✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मनुस्मृति (भाग १)

श
शरद यांनी
Sun, 07/23/2017 - 06:11  ·  लेख
लेख
मनुस्मृति (भाग १) आपण जेव्हा कोणत्याही धर्मकृत्याच्या संकल्पात " श्रुतीस्मृतीपुराणोक्त फलप्राप्यर्थम् " असे म्हणतो तेव्हा आपणाला फारफार तर पुराण माहीत असते, अगदी बरीच नावे माहीत नसली तरी त्यात जुन्या देवादिकांच्या गोष्टी असतात, त्यात भक्तीचा पुरस्कार केला आहे इतके जुजबी ज्ञान नक्की असते. श्रुती-स्मृती ही काय भानगड आहे ? आज थोडी माहिती मिळवू. वेदसंहिता-ब्राह्मणे-आरण्यके-उपनिषदे या सर्व साहित्याला श्रुती म्हणतात. आपल्या, विशेषत: पंडितांच्या, धार्मिक व्यवहारात, हा अतिम शब्द. हा सगळा प्रकार कितीही श्रेष्ठ असला तरी सामान्य माणसांच्या रोजच्या व्यवहारात त्याला लागते साध्या साध्या नियमांची जंत्री माणसांनी एकमेकांशी, राजाने प्रजेशी आणि प्रजेने राजाशी, व्यापार्‍याने ग्राहकाशी, आई-वडिलांनी मुलांशी आणि त्यांनी आई-वडिलांशी, एका वर्णाने दुसर्‍या वर्णाशी, इत्यदि इत्यादि कसे वागावे याचे नियम असणे समाजाला अत्यंत गरजेचे असते; नव्हे. समाज त्या शिवाय राहूच शकत नाही. हे नियम किंवा कायदे ज्या साहित्यात लिहले आहे ते साहित्य म्हणजे स्मृती. अध्यात्मदर्शनाचा पाया शुद्ध आचार आहे. तो आचार आणि त्याच्या नीतीरुपी, सदाचाररुपी सीमारेषा नियमबद्ध करणे हे स्मृतींचे कार्य. आचार शुद्ध रहावा, कायदे नीट पाळले जावेत म्हणून " प्रायश्र्चित्त " (दंड) आलेच. तर अशा या स्मृती. किती आहेत ? प्रमुख वीस. उदा. अत्री, आपस्तम्ब, पाराशर वगैरे. त्यातील सर्वात प्रमुख व ब्रिटिश शासन कालातही न्यायालयात वापरली जाणारी म्हणजे " मनुस्मृती ". एक अतिशय प्रज्वलनशील ग्रंथ. भाजपाला मनुवादी म्हणून हिणवावयास व केव्हाही रस्त्यावर जाळावयास उपयोगी म्हणून "बहेनजीं"ना फारच आवडणारा. आज आपण.मनुस्मृतीची माहिती घऊं.. मी अशा विषयावर लिहतो तेव्हा सहसा संक्षिप्त स्वरूपात लिहतो. वाचणार्‍याला किती त्रास द्यावयाचा हा साधा हिशेब. पण आज जरा विस्ताराने लिहिन म्हणतो. लेख तीन भागात आहे. पहिल्या दोन भागात ग्रंथाची माहिती व तिसर्‍या भागात याच स्मृतीला प्रखर विरोध कां ? ते पाहू. तर आता सुरवात करू मनुस्मृती लिहणार्‍या मनुपासून. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र्र ही ओळख सोडली तर त्याचा ऐतिहासिक.काळ काही सापडत नाही. तेव्हा जरा वळसा घेवून मनुस्मृतीचा काळ कोणता ते पहिल्यांदी ठरवून मग तो काळ मनूचा असे म्हणावे लागते. इथेही अडचण अशी की आज आपल्यासमोर जी मनुस्मृती आहे ती मनूने लिहलेली नव्हेच. ती आहे एकामागून एक अशी संस्करणे झालेली. पण महाभारतात जर मनूची वचने दिली असतील तर ती त्यावेळी सर्वांना माहीत होती असे म्हणावयाचे. ती बुद्धपूर्व कालातील असणार. द्या सोडून. तेव्हा आज आपल्या समोर असलेल्या मनुस्मृतीकडे वळू. ग्रंथात १२ अध्याय व २६८४ श्लोक आहेत..प्रत्येक अध्यायातील महत्वाचे विचार बघू... आज ज्यांना मोठा विरोध आहे ते दोन मुदे (१) "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" आणि (२) शूद्र. पहिल्याचा आपण याच भागात योग्य ठिकाणी विचार करू व दुसर्‍याकरिता भाग ३ आहेच. (१) अद्याय १ (श्लोक ११९) परमात्म्याने सर्व सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाने धर्मशास्त्र मनूला शिकवले. त्याने ते ऋषींना दिले. निमिषापासून युगापर्यंत कालगणना; कृतयुगात धर्म, त्रेतायुगात ज्ञान; द्वापारयुगत