी 3 वर्षात मनावर विजय मिळवून स्वतःची / आत्म्याची खरी ओळख पटेल किंवा खरी स्मृती जागृत होईल असा मार्ग निर्माण करण्यासाठी आपली निवड झाली आहे ह्या सत्याची त्याला अनुभूती होऊन तसा मार्ग तो परिश्रमपूर्वक निर्माण करणार .... कथेच्या शेवटातून वरील गोष्टीचा वाचक अंदाज करेल असं अपेक्षित होतं , शेवट लिहिताना .

मानसशास्त्राविषयी पहिले कधी वाचलं नाही... नवीन गोष्ट आहे आता कुतूहल जागृत होत आहे चालू राहू दे...

In reply to by Abheeshek

प्रतिसादाबद्दल धन्यवाद . मानसशास्त्र हा या कथेचा विषय नाहीच आहे . पुस्तकाच्या नावात असलेला मानसशास्त्र हा शब्द आणि कथेच्या सुरुवातीस असलेला मानसशास्त्राचा संदर्भ यांचा परस्परात काही संबंध नाही . मुक्त कल्पनाविलास / तात्विक - आध्यात्मिक अशी ही कथा आहे . कथानायकास स्वप्नात देवाच्या निराकार सत्य स्वरूपाचं प्रत्यक्ष दर्शन घडलं आहे , पण याची स्पष्ट स्मृती त्याला राहत नाही . .कथानायकास पातंजल योगशास्त्र हा ग्रंथ वाचून योग ह्या विषयात रस उत्पन्न होऊन तो या क्षेत्रात अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा व प्रत्यक्ष योगसाधना करण्याचा प्रयत्न करणार व काही काळाने त्यात यश प्राप्त होताच त्याची या स्वप्नाची स्मृती जागृत होणार व सामान्यजनांसाठी 3 वर्षात मनावर विजय मिळवून स्वतःची / आत्म्याची खरी ओळख पटेल किंवा खरी स्मृती जागृत होईल असा मार्ग निर्माण करण्यासाठी आपली निवड झाली आहे ह्या सत्याची त्याला अनुभूती होऊन तसा मार्ग तो परिश्रमपूर्वक निर्माण करणार .... कथेच्या शेवटातून वरील गोष्टीचा वाचक अंदाज करेल असं अपेक्षित होतं , शेवट लिहिताना .

खूप खुप सुंदर लिहिलंय. अगदी चित्रदर्शी. पुढचा भाग हवा होता असे मनापासून वाटतंय. शेवटी उल्लेखलेल्या पुस्तकाचे विवरण, विवेचन असे काही. शक्य झाल्यास या विषयावर अजुन लिहावे अशी विनंती.

In reply to by पद्मावति

प्रतिसादाबद्दल धन्यवाद . खरंतर शेवटी उल्लेखलेलं पुस्तक मी अजून वाचलेलं नाही ... पातंजल योगशास्त्र नावाचं एक हिंदी इबुक मला इंटरनेटवर सापडलं . ते वाचून मला फार अमूल्य माहिती मिळाली असं वाटलं आणि देव / परमात्मा , जन्माचा उद्देश काय असावा आदी विचारमंथन सुरु झालं ... त्यातूनच बहुधा असं असावं असा मनाने निष्कर्ष काढला व ही कथा जन्माला आली ... ( अर्थात पुस्तक वाचलं म्हणजे मी षड्रिपू जिंकले असं वगैरे मुळीच नाही पण निदान त्यांना जिंकण्याचा प्रयत्न तरी का आणि कसा करायचा याचं ज्ञान मिळालं ) कथेच्या शेवटी उल्लेख केलेल्या पुस्तकाबद्दल काही काळापूर्वी एका सद्गृहस्थांनी आपल्या एका लेखात हे पुस्तक माझ्या साधनेत मला उपयुक्त ठरत आहे असा उल्लेख केला होता , ते वाचून मी बुकगंगा या साईटवर जाऊन या पुस्तकाची अनुक्रमणिका व प्रस्तावना वाचली ...पुढे कधीतरी हे पुस्तक खरेदी करण्याचा माझा मानस आहे .