दिव्याची आवस

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
22 Jul 2017 - 1:19 am

दिव्यांची आवस

आपण ज्याला 'गटारी अमावस्या' म्हणतो ती खर तर 'दिव्याची आवस' किंवा 'दर्श अमावस्या' आहे. दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरवात होते. आपल्यला श्रावणात उपवास करायचे असतात; नॉनवेज आणि दारू याला हात लावायचा नसतो; अस मानलं जातं. अलीकडे मात्र कितीजण हे पाळतात कोण जाणे. पण गटारी अमावास्या मात्र अनेकजण साजरी करतात. आठवडा-पंधरा दिवस अगोदरच आपल्याला whatsaap वर यासंदर्भातले जोक्स यायला लागतात. आपण ते कधी वाचतो... कधी दुर्लक्ष करतो. पण 'गटारी अमावस्या' याव्यतिरिक्त या दिवसाचे काही महत्व आहे हे आपल्याला माहित नाही आणि सहसा कोणी माहित करून घ्यायचा प्रयत्न देखील करत नाही. मात्र या दर्श/दिव्याच्या अमावस्येची एक कथा/कहाणी आहे. ती अशी....

एका आटपाट नगरातील राजाची सून रोज दिवे घासून चांगली तेलवात करायची. दिव्यांच्या अवसेला चांगला नैवेद्य करून दिव्यांना दाखवायची. एकदा तिला घरात केलेला एक पदार्थ खूप आवडला आणि तो तिने खाऊन संपवला. परंतु आळ उंदरांवर घेतला. याचा उंदरांना राग आला आणि सूड घेण्यासाठी त्यांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात टाकली. त्यामुळे तिची सर्वांनी निदा केली आणि घरातून काढून टाकले. ती निघून गेल्यानंतर त्या घरातील दिव्यांची काळजी कोणीच घेतली नाही. असेच दिवस गेले. दर्श अमावस्येचा दिवस आला. त्या दिवशी राजा जंगलात शिकारीला गेला होता. येताना त्याला उशीर झाला म्हणून तो एका झाडाखाली विश्रांतीला थांबला होता. त्याच झाडावर त्या गावातील सर्व दिवे जमले होते. ते प्रत्येक घरातील केलेली पूजा आणि मिळालेला नैवेद्य याबद्दल बोलत होते. तेव्हा राजाच्या घरातील दिव्याने दु:खी आवाजात राजाच्या सुनेची कहाणी सांगितली आणि म्हणाला ती गेल्यापासून राजाच्या घरातील दिव्यांची वाईट अवस्था आहे. झाडाखालील राजाने हे ऐकले. तो वाड्यावर गेला आणि सर्वाना पुढे उभे करून त्याने विचारले की कोणी सुनेला पाहुण्यांच्या खोलीत जाताना प्रत्यक्ष बघितले होते का? सर्वांनी ते नाकारले. मग राजाने पालखी पाठवून सुनेला परत बोलावून घेतले आणि तिची क्षमा मागितली. तिला साऱ्या घराची मुखत्यारी दिली. त्यानंतर राजाची सून दिव्यांची पूजा परत करू लागली. तर जसा राजाच्या सुनेला दीपक पावला तसा तुम्हा आम्हाला पावो . तिचा आळ जसा टळला तसा तुमचा आमचा टळो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

किमान ही कहाणी आपण आपल्या ओळखीच्या लोकांना सांगायला कांस्य हरकत आहे.

यादिवाशी किसलेला गूळ आणि जास्त प्रमाणात कणिक यात गरम तेलाचे मोहन घालून मळून साधारण पेढ्याच्या आकाराचे दिवे करतात. ते मोदकांप्रमाणे उकडतात. त्याचा दिव्यांना नैवेद्य दाखवला जातो.

आमच्या लहानपणी आई दर दिव्यांच्या अवसेला हे दिवे करायची आणि आम्ही ते गोड दिवे अगदी हौसेने खायचो ते आठवते. आजही या गटारी अमावास्येच्या जोक्सपेक्षा आई करायची त्या दिव्यांच्या आवसेच जास्त अप्रूप वाटत.