यज्ञ व कलीयुगात दान प्रधान आहेत; ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण; अध्ययन,अध्यापन,यझ‘करणे-कराविणे दान देणे व घेणे ही ब्राह्मणाची सहा कर्मे; प्रजेचे रक्षण दान देणे, यज्ञ करणे, अध्ययन व इंदियजय ही क्षत्रियाची प्रधानकर्मे, गोपालन, दान देणे, यज्ञ करणे, अध्ययन, व्यापार, शेती ही वैश्याची प्रधानकर्मे तर शिल्पकर्मे (कलानिर्मिती व त्रिवर्णाची सेवा ) ही शूद्रांची कर्मे आहेत. सर्वांनी सदाचारीच असावे. (२) अध्याय २ (श्लोक २४९) ब्रह्मावर्त, ब्रह्मर्षी, मध्य देश यांच्या सीमा; पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत आणि हिमालय-विन्ध्यामधील प्रदेशास आर्यावर्त म्हणतात. ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य याचे उपनयन क्रमश: ८ व्या, ११ व्या; १२ व्या वर्षी करावेत. भोजन एकाग्रचित्ताने अन्नाचा सन्मान करून करावे. अतिभोजन करू नये. पतिसेवा हाच स्त्रीसाठी गुरूकुलवास असून उत्तम रीतीने गृहकृत्ये करणे हाच साय़ंप्रातर्होम होय. प्रतिदिनी जो वृद्धांची सेवा करतो विनम्रभावाने नमस्कार करतो त्याचे आयुष्य, विद्या, यश व बल सर्वच वर्धिष्णु होते. मावशी, मामी, आत्या, काकू, सासू या सर्व मातेसमान आहेत. दहा उपाध्यायासमान आचार्य असतो, शंभर आचार्यासमान पिता असतो आणि पित्यापेक्षा मातेची थोरवी सहस्रगुणित असते. ब्राह्मणाने मानसन्मान विषवत् टाळावे व अपमानची अमृतवत् इच्छा करावी, तात्पर्य त्याने निर्द्वंद्व व्हावे. माता-पिता-आचार्य यांचा कधीही अनादर करू नये. हे तीन लोक, तीन आश्रम, तीन वेद आणि तीन अग्नी आहेत. (त्यांच्याप्रमाणे पवित्र आहेत. उत्तम विद्या शूद्राकडूनही ग्रहण करावी, परमधर्म चांडाळाकडूनही ग्रहण करावा. स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा. विद्या, धर्म, सुचिता, उत्तम वचन इ.अनेक प्रकारच्या चिद्या ज्यांच्याकडून मिळतील त्यांच्याकडून घ्याव्यात. (३) अध्याय तीन (श्लोक २८६) गुरूकुलात ब्रह्मचर्यव्रताने राहून मग गुरूच्या आज्ञेनेच गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. ब्राह्म, दैव, आर्य, प्राजापत्य, आसूर, गंधर्व, राक्षस आणि पैशाच्य हे विवाहाचे आठ प्रकार आहेत. यापैकी पहिले चार श्रेष्ठ आहेत. ज्ञानवान पित्याने द्रव्याच्या मोहाने आपल्या कन्येला कधीही विकू नये. स्त्रीचा सदैव आदरच केला पाहिजे.जेथे (ज्या कुळात) स्त्रीचा सन्मान होतो तेथे देवता रमतात आणि जिथे स्त्रियांचे पूजन होत नाही, तेथे यज्ञादी सर्व क्रीया निरर्थक होतात. ज्या कुलातील स्त्रिया दु:ख करतात, शोक करतात, त्या कुलाचा तात्काळ नाश होतो स्त्रीला सन्मान वा शोभा असेल तरच त्या कुळाला शोभा आहे. देवता, अतिथी, सेवक, माता, पिता, या सर्वांचा गृहस्थाश्रमीने नित्य सन्मान केला पाहिजे. संपूर्ण जीव ज्याप्रमाणे वायूच्या आश्रयाने जगतात, त्याप्रमाणे सर्व आश्रम गृहस्थाश्रमाच्या आश्रयाने जगतात. सर्वांना जेवण दिल्यावरच पति-पत्नीने अन्नग्रहण करावे. (४) अध्याय ४ (श्लोक २६०) सत्य व प्रिय बोलावे, अप्रिय बोलू नये. असत्य पण प्रिय, सत्य पण अप्रिय तेही बोलू नये हाच सनातन धर्मा होय. निष्प्रयोजन वैर किंवा भांडण कधीही करू नये. धर्मवर्जित व धर्माचे अधिष्ठान नसलेल्या अर्थ व काम यांचा संपूर्ण त्याग करावा. नोकर आपली छाया असतात, त्यांच्या मुखातून काही वाईट बोलले गेले तर त्याचा राग करू नये.. कन्या विशेष कृपापात्र असते. विद्वान पुरुषाने सदैव यम-नियमांचे सेवन करावे. तपाचरण करणार्‍याने