शेवटची प्रेमकथा
आलम दुनिया दिशाहीन पळत होती; पण पळूनही फायदा काय? कुठंही गेलं तरी ऑक्सिजन नव्हताच. एका रात्रीतला हा बदल. झाडांनी बंड पुकारलं होतं.सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर बंद केलं होतं त्यांनी प्राणवायु बनवणं. प्रकाशसंश्लेशणाची अशी पद्धत शोधली होती त्यांनी, ज्यात ऑक्सिजन बाहेर पडत नाही.
दोन-तिन तास पुरला कसाबसा प्राणवायु. नंतर सगळेजण गुदमरु लागले; मिळेल त्या वाहनात बसून धावू लागले अज्ञाताकडे. पण प्राण नव्हता कुठंच. माणसं तडफडून मरु लागली. हॉस्पिटल मध्ये होते काही ऑक्सिजन सिलेंडर्स. तेसुद्धा डॉक्टरांनीच पळवले, ज्यांच्यात दम होता त्यांनी डॉक्टरांचा खून करून ते मिळवले.
ती मात्र घाबरली नाही.कारण तो बोलला होता असंच होणार अन ती विश्वास ठेवायची त्याच्या प्रत्येक वाक्यावर. सारा गाव रस्त्याच्या दिशेने पळू लागलेला. तिला मात्र जायचं होतं दुSर- सुर्य उगवतो त्या टेकडीच्या पाठीमागे. तिथेच तर ते भेटायचे. तिथली झाडं साक्ष होती त्यांच्या प्रेमाची. ती जवळ नसली की तो झाडांशी गप्पा मारायचा.
“तू झाडांशी का बोलतो?” तिने एकदा विचारलं होतं.
“कारण ते माझे मित्र आहेत. मला कळते त्यांची भाषा. मीपण त्यांच्यातलाच एक बनणार एक दिवस.” तो स्वप्नाळू डोळ्यांनी सांगायचा.
तिला हे पटायचं, पण लोकांना नाही.वेडा म्हणायचे सगळे त्याला, हसायचे खूप. पण त्याला कुठं होती पर्वा!
विचार करता करता पोहोचली ती टेकडीच्या मागे. सूर्य तापुन लाल झाला होता एव्हाना. इथपर्यंत ती कशी पोहोचली हाच मोठा प्रश्न. कदाचित प्रेमामुळे असेल. याच प्रेमापोटी तिने त्याला जायची परवानगी दिली होती. तो बोलला होता,मी येईल तुझ्याजवळ कायमचा. विश्वास ठेव.
याच शब्दांपोटी तिने पिऊन टाकले होते सगळे अश्रू.
“एक दिवस संपेल हे जग पापी माणसांचं. राज्य येईल तेव्हा झाडांचं. तेव्हा तू ये इथेच, या टेकडीमागे. लाल रंगांची फुलं घेऊन उभा असेन मी तुझं स्वागत करायला.”
त्याचं सगळं बोलणं स्पष्ट आठवत होतं तिला; पण श्वासाची लय आता तुटक होऊ लागली होती, उरले होते फक्त काही क्षण. तिने शरीराच्या सगळ्या अणुरेणुंसकट आवाज दिला त्याला. पिसाटल्यागत धावली ती त्याला शोधायला; पण तो नव्हता कुठंच. तो वचन विसरला का? नाही असं कसं होईल? तिला ग्लानी आली, भान हरपू लागलं झपाट्यानं. अखेर ती कोसळलीच. पण अजूनही तिच्या शरीरातला कण अन कण प्राणवायुविना नाही तर त्याच्याविना तडफडत होता.
हळूहळू नजरेसमोरचं सगळं पुसट होत गेलं. जगण्याचं बळ संपलं…पण मरणसुद्धा एवढं सोपं नसतं हुलकावणी देतंच तेसुद्धा एखाद्याला. तिच्या मदतीला वायूंचा राजा आला धावून.नाकातोँडातून घुसून प्रवेश केला शरीरात चैतन्यानं.प्राणवायु दौडू लागला तिच्या नसानसांतून.
तिचे मिटलेले डोळे उघडले.समोर खरोखरच तो उभा होता, लाल रंगांची फुलं घेऊन. तिच मूर्ख होती,त्याला ओळखायला चुकली होती. तो लालज़र्द रंगांची फुलं अंगाखांद्यावर लेऊन जमिनीत आपली भक्कम मु़ळं रोवून उभा होता; आपले फांद्यांचे हात पसरवून तिला बोलावंत होता.
ती विरहिनी वाहत गेली लाटेसारखी. घट्ट बिलगली त्याच्या खोडाला.
आसवांचा पूर वाहू लागला, लाल फुलांच्या वर्षावात तिचा देह न्हाऊ लागला.
---------------------------------------------
वाचन संख्या
3193
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूपच वेगळी कथा! मस्त आहे!
अतिशय वेगळी आणि खिळवून
अफाट कल्पनाशक्ती !!
सर्व मित्रांचे आभार
आभारी आहे
सुंदर प्रेमकथा!
वेगळीच सुंदर कथा. लिहित रहा
नक्कीच
In reply to वेगळीच सुंदर कथा. लिहित रहा by अजया
हटके...
छानच आहे! आवडलि कथा..
एल शंका
तसं कशाला असेल? प्राणवायु
In reply to एल शंका by मराठी कथालेखक
ओह्ह.. करेक्ट.. इंधनानेही
In reply to तसं कशाला असेल? प्राणवायु by अॅस्ट्रोनाट विनय
आगदी बरुबर
In reply to ओह्ह.. करेक्ट.. इंधनानेही by मराठी कथालेखक
आवो लव ष्टोरी हाय कि!
In reply to ओह्ह.. करेक्ट.. इंधनानेही by मराठी कथालेखक
कथा आवडली!
वेगळ्याच
वाचली