(दिव्यांची रेसिपी: किसलेला गूळ दोन वाट्या, जाड दळलेले गव्हाचे पीठ आणि गरम तेल सहा चमचे. चिमूटभर मीठ. सगळं एकत्र मळून लहान गोळे करून दिव्यांच्या आकार करावेत आणि मोदकांप्रमाणे उकडून घ्यावेत)

लेख

प्रतिक्रिया

दिव्यांची अमावस्या खूप जणांना ठाऊक नसते यात त्यांचा काय दोष? माझ्या माहेरी त्या दिवशी दीपपूजन करतात. पण माझ्या ओळखीत विशेष कुणाकडे ती पद्धत नाही, अगदी आईच्या माहेरीही नाही. त्यामुळे लहानपणी सगळ्यांना त्याबद्दल सांगावं लागायचं आणि ही पूजा आपल्याच घरी असते म्हणून अप्रूपही वाटे.

आदल्या दिवशी सगळे दिवे घासूनपुसून ठेवले जात. सगळ्या दिव्यांसाठी वाती कराव्या लागत. लख्ख झालेली पितळेची समई, निरांजनं वगैरे पाच दिव्यांना पाटावर मांडून फुलं, लाह्या, कापसाचं वस्त्र यांनी आई पूजा करे. नैवेद्याला उकडीचे मोदक असत. त्याचे दिवे करून तेही लावले जायचे. त्यातला एक दिवा खायला मिळत असे. त्याचा खरपूस वास नाकात भरून राही. आईच्या नोकरीमुळे ती पूजा झाल्यावर दिवे मालवून जात असे. (दिवे तो दिवसरात्र मालवायचे नाही अशी खरंतर पद्धत होती.) मी शाळेतून घरी आले की ते सगळे दिवे लावून पूजा करून मग जेवत असे. दिवाळीत सगळीकडेच पणत्या लावतात, रोषणाई असते. पण आषाढात पाऊस कोसळत असताना संध्याकाळी एकाजागी उजळलेले दिवे पाहणं अधिक नेत्रसुखद वाटत असे.

तुम्ही यावर लिहिलंत त्याबद्दल धन्यवाद!

ती खर तर 'दिव्याची आवस' किंवा 'दर्श अमावस्या'

असं लिहिलंय. पण आषाढ अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या नव्हे. दर्श अमावस्या बहुधा कोणत्याही महिन्यात येऊ शकते आणि तिचा संबंध अमावस्या कोणत्या वेळी सुरू होते याच्याशी असावा. बाकी कोणते सण वा व्रतं पाळायची आणि कोणते नाही हे ज्याचं त्याने ठरविलेलं बरं, नाही का?

ज्योति अळवणी's picture

22 Jul 2017 - 8:24 am | ज्योति अळवणी

दिव्यांची अमावास्या जर माहीत नसेल तर तो दोष आहे असं मी कुठेही म्हंटलेलं नाही. तुम्हाला तस वाटलं असलं तस क्षमस्व.

दिव्यांची अमावास्या म्हणजेच दर्श असं मला आजीने सांगितलं होतं. माझ्या माहेरी करायचे. ते आठवत दरवेळी आणि नॉस्टॅल्जिक वाटतं. म्हणून हा लेख लिहिला इतकंच.

बरोबर.
दर्श अमावस्या बहुधा कोणत्याही महिन्यात येऊ शकते आणि तिचा संबंध अमावस्या कोणत्या वेळी सुरू होते याच्याशी असावा. सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हटले जाते, यावेळी समुद्र स्नान केल्याने पुण्या मिळते असे आमची आजी सांगत असे, नंतरच्या काळात आई सांगे मिठामध्ये जन्तुघ्नता असल्याने ठराविक काळाने समुद्रात अंघोळ करावी हे सामान्य जनांना सम्जावाण्यापेक्षा पुण्य मिळते असे सांगितले की उद्देश्य साध्य होत असे...

आमच्या घरी गव्हाच्या नाही, पण बाजरीच्या पीठाचे गोड दिवे करतात. आईपण बहुतेक कुठल्या तरी विशिष्ट दिवशी करायची पण नक्की दिव्यांच्या अवसेलाच की कसे ते आठवत नाही.

जुइ's picture

22 Jul 2017 - 2:48 am | जुइ

माझ्या माहेरी या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. शिवाय गव्हाच्या आणि बाजरीच्या पिठाचे गोड दिवे केले जातात.