अहंकार वाढू देऊं नये; यज्ञ करणार्‍याने असत्य बोलू नये; दु:ख असलेल्याने विप्रांची निंदा करू नये; दान देणार्‍याने दानाची वाच्यता करू नये अहंकाराने तपाचा, असत्याने यज्ञाचा, परनिंदेने आयुष्याचा व वाच्यतेने दानाचा नाश होतो. परलोक प्राप्त करतांना माता-पिता, पुत्र, पत्नी कोणीही उपयोगी येत नाही. केवळ एक धर्मच सहाय्यभूत होतो. जीव एकटाच जन्माला येतो व एकटाच मरतो. एकटाच सुकृत-दुष्कृताला भोगतो. उत्तमांचा संग धरावा आणि अधर्माचा संग टाळावा. (५) अध्याय ५ (श्लोक १६९) आपल्या सुखाकरिता प्राण्यांची हिंसा करणार्‍याला इहलोकात व परलोकात सुख मिळत नाही. शंभर अश्चमेध करणार्‍याला व संपूर्ण आयुष्यात मांस न खाणारा यांना सारखेच पुण्य मिळते. सन्मार्गाने द्रव्य मिळविणे श्रेष्ठ आहे.विद्वान क्षमेने, नदी वेगाने, शरीर जलाने, मन सत्याने, जीवात्मा विद्या व तपाने, बुद्धी ज्ञानाने व ब्राह्मण त्यागाने शुद्ध होतात. मांस खाण्यात, दारू पिण्यात वा संभोगात पाप नाही परंतु त्यापासून दूर राहण्यात जास्त फायदा होतो. मुलीने, तरुणीने वा वृद्धेने आपल्या घरातही काहीही स्वेच्छेने करू नये. बाल्यावस्थेत पिता, तारुण्यात पति वार्धक्यात मुलगा असे स्त्रीचे तीन आश्रय असतात. म्हणून स्त्रीने स्वतंत्र राहू नये. पिता, भर्ता वा पुत्रापासून अलग झालेल्या स्त्रीची निंदा होते. पतिसेवेतच स्त्रीची सर्व व्रते, उपवास, यज्ञ समाविष्ट आहे. मन, वाणी व देह यांने पतीला दु:ख न देणारी स्त्री उत्तम लोकाला जाते. (२००० वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रीने जर पिता, भर्ता आणि पुत्र यांचा आश्रय सोडून स्वतंत्र रहावायाचे ठरविले तर तिला चरितार्थाचे साधन काय असणार ? संरक्षणाची व्यवस्था कोणती ? अशा स्त्रीची समाज निंदा करणार हे उघडच होते. मनूने इतर ठिकाणी स्त्रीची केलेली स्तुती पहाता त्याच्या मनात स्त्रीबद्दल आदरच होता असे दिसते.पण समाजाचा एक भाग म्हणून विचार केला तर त्या काळी स्वतंत्र स्त्री ही कल्पना अव्यवहार्य होती हे मान्य करावेच लागेल. आज काळ बदलला आहे. आज स्त्रीने स्वतंत्र रहावयाचे ठरविले तर ते शक्य आहे,सुरक्षित आहे की नाही हे अलग, तेव्हा या विधानाबद्दल मनूला किती दोष द्यावयाचा हे प्रत्येकाने वैयक्तिक ठरवावे.) (६) अध्याय ६ (श्लोक ९७) माणसाने गृहस्थाश्रमात नियमपूर्वक व जितेंद्रिय रहावे. वृद्धत्व आल्यावर वानप्रस्थाश्रमाचा आश्रय घ्यावा. शेवटी सन्यास घ्यावा. या अध्यायात प्रत्येक आश्रमात कसे रहावे याचे मार्गदर्शन केले आहे. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व यती हे चार आश्रम गृहस्थाश्रमाधिष्ठित आहेत. धैर्य, क्षमा, दम अस्तेय, सुचिता, इंद्रियनिग्रह, शास्त्रज्ञान, आत्मज्ञान, सत्य, अक्रोध ही दहा धर्मलक्षणे आहेत. यांच्या अनुसरणानेच मोक्षलाभ होतो.
  • मनुस्मृति भाग २
  • मनुस्मृति भाग (३)
  • प्रिय श्री स्वधर्म

Book traversal links for मनुस्मृति (भाग १)

  • मनुस्मृति भाग २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
65054 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

असो

मारवा
Wed, 10/25/2017 - 07:25 नवीन
असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

व्यासोत्पत्ती

गामा पैलवान
Wed, 10/25/2017 - 12:56 नवीन
मारवा, जर व्यासांसारख्या विद्वानाची उत्पत्ती होणार असेल तर रुखावरून नकाब सरको वा न सरको. काही फरक पडंत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा