जॅागिंग पार्कातले / बागेतले प्राणी

कंजूस's picture
कंजूस in जनातलं, मनातलं
23 Dec 2016 - 6:57 pm

जॅागिंग पार्कातले /बागेतले प्राणी
प्रेरणा //मैफिलितले प्राणी (२०१३)/लेखक आदूबाळ.
१) पहिला हास्यक्लब सुरू होतो सकाळी सहाला. बहुतेक ज्येष्ठ नागरिक. घरी बहुतेक चारलाच उठून तयारीत राहात असतील. क्यानवास शूज,टी शर्ट,पंजाबी ड्रेस कोड. खाली सोसायटीचा जिन्याचा दरवाजा वेळेत उघडला नसेल तर संतापत असावेत. शंभरेक जणाचा व्यायाम ग्रुप लिडर सांगेल तसा सहाच्या ठोक्याला सुरू. श्वास घेणे सोडणे फासफुस आणि आवाज. साडेसहाला संपण्या अगोदर पाच मिनिटे अगोदर अत्यंत आवडता प्रकार हाहाहोहो नंतर दोन्ही हातांनी मांजर ओजकारते तो अभिनय दात ओठ खावून. सर्व राग तेव्हा काढत असावेत॥ मग सुट्टी. पाचसहाच्या घोळक्यात चर्चा करून निघतात.
२) तोपर्यंत इकडे चाळीसपन्नासजण चालण्याच्या गोल ट्रॅकवर तीन लेनमध्ये प्रदक्षिणा मार्गानेच चालतात. तरातरा चालणारे ,हळूहळू डुगुडुगू चालणारे आणि मध्यम गतीचे आपापली लेन पकडून असतात. किती फेय्रा मारायचे ते ठरलेले असते. मधूनच 'रस्ता' ओलांडणारा आला अथवा उलट फेय्रा मारू लागला तर अती संतापाने बघतात.
३) थोडे उजाडले की तिसरा गट हजर होतो. यांचा स्वतंत्र बाणा असतो. एक प्लास्टिकची पिशवी बरोबर असते. ती गवतावर ठेवून ( गवत ओले असते रात्री पाणी मारल्याने) पद्धतशिर योगासने सुरू. डोळे मिटून ओम वगैरे. सूर्याकडे तोंड.
४) आठेक वाजता गप्पिष्ट गट येतात सहासातजण एकमेकास ओळखणारे. ठराविक बाकडे पकडणार. तिथे कोण उपरा बसलेला (मी) असला की अवतीभवती घोटाळत राहाणार. ते लगेच ताडून मी पुढेच गवतावर फतकल मारतो. ग्रहण सुटते. चारजण बसतात दोनतीनजण "मी पाच फेय्रा मारून आलोच". सध्याच्या घडामोडींवर चर्चा.ठरलेल्या वेळेला निघणार.
५)साधारण याचवेळी नोकरदार तरुणी येतात. कामावर जाताजाता चारपाच फेय्रा मारून स्टेशनकडे जातात.
६) यानंतर गुजराती ग्रुप येतो. पांढरा लेंगासदरा. पासष्टी पुढचे. सन्यास घेतलेले ( अयाचित व्रत करून असतात. घरात काही मागायचे नाही. आंघोळीचे पाणी काढून दिले की आंघोळीला जायचे. दिलेले कपडे घालायचे.मला भूक लागली म्हणायचे नाही. दिलेले मुकाट्याने गिळायचे. चार तास बाहेर टळून घरातल्यांना मोकळे करायचे *) बारातेरा जणांचा गट असतो. एक मोठे वर्तुळ करून गवतावर बसतात. शांतपणे एकेकजण बोलतो. व्यायामवगैरे काही नाही करत. दहाची शिट्टी झाली की बागेच्या बाहेरच्या कट्ट्यावर थोडावेळ बसतात.
७)संध्याकाळसाठी साडेचारला बाग उघडली की साडेपाच वाजता चालणारे पुन्हा हजर होतात पण हे थोडे घाइवाले नसतात.
८) काही एकटेदुकटे भारदस्त लोक येऊन बाकड्यावर बसतील.जास्ती ओळखी वगैरेच्या मागे नसतात. बहुधा ( केंद्रीय पेन्शनर असावेत) सरकारच्या बाजूनेच बोलतात. किंवा एखाद्या ओळखीच्या माणसाबरोबर गप्पा मारतील. "हल्ली काय चारदोनवेळा फासफुस करून प्राणायाम करतो सांगणारे फार झालेत. शास्त्रोक्त करावं लागतं वगैरे आकृतिबंध मतं असतात."
९)बछड्यांना घेऊन येणारे पालक त्यांच्याशी बोल खेळणारे आताच येतात. झोपाळा ,घसरगुंडीवर खेळवून निघतात.
१०)आता जे कोणी ज्येष्ठ नागरिक येतात ते बाकड्यावर बसतील ,गटातल्या अप्पा अण्णांची वाट पाहतील,अरे आज हे नाही वाटतं?"गावी गेलेत?" गप्पा झाल्या तरी एक डोळा घड्याळावर असतो. "मला गेलं पाहिजे, इतक्या वाजता या सूनबाई सांगून गेलीय."
आजकाल हिरवळ बघायला कोणी बागेत जात नाही. कोणी हिरवळ पाहण्यासाठी जात असेल तर त्याला माझा नमस्कार सांगा.

मुक्तकमौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Dec 2016 - 4:13 pm | पैसा

मस्त निरीक्षणे

माझीही शॅम्पेन's picture

25 Dec 2016 - 6:25 pm | माझीही शॅम्पेन

एक नंबरी .... भारी लेख आणि भारी निरीक्षण

असाच लेख मी जिम मधील प्राण्यांवर लिहिला होता (फुकट जाहिरात करून घेतो )

http://www.misalpav.com/node/36482

छ्या! घाम गाळून केलेल्या कामाचं कौतुकच नाही राहिलं हल्ली!
ही प्रेरणा कशी विसरलो?

माझीही शॅम्पेन's picture

26 Dec 2016 - 12:26 pm | माझीही शॅम्पेन

कंकाका छान आहे की लेख ,
थोडी थोडी मध्येच ब्राह्मण-मराठा, पुणेकर (कसे आळशी) , अनहिता (कश्या डांबिस) अस काही लिहिल असत तर जास्त TRP मिळाली असती (पळतो आता ....)

पिलीयन रायडर's picture

27 Dec 2016 - 12:01 pm | पिलीयन रायडर

=))

काय मस्त लिहीलंय!!!!!

माम्लेदारचा पन्खा's picture

28 Dec 2016 - 11:53 pm | माम्लेदारचा पन्खा

अचूक निरिक्षण काका !

खटपट्या's picture

29 Dec 2016 - 1:04 am | खटपट्या

जबरा लीहीलंय काका.

मदनबाण's picture

30 Dec 2016 - 8:55 pm | मदनबाण

मस्त निरिक्षण ! :)
चपला काढुन गवताच्या दवावर चालणारे सुद्धा असतात... काही छान फुल पाखरांचे दर्शन सुद्धा होते. ;)
हल्ली पार्कात बाकड्यांनवर बसुन मोबाईलच्या डिस्प्लेत जग शोधणारे नमुने सुद्धा भरीस पडले आहेत...

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- The Weeknd - Starboy (official) ft. Daft Punk

हिरवळ म्हंजी नेमकं काय?