बरं झालं लिहीलंत, दिव्यांची अवस म्हटलं की लोक 'अजि म्यां ब्रह्म पाहिले' अशा आविर्भावात बघतात.

ज्योति अळवणी's picture

22 Jul 2017 - 8:25 am | ज्योति अळवणी

धन्यवाद सूड जी

हो खूप मस्त लागतात हे दिवे खायला. :)

ज्योति अळवणी's picture

22 Jul 2017 - 8:26 am | ज्योति अळवणी

खरच खोऊ मस्त लागतात. विशेषतः आता मुद्दाम आईच्या हातचे आयते मिळतात तेव्हा त्याची चव वेगळीच असते.

भीमराव's picture

22 Jul 2017 - 8:43 am | भीमराव

कथा छान आहे, तुमचं लेखन सुद्धा एक नंबर
परंतु गटारी हा एक उस्फुर्त सण आहे, पुढे येनारा श्रावण, महिनाभर खाणाऱ्यांची कुचंबना, खाण्याबरोबर पिनं हि आलंच, या सणामागं कुठलीकथा-पुराण नाही तरीही हा सण बेवडे स्वतःच्या जिवावर स्वतःच्या कथा स्वतः तयार करत साजरा करतायत.

मराठी कथालेखक's picture

7 Aug 2018 - 7:13 pm | मराठी कथालेखक

:)

चित्रगुप्त's picture

8 Aug 2018 - 3:43 am | चित्रगुप्त

वा. लेख वाचून बालपण आठवून गहिवरून आले. दिव्याच्या अमावस्येला आई भरपूर कणीक-गुळाचे दिवे करायची आणि घरचे लोणकढे तूप घालून आम्ही भावंडे ते आवडीने खायचो. त्या काळच्या आया प्रत्येक सणाला न चुकता त्या त्या सणाचे ठरलेले गोडाधोडाचे भरपूर प्रमाणात करायच्या आणि मुलाबाळांनाच काय पण येणार्‍या जाणाराला आग्रहाने खाऊ पिऊ घालायच्या. कुटुंब मोठे, पै पाहुणा, वडीलधारी मंडळी, चूल पेटवून स्वयंपाक करायचा, घर सारवणे, आडाचे पाणी काढणे, दिवाबत्ती करणे, कुरडया पापड्या करणे, दिवाळीला मोठमोठे डबे भरून फराळाचे जिन्नस करणे, गोधड्या शिवणे, अशी अनेक कामे त्या कशा करू शकायच्या (शिवाय स्वतःची, सुना-मुलींची बाळंतपणे पण असायचीच) हे असे सर्व करूनही आमच्या आईचे वाचन अफाट होते. पेशवाईचा संपूर्ण इतिहास तिला तोंडपाठ होता..... या सर्वाचे आता खूपच आश्चर्य वाटते ( हल्ली दोघांचा स्वयंपाक करायचाही कंटाळा करून पिझे मागवणार्‍यांबद्दल काय बोलायचे ?)

लहानपणी ही गोष्ट कहाण्यांच्या पुस्तकात वाचलेली.पण त्या वयात ते चोळी टाकण्यात काय प्रोब्लेम झाला तेच कळले नव्हते....वीचारले आईला तर ओरडा पडलेला...

आता तो दीवस आढवला. आणि साक्षात्कार पण झाला...

सस्नेह's picture

8 Aug 2018 - 1:13 pm | सस्नेह

समयोचित लेख !
गटारी संस्कृती सोडून खरी संस्कृती वेगळीच आहे हे दाखवणारा.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Jul 2020 - 8:29 am | प्रकाश घाटपांडे

आई बाजरीचे दिवे पण करायची . मला ते फार आवडायचे.

आपल्याच संस्कृती मधील एखादी गोष्ट माहित नाही हा माझ्या मते नक्कीच दोष आहे. वालेन्तीन डे..माहित आहे. ..आपल्या संस्कृतीत दिवा हि महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे दीप प्रज्वलन महत्वाचे आहे तरीही वाढ दिवसाला मेणबत्ती विजवणे आपल्याला चालते आणि मान्य आहे .. आपल्या समयोचित लेखाबद्दल धन्यवाद.